संपादकीय

गेल्या काही वर्षांत जग जास्त जास्त जवळ आलं आहे. त्यामुळे सगळ्या देशांमध्ये ब-याचशा संस्कृतीतले पदार्थ आपल्याला खायला मिळतात. शिवाय माणसाच्या भटक्या, प्रवास करण्याच्या प्रवृत्तीमुळे अनेक पदार्थ दूरवरच्या अनेक प्रदेशांमध्ये पोचले आहेत, नव्हे ते जणू काही तिथलेच आहेत असे स्थिरावले आहेत. खाद्यसंस्कृतीवर अनेक घटकांचा परिणाम होत असतो. एखादा मानव समूह एखाद्या देशातून दुस-या देशात जातो तेव्हा बरोबर आपल्या देशातले, प्रदेशातले पदार्थ, खाद्यसंस्कृती घेऊन जात असतो. शिवाय ज्या नव्या प्रदेशात जातो तिथली खाद्यसंस्कृतीही तो आत्मसात करत असतो. आणि तो ज्या प्रदेशात गेला आहे त्या प्रदेशातले लोकही त्याची संस्कृती आपलीशी करत असतात. या सगळ्या सरमिसळीतून आणखीनच नवीन खाद्यसंस्कृती तयार होत असते. उदाहरणार्थ – कॉफी ही मूळची इथियोपियन. पण आज युरोपातल्या ब-याचशा देशांचं कॉफी हे जणू राष्ट्रीय पेय झालं आहे. भारताच्या दक्षिण भागात मिळणारी फिल्टर कापी ही भारतीय नाही असं म्हणण्याची कुणी हिंमत करेल काय!

खाद्यसंस्कृती सातत्यानं उत्क्रांत पावत असते. त्यात कालानुरूप बदल होत जातात. आपल्याच देशातली एक गमतीची गोष्ट बघा – आपण उपासाला जे पदार्थ खातो त्यातला एकही पदार्थ मूळचा भारतीय नाही. खिचडी किंवा वड्यांसाठी वापरला जाणारा साबुदाणा हा मूळचा ब्राझिलचा. उपासाच्या प्रत्येक पदार्थाला चवदार बनवणारा शेंगदाणा हा मूळचा अर्जेंटीना आणि बोलिवियातला. तर हिरवी मिरची मूळची अमेरिका खंडातली, ती पोर्तुगीजांनी भारतात आणली. बटाटा हा मूळचा पेरू आणि बोलिवियातला तर रताळं मूळचं दक्षिण अमेरिकेतलं. भगर किंवा वरीचे तांदूळ हे मूळचे उत्तर अमेरिकेतले. आता बघा, या सगळ्या मूळच्या परदेशी पदार्थांना आपण इतकं काही आपलंस केलंय की त्यांना आपण आपल्या संस्कृतीत मानाचं स्थान दिलं आहे.

खाद्यसंस्कृती म्हणजे नेमकं काय? फक्त खाद्यपदार्थ? तर नाही. माझ्या मते खाद्यसंस्कृती म्हणजे एखाद्या प्रदेशातले खाद्यपदार्थ, ते तयार करण्यासाठी लागणारे घटक पदार्थ, त्यांची पैदास, त्याभोवती तयार झालेल्या दंतकथा, त्याभोवती गुंफली गेलेली गाणी, कथा, त्या विषयावर काढली गेलेली चित्रं, त्यावरून तयार झालेल्या म्हणी, प्रथा आणि परंपराही. या सगळ्यांचं एकत्रित मिश्रण म्हणजे त्या प्रदेशाची खाद्यसंस्कृती असं मला वाटतं. या सगळ्यांचा मेळ झाल्यामुळेच ती खाद्यसंस्कृती वैशिष्ट्यपूर्ण अशी होते. रंगीबेरंगी होते.

खाणं ही माणसाची मूलभूत गरज तर खरीच पण त्याचबरोबर माणसाच्या स्वभावावर खाण्याचा फार मोठा प्रभाव असतो. मनासारखं खायला मिळणं ही फार मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. मनाच्या स्थितीनुसार माणसाला खाण्याची इच्छा होते किंवा इच्छा जाते. आनंदात असलेला माणूस बरेचदा समोर येईल ते आनंदानं खातो. याउलट जर माणूस दुःखात, वेदनेत असेल तर पंचपक्वानांचं जेवणही त्याला गोड लागत नाही. अन्न ही आदिमानवाची मूलभूत गरज होती. केवळ पोट भरण्यासाठी तो खायला लागला. त्यातही शिकार करणं हे त्याला गवसलेलं पहिलं कौशल्य. पोट भरण्यासाठी खाणं ते वेगवेगळ्या चवीढवीचं खाणं हा केवढा मोठा प्रवास मानवजातीनं केलेला आहे! आणि तो सगळा प्रवास बघणं, अनुभवणं किती रंजक आहे.

जागतिक खाद्यसंस्कृतीवर एक अंक काढावा असं फार दिवसांचं मनात घोळत होतं. कारण मुळात खाणं आणि खाद्यसंस्कृती हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. शिवाय मी फूड ब्लॉगही लिहिते. त्यामुळे जगभरात अनेक मित्रमैत्रिणी झाले आहेत. जे वेगवेगळ्या देशांमध्ये राहतात, प्रवास करतात, तिथले पदार्थ जिव्हाळ्यानं चाखून बघतात. त्यामुळे ते या अंकासाठी मदत करतील अशी खात्री होती. आणि त्यांनी माझी ही अपेक्षा पूर्णही केली. हा अंक जागतिक खाद्यसंस्कृती विशेषांक आहे. पण यातले लेख वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींचा काटेकोर, शास्त्रीय विचार करणारे लेख नसून ते व्यक्तिगत अनुभवांवर आधारीत ललित लेख आहेत. हे लेख लेखकाला ती विशिष्ट खाद्यसंस्कृती कशी दिसली त्याबद्दल आहेत, पण त्यामुळेच ते अधिक रंजक झाले आहेत. तर काही लेख हे जगभरातल्या खाद्यसंस्कृतींत कॉमन असलेल्या पदार्थांबद्दल आहेत. काही लेख हे खाद्यसंस्कृतीचा सांस्कृतिक आढावा घेणारे आहेत.

जगातल्या बहुतेक देशांमधल्या खाद्यसंस्कृतींमध्ये काही घटक सारखेच आढळतात. ब्रेड, बटाटा, मीठ, साखर, तेल आणि दारू हे ते घटक. जगभरातल्या विविध देशांमध्ये वेगवेगळ्या त-हेचे ब्रेड वापरले जातातच. मग भारतातली पोळी, भाकरी, थालिपीठ असोत की इटलीतला फोकाचिया की इथियोपियातला इंजेरा. साधारणपणे मांस किंवा भाज्या वापरून केलेलं कालवण आणि बरोबर ब्रेडचा प्रकार असंच रोजचं सर्वसाधारण जेवण जगभरात आढळतं. जगातल्या ब-याचशा देशांमध्ये भातही खाल्ला जातो पण ते प्रमाण ब्रेडपेक्षा कमी आहे. जेवणातल्या स्निग्ध घटकांची गरज भागवण्यासाठी तेलाचा वापरही जगभर केला जातो. काही ठिकाणी ऑलिव्ह ऑइल, काही ठिकाणी तेलबियांचं तेल तर काही ठिकाणी शी बटरसुद्धा वापरलं जातं. मार्गरीन, बटर, लोणी हेही याच वर्गात मोडतात. चवीसाठी मीठ आणि साखर सगळीकडेच वापरलं जातं.

दारू किंवा मद्य हाही खाद्यसंस्कृतीचा एक महत्वाचा घटक. आपल्या देशात अजूनही दारू पिणं ब-याच ठिकाणी कमीपणाचं मानलं जातं. दारू पिण्याचा संबंध आपण नशा करण्याशी जोडतो, काही अंशी जरी ते खरं असलं तरी ते सर्वार्थानं खरं आहे असं म्हणता येत नाही. ब-याच देशांमध्ये दारू हा खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. तिथले लोक जेवताना मद्य घेतात. अनेक देशांमध्ये प्रचंड थंडीपासून बचाव करण्यासाठी मद्याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ रशियात इतकी प्रचंड थंडी असते की व्होडका हे त्यांचं रोजचं पेय आहे. शिवाय अनेक पदार्थांच्या पाककृतींमध्येही मद्याचा वापर केला जातो. अनेक प्रकारचे पास्ता, रिसोटो करताना सर्रास वाइनचा वापर केला जातो. फिश अँड चिप्स करताना बियरमध्ये भिजवलेल्या पिठाचा वापर केला जातो. शिवाय ब-याच देशांमध्ये माफक प्रमाणात, रूचीनं मद्य घेतलं जातं. मद्य तयार करणं आणि ते विशिष्ट प्रकारानं पिणं हेही एक शास्त्र आहे, त्यामुळे मद्यविषयक लेखांचा समावेश जर या अंकात केला नसता तर अंक अपूर्ण राहिला असता.

पारंपरिक छापील दिवाळी अंकात असा विषय घेणं थोडं कठीण झालं असतं. पण डिजिटल माध्यमाची आणि सोशल मीडियाची ही ताकद आहे की जगातल्या कानाकोप-यातल्या लोकांशी लगेचच संपर्क करता येतो. शिवाय जर काही बदल हवे असतील तर ते ताबडतोब करणं शक्य होतं. मराठीमध्ये यापूर्वी असे काही प्रयत्न झालेले असतीलही. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर इतक्या वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींबद्दल माहिती मिळणं, तीही मराठीत, ही महत्वाची घटना आहे.

या अंकात जाणीवपूर्वक मराठी खाद्यसंस्कृतीचा समावेश केलेला नाही. याचं कारण आतापर्यंत मराठी खाद्यसंस्कृतीवर खूप लिहिलं, बोललं गेलेलं आहे. त्यामुळे पुन्हा तेच समाविष्ट करण्यात मला रस नव्हता. पण असे काही लोकसमूह आहेत की ज्यांच्या खाद्यसंस्कृतीबद्दल आपल्याला फारसं माहीत नाहीये. अशा काही लोकसमुहांच्या खाद्यसंस्कृतीबद्दल मात्र अंकात लिहिलं गेलंच पाहिजे असं वाटत होतं. त्यातला एक महत्वाचा लोकसमूह म्हणजे आदिवासी. महाराष्ट्रातले आदिवासी म्हटले की लगेचच डोळ्यांसमोर गडचिरोलीतले माडिया गोंड आदिवासी आले. आणि गडचिरोली म्हटलं की अभय आणि राणी बंग यांची सर्च संस्था आणि त्यांनी आदिवासींसाठी केलेलं प्रचंड महत्वाचं कामही डोळ्यासमोर आलं. माझी ज्येष्ठ मैत्रीण मेधा कुलकर्णी ही गेली २५ वर्षं बंग दांपत्यांला ओळखते. शिवाय तिनं त्यांच्याबरोबर कामही केलेलं आहे. तिच्यामुळे आम्हाला राणीताई बंग यांना भेटायला, त्यांच्याकडून आदिवासींबद्दल माहिती करून घेण्याची खरोखर सुवर्णसंधी (इथे मी खरोखर म्हणते आहे कारण मला फारशी विशेषणं वापरायला आवडत नाहीत) मिळाली. त्यांनी आणि त्यांच्या सहका-यांनी आम्हाला दुर्गम आदिवासी भागात फिरवलं, ते आम्हाला तिथल्या घराघरांमध्ये घेऊन गेले. ते बरोबर असल्यानं आम्हाला आदिवासी खाद्यसंस्कृतीबद्दल सहजतेनं जाणून घेणं शक्य झालं. त्यांचे आभार मानावेत तितके कमी आहेत.

हा अंक शक्य तितका समावेशक व्हावा असं मनापासून वाटत होतं. गंमत म्हणजे परदेशातल्या ब-याचशा संस्कृतींबद्दल लेख मिळाले पण भारतातल्या ब-याचशा प्रदेशांबद्दल, लोकसमुहांबद्दल, संस्कृतींबद्दल म्हणावे तितके लेख, माहिती मिळाली नाही. याची खंत मात्र वाटते आहे.

नेहमीच्या अंकांसारखेच या अंकासाठीही आम्ही काही व्हिडिओ तयार केले आहेत. त्यात मराठी साहित्यातले खाद्यविषयक लेख, कथा हे तर आहेतच. शिवाय रूचिरासारख्या आद्य आणि गाजलेल्या पाककृतीविषयक पुस्तकांमधले उतारेही आहेत. हे अभिवाचन अतुल परचुरे, अजित भुरे, सीमा देशमुख, चिन्मयी सुमीत, कौशल इनामदार, अस्मिता पांडे आणि मी केलेलं आहे. मुस्लिम खाद्यसंस्कृतीबद्दल खाद्यसंस्कृती अभ्यासक मोहसिना मुकादम यांनी दिलेली रोचक माहिती आहे,  मालिकांमधलं स्वयंपाकघर याविषयी अभिनेत्री शुभांगी गोखले यांचे रंजक अनुभव आहेत, स्कॉचबद्दलचं हृषीकेश जोशी यांचं चिंतन आहे, ब्रेडबद्दल सई कोरान्ने-खांडेकर यांची मुलाखत आहे. आदिवासी खाद्यसंस्कृतीबद्दल तर लहानशी डॉक्युमेंटरीच आहे. आणि अंकाचं खास आकर्षण आहे ते म्हणजे लेखक महेश एलकुंचवार यांच्याशी स्वयंपाकाबद्दल मारलेल्या गप्पा. ते स्वतः उत्तम स्वयंपाक करतात. आणि यावर्षीच्या दिवाळी अंकासाठी काहीतरी नक्की देईन असं त्यांनी मला सांगितलं होतं. मी तो वर लगेचच मागून घेतला!

या अंकात विनामोबदला सहभागी व्हायला सगळ्यांनी अतिशय पटकन होकार दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानावेत तितके कमीच आहेत. या अंकासाठीचा सर्व व्हिज्युअल कंटेंट प्रसाद देशपांडे यानं केलेला आहे. प्रसाद गेले तीन अंक माझ्याबरोबर काम करतो आहे आणि तेही कुठल्याही अपेक्षेशिवाय. अंकासाठी संपादन साहाय्य केलं आहे मेधा कुलकर्णी आणि दिवाकर देशपांडे यांनी तर मुद्रित शोधन केलं आहे शिवानी ओक यांनी. या सगळ्यांची मी मनापासून ऋणी आहे.

यापूर्वीचे अंक अगदीच बेसिक होते. अर्थात त्यातलं साहित्य उत्तम दर्जाचंच होतं कारण त्यात तडजोड करायची नाही हे ठरलेलंच आहे. पण जर उत्तम तंत्रज्ञान वापरून उत्कृष्ट दर्जाचे अंक काढायचे असतील तर पैशांची गरज असते. या अंकाला टाटा कॅपिटलनं काही अर्थसहाय्य दिलेलं आहे. त्याबद्दल मी टाटा कॅपिटल आणि त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप बांदिवडेकर  यांची मी ऋणी आहे. या तसंच पुढच्या अंकाला अर्थसाहाय्य मिळवण्यासाठी मी Crowd Funding घेते आहे. त्यासाठी ज्यांचा ज्यांचा हातभार लागला आहे त्यांची मी मनापासून आभारी आहे.

हा अंक मनापासून केलेल्या कष्टातून साकार होतो आहे याचा आनंद तर आहेच, शिवाय तुमचा कसा प्रतिसाद मिळेल याची उत्सुकता, अधिरता आहे. अंक वाचा, सविस्तर प्रतिक्रिया कळवा, आपापल्या मित्रमैत्रिणींबरोबर, सुहृदांबरोबर, नातेवाईकांबरोबर अंकाची लिंक शेअर करा.

दिवाळीच्या खूप शुभेच्छा!

सायली राजाध्यक्ष

img-20160708-wa0009

फूड आणि लाइफस्टाइल ब्लॉगर. २०१४ पासून डिजिटल कट्टा या अनियतकालिकाचं संपादन करते. आकाशवाणी आणि दूरदर्शनला अनेक वर्षं अनुवादक, संपादक, वृत्तनिवेदक म्हणून काम केलेलं आहे. काही पुस्तकांचा इंग्रजीतून मराठीत अनुवाद.

इ-मेल – sayali.rajadhyaksha@gmail.com