एक प्याली चाय, कभी भी हो जाय!!

सायली राजाध्यक्ष

माझ्या लहानपणी मुलांनी चहा किंवा कॉफी पिणं चुकीचं समजलं जायचं. आताही अनेक आया मुलांना चहा-कॉफी पिऊ देत नाहीत. कारण चहा किंवा कॉफी ही उत्तेजक पेयं आहेत असं समजलं जायचं आणि जातं. आमच्या घरात मात्र लोकशाही असल्यानं माझी मोठी मुलगी रोज झोपताना चहा करून पिते तर धाकटी मुलगी सकाळी उठल्याबरोबर कोल्ड कॉफी पिते.

मी साधारणपणे तिसरी-चौथीत असल्यापासून चहा प्यायला लागले. माझे आजोबा मला त्यात जास्त दूध घालून द्यायचे. पण तो न पिता मी त्यांच्यासारखाच कमी दुधाचा चहा मागायचे. हळूहळू मी अट्टल चहाबाज झाले. मला स्वतःला देशी पद्धतीनं केलेला चहाच आवडतो. फरक एवढाच की मला तो सौम्य चवीचा लागतो. ही मी माझ्या वडीलांकडून उचललेली सवय आहे. त्यांना चहा आणि त्याचे वेगवेगळे प्रकार फार प्रिय आहेत. मला मात्र एकाच पद्धतीनं केलेला रोजचा चहा आवडतो. पाणी उकळलं की त्यात साखर आणि थोडंसं आलं घालायचं. एखादं मिनिट उकळलं की गॅस बंद करून चहा पावडर घालायची. चमचानं हलवून लगेचच तो चहा गाळायचा आणि त्यात किंचित दूध घालायचं असा चहा मला लागतो. मला तीव्र चवीचा, खूप उकळलेला, खूप दूध किंवा खूप चहा पावडर घातलेला चहा अजिबात आवडत नाही. त्यामुळे बाहेर कुठे गेल्यावर मी चहा प्यायला फारशी उत्सुक नसते. याचं कारण असं आहे की चहाची चव ही फार वैयक्तिक गोष्ट आहे असं मला वाटतं.

चहाची लागवड सर्वात पहिल्यांदा चीनमध्ये झाल्याचा उल्लेख आहे. सुरूवातीच्या काळात औषधी म्हणून चहाचा वापर केला गेला. नंतर नंतर लोकांना त्याची चटक लागली आणि तो लोकांच्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. २७३७ BC मध्ये चहाचा शोध लागला असं मानलं जातं. पण बराच काळ तो चीनपुरताच मर्यादित राहिला. आठव्या शतकात तांग राजघराण्याच्या काळात सामान्य लोकांमध्ये चहा पिण्याची पद्धत रूढ व्हायला सुरूवात झाली आणि चहा विएतनाम, कोरिया आणि जपानमध्ये पोहोचला. पंधराव्या शतकात डच लोकांनी आणि पोर्तुगीज मिशन-यांनी चहा चीनच्या बाहेर लोकप्रिय करायला सुरूवात केली. भारतात प्राचीन काळापासून औषधी कारणांसाठी चहा प्यायला जायचा खरा. पण ब्रिटिशांनी चहाची लागवड सुरू करून समस्त भारतीयांना चहाची सवय लावली. आता ती सवय इतकी मुरली आहे की भारतात घरोघरी, तिन्ही त्रिकाळ, कोप-याकोप-यांवर, ऑफिसमध्ये सतत चहा प्यायला जातो. सकाळी उठल्याबरोबर घराघरांमध्ये चहाचा दरवळ सुटलेला असतो.

चहासाठी चिनी भाषेत जे वर्णाक्षर वापरलं जातं ते आहे टे. त्याचाच अपभ्रंश होऊन पुढे त्याचा उच्चार टी असा झाला. तर कँटनीजमध्ये चहाला चा म्हटलं जायचं. पोर्तुगीजांनी चहाचा प्रसार करताना या उच्चाराचाही प्रसार केला. त्यामुळेच अरब देशांमध्ये, इराणमध्ये, भारतात चहाला चाय म्हटलं जातं.

चहामध्ये दूध आणि साखर घालूनपिण्याची पद्धत ब्रिटिशांनी रूढ केली. सुरूवातीच्या काळात चहावर फार कर लावला जायचा म्हणून चहाचा चोरटा व्यापार होत असे. पण पुढे ब्रिटिशांनी कर काढून टाकला आणि चहाला लोकमान्यता मिळाली. चहाला ऐतिहासिक महत्वही आहे. बॉस्टन टी पार्टीतूनच पुढे अमेरिकन क्रांती झाली.  चहाच्या व्यापारातली चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी भारतात चहाची लागवड सुरू केली. सुरूवातीच्या काळात कुमांऊ टेकड्यांवर आणि दार्जिलिंगमध्ये चहाच्या बागा लावल्या गेल्या. हळूहळू भारतात चहाची मोठ्या प्रमाणावर लागवड व्हायला लागली. आज भारत हा जगातला दुस-या क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे. तर आयर्लंड हा जगातला सर्वाधिक प्रमाणात चहा पिणारा देश आहे. आयर्लंडमध्ये रोज माणशी निदान ४ कप चहा प्यायला जातो.

photo-2

चहा हे झुडूप आहे. जर पानं खुडलीच नाहीत तर चहाचं रोपटं १६ मीटरपर्यंतही वाढू शकतं. पण झुडुपाची उंची जितकी कमी तितकं चहा खुडणा-यांना सोपं होतं. त्यामुळे कंबरेइतकं उंच झालं की पानं खुडायला सुरूवात केली जाते. झुडुपाच्या वरचा फक्त १-२ इंचाचा भागच खुडला जातो. पानं जितकी कोवळी तितका चहाचा दर्जा चांगला असतो. भारतात आता आसाम, सिक्कीम, हिमाचल, केरळ, तामिळनाडू आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर चहाची लागवड केली जाते. आसाम टी किंवा दार्जिलिंग टी हे चहाचे प्रकार जगभर लोकप्रिय आहेत.

 

आपल्याकडे चहा खूप लोकप्रिय, लोकमान्य आहे. पण त्याला हल्ली हल्ली सांस्कृतिक महत्व मिळायला लागलंय. फक्त वेगवेगळ्या प्रकारचे चहा मिळणारे टी लाऊंजेस आताशा लोकप्रिय व्हायला लागली आहेत. मुंबईत ताजमहल टी हाऊस नावाचा अप्रतिम टी लाऊंज आहे. बांद्र्यात फार सुरेख जुन्या पद्धतीचे बंगले आहेत. तशाच एका बंगल्यात हे ताजमहल टी हाऊस आहे. बंगल्याच्या इंटेरियरला धक्का न लावता, खोल्या तशाच ठेवून फार सुरेख रचना केली आहे या लाऊंजची. कोप-याकोप-यात प्रायव्हसी मिळेल अशी टेबलं आणि खुर्च्या ठेवल्या आहेत. बरोबर वाचायला भरपूर उत्तम पुस्तकं. तुम्हाला हवं असेल तर सोफ्यावर बसा, लाऊंज चेअरवर किंवा साध्या खुर्चीवर. पार्श्वभूमीवर अभिजात शास्त्रीय संगीत सुरू असतं. अदबशीर वेटर्स, विविध प्रकारचे गरम आणि थंड चहा आणि त्याबरोबर खायला काही मोजकेच पदार्थ. मी आणि माझा नवरा निरंजन अनेकदा तिथे जातो. तो मनानं ब्रिटिश असल्यामुळे त्याला ते सगळं वातावरण फारच भावतं. परवा मी आणि माझी मैत्रीण चिन्मयी गेलो होतो. अनेक दिवसांनी भेटलो होतो त्यामुळे बराच वेळ बसून गप्पा ठोकायच्या होत्या. मग तिनं काफिर लिव्हजचा गरम चहा आणि मी पाणी पुरी चहा (होय! पाणी पुरीच्या पाण्यात चहाचा अर्क घालून केलेलं पेय.) मागवला. तो अर्थात थंड होता. आणि बरोबर हायटीसाठी असतात तसे पदार्थ. ते खाऊन झाल्यावर गरम दार्जिलिंग ग्रीन टी. काय सुरेख संध्याकाळ गेली ती! ताजमहल टी हाऊसचं वैशिष्ट्य म्हणजे ते शास्त्रीय संगीताचे कार्यक्रमही करतात.

चीन आणि जपान या दोन देशांमध्ये चहाला फार पूर्वीच्या काळापासून सांस्कृतिक महत्व आहे. जपानचा टी सेरेमनी जगप्रसिद्ध आहे. जपानमध्ये अनौपचारिक चहापानाच्या कार्यक्रमाला चाकाई म्हणतात. या चहापानात चहाचा अर्क, पातळ चहा आणि हवं असेल तर अगदी हलकेफुलके पदार्थ सर्व्ह केले जातात. तर औपचारिक चहापानाच्या कार्यक्रमात, म्हणजेच चाजीमध्ये संपूर्ण जेवण, चहाचा अर्क, पातळ तसंच घट्ट चहा सर्व्ह केला जातो. घट्ट चहा किंवा थिक टीसाठी अतिशय उत्तम दर्जाची चहापत्ती वापरण्यात येते. आणि तो सगळ्या पाहुण्यांना एकाच बोलमध्ये सर्व्ह केला जातो. तर पातळ चहा किंवा थिन टी सर्व्ह करताना प्रत्येक पाहुण्याला स्वतंत्र बोलमध्ये चहापत्तीवर गरम पाणी ओतून देतात. जपानमध्ये टी सेरेमनीला आध्यात्मिकतेचा रंग आहे.

ब्रिटिशांनीही हायटीचा प्रघात रूढ केला. दुपारचा चहा आणि रात्रीचं जेवण यात बराच वेळ जात असल्यानं त्यावेळी चहाबरोबर काहीतरी खायला केलं जायचं. शिवाय सरंजामशाही ब्रिटिशांकडे त्यावेळी नोकर नसायचे म्हणजे ते घरी गेलेले असायचे. मग काहीतरी सोपे, सहज, घरातल्या बाईला करता येईल असे पदार्थ यावेळी केले जात. खरं तर दुपारचा चहा हा आरामात सोफ्यावर निवांत रेलून घ्यायची गोष्ट होती. पण हायटीचं स्वरूप आल्यावर तो डायनिंग टेबलावर घेतला जायला लागला. आता तर इंग्लंडमध्ये हायटी सर्व्ह करणारी रेस्टॉरंट्स आहेत. आणि भारतीय माणसाच्या खिशाला तो चांगलाच गरम आहे. हायटीबरोबर साधारणपणे फिंगर सँडविचेस, गरम स्कोन्स, होममेड केक आणि पेस्ट्रीज आणि वेगवेगळ्या प्रकारचे चहा सर्व्ह केले जातात. फिंगर सँडविचेसमध्ये मस्टर्ड आणि हॅम, काकडी, एग मेयनिज, स्मोक्ड सामन असे सँडविचचे वेगवेगळे प्रकार सर्व्ह केले जातात. तर चहामध्ये आसाम, दार्जिलिंग, अर्ल ग्रे, लापसँग सोचाँग हे प्रकार दिले जातात. काही रेस्टॉरंट्स जास्तीचा दर आकारून शँपेनही देतात.

आपल्याकडे जशा चहाच्या टप-या असतात तसे इराणमध्ये चायखाने असतात. इराणमध्ये चहा भारतातून गेला पण लवकरच त्यानं इराणचं राष्ट्रीय पेय म्हणून मान्यता मिळवली. इराणी लोक काळा चहा घेतात तोही साखर न घालता. पण चहा पिताना जिभेवर शुगर क्यूब ठेवून पितात. त्यामुळे तो चहा गोड लागतो. आम्ही काही वर्षांपूर्वी श्रीलंकेला गेलो होतो तेव्हा नुवारा एलिया या गावी गेलो होतो. या गावाला लिट्ल इंग्लंडच म्हणतात. ऐन एप्रिलमध्ये दिवसाचं तापमान १२ अंश सेल्सियस होतं. तर इथे ब्रिटिशांनी १८३४ मध्ये बांधलेल्या द ग्रँड या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो होतो. आम्ही तिथे पोचल्यावर वेलकम ड्रिंक म्हणून त्यांनी व्हॅनिला टी दिला. व्हॅनिलाचा मंद सुवास असलेला काळा, गरमागरम चहा. तो चहाही इराणी चहाप्रमाणे तोंडात शुगर क्यूब ठेवून प्यायचा होता. इतक्या थंडीत त्या चहाची चव इतकी अफलातून लागत होती की दुस-या दिवशी मी त्यांच्याकडे परत तो चहा मागितला. तर आम्ही तो फक्त वेलकम ड्रिंक म्हणून देतो असं त्यांनी सांगितलं. मला त्या चहाची चव इतकी आवडली होती की मी विनंती करून त्यांना मला तो चहा परत द्यायला भाग पाडलं.

भारतात सर्वसाधारणपणे उकळलेला चहा मिळतो. आपल्याकडे कोप-याकोप-यांवर दिवसाच्या कुठल्याही प्रहरी चहाचा ग्लास (हो ग्लासच!) हातात घेऊन लोक गप्पा मारत उभे असलेले दिसतात. यात अगदी कामगार वर्गापासून ते कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्हपर्यंतचे लोक असतात. आणि अशा प्रकारे चहा प्यायला कुणालाही कमीपणा वाटत नाही. मलाही कधीतरी असा उकळलेला मसाला चहा प्यायला आवडतो. कॉलेजमध्ये असताना मी आणि माझी मैत्रीण सोनाली आलं घालून उकळलेला कडक चहा करायचो आणि बरोबर जीभ भाजणारी तिखट बिकानेरी शेव खायचो. फार अफलातून लागतं हे काँबिनेशन! दैनिक मराठवाड्यात काम करत असताना काम टाळायचं असेल की मित्रमैत्रिणी आल्याचा बहाणा करून समोरच्याच टपरीवरचा कटिंग चहा प्यायला जाणं ही सोपी पळवाट होती. औरंगाबादच्या कडक उन्हाळ्यात, ४२ डिग्री तापमानात तो खळखळून उकळलेला चहा पिण्याची कल्पना आज नकोशी वाटते.

प्रवासात असताना असा चहा पिण्याची लज्जत काही औरच असते. भारताचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कितीही पहाटे किंवा कितीही रात्री या चहाच्या टप-या उघड्या असतात. मी दूरदर्शनला काम करायचे तेव्हा पहाटे ४.३० ला घरून निघायचे. दूरदर्शनची गाडी न्यायला यायची. मग आमचा पहिला थांबा असायचा तो दूरदर्शनच्या जवळच्या चहाच्या टपरीवर. तिथे तो उकळलेला मसाला चहा घेतला की काम करायला कशी तरतरी यायची. यावेळी कामावर निघालेले कामगार या टपरीवर चहा पित उभे असायचे. मी कॉलेजमध्ये असताना आम्ही डिसेंबरमध्ये राजस्थानला प्रवासाला गेलो होतो. पहाटे ५.३० ला प्रवास सुरू करण्याचा माझ्या बाबांचा शिरस्ता होता. तितक्या कडाक्याच्या थंडीत राजस्थानच्या गावांमध्ये पहाटे पहाटे घेतलेल्या मसाला चहाची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. मला कॉलेजमध्ये तर चहाचं इतकं व्यसन होतं की विद्यापीठात एमए करत असताना मी कँटीनला एकटी चहा प्यायला जाऊन बसत असे. पुढे उकळलेल्या चहामुळे फारच acidity व्हायला लागली म्हणून मग चहा कमी केला.

चहाचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रदेशानुसार, तिथल्या हवामानानुसार, तिथल्या चालीरितींनुसार, मिळणा-या घटक पदार्थांनुसार चहाची रेसिपी आणि म्हणूनच चवही बदलते. भारतातच बघा, दक्षिणेकडे चहापेक्षा कॉफीचं प्रस्थ जास्त आहे. त्यामुळे तिथला चहा त्याबद्दल काही खास बोलावं असा नसतो. पुढे महाराष्ट्रापासून वर चहा पिणारी राज्यं आहेत. मध्य भारतातल्या राज्यांमध्ये मसाला चहा लोकप्रिय आहे. काही ठिकाणी आलं तर काही ठिकाणी गवती चहा घालून चहा केला जातो. गुजराती लोक दालचिनी, सुंठ, मिरी, लवंगा घालून चहा करतात. काही लोक चहाचा मसालाही बनवून ठेवतात. महाराष्ट्रात मुख्यतः गायीचं आणि म्हशीचं दूध चहासाठी वापरतात. काही लोक शेळीचंही दूध वापरतात. ज्या भागात तिन्ही प्राणी दिसत नाहीत म्हणजे हिमालयाचा भाग तिथे याकचं किंवा मेंढीचं दूध वापरलं जातं. काश्मीरी चहा म्हणजे काहवा ही एक डेलिकसी मानण्यात येते. या चहामध्ये ग्रीन टी, केशर, दालचिनी, विलायची तर घालतातच पण बरेचदा सुगंधासाठी काश्मिरी गुलाबाच्या पाकळ्याही वापरतात. गोडपणासाठी मधाचा किंवा साखरेचा वापर करतात. शिवाय तो अक्रोड आणि बदामांबरोबर सर्व्ह करतात. हा चहा समोवर नावाच्या किटलीत बनवला जातो. हा चहा सर्वसाधारणपणे दूध न घालताच दिला जातो. क्वचित प्रसंगी वयस्कर लोकांसाठी त्यात दूध घातलं जातं. लहानशा, नाजूक कपांमध्ये हा चहा सर्व्ह केला जातो.

तिबेटीयन लोक बटर चहा घेतात. या चहाला ते पो चा म्हणतात. पारंपरिक पद्धतीप्रमाणे चहाची पानं, याकच्या दुधापासून काढलेलं लोणी, पाणी आणि मीठ घालून तो बनवतात. पण हल्ली गायीच्या दुधाचं लोणी सहज उपलब्ध होत असल्यानं त्याचाही वापर या चहात केला जातो. लोणी हा या चहातला महत्वाचा घटक पदार्थ असल्यानं हा चहा प्यायल्यानं ओठ कोरडे होत नाहीतच शिवाय उंचीवरच्या हवामानासाठी ज्या जास्त उष्मांकांची गरज असते तीही भागवली जाते. कामावर जाण्याआधी तिबेटी लोक हा चहा घेतातच. हा चहा बनवताना उच्च प्रतीच्या चहाची पानं अर्धा दिवस पाण्यात घालून गडद तपकिरी रंग येईपर्यंत उकळतात. नंतर हा अर्क सिलिंडरच्या आकाराच्या एका जगमध्ये घालतात. त्यात याकच्या दुधाचं ताजं लोणी आणि मीठ घालून चांगलं घुसळतात. नंतर मातीच्या कपांमध्ये हा चहा सर्व्ह केला जातो.

परवा आम्ही गडचिरोलीला गेलो होतो तेव्हा उराव आदिवासी घरात अप्रतिम असा चहा घेतला. या चहात त्या मुलीनं दारातलीच तुळशीची ताजी पानं, हळद, लिंबू, साखर आणि किंचित चहाची पावडर घातली होती. दूध अजिबात घातलं नव्हतं. या चहानं इतकी काही तरतरी दिली की बस्स!

भारतात जशी चहाच्या टप-यांची पद्धत आहे तशीच एक जुनी परंपरा इराण्यांच्या चहाच्या हॉटेलांची आहे. १९ व्या शतकात जे झोराष्ट्रीयन इराणी भारतात आले त्यांनी जागोजागी चहाची लहान हॉटेल्स उघडली. एकेकाळी मुंबईत सगळ्यात जास्त इराणी कॅफे होते. आज हैदराबादमध्ये सगळ्यात जास्त इराणी कॅफे आहेत. यांच्या कॅफेमध्ये मिळणारा चहा चवीला अप्रतिम असतो. त्याची चव वर्षांनुवर्षं बदलत नाही. मला घरच्या चहाच्या खालोखाल इराणी चहा आवडतो. या चहाबरोबर ब्रून मस्का अफलातून लागतो. ब्रून हा एक प्रकारचा कडक पाव असतो. त्याला भरपूर घरगुती पांढरं लोणी लावून देतात. हा पाव चहात बुडवून खाणं हा एक अतिशय आनंदाचा भाग असतो. या रेस्टॉरंट्समध्ये मटन समोसा, आकुरी, बेरी पुलाव हे पदार्थही मिळतात. इराण्यांच्या कॅफेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं फर्निचर. संगमरवरी टॉप असलेली नक्षीदार पायांची लहान टेबलं आणि त्याला मॅच होणा-या खुर्च्या अतिशय देखण्या दिसतात.

photo-1चहाचे जे लोकप्रिय प्रकार आहेत त्यात नेहमीचा चहा, ग्रीन टी, हर्बल टी, ब्लॅक टी, व्हाइट टी आणि ओलाँग टी असे प्रकार आहेत. आपण नेहमी जो चहा घेतो तो आसाम किंवा दार्जिलिंग चहा असतो. अर्थात उत्तम प्रतीची चहा पत्ती निर्यात झाल्यावर खाली उरलेला गाळ आपण पित असतो. आसाम चहा हा काहीसा स्ट्राँग असतो तर दार्जिलिंग चहा चवीला सौम्य असतो. हल्ली ग्रीन टी पिण्याची खूप फॅशन आहे. त्यात अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाण खूप असतं अशी दंतकथा आहे. पण त्यात काही तथ्य नसल्याचं डॉक्टर सांगतात. चहाची पानं वाळवताना त्यांना हवेत वाळू देतात. तेव्हा त्यांचे ऑक्सिडीकरण होतं. पण ग्रीन टी करताना चहाची पानं ओव्हनमध्ये किंवा पॅनमध्ये गरम करून झटपट वाळवली जातात. त्यामुळे त्यांचं ऑक्सिडीकरण थांबतं. पण या चहाचा सुगंध फार काळ टिकत नाही. ब्लॅक टी हा चांगलाच स्ट्राँग असतो. जगभरात जास्तीत जास्त ब्लॅक टी प्यायला जातो. त्याचा सुगंधही बराच काळ टिकतो. व्हाइट टी हा अतिशय दुर्मीळ प्रकार आहे. चहाची अगदी कोवळी पानं तोडून हा तयार केला जातो. त्यावर अतिशय कमी प्रक्रिया केली जाते. मात्र या चहाचा पूर्ण स्वाद येण्यासाठी तो गरम पाण्यात निदान ७-८ मिनिटं ठेवावा लागतो. हर्बल टी म्हणजे एखाद्या झाडाची पानं, फुलं, बिया, मूळं गरम पाण्यात घालून बनवलेला अर्क. चिनी जास्मिन टी याच प्रकारचाय किंवा जास्मिन टी मध्ये वाळवलेल्या जिरॅनियमच्या पाकळ्या घालूनही अशा प्रकारचा चहा बनवतात. ओलाँग हा खास चिनी चहा आहे. तो स्ट्राँग असतोच शिवाय तो ग्रीन आणि ब्लॅक अशा दोन्ही प्रकारांची कसर भरून काढतो. हा गैवान नावाच्या पात्रात बनवला जातो.

हल्ली आइस टीही बराच लोकप्रिय आहे. पीच, लेमन, एपल, मिंट असे वेगवेगळे प्रकार त्यात मिळतात. पण तो खरा चहा नव्हे. एखादं थंड पेय म्हणून प्यायला हे प्रकार बरे लागतात. पण चहा कसा हवा तर तरतरी देणारा, झोप उडवणारा, उत्साह देणारा.

चहाबद्दल जितकं लिहू तितकं कमीच आहे. सकाळी डोळ्यांवरची झोप आलं घातलेल्या चहाशिवाय उडत नाही. कुठल्याही गप्पांचं सत्र चहाशिवाय पूर्ण होत नाही. रात्री अभ्यास करताना चहा लागतोच. ऑफिसमधल्या सहका-यांबरोबर टपरीवर उभं राहून घेतलेल्या चहाची चव वेगळीच. प्रवासात स्टेशन आलं की चाय-गरमागरम चाय अशी आरोळी ऐकल्यावर तो उकळलेला चहा घ्यावासाच वाटतो. खूप कामात असल्यावर बाजूला स्ट्राँग चहाचा कप हवाच. पावसाळी रात्री जेवल्यानंतरही अर्धा अर्धा कप चहा प्यावासाच वाटतो. आणि थंडीत हातात उबदार चहाचा कप घेऊन खिडकीत बसणं तर परमानंदच. चहाला आपल्या आयुष्यात पर्याय नाही हे खरंच!

सायली राजाध्यक्ष

img_20160907_194653

फूड आणि लाइफस्टाइल ब्लॉगर, अनुवादक, संपादक. अन्न हेच पूर्णब्रह्म आणि साडी आणि बरंच काही हे ब्लॉग लिहिते. २०१४ पासून डिजिटल कट्टा या ऑनलाइन नियतकालिकाचं संपादन करते. अनेक वर्षं आकाशवाणी आणि दूरदर्शनला अनुवादक-संपादक म्हणून काम केलं आहे. काही पुस्तकांचा इंग्रजीतून मराठीत अनुवाद केलेला आहे.

फोटो – सायली राजाध्यक्ष (सौजन्य – ताजमहल टी हाऊस)    व्हिडिओ – YouTube

5 Comments Add yours

 1. Sneha Kale says:

  वाह!!! मजा आली… चहा द्यावा चहा घ्यावा, चहा जिवीचा विसावा…. हे गाणं माझी आजी म्हणायची त्याची आठवण झाली….

  Liked by 1 person

 2. SONALI SATALKAR says:

  Mastach, khup sundar varnan ani chaha baddal paripurna mahiti khaas shailit so mastach. Ha lekh vachtana mala itki tallaf Ali ki mi vachta vachtach lagech chaha karun pila , hyatach apratim lihilay hi pavti ali.

  Liked by 1 person

 3. Vidya Subnis says:

  चहाचे प्रकार व वर्णन मस्त लिहीलंय. आत्ताच चहा प्यायची तल्लफ आली. मी टर्कीहून मुलीने आणलेला apple tea करून प्यायलेला आहे. मस्त असतो.

  Liked by 1 person

 4. aparna ghotge says:

  wah sayli tai.
  Mastach lihila aahe. Khup abhyash purna. Tarihi intetesting. I amnot tea lover. Pan lekh vachun lagech wafalta chaha pyaychi iccha zali.

  Aparna Ghotge.

  Liked by 1 person

 5. Kshama warde says:

  Chaha baddal etaki kahi mahiti milel ase kharech watle nawhte. Mi aaj prathamach aapla blog wachla. Khip empress tar zalech pa bug fan pan zale
  Mala hi cooking khup aawad aahe. Malahi aaple Bhrtatil parprantat jaun prstyek gharst jaun tyanchya khadya padarth shikayla wa khayla nakkich aawadtil wa tyach barobar saglysna khilwayla pan aawadtil

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s