सई कोर्टीकर
मॉरिशस. सुंदर निसर्गसृष्टी, भव्य समुद्रकिनारा, पांढरी वाळू, नितळ समुद्रतळ आणि सगळीकडे हिरवळ. चारही बाजूंनी समुद्रकिनारा असल्यामुळे इकडे पावसाच्या तुरळक सरी वर्षभर पडत असतात.
इकडे पहिल्यांदा, मार्च २०१६ मध्ये येण्याआधी मनात प्रश्न होते. तिथली माणसं कशी असतील, राहणीमान कसं असेल, आपलं नीट निभावेल की नाही वगैरे. माझ्या सासूबाईंना तर विशेष काळजी. मुलं पहिल्यांदा परदेशी चालली आहेत. स्वयंपाकसामग्री, इकडच्या भाज्या, सगळं मिळेल ना मॉरिशसमध्ये. पण, इथे आल्यानंतर सगळी काळजीच मिटली. लगेचच आईंना फोन केला – “आई काळजी करू नका. इथल्या सुपर मार्केटमध्ये भारतीय ब्रँडच्या गोष्टी मिळतात”.
इकडे आल्यानंतर एका मॉरिशिअन मैत्रिणीने माहिती दिली, या देशात प्रत्येक टाउनशिपमध्ये मार्केट डे ठरलेले आहेत. त्यादिवशी आसपासचे शेतकरी ताजी फळं, भाजीपाला, लोणची, फिश अशी बरीचशी सामग्री घेऊन विकायला येतात. पहिल्यांदा भाषेचा जरा गोंधळच उडाला, कारण इथे क्रिऑल आणि फ्रेंच भाषा बोलली जाते. लोकांना इंग्लिशही कळतं म्हणून जरा निभावून गेलं.
पहिल्याच दिवशी एक गंमत झाली. एक हिरवी माठवर्गीय पालेभाजी दिसली म्हणून मी इंग्लिशमध्ये विचारलं, “ही कोणती भाजी?” तर समोरून उत्तर आलं आणि तेही तोडक्या मोडक्या हिंदीमध्ये – “मॅडमजी, ये मॉरिशिअन पालक है. इंडिया से अलग दिखता है, आप खाके देखो, स्वाद वैसेही मिलेगा”. माझ्यासाठी जरा अनपेक्षित होतं. मग मी त्यांना विचारलं, ‘‘आप हिंदी जानते हो?” तेव्हा कळला इकडचा इतिहास!
भारतीय वंश मॉरिशसमध्ये
ब्रिटिशांनी इथे दीडशे वर्षं राज्य केलं. भारताच्या पारतंत्र्याच्या कालावधीमध्ये अठराव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय वंशाच्या लोकांना इथे कामगार म्हणून आणलं होतं. मॉरिशसमध्ये तुम्हांला बहुतांशी भारतीय वंशाचे लोक भेटतील. आणि या लोकांना कोणी भारतीय आहे, असं कळलं की जवळचं कोणी भेटल्याचा आनंद होतो. खूप प्रेमळ आणि मदतीसाठी तत्पर आहेत हे मॉरिशिअन रहिवासी.
मॉरिशस हे विविधतेने नटलेलं, राष्ट्रीय एकात्मता जपणारं एक निसर्गरम्य बेट आहे. मॉरिशसमध्ये महाराष्ट्रीय, बिहारी, बंगाली, तामिळ, फ्रेंच, चिनी, मुस्लिम, आफ्रिकन, ब्रिटिश आणि ख्रिस्ती समाजाचे रहिवासी भेटतील.
खाद्यसंस्कृतींचा संकर
इथे खाद्यप्रकारांमध्येही विविधता आढळते. मॉरिशस हे स्थलांतरित लोकांनी वास्तव्य केलेलं राष्ट्र असल्याकारणाने या देशावर युरोप, आशिया आणि आफ्रिका खंडाच्या खाद्यसंस्कृतीचा प्रभाव आहे. स्थलांतरित लोकांनी आपापल्या देशातील स्थानिक खाद्यपद्धती मॉरिशसमध्ये आणल्या आणि त्यांचा संकर मॉरिशसच्या स्थानिक खाद्यप्रकारांबरोबर झाला. यातूनच इथल्या खास मॉरिशिअन क्रिऑल खाद्यसंस्कृतीचा उदय झाला.
स्थलांतराच्या लाटेसोबत जगातल्या तीन सुप्रसिद्ध देशातल्या खाद्यपदार्थांची लहर मॉरिशिअसमध्ये आली. हे तीन सुप्रसिद्ध देश आहेत फ्रान्स, भारत आणि चीन. यासोबतच इथला क्रिऑल मॉरिशिअन खाद्यप्रकार. क्रिऑल हे आफ्रिकन आणि युरोपियन खाद्यपदार्थांचं मिश्रण आहे.
मॉरिशिअन खाद्यसंस्कृतीमध्ये प्रामुख्याने सिझनिंग, मसाले, सॉसेस, मासे, चिकन, पोर्क, बीफ, मीट, चटणी, लोणची, सूप, शाकाहारी आणि मांसाहारी करी त्यासोबत राईस, सलाड, पालेभाज्या, डाळी, अंडी, पुरी, ढोलपुरी, सामोसा, रॅप्स, फराटा (इकडे पराठ्याला फराटा असं संबोधतात), बिर्याणी, चिकन बोलेट्स, केक, गोड पदार्थ, नूडल्स, सॅन्डविच, सुशी असे बरेचसे पदार्थ आवडीने खाल्ले जातात.
नाश्ता आणि जेवण
मॉरिशिअन रहिवासी दिवसाची सुरुवात करताना इंग्लिश नाश्त्याऐवजी युरोपियन पदार्थास प्राधान्य देतात. युरोपियन नाश्त्यामध्ये ब्रेड / टोस्ट, चहा, कॉफी, फ्रेश फ्रुटस, पराठा, बेक्ड बीन्स हे प्रकार मिळतात.
दुपारच्या जेवणात ढोलपुरी, रॅप्स, राईस-करी, नूडल्स, चिकन बोल्लेट्स हे पदार्थ प्रामुख्याने घेतले जातात. इकडे आल्यानंतर एक प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट – तुम्ही कुठल्याही मॉरिशिअन रेस्टॉरंटमध्ये गेलात तर तुम्हांला व्हिनेगर घातलेली लसणाची पाण्यासारखी पातळ चटणी आणि हिरव्या मिरचीची चटणी मिळतेच.
ढोलपुरी

ढोलपुरी हा पदार्थ इथे खूप लोकप्रिय आहे. तूरडाळ उकडून त्याचं सारण करतात आणि ते सारण मैद्याच्या कणकेमध्ये घालून पुरणपोळीप्रमाणे पोळी लाटतात.
इथल्या प्रत्येक खाद्यप्रकारांमधला मूळ घटक आहे टोमॅटो. इथे टोमॅटोला पॉम-दे-मर आणि कोथिंबिरीला कोटमिल संबोधलं जात. यासोबत कांदा, मिरची, लसूण, पार्सले, थाईम, आलं आणि कोथिंबीर वापरली जाते. इकडे भाजी-आमटीला तरकारी असं म्हणतात.
मॉरिशसमधले फ्रेंच खाद्यप्रकार
फ्रेंच हे नेहमीच त्यांच्या सवयींच्या बाबतीत पुराणमतवादी आहेत. त्यामुळे मॉरिशसमध्ये स्थलांतरित होताना त्यांनी त्यांच्यासोबत त्यांचे पारंपरिक आवडीचे खाद्यपदार्थ तसंच वाईन आणि चीझ आणले. पण इथे आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, इथल्या उष्ण आणि दमट हवामानामध्ये त्यांना त्यांच्या खाद्यप्रकारांमध्ये इथल्या घटक पदार्थांचाही समावेश करावा लागेल. यातूनच फ्रेंच मॉरिशिअन खाद्यसंस्कृतीचा उगम झाला.
पाम हार्ट (पाम कॅबेज), कॅमेरॉन (मोठी कोळंबी), वाइल्ड बोअर (जंगली वराह), वेणिसोन (हरणाचं मीट) हे सगळं फ्रेंच खाद्यप्रकारांमध्ये मोडतं. पाम हार्ट आणि कॅमेरॉन हे सोफेल (बेक्ड एग डिश) आणि रेड सॉसमध्ये मिक्स करून बनवलं जातं. यासाठी लागणारा रेड सॉस हा कोळंबीच्या वरच्या कवचातून आणि डोक्यापासून बनवला जातो.
ऑक्टोपस विंद्ये ही मॉरिशसमधली एक खूप प्रसिद्ध डिश आहे. यामध्ये ऑक्टोपसची स्किन काढून छोटे बारीक तुकडे करतात. या तुकड्यांना मीठ आणि काळीमिरी लावून मॅरिनेट करून नंतर ते ऑलिव्ह ऑइलमध्ये तळतात. हे तुकडे ऑलिव्ह ऑइलमध्ये तळण्यापूर्वी त्यावर बारीक चिरलेला कांदा, आलं, लसूण, मिरची, हळद आणि व्हिनेगर घालून फोडणी घातली जाते.
विंद्ये नावाला एक छोटासा इतिहास आहे, तो मला इथे नमूद करावासा वाटतोय. विंद्ये म्हणजे विनहद-आलं-हो. ही एक पोर्तुगीज डिश आहे. हा पदार्थ मांस, वाईन, व्हिनेगर, वेगवेगळे हर्ब्स आणि मसाल्यांमध्ये मुरत ठेवून बनवला जातो.
या सोबतच सॉसेज रौगेले ही इथल्या लोकांची आवडती डिश आहे. यामध्ये रौगेले हा एक मॉरिशसचा क्लासिक क्रिऑल सॉस आहे, जो बहुतेक मॉरिशिअन खाद्यपदार्थांमध्ये वापरला जातो. रौगेले सॉस हा टोमॅटो सॉससारखा दिसतो, पण यामध्ये टोमॅटोबरोबरच पार्सले, थाईम, आलं, मिरी, मिरची हे घटक पदार्थ वापरतात. हा रौगेले सॉस चिकन, फिश, अंडी तसंच शाकाहारी अन्नपदार्थांमध्ये वापरला जातो. वर म्हटल्याप्रमाणे सॉसेज रौगेले बनवताना, सॉसेजेस या रौगेले सॉसमध्ये शिजवतात.
स्वादिष्ट सूप्स
बहुतांश देशांच्या खाद्यसंस्कृतीत सूपला फार महत्त्व आहे. कारण सूप हा करायला सोपा पण पौष्टिक खाद्य प्रकार आहे. फिश बॉल सूप हे हे एक अप्रतिम चविष्ट असं सूप आहे. हे माझ्या नवऱ्याचं खूप आवडतं आहे. या सूपमध्ये पातीचा कांदा, आलं, मोहरी किंवा पालकाची बारीक चिरलेली पानं, चिनी ब्लॅक मश्रूम, बांबूचे कोंब, काकडी, बोनलेस मासे, एग व्हाईट, राईस वाईन, गाजर, बीन स्प्राउट्स, लेट्युस आणि मसाले असं सगळं असतं. पातीचा कांदा तसंच आलं मध्यम आकारात चिरून घेऊन, अर्ध्या कप पाण्यामध्ये मिक्स करून दोन तास ते मिश्रण तसंच ठेवा. दोन तासांनंतर पाणी गाळून घेऊन ते एका बोलमध्ये ठेवून द्या. मोहरी किंवा पालकाची पानं धुऊन पुसून ठेवा. मश्रूम आणि बांबू शूट्सच्या पातळ चकत्या करून घ्या. काकडी सोलून चकत्या करा. एका बोलमध्ये फिश कुस्करून घ्या आणि त्यामध्ये एग व्हाईट, अर्धी राईस वाईन आणि आलं कांद्याचं पाणी मिसळा. आता मिश्रण निम्मं करून दोन बोलमध्ये ठेवा. त्यानंतर मोहरी आणि पालकाची धुऊन, पुसून, बारीक चिरलेली पानं पंचामध्ये ठेवून, पिळून त्याचे थेंब एका फिश मिश्रण असलेल्या बाऊलमध्ये टाका. याने मिश्रणाला छान हिरवा रंग येतो. आता दोन्हीही बोलमध्ये असलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून ते १ लिटर उकळत्या पाण्यामध्ये शिजायला टाका. शिजल्यानंतर आपोआप फिश मिश्रणाचे गोळे पाण्यावर तरंगायला सुरुवात करतील. ते गोळे बाजूला काढून ठेवा. नंतर उरलेल्या राईस वाईनमध्ये गाजर काही सेकंदासाठी शिजवून घ्या. गाजर कुरकुरीत राहायला हवं. आता फिश बॉल्स, काकडी, मश्रूम, बांबू शूट्स, बीन्स शूट्स, लेट्युस आणि गाजर हे खोलगट भांड्यामध्ये ठेवून त्यावर उकळता फिश स्टॉक घालून घ्या आणि तुमचं आवडतं सिझनिंग त्यावर घालून सर्व्ह करा. मोहरी किंवा पालकाच्या पानांऐवजी तुम्ही हिरव्या रंगाचे दोन ड्रॉप्स वापरू शकता.
मॉरिशिसमधले भारतीय खाद्यपदार्थ
आता मॉरिशसमध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध असलेल्या भारतीय खाद्यप्रकारांविषयी. भारताप्रमाणे थाळीपद्धत इकडेही प्रचलित आहे. आजही भारतीय रेस्टॉरंट्समध्ये तांदळाचे पापड सर्व्ह केले जातात. भारतीय खाद्यप्रकारांमध्ये पंजाबी, दाक्षिणात्य, महाराष्ट्रीय, नॉर्थ इंडियन असे बरेचसे पर्याय उपलब्ध असतात.
इथे आल्यानंतर आमच्या इथल्या मॉरिशिअन मित्राकडे लग्नसमारंभ होता. त्याने आग्रहाने निमंत्रण दिल्यामुळे आम्ही जायचं ठरवलं. लग्नाच्या आदल्या रात्री सगळ्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना पारंपरिक सहभोजनासाठी आमंत्रित केलं जातं. केळीच्या पानावर सात प्रकारच्या भाज्या, चटण्या, पुरी, भाताचे प्रकार, ढोलपुरी, लोणची आणि गोड पदार्थ असं सगळं वाढलं होतं. खूप चविष्ट आणि अप्रतिम होतं ते जेवण, अजूनही चव रेंगाळतीये जिभेवर.

या बरोबरच लोकप्रिय असलेली डिश म्हणजे बिर्याणी. बिर्याणीमध्ये तुम्हांला शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतात.
चिनी खाद्यप्रकारही इथे आवडीने खाल्ले जातात. चिनी खाद्यप्रकारांमध्ये प्रसिद्ध असलेले डम्पलिंग, मॅजिक बाऊल (चिकन, एग्ज), बॉइल्ड आणि फ्राइड नूडल्स, पास्ता, एग नूडल्स, फ्राइड राईस, शेजवान राईस यांसारखे प्रकार प्रसिद्ध आहेत.
गोड पदार्थ
मॉरिशसमध्ये ७०-८० % जमीन उसाच्या लागवडीखाली आहे, मग ती सपाट जमीन असो किंवा डोंगरउताराची असो. मॉरिशसमध्ये फळांची लागवडही मोठ्या प्रमाणावर केली जाते. यामध्ये लिची, आंबा, पॅशन फ्रुट, कलिंगड, अननस आणि अवकाडो यांचा समावेश आहे. या सगळ्या फळांपासून तयार केलेले वेगवेगळे गोड पदार्थ इथे मिळतात. मॉरिशिअन स्वीट आणि डेझर्ट प्रकारांवर फ्रेंच खाद्यसंस्कृतीचा प्रभाव आहे.
क्रीम कॅरॅमल हे मॉरिशसमध्ये क्रिम कोको म्हणून परिचित आहे. या डिशमध्ये रोस्टेड कोकोनट कॅरॅमलमध्ये घालून क्रीम कोको बनवलं जातं.
मॉरिशिअसमधली अजून एक आवडती स्वीट डिश म्हणजे बनाना फ्लँबे. हा पदार्थ पूर्णतः मॉरिशसचा मानता येईल. केळी साखर, बटर आणि लिंबाच्या मिश्रणामध्ये एकत्र करून मॉरिशिअन रममध्ये मिसळून हा पदार्थ करतात
सगळ्यांनी भेट द्यावी असा हा मॉरिशस देश आणि सगळ्यांनी आवर्जून चव चाखावी अशी विविधतेने नटलेली इथली खाद्यसंस्कृती!
रेसिपीज
चिकन डॉबे

चिकन डॉबे करण्यासाठी लागणारी सामग्री: १ किलो चिकन, तेल, १ चिरलेला कांदा, लसणाच्या बारीक चिरलेल्या २ पाकळ्या, थोडीशी ताजी कोथिंबीर, १ कप रेड वाईन, थोडंसं बारीक चिरलेलं पार्सले, ५ लवंगा, ३ मध्यम आकाराच्या मिरच्या आणि अर्धा किलो टोमॅटो सालं काढून.
कृती: चिकनचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून घ्या आणि त्यामध्ये पाच मिनिटे चिकन शिजवून घ्या. शिजल्यानंतर चिकन पॅनमधून काढून थंड होण्यासाठी दुसऱ्या बोलमध्ये ठेवा. पॅनमध्ये ३० सेकंद कांदा आणि लसूण परतून घ्या आणि त्यामध्ये टोमॅटोव्यतिरिक्त बाकी सगळे घटक पदार्थ टाका आणि १ मिनिट शिजवून घ्या. आता टोमॅटोचे चार तुकडे करून ते पॅनमध्ये घाला आणि ५ मिनिटे शिजवून घ्या. ५ मिनिटांनंतर त्यामध्ये चिकन घालून ३ मिनिटे शिजवा.
तुम्ही ही रेसिपी भातासोबत सर्व्ह करू शकता.
प्रॉन आणि सिसमे स्नॅक:
सामग्री : पाव किलो सोललेली कोळंबी, १ लिंबू, १ ड्रॉप हॉट चिली सॉस, थोडीशी फ्रेश चेरवील बारीक चिरलेली, चवीनुसार मीठ, ४ ब्रेड स्लाइस, पाव वाटी तीळ, तळण्यासाठी तेल.
कृती: कोळंबी, लिंबाचा रस, चिली सॉस आणि चेरवील हे सगळं एकत्र करून त्याची पेस्ट करून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालावे. हे मिश्रण कडा कापलेल्या ब्रेड स्लाइसवर लावून, नंतर ब्रेड स्लाइस तिळामध्ये घोळवून घ्या. या ब्रेड स्लाइसच्या पट्ट्या हव्या त्या आकारामध्ये कापून तेलामध्ये खरपूस तळा.
सई कोर्टीकर
फोटो – सई कोर्टीकर व्हिडिओ – YouTube