कृतज्ञ खाद्यसंस्कृतीचा देश – जपान

विभावरी देशपांडे

japancitiesmap‘जपान’- उगवत्या सूर्याचा देश ! जगभरातल्या खवय्यांसाठी ‘सुशी आणि रामेन’चा देश! जपानी लोकांची शिस्तप्रियता, नीटनेटकेपणा याबद्दल आपण सगळेच ऐकून आहोत. मेड इन जपान, म्हणजे तर परिपूर्णता आणि गुणवत्ता यांची खात्रीच. मग जपानी खाद्यसंस्कृती तरी याला अपवाद कशी असेल? जपानी लोकांचं परफेक्शनचं वेड त्यांच्या खाद्यसंस्कृतीतही प्रतिबिंबित होतं. उगाच नाही टोक्योला जगातली सर्वोत्तम फूड सिटी म्हणून नावाजलं जातं. टोक्योमध्ये जगातील सर्वाधिक, २२६ ‘Michelin-starred restaurants’ आहेत. हो, हो..अगदी पॅरिसपेक्षाही जास्त! इतकंच काय, २०१३ मध्ये जपानी खाद्यसंस्कृती म्हणजेच `वाशोकू’ला युनेस्कोच्या जागतिक सांस्कृतिक वारसा यादीत स्थान देण्यात आलं आहे.

अन्य संस्कृतींचा प्रभाव

इतके सगळे मानसन्मान मिळवलेल्या या खाद्यसंस्कृतीचा प्रवासही तितकाच रोचक आहे. प्रत्येक देशाच्या खाद्यसंस्कृतीवर त्या देशाच्या भूगोल आणि इतिहासाचा खूप प्रभाव असतोच. जपानी खाद्यसंस्कृतीवर पहिला परकीय प्रभाव पडला चिनी संस्कृतीचा. चिनी लोकांकडून जपानी लोक भातशेती करायला शिकले. कालांतराने सोया सॉस, तोफू, चॉपस्टिक्स यांचंही चीन-कोरिया मार्गे जपानमध्ये आगमन झालं. चीनमधून जपानमध्ये आलेल्या ‘बौद्ध’ धर्माचाही जपानी खाद्यसंस्कृतीवर खूप प्रभाव पडला. बराच काळ मांसाहारावर बंदी आली आणि आहारात भाज्या-शाकाहारी पदार्थांचं प्रमाण वाढलं. सन १२०० मध्ये जपानचा पश्चिमेकडील देशांशी संपर्क येऊ लागला. डच लोकांनी मका, बटाटा, रताळं यांसारख्या गोष्टींची ओळख करून दिली, तर पोर्तुगीजांकडून ‘तेम्पुरा’सारखं पीठ लावून तळण्याचं तंत्र अवगत झालं.

आज जपानी खाद्यसंस्कृतीत झळकणारी एक प्रकारची आधुनिकता पूर्वापार चालत आली आहे, असं मात्र नाही. जपानी समाजावर बराच काळ सामुराई लोकांचं वर्चस्व होतं. सामुराई हे शेतकरी कुळातले लोक. त्यांच्या प्रभावाने जपानी लोकांची खाद्यसंस्कृतीही बराच काळ साधेपणावर भर देणारी होती.

मेईजी कालखंडात (१८६८-१९१२) जपानने आधुनिकतेकडे वाटचाल सुरू केली. बाहेरच्या जगाशी संबंध वाढला. कायम आपली प्रतिमा जपणाऱ्या जपानने आपल्या खाद्यसंस्कृतीतही बदल करायला सुरुवात केली आणि तिचं रूप पालटलं. आहारात एकंदरीतच मांस आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर वाढला. पाश्चिमात्य देशांची, तिथल्या खाद्यसंस्कृतीची माहिती जपानी लोकांना होऊ लागली आणि जपानी खाद्यपदार्थांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू झाले.

जपानी लोकांनी इतरांच्या चांगल्या गोष्टी जरूर आत्मसात केल्या; पण आपल्या खाद्यसंस्कृतीचा मूळ गाभा अबाधित ठेवत! रामेन, तेम्पुरासारखे पदार्थ जपान्यांनी परकीय खाद्यसंस्कृतीतून उचलले. मात्र या सगळ्याच पदार्थांना खास ‘जपानी स्पर्श’ देत असं काही सादर केलं की हे सगळे पदार्थ जपानी पदार्थ म्हणूनच ओळखले जाऊ लागले.

‘सुशी’ची रुचकर जन्मकहाणी

सुशी हा जपानी पदार्थ आज जगभर ओळखला जातो. सुशीचा इतिहास रोचक आहे. पदार्थ, खास करून मासे खूप काळ टिकून राहावेत म्हणून वापरल्या जाणाऱ्या साठवणीच्या तंत्रातून ‘सुशी’ हा आजचा पदार्थ उत्क्रांत झाला. पूर्वी दक्षिण पूर्व आशियात मासे मिठात ठेवून साठवण्याची पद्धत होती. हीच पद्धत कालांतराने जपानमध्ये आली असावी. १०व्या शतकाच्या सुमारास मासे साफ करून त्यात विनेगर लावलेले तांदूळ भरून साठवण्याची पद्धत रूढ झाली. मासे आंबवण्यासाठी वापरण्यात येणारे तांदूळ नंतर टाकून दिले जात. आणि फक्त माशांचा खाण्यासाठी वापर केला जाई. यालाच ‘नारे सुशी’ असंही म्हटलं जाई. कालांतराने एदो कालखंडात (१६०३ ते १८६७) ‘हाया झुशी’ हा प्रकार अस्तित्वात आला. या काळात मासे टिकवण्यासाठी किंवा आंबवण्यासाठी तांदूळ न वापरता, भातात राईस विनेगर घालून माशासोबत खाण्यास सुरुवात झाली.

आजच्या जगप्रसिद्ध ‘निगिरी झुशी’चा उदय मात्र अलीकडचा, १९व्या शतकातला. या काळात घासभर आकाराच्या अंडाकृती भाताच्या गोळ्यावर ताज्या माशाचा पातळ तुकडा ठेवण्याची पद्धत सुरू झाली. यालाच ‘निगिरी झुशी’ अशी ओळख प्राप्त झाली. १९व्या शतकात टोक्योमध्ये अन्नपदार्थ विकणाऱ्या हातगाड्यांचं प्रस्थ वाढलं आणि जाता येता पटकन खाता येईल असं फास्ट फूड म्हणून ‘सुशी’ नावारूपाला आली.

‘रामेन’ अर्थात ‘soupy noodles’ हे जपानी लोकांचं अतिशय प्रिय आणि जगभर प्रसिद्ध असलेलं फास्ट फूड. जपानमध्ये प्रांताप्रांतानुसार रामेनची रेसिपी बदलत जाते. इंस्टंट रामेन किंवा इंस्टंट नूडल्सचा जन्मही जपानमधलाच. इंस्टंट नूडल्सचा शोध Nissin Food Corporation चे संस्थापक मोमोफुकू आंदो यांनी १९५८ मध्ये लावला. ‘रामेन’ या फार पूर्वी चीनमधून जपानमध्ये आलेल्या पदार्थाला जपान्यांनी आपला खास टच देत त्याला आपलंसं तर केलंच, पण अवघ्या जगाला ‘रामेन’चं वेड लावलं.

हारा हाची बू

तर ही जपानी खाद्यसंस्कृती. आरोग्यपूर्ण खाद्यप्रकारांनी सजलेली. कालानुरूप तळकट-तेलकट फास्टफूडचं प्रमाण इथेही वाढतं आहे. पण मूळ जपानी खाद्यपदार्थांमध्ये तेल आणि मसाल्यांचा अतिशय कमी वापर करून भाज्या, मासे यांची मूळ चव अनुभवण्यावर भर दिला जातो. जपानी लोकांचं एकंदरीत आयुर्मान जास्त असण्याचं एक कारण तेल मसाल्यांचा कमी वापर असणारा त्यांचा समतोल आहार हे तर आहेच; शिवाय ‘हारा हाची बू’ म्हणजेच नेहमी ८०% पोट भरेल इतकंच जेवावं असं सांगणाऱ्या कन्फ्युशियन शिकवणीचा प्रभाव हेदेखील म्हणता येईल. आपल्या तुलनेत तर जपानी लोकांचा आहार खूपच कमी असतो.

भातखाऊ लोक

भात आणि मासे हे येथील मुख्य अन्न. सोया सॉस आणि मिसो (आंबवलेल्या सोयाबिन्सची पेस्ट), तोफू (सोयाबीनपासून बनवलेलं दही) यासारख्या सोयाबीनपासून बनवलेल्या घटक पदार्थांचा वापर स्वयंपाकात मोठ्या प्रमाणावर केला जातो. ‘मिरीन’ (rice wine) आणि ‘दाशी’ (Kelp या सागरी वनस्पती आणि skipjack tuna किंवा Bonito flakes पासून बनवला जाणारा (cooking stock) हे खास जपानी घटक पदार्थ म्हणता येतील.

सामान्य जपानी माणसांच्या रोजच्या आहारात मिसोसूप, भात, सलाड आणि शिजवलेले मासे किंवा चिकन यांचा समावेश असतो. बंगाली लोकांसारखाच जपानी माणूससुद्धा तिन्ही जेवणात आनंदाने भात खातो. भाताशिवाय जपान्यांचं पानही हलत नाही. या लोकांना भात इतका प्रिय आहे की जपानी भाषेत ‘शिजवलेला भात’ आणि ‘जेवण’ यासाठी ‘गोहान’ हा एकच शब्द वापरला जातो.

आधी डोळ्यांनी खायचं…

जपानी खाद्यसंस्कृतीची आणखी दोन वैशिष्ट्ये सांगता येतील. निसर्गानुरूपता आणि पदार्थांचं सादरीकरण. जपानचा ‘शिंतो’ हा स्थानिक धर्म मुळातच निसर्गपूजक. साहजिकच जपानी खाद्यसंस्कृतीत निसर्ग आणि ऋतू यांना खूप महत्त्व दिलं जातं. जपानमध्ये त्या त्या ऋतूमध्ये उपलब्ध असणाऱ्या ताज्या भाज्या आणि फळे यांचा आहारात वापर करण्यावर भर दिला जातो.

निसर्गानुरूपता फक्त आहारातच नाही तर पदार्थांची सजावट, भांडीकुंडी, जेवणाचं टेबल वगैरेतही प्रतिबिंबित होते. वसंत ऋतूतल्या हिरव्यागार निसर्गाचं कौतुक हिरव्या डिश आणि सजावटीसाठी बांबूची पानं वापरून व्यक्त केले जाते, तर ‘चेरी ब्लोसम’च्या काळात सुबक भांड्यावर चेरीच्या नाजूक पाकळ्या जिकडे तिकडे दिसू लागतात.
तुम्ही आधी तुमच्या डोळ्यांनी खाता आणि नंतर जिभेने, असं जपानी लोक मानतात. म्हणूनच जपानी खाद्यसंस्कृतीत पदार्थाच्या चवीइतकंच सादरीकरणसुद्धा महत्त्वाचं ठरतं. जपानी पाककला आणि सादरीकरण यांचा सर्वोत्तम नमुना म्हणजे ‘खाईसेकी ऱ्योरी’. हे खरं तर थोडं महाग प्रकरण. पण जातीच्या खवय्यांनी नक्की अनुभवावं, असं. जपानी खाद्यसंस्कृतीत पाच हा खूप महत्त्वाचा अंक मानला जातो. ‘खाईसेकी’ पंचेंद्रियांना सुखावणारा अनुभव असतो. कारण त्यात पंचरस, पंचरंग (पांढरा, काळा, लाल, हिरवा, पिवळा) पंचपद्धती (कच्चं, उकडलेलं, तळलेलं, भाजलेलं आणि वाफवलेलं) यांचा आवर्जून समावेश केला जातो.

ऎतिहासिक फूड सॅंपल्स

सादरीकरणाचं आणखी एक उदाहरण म्हणजे जपानमध्ये उपाहारगृहांच्या बाहेर पाहायला मिळणारी प्लास्टिकची फूड सँपल्स. उपलब्ध खाद्यपदार्थांच्या हुबेहूब दिसणार्याप प्लास्टिकच्या प्रतिकृती ठेवल्या जातात. अनेकदा पदार्थांच्या नुसत्या नावावरून ताटात नक्की काय पडेल, याचा अंदाज येत नाही. अशा वेळी हे नमुने मदतीला येतात. या फूड सँपल्सनाही इतिहास आहे.

१९२०च्या दशकाच्या उत्तरार्धात जपानमध्ये अशा प्रतिकृती बनवण्याची सुरुवात झाली. सुरुवातीला यासाठी मेणाचा वापर केला जात असे. मात्र १९८० च्या आसपास हे नमुने बनवण्यासाठी प्लास्टिकचा वापर करण्यात येऊ लागला. १९२०च्या उत्तरार्धातच जपानमध्ये उपाहारगृहात जेवण्याची पद्धत मोठ्या प्रमाणावर प्रचलित झाली आणि हे नमुने बनवण्याचा मोठा उद्योग उदयास आला. ‘ताकीझो इवासाकी’ हे या उद्योगाचे जनक मानले जातात. आजही जपानी उपाहारगृहांमध्ये ग्राहकांच्या सोयीसाठी प्लास्टिक फूड संपल्सचा वापर केला जातो. जपानी भाषेचं एकही अक्षर न कळणाऱ्या परदेशी पाहुण्यांसाठी तर या प्रतिकृती अगदी तारणहार ठरतात.

नववर्षाची अनोखी डिश

जपानी पाककला आणि सादरीकरणाच्या संदर्भात आणखी उल्लेख करावा लागेल तो म्हणजे, ‘ओसेची ऱ्योरी’ अर्थात खास नववर्षाच्या स्वागतानिमित्त बनवल्या जाणाऱ्या पारंपरिक पदार्थांचा. ‘ओसेची ऱ्योरी’ बनवण्याची परंपरा हेईआन काळात (७९४-११८५) सुरू झाली. ‘ओसेची’मध्ये रंगसंगतीचा उत्तम समतोल तर साधलेला असतोच, शिवाय ‘ओसेची ऱ्योरी’मधील पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या प्रत्तेक पदार्थाला एक प्रतिकात्मक अर्थही आहे. प्रत्येक पदार्थ हा दीर्घायुष्य, उत्तम संतती, वैभव आणि आनंद यापैकी एकाचं प्रतीक समजला जातो. लाल आणि पांढरा हे शुभ रंग मानले जातात, त्यामुळे या रंगांच्या भाज्या आणि इतर पदार्थांचा सढळ हस्ते वापर केला जातो. हे पदार्थ एकावर एक रचता येणाऱ्या खास चौकोनी डब्यांमध्ये मांडून सजवले जातात. या खास डब्यांना ‘जुबाको’ म्हणतात. ‘ओसेची ऱ्योरी’ हे पारंपारिक नववर्षाचं खास जेवण असलं तरी आपल्या गरमागरम पुरणपोळीच्या स्वयंपाकापेक्षा फारच वेगळं.
जपानमध्ये नवीन वर्षाचे पहिले तीन दिवस बायकांनी स्वयंपाक करणं निषिद्ध मानतात. बायकांना सणासुदीच्या दिवसात घरात आलेल्या पाहुणे मंडळींसोबत आनंदात निवांत वेळ घालवता यावा हे यामागचं कारण असेल कदाचित! त्यामुळे पहिले दोन-तीन दिवस पुरतील इतके पदार्थ ३१ डिसेंबरलाच बनवून ठेवले जातात. हे पदार्थ बनवताना साखर किंवा विनेगर यांचा भरपूर वापर केला जातो. पदार्थ जास्त दिवस टिकावेत, हा त्यामागचा उद्देश. आजकाल सोयीनुरूप ‘ओसेची ऱ्योरी’ विकत आणण्याची पद्धतही वाढत आहे. परंपरा आणि रूढी जरी वेगळ्या असल्या तरी ‘ओसेची ऱ्योरी’चा आस्वाद मात्र आपल्यासारखाच पाहुण्यारावळ्यांच्या सोबतीने घेतला जातो.

जपानी मिठाया

मिठायांचे अनेक प्रकार जपानमध्ये पाहायला मिळतात. पारंपरिक जपानी मिठाईला ‘वागाशी’ असं म्हणतात. जपानी मिठाईचा आस्वाद सहसा ‘ग्रीन टी’ सोबत घेतला जातो. जपानी मिठाई बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तांदळाचं पीठ, ‘मोची’ किंवा राईस केक आणि गोड अझुकी बीन पेस्ट – अंको यांचा वापर केला जातो.
औपचारिक समारंभांना ‘नामागाशी’ नावाची मिठाई दिली जाते. त्या त्या ऋतूत फुलणाऱ्या फुलांच्या आकारात बनवलेली ‘नामागाशी’ अगदी डोळ्याचं पारण फेडणारी असते.

अन्नदाता सुखी भव!

मला आवडलेली जपानी खाद्यसंस्कृतीबद्दलची एक गोष्ट नमूद केल्याशिवाय राहावत नाही. जपानी लोक नेहमी समोर आलेल्या अन्नाबद्दल हात जोडून कृतज्ञता व्यक्त करतात आणि मगच जेवणाला सुरुवात करतात. जपानमध्ये प्रत्येक जेवणाआधी हात जोडून ‘इतादाकीमास’ म्हणजेच ‘मी कृतज्ञतापूर्वक अन्न ग्रहण करतो’ असं म्हणण्याची पद्धत आहे. (हं….आता आपणही शाळेत असताना ‘वदनी कवळ घेता’ म्हणत होतोच की! पण आता आपल्याला हे सगळं आऊटडेटेड वाटतं….असो!) इतकंच नाही, तर जेवण झाल्यावर जेवण बनवणाऱ्या किंवा ज्याच्यामुळे आपल्याला जेवण प्राप्त झाले अशा व्यक्तीला आवर्जून ‘गोचीसोउसामा देश्ता’ म्हणजेच अन्नदाता सुखी भव, असं म्हणून धन्यवाद देण्याचीही प्रथा आहे.
निसर्गाचा आदर करत, अन्नासोबत अन्नदात्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करणारी जपानी खाद्यसंस्कृती ‘समतोल आणि संपन्न’ वाटते ती यामुळेच!

होरेन्सो नो गोमाए- (Spinach Salad with Sesame Sauce)

तयारीसाठी लागणारा वेळ : १० मिनिट, बनवण्यासाठीचा वेळ: ५ मिनिट

(साधारण ४ लोकांसाठी)

साहित्य:

 • पालक – एक जुडी (अंदाजे २२० ग्राम. पालकाची पाने देठांसहित घ्यावीत)
 • मीठ – चिमुटभर

Sesame Sauce साठी साहित्य

 • ३ टेबलस्पून पांढरे तीळ
 • 1½ टेबलस्पून सोया सॉस
 • 1 टेबलस्पून साखर
 • ½साके
 • ½मिरीन

कृती

 • मंद आचेवर तीळ परतून घ्यावेत
 • भाजलेले तीळ खलबत्त्यात कुटून घ्यावेत. ( एकदम बारीक न कुटता, थोडे ओबडधोबड ठेवावेत)
 • कुटून घेतलेल्या तिळात दीड टेबलस्पून सोया सॉस, १ टेबलस्पून साखर, अर्धा टीस्पून साके, अर्धा टीस्पून मिरीन घालून एकत्र करावे.
 • एका पसरट भांड्यात थोडे मीठ घालून उकळून घ्यावे. त्यात पालक टाकून ३०-४५ सेकंद वाफवून घ्यावा. (पालक कोवळा नसेल तर जास्त वेळ वाफवावा. देठ शिजण्यास जास्त वेळ गरजेचा असल्याने वाफवताना देठाच्या बाजूने गरम पाण्यात सोडवा.)
 • पालक गरम पाण्यातून काढून घेऊन थोडा वेळ बर्फाच्या पाण्यात किंवा थंड पाण्यात ठेवावा.
 • पालक थंड होताच पाण्यातून काढावा आणि हाताने हलके दाबत पालकातील उर्वरित पाणी काढून टाकावे.
 • नंतर पालकाचे 1-2” (2.5-5 cm) तुकडे करून घ्यावेत.
 • तयार केलेल्या सेस्मे सॉससोबत एकत्र करून खाण्यास घ्यावे.

**पालकाच्या ऐवजी फरसबी (फ्रेंच बीन्स) वापरूनही हे salad केले जाते.

तेरियाकी सामन (Teriyaki Salmon)

तयारीसाठी लागणारा वेळ : ५ मिनिट, बनवण्यासाठीचा वेळ: १० मिनिट

(साधारण २ लोकांसाठी)

साहित्य:

 • २ स्किनसकट सामन फिले
 • पाव टीस्पून मीठ
 • ताजी काळी मिरी पावडर चवीपुरती
 • १ टेबलस्पून मैदा
 • अर्धा टेबलस्पून तेल
 • १ टेबलस्पून बटर
 • १ टेबलस्पून साके

Seasoning साठी साहित्य

 • १ टेबलस्पून साके
 • १ टेबलस्पून मिरीन
 • १ टेबलस्पून साखर
 • २ टेबलस्पून सोया सॉस

कृती:

 • सिझनिंगसाठीचे सर्व साहित्य साखर विरघळेपर्यंत एकत्र करून घ्यावे.
 • सामन फिले धुवून कोरडे करून घ्यावेत. फिलेच्या दोन्ही बाजूंना मीठ आणि काळी मिरी पावडर नीट लावून घ्यावी.
 • फिलेना हलक्या हाताने मैदा लावून घ्यावा. जास्तीचा मैदा झटकून टाकावा.
 • एका फ्राइंग पॅनमध्ये तेल आणि बटर मध्यम आचेवर गरम करून घ्यावे. बटर करपणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
 • गरम झालेल्या तेल आणि बटरमध्ये माशाचे तुकडे प्रत्येकी ३ मिनिट असे दोन्ही बाजूंनी परतून घ्यावेत.

नंतर त्यात मिरीन घालून ३ मिनिटे वाफवून घ्यावेत. सामन फिले प्लेटमध्ये काढून घ्यावेत.

 • आधी तयार केलेले सिझनिंग त्याच पॅनमध्ये घालून, आच थोडी मोठी करावी. सॉसला उकळी येऊ लागताच सामन फिले त्यात सोडावेत आणि छोट्या चमच्याने सॉस फिलेला सर्व बाजूने लावून घ्यावा.
 • सॉस घट्ट होऊ लागताच गॅस बंद करावा आणि सामन फिले भातासोबत खाण्यास घ्यावे.

कोरोक्के (Potato & Meat Croquette)

तयारीसाठी लागणारा वेळ : १५ मिनिट, बनवण्यासाठीचा वेळ: १ तास ४५ मिनिट

(साधारण ६-८ लोकांसाठी)

साहित्य:

 • बटाटे – ९०० ग्राम
 • कांदा – १, बारीक चिरलेला
 • अर्धी वाटी बारीक चिरलेलं गाजर (ऐच्छिक)
 • १ वाटी बारीक चिरलेले मशरूम (ऐच्छिक)
 • २ टेबलस्पून तेल
 • ४५० ग्राम खिमा
 • अंडी – ४
 • मीठ – १ टीस्पून
 • ताजी काळी मिरी पावडर चवीनुसार
 • panko किंवा ब्रेड क्रम्ब्ज
 • अर्धा कप मैदा
 • तळण्यासाठी तेल

कृती

 • बटाटे उकडून कोरडे करून घ्यावेत. साल काढून मॅश करून घ्यावेत.
 • एका मोठ्या भांड्यात तेल घालून कांदा परतून घ्यावा. परतलेल्या कांद्यात गाजर आणि मशरूम घालून मऊ होईपर्यंत परतून घ्यावेत. नंतर खिमा घालावा आणि चांगला शिजवून घ्यावा. खिमा शिजल्यावर मीठ आणि मिरी पावडर घालून एकत्र करावे आणि मिश्रण बाजूला काढून ठेवावे.
 • मॅश केलेले बटाटे आणि खिमा एकत्र करून घ्यावा. बटाटे आणि खिमा दोन्हीही साधारण कोरडे असावे. अतिरिक्त पाणी असल्यास बाजूला काढावे. याच मिश्रणात एक अंडे घालून एकजीव करावे. मिश्रणाचे गोल गोळे बनवून घ्यावेत.
 • नंतर एक एक गोळा अनुक्रमे मैदा – अंडी – panko किंवा bread crumbs यात बुडवून घ्यावा.
 • फ्राइंग पॅनमध्ये तेल गरम करून घ्यावे आणि सोनेरी होईपर्यंत कोरोक्के तळून घ्यावेत.
 • तळलेले कोरोक्के टिश्यू पेपरवर काढून घ्यावेत आणि जास्तीचे तेल निथळू द्यावे.
 • आवडीच्या सॉस सोबत खाण्यास द्यावे. 

विभावरी देशपांडे

vibhavari

मिशिगन, नॉर्थ अमेरिका इथे वास्तव्य. व्यवसायानं Japanese-English Bilingual अनुवादक.

फोटो – विभावरी देशपांडे    व्हिडिओ – YouTube

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s