प्राची मसुरेकर – वेदपाठक
मी पहिल्यांदा कॉफी प्यायले माझ्या आजीबरोबर. ती जायफळ घातलेली, गोड दुधाळ कॉफी करायची. त्यात कॉफीची चव फार कमी होती. पुढे नेसकॅफेचे पाऊच आणून केलेली कॉफी, ऑफिसमधली रटाळ कॉफी, कॉफी डे मधली महाग कॉफी अशी ती बदलत गेली. पण सर्वात आवडली ती दक्षिणात्य फिल्टर कॉफी! तिचा सुंदर वास आणि कडवट चव याला तोड नाही. त्यासाठीचा खास फिल्टर आणून ती घरी बनवण्याचा प्रयत्नही मी केला, पण तशी कॉफी काही मला जमली नाही.
मग खूप वर्षांनी कॉफी नव्याने भेटली ती मी Netherlands ला आल्यावर. कुणालाही भेटल्यावर जसं आपण पाणी विचारतो तसं इथे कॉफी विचारली जाते, सहसा मग नाही म्हणायचं नसतं. इथला अगदी पहिला दुसरा दिवस असेल, कुणी तरी कॉफी विचारली मी ‘हो’ म्हटलं. हातात आला गरम काळा कुळकुळीत अर्क. कसाबसा अर्धा कप संपवला, मग लक्षात आलं, हवं त्याला दूध, साखर घालता येते, जी जवळच ठेवली होती.
इथल्या ऑफिसमध्ये एक प्रथा आहे, शेजारी बसणाऱ्या चार-पाच जणांनी आलटून पालटून चहा, कॉफी, पाणी हवं का विचारायचं आणि त्याप्रमाणे आणून द्यायचं. सुरुवातीला मी कॉफीत साखर, दूध मागितलं की प्रत्येकजण दरवेळी विचारायचं, “शुगर? रिअली?” इथे कोणीच चहा, कॉफीत साखर घालत नसल्याने सगळ्यांना खूप नवल वाटायचं. ह्या प्रकाराचा मला इतका कंटाळा आला की मी साखर मागणं बंद केलं आणि कोण आश्चर्य मला चहा, कॉफीचा स्वाद नव्याने कळला.
कॉफी आणि ती करण्याचे बरेच प्रकार आहेत. त्यांपैकी काही असे:
French प्रेस – एका cylindrical भांड्यात भरडलेले कॉफी बीन्स आणि उकळतं पाणी घातलं जातं. ४ ते ७ मिनिटांनी गाळण्यासारखी गोल चकती वरून खाली दाबली की गाळ खाली राहतो आणि सुंदर वासाची कडक कॉफी तय्यार.
ड्रीप ब्रू – हा प्रकार म्हणजे दाक्षिणात्य फिल्टर कॉफी. एक स्टेनलेस स्टीलचं उभट भांडं मधल्या फिल्टरने दोन कप्प्यांत विभागलेलं असतं. वरच्या भागात कॉफी आणि उकळतं पाणी घालून ती साधारण अर्धा तास ठेवून द्यायची. हळूहळू ठिबकून खालच्या कप्प्यात कॉफी जमा होते.
एस्प्रेसो – कॉफी मशीनने दबावतंत्र वापरून बनवलेली ती एस्प्रेसो. बारीक पूड असलेले कॉफी कॅप्सूल्स किंवा पॅड्स यावर दाब आणि उकळतं पाणी पडून काही सेकंदांत कॉफी तय्यार.
इन्स्टंट – ही म्हणजे आपली रोजची अतिप्रिय नेसकॅफे. अर्थात नेसकॅफे हा ब्रँड आहे, पण इतर कुठल्याच इन्स्टंट कॉफीला त्याची सर नसल्याने इन्स्टंट म्हणजे नेस हे समीकरणच होऊन गेलंय.
पश्चिम युरोपातील सर्द हवा, सततचा पाऊस आणि थंडी यामुळे कॉफी हा आयुष्यातला अगदी अविभाज्य भाग आहे. सर्वांत जास्त प्यायली जाणारी ‘लुंगो’ म्हणजे कपभर कोरी कॉफी. काही जण ह्यात ‘कॉफी मिल्क’ किंवा ‘एवापोरेटेड मिल्क’ म्हणजे अगदी जाड दूध घालतात, याने खरंच अप्रतिम चव येते.
एस्प्रेसो हा दुसरा प्रकार. ही म्हणजे इवल्याशा कपमधून दिलेली दोन घोट कडक कॉफी. एस्प्रेसो जड जेवणानंतर किंवा झटपट तरतरी येण्यासाठी घेतली जाते. आवडत असल्यास यातही थोडंसं दूध घालतात.
इटलीतल्या समृद्ध खाद्यसंस्कृतीने कडू एस्प्रेसोला लज्जतदार बनवलं. वेगवेगळया प्रमाणात दूध, दुधाचा फेस आणि इतर स्वाद वापरून कॅपचिनो, café late, mocha, macchiato अशी विविध प्रकारची कॉफी बनवता येते.
दोन एस्प्रेसो, उकळतं दूध आणि दुधाचा फेस या क्रमाने कपात घातला की झाली कॅपचिनो.
एक एस्प्रेसो, थोडं जास्त दूध आणि दुधाच्या फेसाने बनते café late.
कॅपचिनोमध्ये चॉकलेटचा स्वाद मिसळला की झाली cafe mocha.
एस्प्रेसोमध्ये अगदी थोडं फेसाळ दूध घातलं की ती Macchiato.
कॅपचिनो किंवा café late मध्ये vanilla, caramel, hazelnut हे स्वाद वापरून वेगवेगळया कॉफी बनवल्या जातात. ऋतूप्रमाणे काही ठरावीक महिन्यात खास कॉफी मिळतात. जसं शिशिरात (Autum) मध्ये pumpkin late किंवा हिवाळ्यात दालचिनीयुक्त कॅफे.
गरमागरम कॉफीचे कप मला जितके हवेसे वाटतात तितकीच प्रिय आहे Cold Coffee. नेदरलँडस्मधल्या महिन्याभराच्या उन्हाळ्यात ती खूप कमी वेळा लाभते. पण ती कसर मी मुंबईला आल्यावर भरून काढते. Cold Coffee देखील वेगवेगळे स्वाद वापरून आवडीप्रमाणे बनवता येते. बर्फाचा चुरा न करता फक्त बर्फाचे खडे घातलेली Cold Coffee खूप छान लागते.
गरम आणि थंड कॉफीइतकीच जरा हटके, पण चविष्ट असते Alcoholic किंवा Liquor Coffee. गरम कॉफीत एखादी खास लिकर किंवा व्हिस्की, क्रीम आणि साखर घालून Liquor Coffee बनवली जाते. याला ‘आयरिश कॉफी’ असंही म्हणतात. एखाद्या ४ ते ५ कोर्सच्या फॉर्मल डायनिंगनंतर Liquor Coffee त्या संध्याकाळचा शेवट सुखद करते.
जमैकन कॉफी बीन्स वापरून ‘तिया मारिया’ ही लिकर बनवतात. ती नुसती प्यायला फारच गोड असते, पण कॉफी किंवा इतर कॉकटेल्समध्ये चांगली लागते. आयरिश व्हिस्की आणि आयरिश क्रीम या आयर्लंडमधल्या दोन अप्रतिम गोष्टी एकत्र आल्या की बनते ‘बेलीज’. कॉफीचा स्वाद असलेलं बेलीज माझं आवडतं डेझर्ट ड्रिंक. मात्र ही सुद्धा बऱ्यापैकी गोड असते म्हणून फारच क्वचित; आणि दोन तीन घोट इतकीच पुरते.
वेगवेगळ्या ‘डेझर्टस’ किंवा गोड पदार्थांमध्येही कॉफी वापरली जाते. चॉकोलेट केक किंवा crumb केकमध्ये थोडीशी कडक कॉफी अप्रतिम चव आणते. केकच्या गोड चवीला छेद देत त्याला एक वेगळंच परिमाण देते. पॅनाकोट्टा, तिरामिसु या इटालियन डेझर्टसमध्येही कॉफी असते. कॉफीच्या स्वादाचे चोकोलेट्स, कूकीज इतकंच काय बिअरही मिळते.
कॉफीचा प्रत्येक शहरातला अनुभव वेगवेगळा. मुंबईतली कॉफी म्हणजे माझ्यासाठी तरी माटुंग्याच्या आनंद भवन किंवा म्हैसूर कॅफेमधली फिल्टर कॉफी. कॉलेजमध्ये असताना मी आणि कौशिक बऱ्याचदा या रेस्टॉरंट्समध्ये जायचो. मुंबईसारखीच इथे सतत घाई असते. गप्पा वगैरे मारत बसायचं नाही, भरभर काय ते खाऊन, कॉफी पिऊन पटकन निघायचं. अर्थात सततच्या गर्दीमुळे लोकही इथे फार थांबत नाहीत.
अॅमस्टरडॅमच्या कॅफेजमध्ये बऱ्याचदा ‘Douwe Egberts’ या कंपनीची कॉफी मिळते. सवयीने म्हणा किंवा खरोखर चांगली असल्यामुळे मला स्टारबक्स किंवा कॉफी कंपनी पेक्षा D E ची कॉफी फार आवडते.
इटलीच्या कॉफीचा तर काय थाट. कडक इस्त्रीच्या कपड्यातला अदबशीर वेटर आणि फॅशनेबल इटालिअन्सने कॅफे गजबजलेला असतो. आपण कॉफी मागवली की न सांगता कॉफीसकट प्रत्येकी एक पाण्याचा ग्लास आणि ‘cantuccini’ कुकी दिली जाते. युरोपात न मागता पाणी कुठेही दिलं जात नाही म्हणून याचं अप्रूप. कॉफी बीन्सची पूड करून ती लगेच वापरल्यामुळे या कॉफीचा वास आणि स्वाद अप्रतिम असतो. रोमला आम्ही उन्हाळ्यात गेल्यामुळे मी फार कॉफी नाही प्यायले, पण रोज सकाळचा एक कप नक्की होता.
व्हिएन्ना या ऑस्ट्रियाच्या राजधानीत ‘कॅफे सेंट्रल’ नावाचा १४० वर्षं जुना कॅफे आहे. तिथे कॉफी घेणं हा एक सुंदर अनुभव होता. अर्धवर्तुळाकार असलेली ही वास्तू आतून संपूर्ण संगमरवरी आहे. उंच छत झेलणारे गोलाकार उंच संगमरवरी खांब, जुन्या काळातील झुंबरे, तन्मयतेने पियानो वाजवणारा वादक आणि तितक्याच रसिकतेने ऐकणारे प्रेक्षक असं ते सुंदर वातावरण होतं. कॅफेमध्ये आलेले गेस्ट्स किंवा तेथील वाढपी यांपैकी कोणालाच घाई नव्हती. पोटात कावळे ओरडत असतील तर जाण्याचे हे मुळीच ठिकाण नाही. त्या वास्तूत स्वस्थपणे बसून त्या वास्तूचे सौंदर्य न्याहाळायचे, सुरू असेलल्या संगीताचा आणि वाफाळलेल्या कॉफीचा आस्वाद घ्यायचा. Sigmund Freud, Peter Altenberg, Alfred Adler, Adolf Hitler, Vladimir Lenin यांसारखी जगप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वं कॅफे सेंट्रलचे नियमित अभ्यागत होते. १५० वर्षांपूर्वीचा काळ जणूकाही या वास्तूत थांबून राहिला आहे. कॅफे सेंट्रलचे वातावरण, अप्रतिम पेस्ट्रीज आणि कॉफी यामुळे ती दुपार माझ्या कायमची लक्षात राहिली.
सर्वांत ताजा अनुभव अथेन्सचा. तीन-चार दिवसांच्या वास्तव्यात पहिल्याच दिवशी एका छोट्याश्या कॉफीच्या दुकानाने माझं लक्ष वेधून घेतलं. जगप्रसिद्ध अक्रोपोलिसच्या समोर रस्त्याच्या कोपऱ्यात लपलेले एक दुकान. फक्त टेक अवे कॉफी मिळण्याची जागा. बसायला खुर्च्यादेखील नाहीत. वेगवेगळ्या कॉफी बीन्स छोट्या छोट्या गोणींमध्ये सुबकपणे मांडलेल्या. रॉ चॉकलेट्स, ड्राय फ्रूट बार्स ते इन हाऊस म्हणजेच स्वतः बनवतात. तिथल्या मुलीनं वेगवेगळ्या कॉफी बीन्सने त्यांच्या मेनूमधील प्रत्येक कॉफी कशी वेगळी लागते ते समजावून सांगितले. तिथली कॅपचिनो अप्रतिम होती. न चुकता रोज सकाळची कॉफी मी तेथे घ्यायचे. ती कॉफी प्यायल्यानंतर तिथली इतर कोणतीही कॉफी ‘गोड’च लागेना. फिल्टर नसतानाही तिथली पूड गरम पाण्यात टाकून कॉफी करून प्यायचे मी.
युरोपात कॉफी हे फक्त एक पेय नाही, तर तो या संस्कृतीचा भाग आहे. “मीट ओव्हर कॉफी” म्हणजे कॉफी प्यायला भेटायचं, पण त्यात खरंतर नवीन ओळखी, भेटीगाठी, कामाची बोलणी असं बरंच काही होतं. कॉफी प्यायला लोक वेळ काढून, छान तयार होऊन येतात. कॉफीबरोबर Netherlands मध्ये एक ‘koek’ म्हणजे छोटीशी कुकी किंवा चॉकलेट दिलं जातं. कॉफी आणि सफरचंदाचे केक (अॅपल टार्ट) ही इथली प्रसिद्ध जोडगोळी. अॅपल टार्टचा एक तुकडा, क्रीम आणि कॉफी घेतली म्हणजे तोच त्या दिवशीचा लंच.
अगदी हॉस्पिटलमध्येदेखील रुग्णांसकट सर्वांना आवर्जून कॉफी विचारली जाते. नवीन घरी राहायला गेलं तर शेजाऱ्यांना कॉफीसाठी बोलावले जाते. अशी ही कडू कॉफी माणसं जोडण्याचं गोड काम छान करते.
१. कोल्ड कॉफी – २ ग्लास
थंड दूध – १ ग्लास
वॅनिला आईसक्रीम – दोन स्कूप
इन्स्टंट कॉफी – २ टेबलस्पून
वरील सर्व जिन्नस मिक्सरमध्ये फिरवा. पातळ आवडत असल्यास थोडं आणखी दूध घाला.
ग्लासात बर्फाचे खडे घाला आणि मग कॉफी घाला.
२. आयरिश कॉफी – १ कप
ताजी बनवलेली कोरी कॉफी – १ कप
साखर – १ टेबलस्पून
आयरिश किंवा कोणतीही व्हिस्की – ३ टेबलस्पून
फेटलेले हेवी क्रीम – २-३ टेबलस्पून
कपमध्ये उकळती कॉफी घाला, साखर घालून ढवळून घ्या. लगेचच व्हिस्की घाला, वरून क्रीम घालून सर्व्ह करा.
प्राची मसुरेकर – वेदपाठक
मुंबईकर, पण गेल्या सहा वर्षांपासून नेदरलँड्समध्ये.
फोटो – प्राची मसुरेकर-वेदपाठक व्हिडिओ – YouTube
Uttam lekh…wegwegalya thikanchya coffee baddal chaan mahiti..
Aani coffee hi nusate pey nasun sankruti aslyacha lekhatun nakki pohochate
LikeLike