गुटेन आपेटिट – जर्मनी

शिल्पा गडमडे-मुळे

Wenn der Magen voll ist, singen die Vögel und die Menschen lachen.

जेव्हा पोट भरलेलं असतं तेव्हा पक्षी गात असतात आणि माणसं हसत असतात.

d903de75176cd8f80311972699a0d4bfआपल्याकडे जेवणाआधी ‘वदनी कवळ घेता’ हा श्लोक म्हटला जातो. जेवणाकडे केवळ ‘उदरभरण’ या दृष्टीने न पाहता ‘अन्न पूर्णब्रह्म आहे’ हे लक्षात घ्या, या अर्थाचा हा श्लोक आहे. जेवण किंवा आहार याला फक्त पोटाची भूक भागविणे यापेक्षा अनेक अर्थांनी महत्त्व आहे. एखाद्या देशात, प्रांतात एखादा पदार्थ का खाल्ला जातो, यामागे अनेक कारणं असतात आणि ती कारणं आपल्याला त्या देशाच्या, प्रांताच्या, संस्कृतीच्या जवळ आणून ठेवतात. कुठल्याही देशाची खाद्यसंस्कृती तयार होताना, बदलताना त्यामागे त्या देशाचे भौगोलिक स्थान, सामाजिक परिस्थिती, धर्माशी निगडित चालीरीती, तिथले तापमान, शेती व्यवसाय या आणि अशा अनेक कारणांचा समावेश असतो. अशीच एक पुरातन संस्कृती पुढे घेऊन जाणाऱ्या जर्मनीला या लेखातून भेट देणार आहोत.

जर्मनी आकारमानाने अवाढव्य नसला तरी विविधतेने समृद्ध आहे. अनेक ठिकाणी पर्वतरांगा, उत्तरेला समुद्र आहे. या गोष्टींचा परिणाम खाद्यसंस्कृतीवरदेखील झालेला आहे. १८७१ साली जर्मन साम्राज्याची घोषणा होईपर्यंत जर्मनीमध्ये अनेक लहान राज्यं, जहागीरदार यांचा समावेश होता. त्यामुळे अनेक प्रादेशिक खाद्यपदार्थ जर्मनीमध्ये आढळून येतात. १८५० च्या सुमारास सुरू झालेल्या औद्योगिकीकरणाचा, वीस-एकविसाव्या शतकात झालेल्या जागतिकीकरणाचा जर्मन खाद्यसंस्कृतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला.

मी जर्मनीमध्ये आल्यावर इथल्या संस्कृतीची ओळख व्हायला सुरुवात झाली. इथल्या दुकानात पहिल्यांदा गेल्यावर लक्षात आले की इथे एका गोष्टीसाठी किती पर्याय आहेत ते. साखर, चहा, ब्रेड, जॅम, चीज काहीही घ्यायला गेलात तर त्याला किमान तीन-चार वेगळे पर्याय दिसतील. सुरुवातीला भाषेची अडचण आणि एकदम वेगळ्या खाद्यसंस्कृतीतून आलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला या पर्यायांचा आनंद होण्याऐवजी त्रासच जास्त होतो. पण हळूहळू जर्मन जीवनाला आणि जेवणाला सरावल्यावर ‘हे असे का’ याचे उत्तर मिळत जाते.

20161006_125023

रोजचा दिवस आणि अन्न

Frühstück ( नाश्ता )

अनेक संस्कृतींप्रमाणेच जर्मन लोकदेखील दिवसाची सुरुवात घरी नाश्त्याने करतात. पण कामासाठी घाईत बाहेर पडणारे लोक जाता जाता कॉफी आणि सँडविच घेऊन जातात. सकाळच्या वेळी ट्रेन किंवा बसमध्ये असे जाता जाता नाश्ता करणारे अनेक लोक नजरेस पडतात. शाळांमध्ये मुलांना सकाळी नाश्त्याचा ब्रेक असतो. नाश्त्याला ब्रेड, चीज, सिरीअल, दही, सॉसेज असतात. शनिवार, रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी नाश्ता जास्त आरामात घेतला जातो. प्रांतानुसार यात थोडा फेरफार आढळतो.

Mittagessen ( दुपारचे जेवण )

जर्मन लोकांच्या जेवणात दुपारच्या जेवणाला रात्रीच्या जेवणापेक्षा जास्त महत्त्व आहे. दुपारचे जेवण साधारणतः बारा ते एकच्या दरम्यान घेतले जाते. दिवसातून घेतले जाणारे हे गरम जेवण असते. मांस किंवा फिशसोबत भाज्या आणि सॅलड किंवा सूप असते. शुक्रवारी धार्मिक कारणांमुळे मांसाच्या ऐवजी शाकाहारी जेवण घेण्यात येते. ऑफिसमध्ये घरून डबा नेण्याची पद्धत फार प्रचलित नाही. नोकरी करणारे लोक ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये किंवा आसपासच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करतात. पण बरेचदा ते देखील फार आरामात न घेता पटकन खाऊन होईल या स्वरूपाचे असते.

कॉफी टाईम

दुपारी तीन ते चारच्या दरम्यान कॉफी आणि केक खाल्ला जातो. मित्रमंडळींना एखाद्या कॅफेमध्ये भेटण्यासाठीही वेळ वापरण्यात येते. आठवड्याभरात कामाच्या रगाड्यात कॉफी टाईमसाठी वेळ नसला तरी सुट्टीच्या दिवशी त्याची कसर भरून काढली जाते. दक्षिण जर्मनीत अजून थोडं उशिरा कॉफी टाईमच्या ऐवजी ब्रोट (ब्रेड) टाईम घेतला जातो. यावेळी थंड स्नॅक्स खाण्यात येतात.

20161002_144554

Abendessen  ( संध्याकाळचे जेवण )

संध्याकाळच्या पारंपरिक जेवणात ब्रेड, चीज, सॅलड, मांसाच्या स्लाईस असे पदार्थ असतात. या जेवणाला ‘आबेंडब्रोट’ असे देखील म्हणतात. बरीच जर्मन कुटुंबं आजही असेच पारंपरिक जेवण जेवत असतात. पण दुपारी गरम जेवण घेता आले नाही किंवा कुटुंबातील सगळ्यांना एकत्र जेवण्यासाठी संध्याकाळचीच वेळ सोयीची असेल तर गरम जेवण तयार केले जाते. पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात फ्रोझन जेवण, किंवा रेडिमेड जेवण घेण्यावर जास्त भर असतो.

20161001_130437

जर्मन खाद्यसंस्कृतीमधले काही अन्नपदार्थ

ब्रेड (ब्रोट)

अगदी जुन्या काळापासून आजवर आपले महत्त्व टिकवून ठेवलेला प्रमुख अन्नपदार्थ म्हणजे ब्रेड (जर्मन भाषेत ‘ब्रोट’). संध्याकाळच्या थंड जेवणाला जर्मनीमध्ये ‘आबेंडब्रोट’ असे संबोधण्यात येते. या जेवणामध्ये ब्रेड आणि त्यावर लावण्यात येणारे लोणी, चीज, मांसाच्या पातळ चकत्या याचा समावेश होतो. भारतात जसा राज्यागणिक आहार बदलत जातो तसाच जर्मनीमध्ये देखील प्रत्येक राज्यानुसार आहारामध्ये थोडा फरक जाणवतो. जर्मनीच्या बायर्न किंवा  ज्याला बव्हेरिया देखील म्हणतात, या राज्यामध्ये सकाळी किंवा दुपारी करण्यात येणाऱ्या नाश्त्याला ‘ब्रोटझाईट’ म्हणतात. या नाश्त्यामध्ये ब्रेडचा प्रामुख्याने वापर करण्यात येतो. साठच्या दशकात शिळ्या ब्रेडपासून तयार करण्यात येत असलेले ‘ब्रेडसूप’ आता काळाच्या ओघात हरवून गेले आहे.

ब्रेडचे अनेक प्रकार बेकरी किंवा दुकानात बघायला मिळतात. पांढरा, करडा, काळा या रंगापासून गहू, जवस, नाचणी, मका, सर्व धान्यमिश्रित ब्रेड असे अनेक प्रकार उपलब्ध असतात. प्लेन ब्रेड किंवा सूर्यफुलाच्या बिया, तीळ, भोपळ्याच्या बिया, खास मसाले घातलेले ब्रेड असे कितीतरी ब्रेडचे प्रकार दुकानांमध्ये दिसतात. काही ब्रेड स्लाईस स्वरूपात उपलब्ध असतात, पण बरेचदा ब्रेडच्या मोठ्या लाद्याच असतात. काही दुकानांमध्ये ब्रेडच्या लादीला स्लाईसमध्ये कापून घेण्यासाठी मशीनदेखील ठेवलेले असते. पण या सगळ्या गर्दीत आपल्याकडे मिसळीसाठी, पावभाजीसाठी वापरण्यात येणारे पाव मात्र नसतात. तेव्हा ब्रेडचे इतके प्रकार उपलब्ध असूनही आपल्याकडचे पाव असते तर किती बरे झाले असते हा विचार भारतीय मनात डोकावून जातो.

प्रेत्झेल हा ब्रेडचा प्रकार लहान मुलांमध्ये विशेष आवडीचा आहे. नुकत्याच चालू लागलेल्या किंवा आईच्या अंगावर खेळणाऱ्या मुलाच्या हातात प्रेत्झेलचा तुकडा आहे असे चित्र नेहमीच दिसते.

बटाटे

आपल्याकडे साग्रसंगीत जेवणाच्या रांगेत जराशा दुर्लक्षित असणा-या बटाट्यावर जर्मन लोकांचे विशेष प्रेम आहे. सुरुवातीला अल्प उत्पन्न असणाऱ्या गटात लोकप्रिय असलेला बटाटा हळूहळू संपन्न परिवाराच्या जेवणातील महत्त्वाचा भाग बनला. आम्ही गमतीने ‘बटाट्याशिवाय जर्मन लोकांचे कसे होणार’ असे म्हणतो. बटाट्यामध्ये देखील विविधता असू शकते याची जाणीव जर्मनीत आल्यावर होते.  बटाटे मॅश करून कुठला पदार्थ करायचा असेल तर त्यासाठी वेगळ्या प्रकारचे बटाटे, भाजी करायची असेल तर वेगळ्या प्रकारचे बटाटे मिळतात. या बटाट्यांच्या प्रकारची माहिती नसल्यामुळे अनेकदा आपले पदार्थ फसल्यानंतर नेमके कुठले बटाटे कशासाठी घ्यावे याचे ज्ञान मिळते.

उत्तर जर्मनीमध्ये बटाट्यांना मुख्य अन्न घटक मानून जवळपास प्रत्येक जेवणात कुठल्या न कुठल्या स्वरूपात समावेश केला जातो; तर दक्षिण जर्मनीमध्ये बटाट्यांना केवळ एक भाजी म्हणून वापरण्यात येते. बरेचदा मोठ्या सॉसेजसोबत बटाट्याचे सूप जेवण म्हणून वाढण्यात येते.

24216_121333144547823_590177_n

मांसाहार

जर्मन लोकांच्या जेवणातील महत्त्वाचा घटक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मांस. डुकराचे मांस (पोर्क), गोमांस (बीफ), घोड्याचे मांस, शेळी, चिकन हे प्रामुख्याने मांसाहारासाठी वापरले जाते. जर्मन आहारात नाश्त्यात, दुपारच्या जेवणात, संध्याकाळच्या जेवणात कुठल्यातरी पदार्थाच्या रूपात मांसाहार केला जातो. पूर्वीच्या काळात मांस जास्त काळासाठी जतन करण्याच्या तंत्रज्ञानाचा अभाव होता. तसेच आधुनिक वाहतुकीच्या साधनाअभावी मांस मीठ लावून, वाळवून ठेवण्यात येत असे. तसेच, हिवाळ्याच्या दिवसात येणाऱ्या सणासुदीच्या काळात ताजे मांस भाजून खाण्यात येत असे. जर्मनीत अतिशय लोकप्रिय असणा-या सॉसेजेसचा संबंध या जुन्या पद्धतींशी जोडला जाऊ शकतो. बाजारात सॉसेजेसचे अनेक प्रकार उपलब्ध असतात. पोर्कला जर्मनमध्ये श्वाईन म्हणतात. त्यापासून तयार होणारा श्निट्झेल हा पदार्थ जर्मन लोक अतिशय आवडीने खातात. जर्मन लोकांचे श्वाईनप्रेम इतर गोष्टींमध्येदेखील दिसते. दुकानांमध्ये लहान मुलांना खेळायला डुक्कर सॉफ्ट टॉईज असतात. डुक्कर चांगले नशीब आणतात असादेखील समज आहे.

20151120_133422

ख्रिश्चनधर्मीय शुक्रवारी मांसाहार करण्याचे टाळतात. पण जर्मनीत मासे शाकाहारी वर्गात गणले जातात. शुक्रवारी मांसाहार करत नसणारी मंडळी त्या दिवशी मासे वर्ज्य मानत नाहीत. मी शाकाहारी असल्यामुळे रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यावर फक्त शाकाहारी जेवण मागवत असे. माझ्या आवडीच्या एका इटालियन रेस्टॉरंटमध्ये पास्ता किंवा पिझ्झा ऑर्डर केल्यावर आधी ताजे छोटे ब्रेड आणि चटणी (स्प्रेड) मिळत असे. या ब्रेडसोबत मिळत असलेली ऑलिवची चटणी माझ्या आवडीची होती. एक दिवस त्या ऑलिवच्या नेहमीच्या चटणीऐवजी दुसरीच कुठली तरी चटणी वेट्रेसने आणून दिली. माझ्या काही अनुभवांमुळे मी तिला हे नक्की शाकाहारी आहे ना हे विचारले. ती म्हणाली, ‘हो शाकाहारीच आहे’. मी निवांतपणे माझ्या ब्रेडवर चटणी लावून तोंडात टाकत असताना तिने मला ‘यात फक्त फिश आहे’ ही अतिरिक्त माहिती दिली. अगदी तोंडाशी नेलेला घास परत प्लेटमध्ये ठेवून मी पास्त्याची वाट बघत बसले. त्यानंतर बाहेर जेवताना शाकाहारी सांगितले तरी ‘यात फिश नाही ना?’ हे विचारायला विसरत नाही.

जर्मनीतील जवळपास प्रत्येक सुपरमार्केटच्या फ्रोझन विभागात मासे सहज उपलब्ध असतात. समुद्रापासून उत्तर जर्मनी जवळ असल्यामुळे जर्मनीच्या दक्षिण भागापेक्षा उत्तरेत आहारात माशांचा वापर जास्त आहे.

चीज (केझं)

जर्मन आहारात प्रामुख्याने वापरण्यात येणारा अजून एक पदार्थ म्हणजे चीज. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी  औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीमुळे दुधावर संस्करण करून अनेक प्रकारचे पदार्थ बनविण्यात येऊ लागले. त्यात चीजचा देखील समावेश आहे. गाईच्या दुधाव्यतिरिक्त मेंढी, शेळी आणि म्हशीच्या दुधापासूनदेखील चीज बनविण्यात येतं. छोट्या ठोकळ्यांच्या आकारात, स्लाईसच्या रूपात, गोलाकार, त्रिकोणी आकारात अनेक प्रकारचं चीज कुठल्याही सुपरमार्केटमध्ये सजलेलं दिसतं. लहान मुलांसाठी देखील अनेक प्रकारचं चीज बाजारात मिळतं. जर्मनीत मिळणाऱ्या चीजवर स्वित्झर्लंड, बेल्जियम या देशाच्या चीजचे संस्कार आहेत. जर्मन लोकांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या काही चीजला अतिशय स्ट्राँग वास असतो.  जवळपास ६०० वेगवेगळ्या प्रकारचं चीज जर्मनीत तयार केलं जातं. जर्मनीत तयार करण्यात येणाऱ्या चीजच्या ७५ टक्के चीज बव्हेरिया, साक्सोनी अनहाल्ट, मेक्लेनबुर्ग या भागात तयार केलं जातं.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

ताजे दूध पिण्याची कल्पना १८७० च्या सुमारास झालेल्या कृषी सुधारणेनंतर आणि पास्चरायझेशन सुरू झाल्यानंतर जर्मनीत रुजली. शेतकऱ्यांच्या बायका, मुली लोणी किंवा अगदी साधे चीज करून विकत असत. यातून त्यांना किरकोळ रक्कम मिळत असे. कालांतराने शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे शहरातल्या बकऱ्या आणि गायी यांची संख्या रोडावली. शेती करणे महाग आणि कष्टाचे होऊ लागले, त्यामुळे दुधाचा व्यवसाय फायद्याचा ठरू लागला. नवीन तंत्रज्ञानामुळे दूध दीर्घकाळ साठवून ठेवता येऊ लागले. कॉफी आणि मद्य यांच्या तुलनेत ‘दूध – एक आरोग्यपूर्ण पर्याय’ म्हणून लोकांसमोर ठेवण्यात आला.

आजच्या घडीला जर्मनीमध्ये दुग्धव्यवसाय अतिशय विकसित आहे. फोलमिल्च (३,५% फॅट), फेटआर्म (१,५% ते १,८% फॅट), मागेरमिल्च (०,५% पेक्षा कमी फॅट) असे अनेक दुधाचे पर्याय ग्राहकांसमोर उपलब्ध आहेत. हे दूध ताजे किंवा हिट ट्रीटेड यामध्ये देखील उपलब्ध असते. हिट ट्रीटेड दूध फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज पडत नाही. बाहेर देखील बराच काळ टिकू शकणारे हे दूध आहे. याखेरीज कॉफीसाठी वेगळ्या प्रकारचे दूध मिळते.

दुधासोबातच दह्याचे देखील अनेक प्रकार जर्मनीत बघायला मिळतात. त्यात विविध फॅटचे प्रमाण असलेले दही इथपासून ते वेगवेगळ्या फळांचा स्वाद, तुकडे असलेले दही असे अनेक प्रकार असतात. चॉकलेट प्रेमींसाठी फ्रोझन चॉकलेट दहीदेखील उपलब्ध आहे.

img_4676

फळं

आपल्याकडे मोसमानुसार बोरं, करवंद, सीताफळ, आंबे अशी फळं उपलब्ध होत असतात, त्यानुसार जर्मनीतदेखील निरनिराळ्या मोसमात निरनिराळ्या फळांचा आस्वाद घेता येतो. काही फळांचे उत्पादन जर्मनीत घेतले जाते, तर काही फळं बाहेरच्या देशातून आयात केली जातात. काही दिवसांपूर्वी स्पेन, ब्राझील अशा निरनिराळ्या देशांच्या फळांच्या रांगेत आपल्याकडची ‘नाशिकची द्राक्षं’ बघून खूप आनंद झाला होता. वर्षभर बाजारात उपलब्ध असणाऱ्या फळांमध्ये सफरचंदाचे नाव प्रामुख्याने घेता येईल. सफरचंदामध्येदेखील अनेक प्रकार उपलब्ध असतात हे आता वेगळे सांगायला नको. जर्मनीमध्ये जागोजागी सफरचंदांच्या बागा आढळतात. मोसमी फळांच्या यादीत असणाऱ्या फळांपैकी चेरी हे लोकांच्या आवडीचे फळ आहे.

जर्मन पेयांबद्दल लिहिल्याशिवाय जर्मन खाद्यसंस्कृतीची माहिती पूर्ण होणार नाही.

बिअर

जर्मनीबद्दल अगदी मोजकी माहिती असणाऱ्या व्यक्तीलादेखील जर्मनी आणि बिअर यांचे घट्ट नाते माहिती असेल. जर्मनिक काळापासून जर्मन लोक बिअर पितात. जर्मन लोक पाणी जास्त पितात, की बिअर असा प्रश्न पडावा इतक्या प्रमाणात बिअर पिण्यात येते. म्युनिकचा ‘ऑक्टोबर फेस्ट’ फेसाळणाऱ्या बिअरसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. राज्यागणिक बिअरच्या चवीत थोडाफार फरक असतो.

वाईन

बिअरला पूरक प्रमाणात वाईन पिण्यात येते. पहिल्या शतकापासून जर्मनीत वाईन तयार करण्यात येत आहे. ऱ्हाईन नदी आणि तिच्या उपनद्या यांच्या काठावर मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे मळे आहेत. आजच्या काळात जर्मनीत उपलब्ध असलेली वाईन जगभरातून निवडण्यात येते. वाईन उत्पादन करणाऱ्या भागांमध्ये ‘वाईन टेस्टींग टूर’ प्रसिद्ध आहेत. हिवाळ्यात आणि विशेषतः ख्रिसमस दरम्यान पिण्यात येणारी ‘ग्लूवाईन’ ही आपल्यासमोर येते ती कपातून.. ख्रिसमसच्या आधी भरणाऱ्या ख्रिसमस मार्केटमध्ये ग्लूवाईन पिण्यासाठी लांब रांगा असतात.

चहा, कॉफी

आपल्याकडे घरातून, ऑफिसातून चहा नसणे याची कल्पना करता येत नाही, तसे कॉफीशिवाय जर्मन लोकांच्या आयुष्याची कल्पना करवत नाही. नाश्त्याला, दिवसभरात ब्रेकच्या वेळेला कॉफी घेतली जाते. दुपारच्या पोटभर जेवणानंतर कॉफी पिण्याची पद्धतदेखील बऱ्यापैकी प्रचलित आहे. अनेक घरांमध्ये कॉफी मशीन असते.

कॉफीच्या खालोखाल चहावर प्रेम केलं जातं. पण हा चहा आपल्याकडे मिळतो तसा भरपूर दूध, साखर टाकून केलेला नसतो. श्वार्झेर (काळा) चहा लोक आवडीने पितात. अनेक प्रकारचे हर्बल चहा, फळांचा स्वाद असलेला चहा, कामिल (शेवंती), पेपरमिंट हे चहाचे प्रकार आरोग्यकारक मानले जातात. हिवाळ्यात घसेदुखीला आराम मिळावा म्हणून डॉक्टर कामिल किंवा हर्बल चहा पिण्यास सांगतात. लहान मुलांना देखील असा चहा देण्यात येतो.

पाणी

जर्मनीत पिण्याच्या पाण्याचा नळ, वापरायच्या पाण्याचा नळ असा भेद नसतो. पिण्यासाठी अशी सोय नसते. नळातून येणारे पाणी पिणे सुरक्षित असले तरी आजकाल लोक सीलबंद बॉटलमधील पाणी विकत घ्यायला प्राधान्य देतात. सगळ्या वस्तूंचे अनेक पर्याय असणाऱ्या जर्मन बाजारात पाण्याचा फक्त एकाच पर्याय कसा असेल? पाण्यामध्ये देखील साधे पाणी आणि स्पार्कलिंग मिनरल पाणी असे पर्याय असतात. स्पार्कलिंग मिनरल पाणी म्हणजे सोडा असलेलं पाणी. आधीच्या काळात फक्त ‘स्पार्कलिंग मिनरल पाणी’ विकायला असे. हे पाणी फळांच्या रसात किंवा वाईनमध्ये टाकण्यासाठी वापरत असत. पण आजकाल नळाच्या पाण्यापेक्षा साधे किंवा Still  पाणी विकत घेण्याकडे लोकांचा कल असतो.

सगळीकडे जागतिकीकरणाचे परिणाम दिसू लागले आहेत; तसेच जर्मनीतदेखील दिसत आहे. इतर देशातून येऊन जर्मनीत राहणाऱ्या लोकांच्या आता दुसऱ्या, तिसऱ्या पिढ्या इथे आहेत. त्याचा परिणाम इथल्या खाद्यसंस्कृतीवर देखील होत आहे. इथली खाद्यसंस्कृती इतर अनेक खाद्यसंस्कृतींना आपल्यात सामावून घेत मोठी होत आहे.

शिल्पा गडमडे-मुळे

945227_644560168891782_297806503_n

तुझं ‘पोट’ तृप्त व्हायला तुला काय लागतं? असा प्रश्न कोणी विचारला तर खाद्यपदार्थाव्यतिरिक्त ‘वाचन’ आणि ‘वेळ मिळेल तसे करत असलेले लिखाण’ असे माझे उत्तर असेल. मी मागील सात वर्षापासून जर्मनीत वास्तव्यास आहे. जर्मनीतल्या वास्तव्यादरम्यान मला उमगलेल्या जर्मन समाजजीवनाची ओळख करून देणारे साप्ताहिक सदर मराठी वृत्तपत्रासाठी लिहिले. सध्या जर्मनीमध्ये भारतीय कायदेविषयक सल्लागार म्हणून काम करते. वास्तव्य फ्रँकफर्ट.

फोटो – शिल्पा गडमडे-मुळे     व्हिडिओ – YouTube

2 Comments Add yours

  1. Vidya Subnis says:

    छानच लिहीलंय.

    Like

  2. arun tingote says:

    छान लिहिल आहे. वाचून पाेट भरल्यासारख वाटतय.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s