कला आणि खाद्यसंस्कृती

शर्मिला फडके

img_5542

कोणत्याही कालखंडात, कोणत्याही संस्कृतीत बनलेला खायचा पदार्थ हा कधीच एकेकटा येत नाही, तो आपल्या अंगभूत रंगपोतासहित त्या त्या प्रदेशातली धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक वैशिष्ट्ये सोबत घेऊन येतो. त्यातूनच खाद्यसंस्कृती विकसित होत जाते. मानवी इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडांमधील या खाद्यसंस्कृतीचे दस्तावेजीकरण लिखित माध्यमांमधून झाले, तसेच दृश्यमाध्यमांमधूनही झाले. अनेक ऐतिहासिक महत्त्वाच्या गोष्टी या चित्रांमधून जितक्या सुस्पष्टतेनं उलगडतात तितक्या कोणत्याही कागदपत्रांमधे लिहिलेल्या वर्णनांवरून नाही.

दृश्य संस्कृती विकसित होत असताना त्यातल्या प्रत्येक टप्प्यावर ‘अन्न’ हा विषय तपशिलवार पद्धतीने सर्वात जास्त एक्स्प्लोर केला गेला चित्रकलेमधे. प्रागैतिहासिक काळापासून आजच्या आधुनिक युगातील चित्रकारांनी आपल्या कलाकृतींमधून अक्षरश: तोंडात बोटे घालावी लागतील इतक्या वैविध्यपूर्ण पद्धतीने अन्नाचा वेध घेतला आहे. धर्म, पुराण, संस्कृतीतले अन्नाचे स्थान, विविध दैवतांशी असलेला त्यांचा संबंध, नैवेद्याचे प्रकार, त्यातले वैविध्य, होते गेलेले बदल.. खाद्यपदार्थांच्या त्यांच्या पाककृती, विविध प्रांत, प्रदेशांनुसार ते शिजवण्याचे, कापण्या-चिरण्याचे, तळण्याचे, परतण्याचे, घोळवण्याचे आणि खायचेही वेगवेगळे प्रकार, वाढण्याच्या पद्धती, अन्नपदार्थ ठेवण्याचे, ज्यातून खायचे त्या भांड्यांचे प्रकार, खाणारी माणसे, अन्न टिकवण्याचे प्रकार, मांस, मासे, चीज आणि भाज्या सुकवायच्या, खारवून ठेवायच्या, धूर द्यायच्या पद्धती, मधासारख्या नैसर्गिक प्रिझर्वेटीव्ह्जमध्ये घालून फ़ळे टिकवण्याच्या पद्धती, मांसाकरता प्राण्यांची शिकार, शेतातले पीक, झाडांची जोपासना, फ़ळांची तोडणी, फ़ळा-भाज्यांचा, मांसाचा व्यापार.. इत्यादी असंख्य प्रकार आजवर चित्रांमधून उमटले.

रोमन भित्तीचित्रांमधे आणि मोझॅक पेंटींग्जमधे फ़ळे, मद्याचे चषक, मांसाचे खाद्यप्रकार चितारलेले आहेत. त्याही आधी, आर्किऑलॉजिस्ट्सना इजिप्शियन पिरॅमिड्सच्या भिंतींवर खाद्यचित्रे सापडली आहेत. मृत्यूनंतरच्या प्रवासामधे या चित्रांमधले खाद्यपदार्थ मृत व्यक्तीचे पोषण करतात, असा त्यामागे समज होता. अतृप्त आत्म्यांना आनंद मिळावा म्हणून सुद्धा चवदार अन्न आणि वाईन यांची चित्रे भिंतीवर चितारली जात. खाद्यपदार्थ मृतात्म्यांना ओळखू यावे म्हणून ते ठेवण्याची भांडी शक्य तितक्या वास्तव पद्धतीने, नैसर्गिक रंगांचा आकर्षक वापर करून रंगवली जात.

adorable-art-work-on-wall-inside-the-egyptian-pyramid

चित्रांमधील खाद्यपदार्थ आणि त्यांच्यात घट्ट गुंफ़ल्या गेलेल्या सामाजिक संस्कृतीचा इतिहास युरोपियन आणि अमेरिकन पेंटींग्जमधून अतिशय चवदार पद्धतीने उलगडला गेला आहे.

images-5रेनेसान्स काळातील समृद्धी, खाद्यपदार्थांची विपुलता, चांगले पीकपाणी यांचे प्रतिबिंब कलेत पडले. खाणे, खाद्यपदार्थ हा चित्रांचा मुख्य विषय बनला. चर्चमधील धार्मिक चित्रांमधे लहानग्या येशूने हातात धरलेले सफ़रचंद आणि द्राक्षांचा घड, स्टील लाईफ़्समधली द्राक्ष, सफ़रचंद आणि भाजलेले, सोललेले ससे, चिमण्या, गुबगुबीत डच स्वयंपाकिणीने हातात उलटी धरलेली फ़डफ़डणारी कोंबडी, लिओनार्दोच्या लास्ट सपरमधलं, व्हॆन गॉघच्या पोटॅटो इटर्सच्या समोरचं, ब्रुगेलच्या पेझन्ट वेडिंगमधलं अन्न… युरोपियन पेंटींग्जमधे अशा वेगवेगळ्या संदर्भांतून खाद्यपदार्थ किमान चार शतकांपासून दिसत आहेत.

मध्ययुगात, प्राचीन ग्रीस आणि रोममधे मोठमोठ्या, खाद्यपदार्थांची रेलचेल असणा-या मेजवान्या देण्याची फ़ॅशन होती. मोझॅक, भित्तीचित्रे, तैलचित्रे अशा विविध माध्यमांमधे त्याचे संदर्भ उमटले. एम्परर हेद्रियनच्या तिव्होली इथल्या महालामधली मोझॅक प्रसिद्ध आहेत. त्यात माशांची हाडे, फ़ळांच्या साली, सुकामेव्याची टरफ़ले वगैरे मेजवानी झाल्यानंतर जेवणाच्या टेबलावरील पसाराही अत्यंत वास्तव चितारला आहे.

आपल्या कलाकृतींमधून अन्नाचं जास्तीत जास्त ग्लॅमरस दर्शन घडावं याकरिता क्लासिकल पिरियडमधल्या ग्रीक आणि रोमन कलाकारांनी आपलं कौशल्य पणाला लावलं. उच्च्भ्रू रोमन नागरिकांना आपण किती उत्कृष्ट दर्जाचं अन्न खात आहोत, आपल्या पाहुण्यांना खिलवत आहोत हे दाखविण्याची अतिशय हौस. आपली उदार आतिथ्यशीलता दाखवण्याचाही एक हेतू. साहजिकच त्या काळातल्या रोमन पेंटींग्जमधे ताज्या, रसरशीत फ़ळांनी, चीजने भरलेले काचेचे शोभिवंत वाडगे, वाईन बॉटल्स हे आवर्जून दिसतात.

leonardo_da_vinci_-_last_supper_copy_-_wga12732

ग्रीक आणि रोमन कलाकार आपल्या चित्रांमधे खाद्यपदार्थांचे चित्रण जास्तीत जास्त रिएलिस्टीक, हुबेहूब कसे होईल याचा बारकाईने विचार करत. ती त्यांच्याकरता अभिमानाची बाब होती. पेंटर इटालीच्या कोणत्या भागातून आला आहे हे त्या पेंटींगमधे रंगवलेल्या द्राक्षांच्या रंगावरून, आकारावरून ओळखता येई. महागडे, दुर्मीळ खाद्यपदार्थ, जसे की शेलफ़िश किंवा लिंबे, दुर्मीळ पक्षी, शिकार करून आणलेले प्राणी हे सगळे आपली प्रिव्हिलेज्ड लाइफ़स्टाईल दाखवायला चित्रांमधे मुद्दाम रंगवून घेतले जात.

आजही चित्र फ़ारसं बदललेलं नाही. आधुनिक स्वयंपाकघरांमधल्या रंगीत इलस्ट्रेशन्सनी सजलेल्या भिंती, रेस्त्रॉं, हॉटेल्समधल्या भिंतीवरची कलात्मक पेंटींग्ज, छायाचित्रे, लॅमिनेटेड पोस्टर्स या सर्वांमधे ताज्या, रसरशीत, भूक खवळून टाकणा-या अन्नाची, फ़ळांची, भाज्यांची मांडणी समृद्धीचे प्रदर्शनच करत असतात. इजिप्शियन्सचा होता, तसा ही खाद्यचित्रे आपले पोषण करतील असा समज जरी आता नसला तरी त्या चित्रांमधे नक्कीच संवेदनांना सुखावणारे, कम्फ़र्टींग असे काहीतरी असते. पेंटींग्जमधे खाद्यपदार्थ रंगवण्यामागे चित्रकाराचा हा हेतूही असतोच.

आपण जेव्हा पेंटींगमधले खाद्यपदार्थ किंवा स्टील लाईफ़मधली फ़ळे, भाज्या, ब्रेड वगैरेंच्या इमेजेस पाहात असतो तेव्हा हे केवळ नजरेला सुखावणारे खाद्यपदार्थ नाहीत, खरं तर एका मोठ्या खाद्यचित्र परंपरेमधली कडी आहे ही, अशा दृष्टीने पाहायला हवं.

d4d62ba9bfa7919e113c23225d64a855

सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला युरोपमधे चित्रकारांनी आपल्या आजूबाजूचे वास्तव जग आणि निसर्ग पेंटींगमधून चितारण्याला सुरुवात केली. तोवर दृश्यकलेचा वापर केवळ धार्मिक कारणांकरिताच केला जात असे. मध्ययुगीन अंधाराचा काळ संपलेला असला तरी अजूनही बहुतांश युरोपात चित्र आणि एकंदरीतच कला चर्चच्या भिंतीवर, छतांवरच रंगवायचा प्रघात होता.

खरं तर पंधराव्या शतकाच्या अखेरीस धार्मिक चित्रांमधला लोकांचा रस नाहीसा झाला होता, पण कलाकारांना आपल्या आजूबाजूच्या, ख-या जगातील विषय रंगवण्याची कितीही इच्छा असली तरी ते सहज शक्य नव्हतं. चित्रविषय धार्मिक पुराणांमधले, देवाधर्माशी निगडित असण्याची अट होती.

यातून मार्ग काढण्याकरिता मग काही चित्रकारांनी धार्मिक चित्रांमधेच दैनंदिन जग रंगवण्याची नामी क्लुप्ती शोधली. मुख्य धार्मिक विषयांच्या पार्श्वभूमीवर दुय्यम, शक्यतो प्रतीकात्मक पद्धतीने ते आपले रोजच्या जगण्यातले वास्तव चितारायला लागले. त्यातूनच चित्रांमधे झाडे, वेलींसोबत नैवेद्य म्हणून फ़ळे, मिठाया, वाईन, मांस इत्यादीचा समावेश होऊ लागला.

दुय्यम असले तरी हे जग जास्तीतजास्त कलात्मक, तसेच वास्तव पद्धतीने चित्रात उतरवण्याचा चित्रकारांचा प्रयत्न असे. त्याकरता त्यांचे निरीक्षणकौशल्य, रंग, रेषा, आकार, पोत चितारण्यातले कसब पणाला लागायचे. त्यामुळे हे आव्हानात्मकही वाटत होते त्यांना. 

butchers-stall

Peter Aertsen, Butcher’s Stall With the Flight into Egypt, 1551

१५५१ मधले एर्सेनच्या जोसेफ आणि मेरी यात्रेला जात आहेत, या विषयावरच्या चित्रामधे पार्श्वभूमीची सगळी जागा खाटकाच्या दुकानाने व्यापलेली आहे. अगदी तपशीलवार चित्रण त्यात केलेले आहे. मांसाचे भलेमोठे तुकडे त्यातल्या चरबी, स्नायूंसकट अगदी बारकाईने रंगवलेले आहे. चित्रकाराला मुख्य चित्रविषयापेक्षा हेच रंगवण्यात जास्त रस असल्याचं जाणवतं ते पाहून.

खाद्यपदार्थांच्या प्रतिकात्मक अर्थांचे संदर्भ त्याकाळच्या साहित्यातून घेतलेले असत. फ़ळे, सुकामेवा, सुगंधी वनस्पती आणि धान्ये हे शेतीजन्य पदार्थ पौराणिक ग्रंथांमधे देव-देवतांना नैवेद्य म्हणून अर्पण केले गेल्याचा उल्लेख असल्याने ते पवित्र आणि शुद्ध मानले जात.

मध्ययुगातील ख्रिश्चन, पेगन धर्मग्रंथांमधे असलेल्या सविस्तर वर्णनांनुसार धार्मिक चित्रांमधे त्याचा समावेश केला जाई. उदा. सेरेस देवतेला मक्याचे कणीस, गव्हाची लोंबी, काही देवतांना द्राक्षाचा ताजा रस, तर व्हिनस या सौंदर्यदेवतेला अभिलाषेचे प्रतीक या अर्थाने डाळिंब अर्पण केले जाई. त्यात अनेक बिया असल्याने जननक्षमतेचे, पुनर्जन्माचे, अमरत्वाचे तसेच बदलत्या ऋतूचे प्रतीक म्हणूनही डाळिंब फ़्लोरेन्टाइन पेंटर्सच्या चित्रांमधे आले.

incdh

देवतेला प्रसन्न करण्याकरिता त्याच्यासमोर सादर केलेल्या या खाद्यपदार्थांचे प्रकार चित्रांमधे दर काही वर्षांनी बदलले. त्यांच्या बदलामागची कारणे शोधत जाताना कला-इतिहासकारांना बदललेल्या भौगोलिक परिस्थितीची, सामाजिकतेची, रीतीरिवाजांची माहिती मिळायला लागली. काही वेळा एखाद्या फ़ळाचे किंवा खाद्यपदार्थाचे प्रतिकात्मक अर्थही पुढच्या पिढ्यांमधे बदलत गेले.

सोळाव्या, सतराव्या शतकात विकसित झालेला वैज्ञानिक, चिकित्सक दृष्टिकोन चित्रांमधेही दिसू लागला. त्यामुळे अन्नही जास्तीत जास्त खरेपणाने चित्रित व्हायला लागलं. दैनंदिन जीवनातल्या वस्तू आकर्षक पद्धतीने रंगवण्याकडे चित्रकारांचा कल वाढत होता. फ़ुलदाण्या, फ़ळांचे शोभिवंत, सुंदर वाडगे, खाद्यपदार्थांशी निगडित इतर वस्तू, माणसेही चित्रांमधे दिसायला सुरुवात झाली.मात्र या काळात फ़ूड पेंटींगमधे खऱ्या अर्थाने बाजी मारली डच रिएलिस्ट पेंटर्सनी. चित्रांमधील खाद्यपदार्थांचा विषय डच पेंटींग्जच्या उल्लेखाशिवाय सुरूही होऊ शकत नाही, इतके त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.

27877210_1214424338_snayders_ruybnaya_lavka

आधुनिक चित्रकलेच्या इतिहासात डच पेंटींग्जमधून पहिल्यांदा जाणीवपूर्वक खाद्यचित्रभाषा मांडली गेली. डच पेंटर्सनी रंगवलेली स्वयंपाकघरं, कोठारे, फ़ळे, भाज्या, मांस यांनी ओथंबलेले बाजार, चविष्ट खाद्यपदार्थांनी भरभरून वाहणारी मेजवानीची टेबले, बागेत, सुखद उन्हात केलेल्या न्याहाऱ्या.. ही सगळी डच फ़िल गुड पेंटींग्ज. नजरेला, रसना इंद्रियांना सुखावणारी.

आजही ती अतिशय आकर्षक आणि त्या काळातील खाद्य-संस्कृतीचं वास्तव चित्रण करणारी वाटतात.

१७ व्या शतकातल्या डच बरोक काळात समृद्धीच्या प्रदर्शनाकरिता स्टील पेंटींग्ज चितारली गेली. त्यामुळे मग अतिशय तपशिलात केलेले चित्रण, ऐषोरामी जीवनशैली, संपत्तीचं प्रदर्शन करायला फ़क्त श्रीमंतांनाच आस्वाद घेण्याची, परवडण्याची मुभा असलेले चैनीचे खाद्यपदार्थ, पेंटींगमधून ज्यांचा रसरशीतपणा जाणवू शकेल असे स्लाइस्ड हॅम, लॉबस्टर, रसाळ लिंबे आणि इतर खास मेजवानीयुक्त पदार्थ चित्रात दिसतात. वाडग्यांवरची चमकही पाहा!

१७ व्या शतकातल्या या डच फ़ूड पेंटींग्जमधूनच आजची मॉडर्न फ़ूड इमेजरी विकसित होत गेली. पुराणकथा, धर्म, वैद्यकीय इतिहास आणि पारंपरिक सामाजिक रीतीरिवाज या सर्वांच्या एकत्रित परिणामातून फ़ूड इमेजरी (खाद्य प्रतिमा) निर्माण होते. डच चित्रकारांच्या पेंटींग्जमधे खाद्यपदार्थांना महत्त्वाचे स्थान होते. त्यातून श्रीमंतांकरता खास अन्न, लैंगिक उत्तेजना देणारे अन्न, सामाजिक खाद्यप्रसंगी बनणारे अन्न, खाजगी मेजवान्यांमधला मेनू, जेवणाच्या दालनांमधील सजावट, पाळीव प्राण्यांचा तिथला वावर, बाटलीतले शुद्ध पाणी, स्वयंपाकघरांमधील स्वच्छता आणि व्यवहार अशा खाद्यप्रतिमा निर्माण झाल्या.

काही प्रतिकात्मक खाद्यप्रतिमाही असतात. त्यात लैंगिक प्रतिकात्मतेपासून बीभत्सता, रोमान्स, सामाजिक, आर्थिक पत, दर्जा, दर्शवणाऱ्या प्रतिमा दिसून येतात. कार्डिनने त्याच्या चित्रातल्या फ़्रेन्च पावाला केशरी फ़ुलांनी सजवले; त्यामागची प्रतिकात्मकता जाणून घेण्याकरिता कलाइतिहासकारांच्या चर्चा घडतात.

706px-willem_kalf_still_life_with_drinking-horn_c-_1653_oil_on_canvas_national_gallery

फ़्रान्स हालच्या पेंटींगमधलं पिकल्ड हेरिंग आणि सॉसेजेस स्त्री पुरुषांच्या लैंगिक अवयवांचे प्रतीक आहेत. आपल्या लैंगिक ताकदीचे प्रतीक म्हणून अंडी, सॉसेजेस, फ़ळे यांचा मुबलक वापर चित्रांमधे करायला धनिक चित्रकारांना भाग पाडीत.

आधुनिक चित्रकलेमधे खाद्य प्रतिकात्मकता सर्रिअल पद्धतीत चितारलेली जास्त दिसून येते.

गिसेप आर्चिम्बोल्द या सर्रिअल पोर्ट्रेट/स्टील लाइफ़ पेंटरची चित्रे वैचित्र्यपूर्ण आणि खिळवून ठेवणारी. त्याने फ़ळे, भाज्या, अगदी पुस्तकांचीही पोर्ट्रेट्स केली, ज्याचे इन्टरप्रिटेशन हे मोडकळलेल्या मनाचे तुकडे किंवा इटालीतल्या तत्कालिन श्रीमंतीच्या प्रदर्शन संस्कृतीवर केलेली टीका असे कलासमीक्षकांनी केले.

640px-giuseppe_arcimboldo_reversible_head_with_basket_of_fruit_c-_1590_oil_on_panel

 

 

Juan Sanchez Cortan, Still Life With Quince, Cabbage, Melon, and Cucumber, 1602-1603

 

8ff64590840a53949e94085c6f0386bc

खाद्यपदार्थांची स्टील लाइफ़्स हा तर सर्वच काळातल्या चित्रकारांच्या जिव्हाळ्याचा विषय. लालभडक सफ़रचंदे, कलिंगडाची कमनीय फ़ोड, तजेलदार टपोरी द्राक्षे, रसरशीत, केशरी आंबे वगैरेंची स्टील लाइफ़ करण्याचा मोह झाला नाही असा चित्रकारच विरळा. अगदी आजही स्टील लाइफ़मधली फ़ळे जास्तीतजास्त ताजी, रसरशीत आणि खरी कशी दिसतील याकरिता चित्रकारांचं कौशल्य पणाला लागतं.

 

maxresdefault Paul Cezanne, Un Coin de Table, 1895-1990

आधुनिक चित्रकलेमधे पॉल सेझां (१८३९-१९०६) या फ़्रेन्च आर्टिस्टने काढलेली फ़ळांची मनोवेधक पेंटींग्ज सुप्रसिद्ध आहेत. सेझां हा फ़ळांच्या स्टील लाईफ़ चित्रणातला मास्टरच. त्याच्या स्टील लाइफ़मधलं अन्नाचं चित्रण एकाचवेळी पारंपरिकही आहे आणि आधुनिकही. पारंपरिक अशा अर्थाने की त्याने रंगवलेली फ़ळं, भाज्या कोणत्या आहेत हे सहज ओळखता येतं, आणि आधुनिक आहेत कारण त्यांचं चित्रण कलात्मकरित्या केलं आहे, जसं आहे तसं या रेनेसान्स काळातल्या अन्नाच्या वास्तव चित्रणासारखं नाही.

सेझांचे ‘स्टील लाइफ़ विथ फ़्रूट बास्केट’ हे खाद्यचित्रांच्या स्टायलाइझ्ड रिप्रेझेन्टेशनचे आधुनिक काळातील महत्त्वाचे उदाहरण.

अतिशय आकर्षक पद्धतीने सजवलेल्या लाकडी टेबलावरचा पांढराशुभ्र टेबलक्लॉथ, त्यावरच्या फ़्रूट बास्केटमधे सफ़रचंद आणि पेअर्स. चित्राचं वैशिष्ट्य म्हणजे ही फ़्रूट बास्केट एकाच वेळी टेबलावर ठेवलेली आहे आणि त्या मागच्या जमिनीवरही टेकलेली आहे असं वाटतं. सेझांच्या पेंटींगमधलं मॉडर्न एलेमेन्ट आहे ते हे.

फ़ळांची अत्यंत सुंदर चित्रे म्हणून आजही सेझांच्या सफ़रचंदांच्या स्टीललाईफ़कडे पाहिले जाते.

ब्रुगेल, रेम्ब्रां, कार्डिन, मॅनेपासून आद्रियन कूर्त, पीटर ब्लूम ते पॉप आर्टिस्ट वॉरहॉलपर्यंत अनेक सुप्रसिद्ध आर्टिस्ट्सच्या चित्रांमधे खाद्यपदार्थांना महत्त्वाचे स्थान आहे. ब्रुगेलच्या चित्रात सामान्य, शेतकरी वर्गातली खाद्यसंस्कृती आहे. श्रमजीवी माणसांचं जेवण काय होतं ते त्यातून लक्षात आलं.

the-potato-eaters-1885-1

व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघने (१८५३-१८९०) आपली स्वत:ची खास इम्प्रेशनिस्ट शैली वापरुन पेंटींगमधलं अन्न अजरामर केलं. त्याचं पोटॅटो इटर्स तर कोणीही विसरणार नाही. स्टील लाइफ़ विथ क्वीन्सेस ऎन्ड लेमनसॆन्ड, स्टील लाईफ़ विथ काराफ़े ऎन्ड लेमन्स ही त्याची अजून काही पेंटींग्ज.

चित्रांमधे सर्वात जास्त ब्रेड, फ़ळे, वाईन, चीज इत्यादी खाद्यपदार्थ रंगवले जातात, कारण ते सहज उपलब्ध असतात आणि तुलनेने त्यांचा पोत, रचना, रंग कॅनव्हासवर अगदी ख-याचा आभास होईल अशा त-हेने त्यांना स्टील लाइफ़मधे उतरवता येते, त्यात जास्तीजास्त मनोवेधक आस्वादताही आणता येते. भुकेच्या, जिव्हालौल्याच्या आणि इंद्रियांना सुखावणा-या मुलभूत मानवी संवेदना चित्रांमधल्या खाद्यपदार्थांच्या चित्रणामधून जाणवून देणे हा फ़ूड आर्टमधला एक पुढचा, महत्त्वाचा टप्पा, ज्याने आज फ़ूड पॉर्नचे स्वरूप घेतले आहे.

 

पेंटर वेन थिबॉडच्या ‘केक्स’मध्ये त्याने अमेरिकेतल्या डेली शॉपमधील काउंटरवर असणारे मफ़िन्स, कपकेक्स आणि पाय रंगवले ते पाहाताना त्यात शारीर सौंदर्याचा भास होतो. डेझर्ट्सचे सरफ़ेस रंगवताना त्याने इम्पास्टो पद्धतीने केलेला रंगाचा वापर त्या पदार्थांना फ़्रॉस्टेड स्वरूप देतात. थिबॉडने त्याकरिता केलेली गुलाबी, फ़िक्या निळ्या, पिवळ्या रंगांची निवडही वैशिष्ट्यपूर्ण आहे.

images-1 

Pablo Picasso, Still Life With Chair Caning, 1912पिकासोच्या ‘द कॅफ़े टेबल’ या स्टीललाईफ़मधे त्याने केनच्या खुर्च्या, त्यावरची वृत्तपत्रे, लिंबे आणि दारुचे चषक यांच्या जागा, आकार, कोन यांची जी अदलाबदल, मोडतोड केली आहे ती त्याच्या क्लासिक क्यूबिस्ट शैलीची सुरुवात.

 

 

bodegon_10

Salvador Dalí, Eucharistic Still Life, 1952

सर्रिअलिस्ट आर्टिस्ट दालीचे बालपण स्पेनच्या समुद्र किनाऱ्यावर गेले, त्यावेळी पाहिलेले सी अर्चिन्स आणि इतर  समुद्री जीव त्याच्या या स्टीललाईफ़मधे खास दालीच्या वैचित्र्यपूर्ण, अद्भूत शैलीमधे दिसतात.

 

Bompas & Parr, 50 States of Jell-O

tatanakacreditalexandraconstantinides_1600_1200_85

 Antonio Lopez Garcia, Skinned Rabbit, 1972

अन्तोनिओ लोपेझ या स्पॅनिश पेंटरचे हे कटेम्पररी स्टाईलचे फोटोरिएलिस्टीक पेंटींग अनेक कारणांकरता गाजले. स्टील लाइफ़चा प्राचीन चित्रप्रकारच त्याने त्याकरता निवडला असला तरी यात चित्रविषय आणि मांडणी हिंस्र प्रकारात मोडणारी आहे.

skinned-rabbit-1972-lpez-garca-1361416180_org

आधुनिक चित्रकारांनी आपल्या पेंटींग्जमधे आधुनिक खाद्यपदार्थ रंगवले. समकालीन चित्रकार आपल्या पेंटींग्जमधे अन्न चितारतात ते मुख्यत: रचनाकौशल्य, प्रकाश, पोत यांना महत्त्व देऊन. कॅनव्हासवरच्या संकल्पनांमधे जिवंतपणा, वेगळेपणा आणण्याकरता अनेकांनी अन्नाचा वापर केला. पॉप आर्टिस्ट ऎन्डी वॉरहॉल याने अगदी सहज उपलब्ध असणारे सामान्य सूपचे कॅन्स रंगवून महत्त्वाचे सामाजिक भाष्य केले.

राल्फ़ गोइंग्जने टेबलावर एकत्र रचून ठेवलेले पदार्थ आणि खिडकीतून त्यांच्यावर पडलेला प्रकाश यातून चितारलेलं ए-१ सॉस हे चित्रही पाहावं असंच. त्यात फ़ूड आर्टला साजेसं फ़ारसं काहीच रोमॅन्टीक नाही. पण उजळ प्रकाशाच्या छटा, विविध आकार, रचना यातून एक अतिशय आकर्षक रचना तयार होते कॅनव्हासवर.

sauce

इजिप्शियन पिरॅमिड्समधील भित्तीचित्रे, प्राचीन रोमन, ग्रीक पेंटींग्ज, रेनेसान्स काळातील रसरशीत डच रिएलिस्ट पेंटर्सची चित्रे, मॉडर्न स्टील लाइफ़ पेंटींग्ज आणि पॉप आर्ट कल्चरमधले सूप कॅन्स आणि बर्गर्स, आणि कटेम्पररी आर्टिस्ट्सची फ़ूड इन्स्टॉलेशन्स.. चित्रकलेतील खाद्यकलेचा प्रवास दीर्घ आणि सातत्याने पुढे जाणारा आहे. त्याच्या अभ्यासातून आपल्याला या प्रत्येक कालखंडांविषयी, त्यातील सामाजिकतेविषयी ठोस अनुमाने काढणे सहज शक्य होते.

केनेथ बेन्दीनेर या कला-इतिहासकाराने पहिल्यांदा फ़ूड इन पेंटींग्जला कलेतील एक वेगळी वर्गवारी मानून या अनुषंगाने अभ्यास केला.

नजरेला सुखावण्याचे काम खाद्यपदार्थ आणि चित्रकला दोघांचेही आहे, त्यामुळे चित्रकलेत खाद्यपदार्थ चितारलेले असतात असे मानण्यापासून ते चित्रकलेतून खाद्यसंस्कृतीचा सामाजिक इतिहास, मानवी वर्तन अभ्यासता येते इथवर कला-इतिहासकारांचाही एक प्रवास आहे. मानवी इतिहासात अनेक युगं आली, युद्ध झाली, विध्वंस झेलले गेले, नैसर्गिक आपत्ती आल्या, दुष्काळ पडले, महापूर आले.. प्रत्येकाचे पडसाद मानवी कला-संस्कृतीमधे उमटले. आधुनिक युगात कला बदलत गेली, चित्रकला तर कॅनव्हासच्याही बाहेर, ओळखू न येण्याइतकी बदलली; मात्र आजही खाद्यपदार्थ दिमाखाने कलेत आपले स्थान टिकवून आहेत.

चित्रकार इतक्या सातत्याने आपल्या कलाकृतींमधून खाद्यपदार्थ नेमके कोणत्या कारणांकरिता रंगवत आले आहेत ते सांगणे खरोखरच अवघड. सुगीच्या भरपूर आलेल्या पिकाचा आनंद साजरे करणे असो, स्थानिक उपलब्ध खाद्यपदार्थांना आपल्या कलेत स्थान देण्याचा हेतू असो, रोजचे जीवन नोंदवून ठेवण्याचा अभ्यासूपणा असो.. प्रत्येकाचे हेतू वेगळे, संकल्पना वेगळ्या. पेंटींग्जमधलं अन्न हे समाजातली समृद्धी, रेलचेल, संपन्नता दाखवायला चितारलं जातं, की कलाकाराला ते चितारणं हे आपल्यातल्या कलेची, कौशल्याची कसोटी घेणारं वाटतं, की त्याला त्यातून सामाजिकतेबद्दल काही भाष्य करायचं असतं, हे आजही नेमकं ठरवता येणार नाही. पण एक मात्र निश्चित. जोवर चित्रकला आहे आणि अन्नही आहे तोवर या दोघांना एकत्र आणणारे कलाकारही असणारच.

981739314

भारतीय चित्रकलेच्या इतिहासातही खाद्यप्रतिमांना महत्त्व आहे. भारतीय खाद्यसंस्कृतीचा सामाजिकतेचा इतिहास त्यातून उलगडतो. अजिंठा लेण्यांमधे, जातक कथांवर आधारीत भित्तीचित्रांमधे अन्न आहे, फ़ळे आहेत. सांचीच्या स्तुपावरही विविध फ़ळे, मिठाया, लाडू, खिरींचे चित्रण आहे.

कालीघाट पेंटींग्जमधे बंग संस्कृतीतले प्रचलित खाद्यपदार्थ विपुल प्रमाणात आढळतात. कालीमातेच्या समोर भोग चढवलेल्या खाद्यपदार्थांमधे प्राणी, मासे, पायेश, बुंदिया, शोन्देश, शोर भाजा, लांगचा अशा दुधाच्या मिठाया, फ़ळे इत्यादी वैविध्य दिसते.

220px-nathdwara_srinathji

 

जामिनी रॉय यांच्या चित्रात मांजरीने तोंडात पकडलेली गलेलठ्ठ चिंगरी आहे, देवीच्या पुढ्यातला माशांचा भोग आहे, बंगाली भद्र घरांमधे, सुशिक्षित नवरा बायको टेबलावर बसून आधुनिक खाद्यपदार्थांचा (ब्रिटिश राजवटीचा प्रभाव) आस्वाद घेत आहेत असं कालीघाट पेंटींग्जमधे दाखवण्याची फ़ॅशनच होती. १९ व्या शतकातल्या कालीघाट पेंटींगमधे भलामोठा मासा (बोन्ति) विळीवर चिरत बसलेली बंगाली स्त्री दिसते. रामकिंकर बैज यांच्या बाजारहाट करून घरी परत येणाऱ्या श्रमजीवी कामगार जोडप्यातील पुरुषाच्या खांद्यावर असलेल्या कावडीमधे संध्याकाळच्या मिठमिरचीचा शिधा आहे, बाईच्या हातात आडवा धरलेला मासा आहे.

 

 

india_art_kids_1b

बंगालमधील दुष्काळात चित्तोप्रसादांनी काढलेल्या चित्रांमधे दिसलेले अन्नाचे कण टिपणारे हाडांचे जिवंत मानवी सापळे अंगावर शहारा आणतात. अभावातही अन्न वाटप करणारे नागरिक मानवतेचा दिलासा देतात.

संथाळी चित्रांमधे फ़ळांनी लगडलेली झाडे, समृद्ध झाडे आहेत, पटचित्रांमधेही खाद्यपदार्थ आहेत.

ce5836729539980032c2a24cedb44657-1सोळाव्या आणि सतराव्या शतकातल्या मोगल मिनिएचर्समधे खाद्यपदार्थांचे ऐषोआरामी चित्रण आहे. अकबर, जहांगिर आणि शाहजहानच्या काळातील दरबार, शाही मेजवान्यांचे चित्रण यातून सत्ताधारी सम्राटांचा रुबाब, ऐश्वर्य प्रकट केले गेले आहे.

निमतनामा हा मोगलकालीन खाद्यपदार्थांचा पर्शियन ग्रंथ. त्यात अनेक रेसिपी वगैरेंची सविस्तर वर्णने आणि सोबत तपशीलवार चित्रे आहेत. जवळपास ५० मिनिएचर्स आहेत ही. त्या काळातील रेसिपींचे हे सर्वोत्तम डॉक्यूमेन्टेशन. वर्णने कितीही लिहिले तरी चित्रमय वर्णनाला तुलना नाही हे त्यांनी ओळखलं होतं. बाबरनामामधेही लिखित कागदपत्रांमधे पदार्थांचे रंग, पोत, आकार नीट वर्णन करता येत नाहीत, म्हणून चित्रे सोबत जोडली असल्याचा उल्लेख आहे. जहांगिरनेही दस्तावेजीकरणाकरता मिनिएचर्सचा वापर केला. आइने अकबरीमधे मोगलकालीन दरबारातील शेकडो खानसामे, वाढपी, अन्न चाखणारे, पान बनवणारे खास लोक यांची तपशीलवार वर्णने आहेत आणि मिनिएचर पेंटींग्जमधेही राजेशाही खानपानाचे चित्रण आहे.

१४९५ ते १५०५ कालखंडातील एक मिनिएचर नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात आहे, त्यात मांडूच्या सुलतानाला मिठायांचा नजराणा देतानाचं चित्रण आहे, त्यातले खाद्यपदार्थ, मिठाया सुस्पष्ट दिसतात. लैंगिक उत्तेजना देणारे अन्नही त्यात प्रतिकात्मकरित्या दाखवलेले आहे. मिठाया बनवतानाच्या, शिजवतानाच्या पद्धती असलेलं, राजाच्या देखरेखीखाली त्याच्या स्त्रिया स्वयंपाक करत असतानाचं एक मिनिएचरही आहे.अजून एका चित्रात घियासुद्दिन खिलजी हा, दासी बनवत असलेल्या स्वयंपाकावर लक्ष ठेवून असल्याचं चित्रण आहे. उझबेकींना देण्यात आलेल्या राजेशाही मेजवानीचे एक पेंटींगही तिथे आहे. त्यामधे १८ व्या शतकातली, पर्शियन खाद्यपदार्थांनी ओसंडून जाणारी पात्रे आहेत.

fbac93c013386098fbc4a18d39a457a9

मोगलकालीन चित्रकलेमधे खाद्यपदार्थ, फ़ळे, शक्यतो पर्शियन असण्यावर मोठा भर होता. आपल्या उच्च वारशाला त्यातून अधोरेखित केले जाई.

चित्रांमधील खाद्यपदार्थांप्रमाणेच खाद्यपदार्थांची चित्रे म्हणजेच फ़ूड आर्ट किंवा फ़ूडस्केप्स यालाही स्वत:चा एक इतिहास आहे. खायचा पदार्थ आधी नजरेने मग जिभेने आस्वादायचा असतो- हे तत्त्व फ़ूडस्केप्समधे पणाला लागतं. प्लेटच्या कॅनव्हासवर चितारलेलं हे खाद्यपदार्थांचं पेंटींगच असतं.

प्लेटमधे एखाद्या पेंटींगसारखं रचलेलं अन्न पाहात असताना कलेच्या इतिहासातले टप्पे आठवतात. प्लेटच्या कॅनव्हासवर चितारलेली खाद्यपदार्थांची कला ‘जसे आहे तसे’ चितारण्याच्या रिएलिझमकडून मेगा रिएलिझम आणि हायपर रिएलिझमपर्यंत पोचली. कटेम्पररी आर्ट, निओ मॉडर्न, पोस्ट मॉडर्न मार्गाने जाताना प्लेटमधे फ़ळांच्या साली, फ़ोलफटंही सजायला लागली प्रॉप म्हणून. कलेच्या इतिहासाच्या सगळ्या पायऱ्या फ़ूड आर्टनेही ओलांडल्या.

रशियन फ़ूड स्टायलिस्ट तातियाना श्कोन्दिना क्लासिक पेंटर्सच्या कलाकृती आपल्या प्लेटच्या कॅनव्हासमधे रचते. फ़ळं, फ़ुलं, धान्य, खाद्यपदार्थ वापरून ती कला-इतिहासातले टप्पे दाखवते. मोन्द्रियानच्या सरळ रेषा आणि सोपे आकार, व्हॅन गॉघच्या स्टारी नाइट्सचे नाजूक, लयदार स्ट्रोक्स आणि त्यातला घनगर्द निळा रंग, सेझांच्या स्टील लाइफ़्समधली सफ़रचंदे, मॅग्राइटचा चेहर्‍याच्या जागी सफ़रचंद असलेला हॅटवाला, दालीचे वितळते, सर्रिअल आकार..

हे सर्व तातियानाने सजवलेल्या प्लेटमधून कलारसिक खवैय्यांच्या पोटात जाताना त्यांची कला-अभिरुचीही वेगळ्या उंचीला पोचत असेल बहुधा. काही प्लेट्समधे आकारांची मोडतोड असते. पिकासोच्या क्यूबिझममधून आलेली. त्याचा निळा, गुलाबी कालखंडही असतो.

food-classics-tanya-shkondina5-940x940-750x750

जेसन मेसिएर हा मोझॅक आर्टिस्ट, त्याने अतिशय सुंदर मोझॅक पेंटींग्ज केली, मटेरियल होते पोटॅटो चिप्स, बीन्स, हॅमबर्गर बन्स, कॅन्डी, कुकीज, नूडल्स आणि प्रेत्झेल्स. फ़्रेन्च स्कल्प्टर ख्रिस्टील असान्ते हिने अंड्याच्या टरफ़लातून नाजूक शिल्पं निर्माण केली. जिम विक्टर बटर, चॉकोलेट, चीज वापरून लाइफ़ साइझ शिल्पे बनवतो. असे अनेक आहेत,

इटालीतील मिलान शहरात दरवर्षी मे महिन्यात फ़ूड आर्ट फोटोग्राफ़र्सचा मेळावा भरतो. खरं तर ही एक स्पर्धा. ज्यात व्यावसायिक फोटोग्राफ़र्सपासून हौशी किचन फोटोग्राफ़र्सपर्यंत जगभरातला कोणताही खाद्यप्रेमी भाग घेतो. निवड मोजक्याच फोटोग्राफ़र्सची होते. गेल्या वर्षीच्या स्पर्धेची संकल्पना होती “Feeding the Planet, Energy for the Life.”

या स्पर्धेमधे सहभागी झालेल्यांनी सादर केलेल्या फ़ूड प्लेटमधे वसुंधरेचं त्रिमित विश्व सामावलेलं होतं. कधी ती हरीभरी होती, कधी भेगाळलेली. काही प्लेटमधे कबरे, कोरडे दुष्काळ, तर काहींमधे खाद्यपदार्थांची ओसंडून वाहणारी रेलचेल असलेले श्रीमंती प्रदेश. हिरवी शेतं, निळे समुद्र, खोल विहिरी, द्राक्षांचे मळे, मक्याची शेतं, वाळवंटातली कलिंगडं, संत्र्याच्या, पीचच्या बागा, समुद्रातले पोहणारे, काही तेलप्रदूषणामुळे मृतावस्थेतले मासे, गोठलेले समुद्रकिनारे, अ‍ॅसिडचा पाऊस सगळं फ़ूड प्लेटमधे साकारले गेले.

अन्नातूनच साकारलेला हा अन्नाचा सोहोळा पाहताना आपल्या नजरेचं पारणं हजारो तऱ्हांनी फ़िटतं. हे कसं साध्य झालं याचा अचंबा वाटतो. मोलेक्यूलर गॅस्ट्रोनॉमीची कमाल यात नक्कीच असते; शिवाय फ़ूड फ़ोटोग्राफ़र्सच्या तैनातीला फ़ूड स्टायलिस्ट, फ़ूड डिझायनर्सही असतात. मात्र यात एरवी व्यावसायिक फ़ूड फ़ोटोग्राफ़ीमधे असतो तसा फ़ेक, खोट्या पदार्थांचा, पेपर मॅशे, कॅनव्हास, कृत्रिम रंग, लेदर, टिश्यू पेपर्स, केमिमल्स, डिटर्जन्ट्सचा वापर मात्र नव्हता. प्लेटमधले पदार्थ खाण्यायोग्य असणे ही मुख्य अट होती. ही खरी फ़ूड आर्ट.

फ़ूड स्टायलिंगची सुरुवात अमेरिकेत ४० च्या दशकात झाली. मात्र तिचे खऱ्या अर्थाने व्यावसायिक सादरीकरण सुरू झाले ५० ते ६० च्या दशकात. अमेरिकेच्या गुर्मे मासिकात देखणी सर्व्हिंग वेअर्स, टेबल सजावट, फ़ुलांची मांडणी, सोबत रंगीत पार्श्वभूमी असलेले खाद्यपदार्थांचे फोटो छापले जायला लागले. जागतिक महायुद्धानंतरचा हा काळ. फ़क्त पोट भरण्याकरता खाण्याला लोक कंटाळले होते. त्यांना नवे खाद्यपदार्थ आणि सोबत देखणी लाईफ़ स्टाईलही देण्याच्या हेतूतून फ़ूड फ़ोटोग्राफ़ी विकसित होत गेली. घरे, हॉटेल इंडस्ट्रीमधे यांत्रिक, स्वयंचलित उपकरणे, कृत्रिम रंग, फ़्रोझन खाद्यपदार्थांचा वापर सुरू झाला होता. पदार्थ जास्तीतजास्त सुबक, झटपट, आकर्षक बनवणं सोपं होतं गेलं. फोटोग्राफ़्सकरिता खाद्यपदार्थांना सजवणे सुरू झाले. आइस्क्रीमकरिता उकडलेल्या बटाट्यांचा लगदा, चिकनच्या जागी पेपर मेशच्या प्रतिकृती वापरणं सुरू झालं, ज्या आजही वापरतात. फोटोग्राफ़र्सना स्टुडिओतल्या दिव्यांची उष्णता, फ़िल्म स्पीड, हवामान सांभाळायला हे गरजेचे होते.

सत्तरच्या दशकानंतर रंगीत फोटोग्राफ़ी तंत्रात आमूलाग्र सुधारणा झाल्या. जॅपनीज कलर प्रिन्टींगमुळे सुस्पष्ट इमेजेस आल्या. खाद्यपदार्थांना वाहिलेली मासिके, कुक बुक्स या काळात वेगाने लोकप्रिय होत होती. त्यांचं मुखपृष्ठ आकर्षक असणं गरजेचं होतं. लोकांनी काय आणि कसं खायला हवं हे, ही मुखपृष्ठं ठरवत होती. लोकांचं राहणीमान वाढलं होतं. भपकेबाज लाइफ़स्टाईल, ग्लॉसी डेबोनेर डिशेसचे डबल स्प्रेड फोटो, रंगीत प्लेट्सची रेलचेल असलेल्या रेसिपीज, अनेक वेगवेगळ्या रंग, पोतांचे पदार्थ एकत्र आणून केलेली टेबलस्केप्स बीबीसीच्या फ़ुड ऎन्ड ड्रिन्क्स, गुड फ़ुड – सारख्या मासिकांमधे झळकायला लागली. या सगळ्यातून आलिशान राहणीमान आणि ग्लॅमरस जीवनशैली प्रक्षेपित होत होती.

फ़ूड फोटोग्राफ़ी इतकी विस्तारली, कारण जगभरात खाद्यप्रेमींचं जग कमालीचं विस्तारलं.

जेवणाच्या टेबलावरचं किंवा ताटातलं अन्न आपल्याला जसं दिसतं तसं दाखवणारी फ़ोटोग्राफ़ी कधीच इतिहास जमा झाली. रोमॅन्टीक मूड निर्माण करणारा अंधुक प्रकाश ज्यात आपण नेमकं काय खाणार आहोत तेही धूसरच दिसणारी डोना हे स्टाईल, स्विडिश स्टाईलची हाय डिझाइन्स, जापनिज मिनिमलिझम स्टाईल फोटोग्राफ़ीही आता मागे पडली.

हाय एन्ड रेस्टॉरन्ट्समधील फ़ूड डिझायनर्सने तर खाद्यपदार्थांकडे कसे बघावे याच्या संकल्पनाच बदलून टाकल्या. डिझायनर फ़ूड नजरेला सुखावते, तुमच्या मूडप्रमाणे ते समोर येते. फ़ूड डिझाईन हा एक स्वतंत्र कला-प्रकार आहे. कल्पनाशक्ती, कौशल्य, कला, तंत्र, विज्ञान या सगळ्याचा विचार त्यात केला जातो.

andra-thali

खाद्यपदार्थ सजावटीचा भारतीय इतिहासही रंगतदार आहे. अन्नाचे ताट सजवणे हे पारंपरिक स्वयंपाकघरात होते; आणि आजही आहेच. केळीच्या हिरव्यागार, निमुळत्या पानावर देखणा सजलेला मोग-याच्या कळ्यांसारखा भात, पिवळ्या वरणावर सोनेरी तुपाची धार, तांबूस, खरपूस पुरणपोळी, शुभ्र मलईदार श्रीखंड.. नाजूक मुरडीचा कानोला, केशरी पाकातली जिलबी, केशराच्या काड्या, पिस्त्याच्या पुडीची पखरण.

’अन्नं वै प्राणा:’ मधे (लेखक-चिन्मय दामले)*मायबोली लिंक* प्राचीन खाद्य सजावटींच्या ज्या करामती दिल्या आहेत त्या चित्तथरारक आहेत. सहाव्या विक्रमादित्याचा पुत्र सोमेश्वराने बाराव्या शतकात लिहिलेल्या मानसोल्लास ग्रंथातील वर्षोपलगोलक, कृष्णपाक असे चित्रदर्शी नावाचे पदार्थ, ज्यात उकडीचे मोदक पावसाळ्यात पडणार्‍या गारांप्रमाणे शुभ्र बनवतात आणि शेळीच्या मांसाच्या सुपारीच्या आकाराच्या तळलेल्या तुकड्यांवर रक्त शिंपडतात. त्यात मांसाच्या तुकड्यांना फळांचे आकार दिलेले असतात, बसवराजाच्या ‘शिवतत्त्वरत्नाकर’ ग्रंथात दर पन्नास वर्षांनी फुलणार्‍या बांबूची फुलं घालून केलेला केशर, वेलदोड्याची पूड घालून सजवलेला भात आहे. ताम्बूलमञ्जरी श्लोकांमधले विड्याचे पान, चुना, सुपारी, लवंग, वेलदोडा, जायपत्री, जायफळ, खोबरं, अक्रोड, कापूर, कंकोळ, केशर, दालचिनी, कस्तुरी, सोन्याचा वर्ख, चांदीचा वर्ख, सुंठ, चंदन, तंबाखू, नखी (Helix asperaa या गोगलगायीच्या कवचाचे चूर्ण) आणि कूलकुट (Casearia esculenta) युक्त त्रयोदशगुणी विड्याचे वर्णन.

अर्थात त्याकाळात सजावटीपेक्षा पदार्थ शिजवण्याच्या, मांडण्याची काटेकोर शिस्त, स्वच्छता, आरोग्याच्या नियमांचं प्रस्थ जास्त होतं. तपश्चर्या करणार्‍या योगींनी तांब्याच्या भांड्यात शिजवलेला भात खावा. सोन्याच्या भांड्यात शिजवलेला भात खाल्ल्यास विषबाधा होत नाही; तसंच हा भात वातशामक व कामोद्दीपक असल्याने तो खास राजाकरता. चांदीच्या भांड्यात शिजवलेला भात पचनास हलका. अतिशय कोरड्या जागेवरील मातीपासून तयार केलेल्या भांड्यात स्वयंपाक केल्यास रक्तदोष नाहीसे होऊन त्वचाविकार दूर होतात. पाणथळ जागेवरील मातीपासून तयार केलेली भांडी वापरल्यास कफविकार दूर होतात आणि दलदलीच्या जागेवरील माती वापरल्यास पचनसंस्था मजबूत होते – वगैरे नियमावली आणि मार्गदर्शक तत्त्वे ही सजावटीपेक्षा महत्त्वाची वाटतात.

अकबराच्या मुदपाकखान्यात मात्र खानसामे गमती करत. शुभ्र मोत्यांच्या कंठ्याच्या आकारातली पनीरची मिठाई, कधी कोंबडीच्या एखाद्या पदार्थाला दिलेला फळांचा आकार. कधी मेंढीचं मांस हिरेमोत्यांच्या आकारात असे. एकदा बादशाहाकडे आलेल्या एका जेसुइट पाहुण्यानं ताटातली टम्म फुगलेली पुरी बोटानं फोडली तर त्यातून म्हणे एक चिमणी बाहेर पडली आणि उडून गेली. रोजचं दही सात रंगांत असे. केशर, हळद, पालक यांच्यापासून तयार केलेले रंग तूपात घातले जात. कापूर, गुलाबाच्या पाकळ्या, बडीशेप, संत्र्याची पानं घालून पाणी सुगंधी करत. अनेक पदार्थांमध्ये सोन्याचांदीच्या तारा किंवा मोत्यांचं चूर्ण घालत. मिठायांना अस्सल सोन्याचा वर्ख असे. अकबराच्या काळात सामान्य लोकही मसाल्यांची पूड, बदाम, पिस्ते, अक्रोड वापरून रोजचे पदार्थ देखणे बनवत, असे म्हणतात.-

food-snapp

प्रत्येक कालखंडातले फ़ूड ट्रेन्ड्स वेगवेगळे असतात. फ़ूड ट्रेन्ड हे सोसायटीतल्या ट्रेन्डचं प्रतिनिधित्व करतात. आजच्या व्हिज्युअल कल्चरला सर्वात महत्त्व असणाऱ्या युगाचा ट्रेन्ड आहे फ़ूड पॉर्न. या शब्दाचा उगम खाद्यपदार्थांच्या फ़ोटोंद्वारे बघणाऱ्याच्या मनातल्या आदिम अशा भूक, अभिलाषा, असूया, आसक्ती अशा तीव्र भावनांना चाळवण्याच्या प्रयत्नातून झाला.

खाना खजाना पासून मार्कोचा हेल्स किचन, गॉर्डन रॅमसेची किचन नाइटमेअर्स, रेचल रेचे उन्मादक फ़ूड शो चवीने बघणारे, मास्टर शेफ़चे सगळे सीझन्स, त्यातल्या पार्टिसिपन्ट्सची नावं, बनवलेल्या, नावाजलेल्या, नाकारल्या गेलेल्या डिशेसपर्यंत सर्व काही तोंडपाठ असणारे, आपण काय खाल्लं, घरी काय शिजलं, रेस्त्रॉंमधलं आज काय खातो आहोत त्याचे फोटो सातत्याने इन्स्टाग्राम, ट्वीटर, फ़ेसबुकवर अपलोड करणारे सगळेजण या फ़ूड पॉर्न जनरेशनमधले.

खाद्यपदार्थांच्या संस्कृतीला फ़ूड पॉर्नचे स्वरूप येण्याला आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सहजशक्य झालेली फ़ूड फोटोग्राफ़ी कारणीभूत आहे. सोशल मिडिया, फ़ूड ब्लॉग्ज, इन्स्टाग्रामवर सातत्याने अपलोड होत राहणारे फोटोग्राफ़्स जास्तीतजास्त आकर्षक, सेन्शुअस करण्याकडे सगळयांचाच कल असतो.

खाद्यपदार्थांना ग्लॅमरस, रसरशीत, रंगतदार, आसक्त स्वरूपात पेश करणे ही आजची गरज बनली आहे. तयार खाद्यपदार्थांच्या जाहिराती, फ़ुड-डायेट शोज, डिझायनर रेस्त्रॉं, स्पेशालिटी फ़ुड चेन्स.. अन्नाचे आकर्षक फोटोग्राफ़्स काढून ते जाहिराती, बुकलेट्स, होर्डिंग्ज, मासिके, पॅकेजिंग, कुक बुक्समधे झळकवणारे सगळेच फ़ूड पोर्नोग्राफ़ीत सामील.

आणि मग स्टुडिओच्या तप्त उजेडात गारेगार सरबत ओतलेल्या फ़ेसाळत्या ग्लासाचे फ़ोटो दाखवायला कामाला येतं डिटर्जंट. दाट, क्रिमी, चकाकत्या दुधाचा ग्लास दाखवायला पांढरी शुभ्र, चिकट खळ वापरली जाते. कसाही असो, पण खाद्यपदार्थ रसरशीत, उन्मादकच दिसायला हवा. हेल्थ फ़ूड, डाएट फ़ूड सुद्धा रटाळ, कंटाळवाणं दिसायला नको, घरगुती खाणंही एकसुरी नको. ग्लॅमरस हवं. फ़ळं, भाज्या टवटवीत, सौंदर्यपूर्ण हव्या, त्यांचे लाल, पिवळे, केशरी, हिरवे, जांभळे रंग उठून दिसायला हवेत.

फोटोग्राफ़्समधला खोटेपणा मग खऱ्यात उतरायला वेळ लागत नाही. मेणाची चकाकी दिलेली सफ़रचंद, लाल रंग इंजेक्ट केलेली कलिंगडं, शेंदरी आणि गुलाबी रंगाच्या द्रावणात बुडवून ठेवलेली गाजरं, स्ट्रॉबेरीज, लस्सी, आइस्क्रीममधले टिश्यूपेपर्स, कृत्रिम हार्मोन्स पाजून टपटपीत केलेली धान्य, टपोरलेली फ़ळं.. फ़ूड पोर्नची अश्लिलता सोशल साईट्समधून बाजारात किंवा उलट मार्गानेही असू शकेल, पण थेट आपल्या घरातल्या प्लेटमधे उतरली, गरती झाली.

मात्र काही सिरियस फ़ूड ब्लॉगर्स, फ़ूड हिस्टोरियन्सही आहेत, जे खाद्यपदार्थांचा इतिहास, संस्कृती जाणून घेतात, त्याकरिता प्राचीन पोथ्या धुंडाळतात; इजिप्शियन, मोहेन्जोदारोकालीन खाद्यसंस्कृतीच्या खूणा शोधू पाहतात; खाद्यपदार्थांची मुबलकता, वानवा अनुभवलेले काही खाद्यप्रेमी असतात जे आपापले खाद्यानुभव लिहितात. काही नैसर्गिक, ऑरगॅनिक फ़ूडचा प्रचार करतात, काही फ़ूड इकॉनॉमीवर अभ्यासू मते मांडतात..

साध्या, स्वच्छ, नैसर्गिक स्वरूपातलं, कमीतकमी सजावटीचं, खोटे रंग, केमिकल्सच्या खोट्या वाफ़ा, आकार न दाखवता, अन्नाला थेट घशात घुसवणारे क्लोज अप्स नसलेले तरीही कलात्मक असलेले फ़ूड फोटोग्राफ़्सही आपल्या आसपासच आहेत, ही स्वच्छ, सुगंधी वाऱ्याची झुळूकच म्हणायची.

शर्मिला फडके

img_20150323_194836

लेखिका कला विषयाच्या अभ्यासक आहेत.

सर्व फोटो इंटरनेटवरून घेतलेले असून त्या-त्या वेबसाइटकडे त्यांचे स्वामित्व हक्क आहेत.  व्हिडिओ – YouTube

One Comment Add yours

  1. Anil koshti says:

    खाद्य संस्कृती लेख आणि संबंधित चित्रे खूप आवडले.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s