एका चवीचं जन्मरहस्य उलगडताना

आशय गुणे

दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मुंबईत, ‘मरिन लाईन्स’ला ‘ग्रीन ओनियन’ ( Green Onion) नावाचे एक रेस्तरॉ आहे. त्या वेळेस मी एका ‘ऑनलाईन ट्रॅव्हल मार्केटप्लेस’ असलेल्या कंपनीत कामाला असल्यामुळे या रेस्तरॉशी संबंधित असलेल्या ‘हॉटेल सपना मारिन’शी माझा व्यावसायिक संबंध येत असे. तिथल्या भेटीच्या वेळी माझ्या लक्षात आलं की, या रेस्तरॉमध्ये नायजेरियन पद्धतीचं जेवण मिळतं. त्यामुळे बरेच नायजेरियन लोक इथे ‘घरचं’ जेवायला म्हणून येतात आणि हॉटेलमध्ये राहायला देखील! आपण ‘रिसेप्शन डेस्क’ला जाऊन उभं राहिलो की हमखास कुणीतरी नायजेरियन व्यक्ती दिसतेच दिसते. अशाच एका भेटीच्या वेळी ‘एकदा खाऊन बघा’ असं आमंत्रण मला मिळालं. पुढे काही दिवसांतच मी ते स्वीकारलं.

या रेस्तरॉबद्दल बऱ्याच फूड ब्लॉगर्सनी त्यांच्या ब्लॉग्समध्ये, वर्तमानपत्रांमध्ये लिहिल्याचं माहीत होतं. त्या दिवशी मी तिथे एक वेगळ्या प्रकारचा चिकन राईस खाल्ला. त्याचे नाव जोलफ राईस विथ चिकन (Jollof Rice with Chicken). त्या दिवशी जेवताना आणि या पदार्थाची विलक्षण चव अनुभवताना एक गोष्ट जाणवली. मसाले आणि तत्सम घटक हे बोलीभाषेसारखे असतात. राईस आणि चिकन हे सर्वत्र आहे. पण त्यात चव आणतात हे मसाले!  एका विशिष्ट भागातील साहित्य जसं तिथल्या बोलीभाषेतील शब्दांमुळे किंवा तिथलं संगीत तिथल्या विशिष्ट लोकसंगीताच्या प्रभावाने खुलतं, एक विशिष्ट रूप घेतं, तसंच या पदार्थांचंदेखील. मैफल संपल्यावरदेखील मनात सूर रेंगाळत राहावेत तशी या ‘जॉल्लोफ’ची चव माझ्या जिभेवर रेंगाळली होती.

याचा प्रत्यय मला पुन्हा नंतरच्या वर्षी आला, २०१५ मध्ये!

वाशी, नवी मुंबई इथल्या ‘इनॉर्बिट’ मॉलमधलं ‘चिलीज’ (Chili’s) रेस्तरॉ. काही कामानिमित्त तिथे गेलो होतो. वीकएंड असल्यामुळे काहीतरी नवीन ट्राय करायची हुक्की आली होती. तसं मी आधीदेखील तिथे गेलो होतो. परंतु मित्रांबरोबर गेलो होतो. त्यामुळे गप्पांना प्राधान्य मिळालं होतं आणि ‘चव’ मागे राहिली होती. गाण्यात सूर अनुभवायचा असेल, तर तुम्हांला ते एकट्यानेच ऐकायला लागतं. तसंच एखाद्या पदार्थाची चव अनुभवण्यासाठी एक तर रसिक लोकांची कंपनी हवी. नाही तर ती एकट्यानेच जेवून अनुभवावी.

त्या दिवशी मी ऑर्डर दिली न्यू ऑर्लीयन्स जम्बलाया (New Orleans Jambalaya) या पदार्थाची. अतिशय उत्कृष्ट चव! तितकंच उत्कृष्ट प्रेझेंटेशन. पदार्थ आपल्यासमोर सर्व्ह केला गेल्यावर केल्यावर ‘वाह’ ही दाद येतेच! या डिशचं मेन्यूकार्डवरचं असलेलं वर्णन मी वाचलं. ते असं – Jazzy Blend of diced chicken, smoky Bacon, mixed veggies, all tossed in spicy Jambalaya rice and topped with sautéed shrimp. Sprinkled with our special blend of Cajun seasonings and sliced green onions.

एखादी धून ऐकली की यासारखं काहीतरी आपण आधी कुठेतरी ऐकलं आहे, असं आपल्याला बऱ्याच वेळेस वाटतं. या साम्यस्थळांचं वर्णन करता येत नाही, परंतु ती जाणवतात मात्र नक्की! तसंच माझं त्या वेळेस झालं. ही चव आपल्या परिचयाची आहे असं वाटलं. कुठे, कधी, केव्हा खाल्लं असावं आपण या चवीसारखं काहीतरी? आणि डोक्यात प्रकाश पडला!  ती चव मला घेऊन गेली थेट त्या नायजेरियन रेस्तरॉच्या ‘Jollof Rice’ कडे. मला खाद्यपदार्थांचे बारकावे माहीत नाहीत. पण ‘जाणवण्या’त एक वेगळीच शक्ती असते. त्यासाठी तुम्ही त्या क्षेत्रातलं तज्ज्ञ असायला हवं, असं नाही. तशी गरजच नसते. तर या जाणवण्याखेरीज मेन्यूकार्डवर लिहिलेल्या वर्णनातल्या काही विशिष्ट शब्दांनी माझं लक्ष वेधून घेतलं. Jazzy, Jambalaya, New Orleans, Cajun हे ते शब्द.

त्याच वर्षी मी ‘जॅझ’ या संगीतप्रकाराबद्दल वाचायला सुरुवात केली होती. जॅझ संगीत मला ऐकायला आवडतंच. पण हा संगीतप्रकार कसा आणि कुठे विकसित झाला, तेव्हाची सामाजिक परिस्थिती कोणती होती, हे समजून घ्यायला मी उत्सुक होतो. आणि वर लिहिलेले शब्द माझ्या वाचनात तेव्हा येत होते. Jazzy हा शब्द  जिवंत, उत्स्फूर्त, ताजं, टवटवीत, रंगीबेरंगी या अर्थाने वापरला जातो. Jambalaya ही अमेरिकेतल्या ल्युसियाना राज्यातली एक डिश आहे. या खाद्यपदार्थावर स्पॅनिश आणि फ्रेंच प्रभाव आहेत. न्यू ऑर्लीयन्स हे ल्युसियाना राज्यातलं एक शहर. आणि Cajun Cuisine ही एक खाद्यपद्धती, फ्रेंच भाषा बोलणाऱ्या लोकांची. हे फ्रेंच भाषक लोक मूळ कॅनडातल्या अकाडिया भागातले. तिथून  ब्रिटिशांनी त्यांना हाकलून लावलं आणि ते ल्युसियानामध्ये स्थायिक झाले.

जॅझ संगीत हे आफ्रिका, युरोप आणि अमेरिकन प्रवाहांचा एकत्रित परिपाक आहे. युरोपियन वसाहतवाद्यांनी जेव्हा अमेरिकेला लक्ष्य केलं तेव्हा त्यांनी त्यांच्याबरोबर अनेक आफ्रिकन लोकांना गुलाम म्हणून नेलं. न्यू ऑर्लीयन्स हे शहर फ्रेंच लोकांनी बांधलं. या शहरात फ्रेंच आणि स्पॅनिश प्रभाव मोठा आहे. या शहराने आणि एकूण ल्युसियाना या राज्याने अनेक युद्धं बघितली. ही युद्धं फ्रेंच आणि स्पॅनिश लोकांमध्ये झाली होती. शिवाय अमेरिकेचा स्वातंत्र्यलढादेखील होताच. या सगळ्या घडामोडींतून युरोपचा प्रभाव तिथे स्थापन झाला. त्याचबरोबर आफ्रिकेतून आलेले, तिथे गुलाम म्हणून राहणारे कृष्णवर्णीय लोक त्यांची संस्कृती इथे घेऊन आले होते. त्यात त्यांचं संगीत तर होतंच. राहणीमान आणि त्यांची खाद्यसंस्कृतीदेखील होती. युद्ध संपल्यावर तिथल्या सैनिकांनी आपली वाद्यं ( परेड वगैरेसाठी वापरली जाणारी) बाजारात विकली. ही वाद्यं तिथल्या कृष्णवर्णीयांनी विकत घेतली. या वाद्यांचा वापर त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या पारंपरिक आफ्रिकन वाद्यांबरोबर केला आणि या मिलाफातून जॅझ संगीताचा जन्म झाला. तसंच युरोपियन आणि आफ्रिकी खाद्यपद्धतींचा संकर होऊन आधी लिहिल्याप्रमाणे Jambalaya, Cajun इत्यादी खाद्यपदार्थ विकसित झाले. मी मागवलेल्या न्यू ऑर्लीयन्स जम्बलाया या डिशमध्ये युरोपचे प्रभाव असे मिसळले आहेत. आणि आफ्रिकी? त्यासाठी मी अगदी सुरुवातीला वर्णन केलेल्या Jollof Rice कडे पुन्हा एकदा जातो. ही डिश पश्चिम आफ्रिकेची खासियत आहे. नायजेरिया आणि घाना हे प्रमुख देश आणि त्याच बरोबर सेनेगल, लिबेरिया, कॅमरून इत्यादी देशांमध्ये या प्रकारचा भात खाल्ला जातो.

मला या दोन रेस्तरॉमध्ये खाल्लेल्या दोन पदार्थांमधली साम्यस्थळं अशी लक्षात आली. त्या चवींनी जणू माझा पाठलाग चालवला होता; आणि मला त्यांचं जन्मरहस्य उलगडलं होतं.

मानवी स्थलांतरं गेली अनेक शतकं होत आहेत. पुढे देखील होत राहतील. माणूस एका ठिकाणाहून दुसरीकडे जातो तेव्हा त्याच्याबरोबर त्याची खाद्यपद्धतीदेखील घेऊन जातो. जिथे जातो, तिथल्या पद्धतीमध्ये, जिथून गेला ती पद्धती बेमालूमपणे मिसळून एक नवीन खाद्यसंस्कृती जन्माला येते.

रेस्तरॉ हे आर्थिक फायद्यासाठी काढलेलं असतं. केली लोकांच्या मागणीप्रमाणे ते पदार्थ दिले जातात. पण एखादी डिश अशी सांस्कृतिक प्रभावांचा इतिहास उलगडणारी असते. हे सर्व प्रभाव एका ‘डिश’च्या रूपाने टेबलवर येतात. अनेक सांगीतिक प्रभावांना व्यासपीठ मिळाल्यावर त्यांना प्रस्थापित रूप प्राप्त होतं, अगदी तसंच !

काही महिन्यांनी जेव्हा मी पुन्हा एकदा न्यू ऑर्लीयन्स जम्बलाया खाल्लं, तेव्हा हे सारे वैश्विक प्रभाव आठवून अंगावर रोमांच उभे राहिले. जागतिकीकरण यापेक्षा वेगळं काय असतं ?

 

आशय गुणे

1

‘प्रथम’ ह्या संस्थेत ( NGO ) सोशल मीडिया मॅनेजर म्हणून कार्यरत. संगीत, लेखन, भाषांतर, राजकारण, अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी ह्यांची आवड

फोटो  – इंटरनेट फोटो     व्हिडिओ – YouTube

2 Comments Add yours

  1. mrin says:

    अफलातून. रोमांचक. आणखीही असं लिहू शकशील तू, संगीताच्या वाटेने जात जात खाद्यपदार्थांबद्दल.

    Like

  2. smpkri says:

    ग्रीन ओनियनची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! पुढच्या वेळेस जाऊन try करेन.

    Like

Leave a Reply to mrin Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s