खाद्यभ्रमंतीचं एल डोरॅडो! – पेरू

पुष्पक कर्णिक

(अनुवाद साहाय्य – नीलेश अग्निहोत्री)

एल डोरॅडो – संपन्न, समृद्ध असं काल्पनिक शहर

Political simple map of Peru, single color outside, borders and labels.
Political simple map of Peru, single color outside, borders and labels.

१९९३ सालापासून ‘Word Travel Awards’ हे जागतिक पर्यटन उद्योगात विशेष मान्यताप्राप्त आणि अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाणारे पुरस्कार आहेत. या पुरस्कारांच्या निवड समितीवर विविध क्षेत्रातल्या मान्यवर व्यक्ती असतात. २०१२ ते २०१५ अशी  सलग चार वर्षं ‘World’s Leading Culinary Destination’ हा सन्मान मिळवणारा देश कोणता असेल? उपजतच असलेल्या सौंदर्यदृष्टीचा, आपल्या पाककलेशी मोहक असा मेळ घालणारा फ्रान्स? आपल्या सुबक पाककृतींनी रसग्रंथींचा ठाव घेणारा इटली? पारंपरिक मसाल्यांच्या मांदियाळीने खवय्यांची मनं जिंकणारा भारतीय उपखंडातला एखादा देश? की नजाकतभरी (Kaiseki) काईसेकी पेश करणारा जपान असा काहीतरी तुमचा अंदाज असू शकतो. पण खरं उत्तर ऐकून तुम्ही बुचकळ्यात पडल्याशिवाय राहणार नाही.  या सगळ्यांना मागे टाकत, सलग चार वर्षं हा पुरस्कार पटकावणारा देश आहे – पेरू !

पेरू – दक्षिण अमेरिका खंडाच्या वायव्येला, पॅसिफिक महासागराला रेलून निवांत पहुडलेला देश. या देशाला शतकानुशतकांच्या अभिजात संस्कृतीचा संपन्न वारसा लाभला आहे. काळाच्या ओघात या देशाने इतर अनेक संस्कृतीही आपल्याशा केल्या, पण या संस्कृती सामावून घेताना त्यांना खास पेरूवियन संस्कृतीचा सफाईदार मुलामाही चढवला. तसं बघायला गेलं तर दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया, ब्राझिल, चिले, आणि कोलंबिया या इतर भावंडांमध्ये पेरू ही धाकटी पाती. या थोरल्या भावंडांची संस्कृती आणि पाककला जगाला अधिक ओळखीची असली तरीही पेरूच्या खाद्यसंस्कृतीने खवय्येगिरीत विशारद असलेल्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

नुकताच काही मित्रांबरोबर पेरू या देशाला भेट देण्याचा योग आला, तेव्हा व्हिसासाठी वकिलातीत गेल्यावर तिथला मुख्य अधिकारी, Senor Miguel Angel Velásquez García, याने स्वतः आमची मुलाखत घेतली. हा अनुभव, इतर काही देशांच्या वकिलातीत येणाऱ्या उलट तपासणीसदृश अनुभवापेक्षा भलताच सुखद, अगदी घरगुती गप्पा मारल्यासारखा होता. “भारत आणि चीनसारख्या देशांनी information technology  सारखं क्षेत्र, जगात आपला ठसा उमटवण्यासाठी निवडलं आणि ओघातच हे देश जगाचे ‘brainy powerhouse’ झाले. पण पेरूने मात्र जगातला सर्वोत्कृष्ट मुदपाकखाना होण्याचं ठरवलं. जेणेकरून आमच्या खाद्यसोहळ्यात सहभागी होण्यासाठी आम्हांला सगळ्या जगाला आमंत्रण देता येईल!”  हे सांगत असतानाचा त्याचा सूर मिश्किल होता आणि यावरून तिथे गेल्यावर आपल्या पानात काय वाढून ठेवलंय याचा अंदाज सियॅटलमधल्या पेरूच्या वकिलातीतच आला. पुढे पेरूमधल्या वास्तव्यात अनुभवलेलं आदरातिथ्य, प्रेमळपणा आणि सळसळता उत्साह याची एक झलकच इथे मिळाली.

लिमा हे पेरूच्या राजधानीचं शहर. आमची भटकंती लिमापासूनच सुरू झाली. या शहरात फिरताना त्याच्या होणाऱ्या विविधांगी दर्शनातून ते आपल्यापुढे उलगडत जातं. इथल्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे इथली प्रसिद्ध ‘Food Tour’. चार तासांची ही Food Tour आपल्याला जगातील पारंपरिक खाद्यसंस्कृतींपैकी एक असलेल्या पेरूवियन खाद्यसंस्कृतीची सफर घडवते.

पेरूवियन खाद्यसंस्कृती ही अभिजात इन्का, युरोपियन (स्पॅनिश, जर्मन आणि इटालियन), आफ्रिकन आणि आशियाई (चीन व जपान) यांचं मिश्रण आहे. या खाद्यसंस्कृतीला सुमारे ५०० वर्षांचा इतिहास आहे. पेरूवियन खाद्यसंस्कृतीची उत्क्रांती ही एक देश म्हणून पेरूत होत गेलेल्या बदलांशी सुसंगत आहे. अगदी आरंभीच्या काळात इथे स्थायिक झालेल्या लोकांनी भवतालाशी जुळवून घेत निसर्गतः जे उपलब्ध होतं त्यावरच आपलं पोट भरलं. त्यांच्या जेवणात मुख्यतः मका, बटाटा, शेंगा (legumes), राजगिरा (Amaranth) व किनवा (Quinoa) यांचा समावेश असे. अॅंडीज पर्वतरांगांमध्ये पिकणाऱ्या जांभळ्या मक्याचं (purple corn) पेरू हे जणू माहेरघरच. पेरूत पिकणारा मक्याचा दाणा हा अमेरिकेतल्या मक्याच्या दाण्यापेक्षा अधिक मोठा आणि चविष्ट असतो. मक्याइतक्याच इथे पिकणाऱ्या Fava Beans या शेंगाही प्रसिद्ध आहेत. या शेंगा उन्हात वाळवून त्याचा चुरमुऱ्यासारखा एक प्रकार करतात. त्याला ‘हाबास’ (Habas) असं म्हणतात.  हाबासची लोकप्रियता व्यसनाधीनतेच्या सीमारेषेवर रेंगाळते; ती इतकी की पेरूतल्या विमानकंपन्यादेखील प्रवाशांना हाबास खायला घालतात. पेरूत बटाट्याचे सुमारे ३,८०० प्रकार पिकतात. आमच्या चार दिवसाच्या कॅंपिंगमध्ये आम्हांला त्यातले जवळजवळ २० प्रकार चाखता आले. पेरूच्या मूळ रहिवाशांच्या आहारात आपल्या चिकू व रामफळासारखी दिसणारी अनुक्रमे Lucuma आणि Cherimoya, पपनस, पपई  इत्यादी फळांचा समावेश असे.

नंतर स्पॅनिश लोकांनी आपल्याबरोबर युरोपियन गहू, भात, काबुली चणे, लवंग, वेलदोडा, केशर, काळी मिरी, बडीशेप यांसारखे मसाल्याचे पदार्थ आणि बीफ, पोर्क व चिकनसारखा मांसाहार आणला. त्यांनी आपल्याबरोबर पश्चिम आफ्रिकेतून अनेक गुलामही आणले. या गुलामांचं खाद्य हे कठोर अंगमेहनतीला पूरक असं होतं. गुलामांनी आणलेल्या आफ्रिकन संस्कृतीची पाळंमुळं आता पेरुवियन संस्कृतीत घट्ट रुजली आहेत. पेरुतल्या या आफ्रिकन खाद्यसंस्कृतीबद्दल एक कथा सांगितली जाते ती अशी –

anticucho_de_corazon_chicha_morada
(डावीकडे) आंतिकुचो दे कोरासोन, सोबत चिचा मोरादा. (उजवीकडे) सेविचे, पेरूचे राष्ट्रीय खाद्यपदार्थ.

कमालीच्या दारिद्र्यामुळे गुलामांना मांस विकत घेणे परवडत नसे. उपलब्ध असलेलं आणि चांगल्या प्रतीचं सगळं मांस हे गुलामांच्या मालकांकडे म्हणजे स्पॅनिश लोकांकडे जात असे. त्यामुळे स्पॅनिश लोकांनी फेकून दिलेले प्राण्यांचे अवयव (Organ Meat) तेवढे गुलामांच्या नशिबी येत. पण गरज ही शोधाची जननी असते या तत्त्वाला अनुसरून या आफ्रिकन गुलामांनी, आपली कल्पकता वापरून स्वतंत्र मांसाहारी पाककृती तयार केल्या; ज्या आज पेरूवियन खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. अशीच एक अत्यंत लोकप्रिय पाककृती म्हणजे ‘Anticuchos’ (आंतिकुचोस्). बीफची कलेजी आफ्रिकन मसाल्यांमध्ये घोळवून, सळयांना टोचून, शीश कबाबप्रमाणे कोळशावर खरपूस भाजली की ‘Anticuchos’ तयार होतं. हे मुख्यतः ‘स्ट्रीट फूड’आहे. आपल्या कल्पकतेने प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याच्या मनुष्यजातीच्या कौशल्याचा हा एक उत्तम नमुना आहे. या पदार्थाबरोबर उकडलेलं मक्याचं कणीस आणि बटाटा वाढण्याची पद्धत आहे.

 

आफ्रिकन माणसांना गुलाम म्हणून पेरूत आणलं गेलं असलं तरी चिनी आणि जपानी माणसं मात्र चांगल्या जीवनशैलीच्या शोधात स्वतःहून इथे स्थलांतरित झाली. ही माणसं स्पॅनिश लोकांच्या मालकीच्या शेतांवर मजुरी करत असत. पेरू आणि चीनच्या खाद्यसंस्कृतीच्या संकरातून ‘शीफा’(Chifa)  या खाद्यसंस्कृतीचा जन्म झाला. मंदारिन भाषेत शीफाचा अर्थ  ‘भात खाणे. अस्सल चिनी पाककृतींसाठी लागणारं साहित्य पेरूमध्ये सहज मिळत नसे. त्यामुळे चिनी लोकांनी नाईलाजाने पेरूत उपलब्ध असलेले पदार्थ वापरून नव्या पाककृती निर्माण केल्या. या पाककृतींना पुढे जाऊन १९व्या शतकात लिमामधील अनेक खानदानी कुटुंबांमध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली. शीफाने लवकरच संपूर्ण देशाला झपाटून टाकलं. आज लिमा आणि आजूबाजूच्या प्रदेशात, जिथे चिनी लोकांची प्रामुख्याने वस्ती आहे, तिथे ‘शीफा’मिळणारी अनेक ठिकाणं आहेत.

जपानी लोकांनी आपल्याबरोबर नजाकतदार आणि नैसर्गिक चवीचा मान ठेवणाऱ्या, विशेषतः मत्स्याहारातील सुशी/साशिमीसारख्या पाककृती आणल्या. पेरूमध्ये सुमारे २००० वर्षांपासून मासे साठवून ठेवण्याचं एक तंत्र वापरलं जातं. यात ‘चिचा’(chicha) नावाच्या मक्यापासून तयार केलेल्या आणि आंबवलेल्या पेयात मासे घोळवले जातात. पेरुवियन आणि जपानी पाककृतींचा मेळ तिथे मिळणाऱ्या Ceviche (सेविचे) या पदार्थात अनुभवता येतो. समुद्रातल्या, मुख्यतः Sea Bass सारख्या माशांचे तुकडे लिंबाच्या रसात घोळवून मग वाळवले की हा पदार्थ तयार होतो. लिंबाच्या रसातल्या ॲसिड्समुळे माशांमध्ये असलेल्या प्रथिनांचं (proteins) विघटन होतं. याला ‘Denaturing’ असं म्हणतात. या प्रक्रियेमुळे कच्चा असला तरी मासा शिजल्यासारखा लागतो. Aji-peppers हा पेरूमध्ये पिकणाऱ्या  मिरच्यांचा एक प्रकार.  Cevicheला अधिक चविष्ट करण्यासाठी त्यात Aji-peppersचे बारीक तुकडे मिसळतात. कच्चा कांदा, उकडलेला गोड बटाटा आणि भाजलेलं मक्याचं कणीस हे त्याचे साथीदार या पदार्थाची रंगत वाढवण्याचं काम चोखपणे पार पाडतात. ही पेरूची राष्ट्रीय पाककृती आहे. जिथे Ceviche मिळत नाही असं रेस्टॉरंट पेरूमध्ये क्वचितच सापडेल !

पेरू हा गोडघाशांचाही देश आहे. इथे घरोघरी Arroz con Leche  हे पारंपरिक स्पॅनिश पक्वान्न केलं जातं. हे आपल्या तांदळाच्या खिरीसारखं लागतं. भात शिजवून तो दुधात भिजवतात आणि त्यात मनुका, दालचिनी, जायफळ इत्यादी मिसळून Arroz con Leche  तयार होतं. ‘Mazzamora Morada’ किंवा  ‘Purple Jelly’ म्हणूनही ओळखला जाणारा अजून एक गोड पदार्थ मुख्यतः इथल्या ‘स्ट्रीट फूड’चा भाग आहे. हा पदार्थ जांभळ्या मक्यापासून तयार करतात. आधी वर्णन केलेल्या Anticuchosच्या बरोबरीने जांभळ्या मक्याच्या दाण्यांपासून तयार केलेलं ‘Chichaa Morada’ नावाचं एक गोड पेयही मिळतं. लिमामधल्या आमच्या ‘Food Tour’ मध्ये या सगळ्या पदार्थांशी आमची चांगलीच ‘तोंडओळख’ही झाली! पण आम्हांला सर्वाधिक आवडलेला प्रकार म्हणजे खास पेरूवियन खाद्यसंस्कृतीला साजेशा ढंगाने पेश केलेले पारंपरिक स्पॅनिश डोनट्स – Picarones. मका आणि लाल भोपळ्याच्या पिठाचं मिश्रण करून ते डोनट्सच्या आकारात तळतात. ते साखरेच्या पाकासारख्या गोड सॉसबरोबर खायचे असतात. आम्ही Picarones खाल्ले ते ’fig-honey’ म्हणजेच अंजिराच्या चवीच्या सिरपबरोबर.

पेरूवियन health-juice चा आस्वाद घेताना माझा मित्र मकरंद.
पेरूवियन health-juice चा आस्वाद घेताना माझा मित्र मकरंद.

पेरूच्या ‘स्ट्रीट फूड’चं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जागोजागी असलेली ज्यूसची दुकानं. फेरीवाल्यांच्या गाड्यांवर ताजी फळं, फळांचे अर्क आणि Vitamins व इतर supplementsच्या पावडर रचून ही दुकानं थाटलेली असतात.  कोरफडीचा अर्क हा ज्यूसचा मुख्य घटक असतो. एका मोठ्या पातेल्यात कोरफडीचा गर टाकून पाणी उकळत ठेवतात. आणि मग गिऱ्हाईकाच्या ऑर्डरप्रमाणे तो विक्रेता ताज्या फळांचा गर, vitamin powder आणि इतर काही पारंपरिक औषधं एकत्र करून ज्यूस तयार करतो. हे ज्यूस जरासं औषधासारखं लागत असलं तरी ते चविष्ट असतं आणि या ज्यूसचा एक संपूर्ण ग्लास रिचवणं हे एकट्या माणसाच्या आवाक्याबाहेरचं काम आहे.

पेरूमध्ये प्रसिद्ध असलेलं अजून एक पेय ‘Pisco’, म्हणजे पेरूवियन बनावटीची द्राक्षांपासून तयार केलेली ब्रँडी. Ceviche हे जसं पेरूचं राष्ट्रीय खाद्य आहे तस Pisco हे पेरूचं राष्ट्रीय पेय आहे. अत्यंत महागड्या ते स्वस्तातल्या स्वस्त अशा सर्व श्रेणीच्या बुटिक्स, सुपर मार्केट्स आणि दुकानांत Pisco मिळतं. Piscoचं कॉकटेल हा त्याचा सर्वात लोकप्रिय अवतार. ‘Pisco Sour’ नावाचं कॉकटेल, Pisco, लिंबाचा रस, साखर आणि egg white एकत्र घुसळून, त्यात बर्फाचा चुरा टाकून तयार करतात. आमचा टूर गाईड, Julio आम्हांला Pisco Sourबद्दल एक गंमत सांगत होता. तो म्हणाला, “या कॉकटेलचा एक ग्लास एखाद्या पर्यटकाने प्यायला तर तो आनंदी होतो.  दोन ग्लास प्यायला तर नाचायला लागतो आणि तीन ग्लास प्यायला तर स्पॅनिशमध्ये बोलायलाच सुरुवात करतो!” हे ऐकून मी आनंदी होण्यातच समाधान मानलं!

अॅंडीज पर्वतरांगामधल्या आणि समुद्रसपाटीपासून उंचावर असलेल्या प्रदेशात प्यायलं जाणारं अजून एक पेय म्हणजे कोकोचा चहा (Mate de coca). कोकोची वाळलेली पानं सुमारे पाच मिनिटं पाण्यात उकळली की चहा तयार होतो. तिथे असा एक समज आहे की कोकोच्या पानात असलेल्या अल्कलाईड्समुळे समुद्रसपाटीपासून उंचावर गेल्यावर विरळ ऑक्सिजनमुळे होणारा त्रास (altitude sickness) काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते. कोकोची पानं चघळण्याचीसुद्धा इथे पद्धत आहे. ग्रीन टीसारखी ही पानं चवीला थोडी कडसर असतात. ज्यांना असा चहा किंवा पानं चघळणं आवडत नसेल त्यांच्यासाठी कोकोच्या अर्कापासून तयार केलेले चॉकलेट्स, गोळ्या किंवा अगदी दारूसुद्धा मिळते. कोकोच्या औषधी गुणधर्माचं राहू द्या, पण त्याच्या केवळ चवीसाठी आम्ही कोको चहाचे अनेक कप रिचवले आणि त्याच्या पानांच्या अनेक चिमटी तंबाखूसारख्या दिवसभरात चघळल्या!

लिमा आणि पेरूच्या इतर भागांतला खाद्यानुभवही विलक्षण आनंददायी होता. जगातल्या आश्चर्यांपैकी एक असलेल्या ‘माचु पिचु’ला जाताना, आमच्या कॅंपमध्ये आम्हांला स्थानिक पदार्थांची मेजवानी मिळाली. ‘माचु पिचु’च्या ट्रेकमध्येसुद्धा आमच्यासाठी सूप, ॲपेटायझर्स (starters), किमान तीन ते चार मेन कोर्सेस आणि वर कोको चहा असं साग्रसंगीत जेवण दिलं जायचं. शाकाहारींसाठी खास निरामिष पदार्थ असायचे आणि कधी कधी ते सामिष पदार्थांपेक्षाही अधिक चविष्ट असायचे. यात वांग्याच्या कापांसारखा असलेल्या Fried Eggplant याचा विशेष उल्लेख करावा लागेल. Lake Sandoval या काहीशा दुर्गम असलेल्या ठिकाणी तर नाश्त्यासाठी बाजूच्या जंगलातली ताजी फळं आम्हांला दिली होती.

कॅंपसाईटवर तयार केलेला फ्रूट केक!
कॅंपसाईटवर तयार केलेला फ्रूट केक!

आधीच माहीत असलेल्या घटकांपासून तयार केलेले नवीन पदार्थ हा तर आम्हांला आश्चर्याचा धक्काच होता. उदाहरणच द्यायचं झालं तर किनवाचं अननस घालून केलेलं ज्यूस फारच अप्रतिम होतं! एका कँपमध्ये तर आमच्या आचाऱ्याने दोन तास निवांतपणे सरपणाच्या मंद आचेवर अप्रतिम केक बनवला. आमच्या प्रवासात भरपूर हसणं-खिदळणं, चविष्ट जेवणं आणि अनेक आश्चर्ये यांनी आमची संगत कधीच सोडली नाही. प्रत्येक जेवणानंतर मिळणारी तृप्ती, उद्या जेवायला काय असेल या उत्सुकतेच्या आडही कधी आली नाही. कोणत्याही भपकेबाजपणाशिवाय ताज्या पदार्थांनी सिद्ध केलेली पाककृती किती उच्च दर्जाची असू शकते याचा प्रत्यय या प्रवासात आला.

पेरूवियन पारंपरिक खाद्यसंस्कृतीची ध्वजा मुख्यतः इथल्या ‘स्ट्रीट फूड’ने उंचावून धरली असली तरी सध्या या खाद्यसंस्कृतीने ‘Fine Dining’ हीच ओळख असलेल्या अनेक उच्चभ्रू रेस्टॉरंस्ट्समध्येही मानाचं पान मिळवलं आहे. अनेक पदार्थांनी आकर्षकपणे सजवलेली एखादी डीश ही जिव्हा आणि उदराइतकीच नजरेलाही तृप्त करून जाते. पेरू हे जगातल्या अनेक उच्च मानांकित रेस्टॉरंट्सचं माहेरघर आहे.  ही रेस्टॉरंट्स म्हणजे पेरूचे साधे स्थानिक पदार्थ, पाककलेची नाविन्यपूर्ण तंत्रं आणि त्याचं मोहक सादरीकरण यांचा अप्रतिम संगम आहे.

पेरूवियन लोक कोणतीही पाककृती मनापासून तयार करतात. तिचं सादरीकरण कमालीचं विचारपूर्वक आणि काटेकोर असतं. समोर येणारे पदार्थ नेहमी चविष्ट, ताजेतवाने आणि आल्हाददायकच असतात. मग ते Morena Peruvian Kitchen सारखं Fine Dining रेस्टॉरंट असो किंवा El Tabuco सारखं अगदी लहानशा गाळ्यातलं पिझ्झा मिळणारं ठिकाण असो, किंवा Café Organika सारखं आजच्या जमान्यातलं पर्यावरणाची बूज राखण्याच्या कल्पनेतून साकारलेलं रेस्टॉरंट असो. आपल्या खाद्यश्रीमंतीने पाहुण्यांना आपलंसं करण्याचं पेरूचं हे कसब ‘स्ट्रीट फूड’, ते Fine Dine रेस्टॉरंट्स असं सर्वव्यापी आहे! पेरूवियन खाद्यश्रीमंतीचा अनुभव घेताना वेळोवेळी Senor Garcia चे ते शब्द आमच्या कानात घुमत होते. त्यात काहीच अतिशयोक्ती नव्हती.

पेरूचा ‘Culinary Destination of the World’ हा सन्मान यथोचितच आहे. आम्हांला असं जाणवलं की पेरूमधली खाद्यभ्रमंती हा केवळ उदरभरणाचा उपचार नाही, तर ती पंचेंद्रियांना परितृप्त करणारी एक अनुभूती आहे. या खाद्यश्रीमंतीला पेरूच्या माणसांच्या अगत्यशीलतेची उचित जोड आहे. पेरूच्या खाद्यसंस्कृतीने आम्हांला जिंकून घेतलं हे वेगळं सांगायची गरज नाही.

पुष्पक कर्णिक  (अनुवाद सहाय्य – नीलेश अग्निहोत्री)

pushpak_profile_image

पुष्पक हा व्यवसायानं कॉम्प्युटर तज्ज्ञ आहे पण त्याला अभिव्यक्तीचे वेगवेगळे प्रकार आवडतात. त्याला प्रवासाची प्रचंड आवड आहे. तो सध्या सिएटलजवळच्या Sammamish या उपनगरात राहातो.

फोटो – पुष्पक कर्णिक    व्हिडिओ – YouTube

2 Comments Add yours

  1. सचिन पटवर्धन says:

    कोकोच्या पानांचे पेय नसावे तर कोकाच्या पानांचे पेय असावे. मराठी translation किंवा transliteration मध्ये घोळ झालेला वाटतोय. कोको म्हणजे सर्वसाधारणपणे ज्यापासून चॉकोलेट बनवतात ते फळ किंवा त्याच्या बिया. कृपया तपासावे. बाकी लेख अतिशय सुंदर. वाचून एकदा तरी पेरूला गेलेच पाहिजे असे वाटले.

    Like

  2. Vidya Subnis says:

    लेख आवडला, चांगले वर्णन केलेय

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s