माधवी भट
त्यादिवशी गर्दीचा अंदाज आणि पार्किंगला न मिळणारी जागा याचा अंदाज घेऊन वाहन सोबत न घेता रिक्षाने येऊन बाजारहाट केला. सर्व पिशव्या घेऊन पुन्हा परतीच्या वाटेवर येऊन थांबले आणि बघते तर काय, ऐन चौकात एकमेव रिक्षा आणि त्यात “वाट माझी बघतोय रिक्षावाला” असं म्हणत बागडत जावं असा थांबलेला रिक्षावाला. जाऊन उभी राहिले पुढ्यात तर त्याने लागलीच विचारलंन “ बंगाली क्यांप ?”
मी होय म्हटलं… आताशा रिक्षावाल्यांच्या किंवा नव्या कुणाच्याही या समजुतीचं नवल वाटत नाही इतका काळ लोटला ‘“बंगाली क्यांप ?”’ या प्रश्नाला उत्तर द्यायला.
चंद्रपूर तसा मोठा जिल्हा आहे. बंगालची फाळणी झाली तेव्हा इथे एका मोठ्या संख्येने जनसमुदाय येऊन विसावला. त्याला अनेक वर्षे लोटली. त्यांची आता तिसरी चौथी पिढी चंद्रपुरात आहे. उत्सवसणांच्या काळात बंगाली कँप म्हणजे मिनी बंगाल वाटू लागतं. मात्र मी बंगाली कँम्पात राहात नव्हते तेव्हाही प्रश्न सारखाच – “बंगाली कँप ? आप बांगला हो ?”
पूर्वी मला नवल वाटायचे. आता वाटत नाही. बहुधा आपल्याला आवडत असलेल्या गोष्टींत आपण इतके एकरूप होतो की हळूहळू तसेच दिसूदेखील लागतो. मला वंग प्रांत पूर्वीपासून आकर्षित करत होताच, तो भाषेसाठी. किती गोड आणि सहज भाषा आहे. मग सावकाश त्यांच्या कथा, साहित्य वाचनात आलं. पाथेर पांचाली ट्रायो, जोलसाघर आणि चारुलता …हे सिनेमे पाहिले की आपोआप बंगाली होण्याची प्रक्रिया सुरू होत जाते.
माझ्या कॉलेजात काही मैत्रिणी बंगाली होत्या. हलदार, डे, दास, बर्मन, मुखोपाध्याय वगैरे आडनावे असलेल्या. ‘शोत्ती ? , की बोलछो ? ओग्गो माँ, दुग्गा दुग्गा …’ ही बंगाली केवलप्रयोगी अव्यये ऐकायला आणि त्यावर आधीच मोठे असलेले काजळभरले डोळे अधिकच मोठे झालेले पाहायला मजा येई. त्यांच्या सहवासात अनेक गोष्टी कळत गेल्या. मुख्य म्हणजे बंगाली पद्धतीची साडी कशी नेसावी आणि त्यावर फुग्यांचे पोलके. सेकंड इयरला असताना श्राबोनी मुखोपाध्याय या गोड मैत्रिणीच्या नृत्यदिग्दर्शनात आम्ही सर्व मुलींनी पांढ-याशुभ्र, लालसर बुट्टे आणि काठांच्या बंगाली साड्या नेसून, लाल सिंदूर कपाळभर रेखून, तसेच फुग्यांच्या बाहीचे लाल पोलके घालून
मोमो चित्ते निते न्रित्ये
नाचे नाचे , ताता थोई थोई …
हे रोबींद्र संगीतावर आधारित नृत्य केल्याचेही स्मरते अजून. हे गीत तसे झपूर्झा घातल्यासारखे आहे. नाचे जोन्मो, नाचे मृत्यू ..पाछे पाछे ….हा भाव कवीला कळायला आधी तेवढे चिंतन हवेच..! रोबिन्द्रनाथ ठाकूर हे तसेच होते ! असे बंध जुळत गेले. मग वाट पाहायची ती पॉयलो बोईशॉखची, नवरात्रीची, दुर्गाष्टमीची, शरद पौर्णिमेच्या लोख्खी पूजेची किंवा बसंतपंचमीच्या सरस्वती पूजेची. या दिवसांना खास बोलावणे असे. तिथे काही सुंदर पदार्थ खायला मिळत. ज्यांची चव जिभेवर रेंगाळत राहते.

कॉलेजातल्या मैत्रिणी यथावकाश दूर जातातच. काही वंग मैत्रिणी इथे असतीलही, मात्र आता माझा त्यांच्याशी संपर्क नाही. मात्र त्या सोबत होत्या त्या काळात त्यांनी मला भाषेच्या सौंदर्याची एक मोठी भेट दिली आणि हो…त्यांच्या खाद्य संस्कृतीशी जमेल तेवढा परिचय करून दिला. तोच अनुभव आज तुम्हा सर्वांशी शेअर करणार आहे !
मागे काही दिवसांपूर्वी इनबॉक्सात एका व्हिडिओची लिंक निलोकांतने पाठवली. निलोकांत आमच्या सोबत गाणे शिकायला येई. तेव्हाची ओळख. तो आवर्जून काही ना काही पाठवत असतो. ती लिंक पाहिली तर नुकताच प्रसिद्ध झालेला सावन दत्ताचा माछेर झोल नावाचा व्हिडीओ होता. माछेर झोल म्हणजे बंगालातला सर्वात लाडका पदार्थ.
मी म्हटलं, “पण मी शाकाहारी आहे, नील”
निलोकांतचं म्हणणं आहे की, “बांगला व्हायचं असेल तर माछेर झोल चाखून पाहायलाच हवे. बंगालात राहून मासे नाही म्हणणे म्हणजे पानी में रहकर मगरमच्छ से बैर वगैरे आहे.”
बंगाल प्रांत बंगालच्या उपसागरालगत वसलेला आहे. तिथले वातावरण, पाऊस यांचा विचार केला तर मुख्य खाणे भात आणि मासे हेच ! मासे हा बंगालच्या जीवनाचा इतका अविभाज्य आणि महत्त्वपूर्ण घटक आहे की, बंगाली विवाह समारंभात मुलगा वरात घेऊन येतो तेव्हा भला मोठा मासा सजवून, वेष्टनात गुंडाळून भेट म्हणून आणतो. त्यानंतर तो शिजवतात आणि भोजनात त्याचा समावेश करतात. ही मासोळी देखील वधुवेषात सजवली असते हे विशेष. मासोळीला वधुवेष का देतात हे मला माझ्या वंग मैत्रिणींनी सांगितले. मासा म्हणजे गंगा फल, आणि विवाहविधीत पूजन होत असल्याने तर त्याचा संबंध सर्जन, पोषण आणि समृद्धी यांच्याशी आहेच.. कारण विवाहसमारंभात बरेचदा अनेक रूढींचा संबंध लोकमानस सर्जन, पोषण यांचे प्रतीक म्हणून लावते हे तसे उघड आहे.
बंगाल्यांचा आवडता मासा म्हणजे हिल्सा ! हा गोड्या पाण्यातला मासा आहे. अनेक बंगाली घराशेजारच्या मोकळ्या जागेत छोटे गोड्या पाण्याचे तळे राखून त्यात हिल्सा पाळत असेही म्हणतात. एरवी बंगाली लोकांचे प्रमुख खाद्य म्हणजे भात ! समुद्राच्या जवळचा भाग, शिवाय पर्जन्य भरपूर असल्याने धान्य, पीक भरपूर होते. बंगाली माणूस गोडघाश्या आहे! त्याला गोड फार आवडते !
बाकी सावन दत्ताचा व्हिडिओ एकदा पाहावा असाच आणि मजेशीर आहे. गुड फॉर माय टमी ऍण्ड गुड फॉर माय सोल …माछेर झोल ! असे जेव्हा ती खास बंगाली पद्धतीने तोंडात दोन्ही गालात दोन रोशोगुल्ले ठेवून बोलल्यावर दिसेल तशी दिसत गाते.
आमच्या बंगाली कँम्पात कालीबाडीजवळ एक छोटेसे मिष्टान्नो भांडार आहे. तिथले रोशोगुल्ले खायचे म्हणजे पर्वणीच असते. इतरवेळी, इतरठिकाणी मिळते ती बांगला मिठाई आणि ह्या मिष्टान्नो भांडारात तयार होणारी बांगला मिठाई यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. रोशोगुल्ला तोंडात ठेवावा आणि तो अल्लद विरघळून जावा हा सुखद अनुभव केवळ इथेच मिळेल. शिवाय त्या शेजारीच मासळी बाजार पार करून ऐन बोस चौकात उजव्या बाजूला वळलं तर बांग्ला पान घेऊन एक ठाकूरमां बसतात. दोन्ही तळहातांची ओंजळ पसरून धरली की होणारा आकार तेवढे भले थोरले बांगला पान. एकच लावले तरी तोंडभर होईल. शिवाय पानच इतके तिखट की वेगळा अस्मानतारा घालायची गरज नाही. मात्र ज्यांना ‘दाह’ सोसायची चाड आहे त्यांनी हा प्रयोग करावा… छानपैकी बांगला पान घ्यावे, चुना अगदी तर्जनीच्या नखावर येईल तेवढाच लावावा, मग काथ लावून बाकी सुपारी, हे ते साहित्य घालून इवला असमान तारा भुरकून पाहावा….पानाची घडी तोंडात अलगद घातली नि त्याचा तोबरा बसला की तर्जनीच्या नखाला लागलेला चुना पुन्हा जिभेवर घ्यावा….
डोळे मिटावेत आणि मग ब्रह्मानंदी टाळी लागली की त्यात हरवून जावे.
हे अवघड आहे. हा विडा खाणे आणि तो पेलवणे हे ये-या गबाळ्याचे काम नोहे. त्यासाठी आधी म्हटलं तशी तयारी लागते. दुखून सुख वाटतं ..ते अनुभवायची तयारी ! तर असे हे बांगला पान !
बांगला खान्यात तांदूळ महत्त्वाचा आहे. त्यात खिचडी हा पदार्थ महत्वाचा आहे. आणि पायेश म्हणजे खीर. हे दोन्ही पदार्थ नैवेद्याला वापरतात. पायेशला मूळ बंगालात राहणारा माणूस खास गोबिंदोभोग चावल वापरील. मात्र तो सर्वत्र उपलब्ध नसेल तर मग बासमती वापरतात ! सर्वप्रथम पायेशबद्दल पाहू –
१) पायेशला मिष्टान्नोदेखील म्हणतात ! गोविंदोभोग चावल नसेल तर मग बासमती तांदूळ घ्यावा, धुऊन लगेच उपसून ठेवून साजूक तुपात भाजावा, दूध तापले की त्यात तांदूळ घालावे. वरून उकळी येऊ द्यावी. तांदूळ शिजत आला की त्यात खजुराचा गूळ किंवा बंगालात वापरतात तो पाटाली गूळ, नोलीन गूळ हे प्रकार वापरलेत तरी चालेल. गूळ नको असल्यास साखर घालता येईल; मात्र पायेशची खरी मजा गुळातच आहे. शिवाय रंगही उत्तम येतो. उकळी आली की त्यात चिमूटभर मीठ घालावे. शिजल्यावर त्यात आवडीनुसार सुका मेवा घालावा.
पायेश नुसतेदेखील खाता येते किंवा पुरी – बंगालात ‘लुची’सोबत खाता येईल.
२) बेगुनभाजा –
बेगुनभाजा हा अत्यंत लवकर होणारा आणि अतिशय चविष्ट लागणारा पदार्थ आहे. मुख्य म्हणजे बेगुनभाजा करायला खास तशी मोठी वांगीदेखील मिळतात. ती मोठी असली तरी त्यात बिया असता कामा नये. मोठी कोवळी वांगी घ्यावीत. चकत्या कराव्या. चकत्यांवर मीठ लावावे आणि नंतर हळद लावून घ्यावी. मिठामुळे चकत्यांना पाणी सुटतेच, त्यामुळे त्यांना तांदळाचे पीठ लावावे आणि मग लागलीच त्या चकत्या तळून घ्याव्या.
गरम वाफेभरला भात, तुपाची धार, हिरवी तिखटजाळ मिरची घ्यावी आणि सोबत कुरकुरीत बेगुनभाजा कालवून खायची पद्धत आहे !
३) खिचडी –
नैवेद्याला सहसा महाराष्ट्रात खिचडी करायचा प्रघात नाही. मात्र इथे करतात. ती पद्धत सोपी आणि कॉमन आहे. मुगाची डाळ आणि तांदूळ एकास एक या प्रमाणात घेऊन धुऊन घ्यावे. त्यात भाज्या घालायच्या असतील तर बटाटे, फ्लॉवर, वगैरे गुलाबीसर तळून काढून मग साधी फोडणी घालून, हे साहित्य घालून खिचडी शिजवावी. ती मऊ, सैल आणि चविष्ट होते. (खिचडी करायच्या अनेकविध पद्धती आहेत. त्या सर्वच आपापल्या पसंतीनुसार लोक करतात.)
४) माछेर झोल – माछेर झोलसाठी रोहू मासा लागतो. तो स्वच्छ करून घ्यावा आणि मोठे काप करून घ्यावे. त्यांना प्रथम मीठ आणि नंतर हळद लावावी…ते काप तळून घ्यावे. तसेच बटाट्याचे मोठे काप करून हळद मीठ लावून तळून घ्यावे. जिरे, धणेपूड, आले, खसखस, काजूगर सर्व एकत्र वाटून घेऊन ती पेस्ट तेलात मोहरीच्या फोडणीसह परतावी. लाल तिखट, मीठ घालावे. सावकाश वाटणाला तेल सुटते. त्यांनतर पाणी घालून उकळी घेऊन आपल्याला हवी त्या प्रमाणात ग्रेव्ही करावी. उकळी आली की त्यात माश्यांचे आणि बटाट्याचे काप घालावे. वरून गरम मसाला भुरकवावा.
विशेष सूचना – बंगालात माछेर झोल करताना कांदा लसूण घालत नाहीत. मात्र हल्ली हॉटेले वगैरे सर्वत्र कांदा लसूण घालतात. तेव्हा आपल्याला हवे असल्यास घालायला हरकत नाही.
माछेर झोल गरम भातासोबत ओरपतात !
गुड फॉर योर टमी …गुड फॉर योर सोल….माछेर झो sssssल !
५) झालमुडी – झालमुडी म्हटले की तोंडाला पाणी सुटते. चटपटीत पदार्थ आहे. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशीही दुपारच्या वेळी खायला उत्तम ! ताजे कुरकुरीत मुरमुरे (कुरमुरेदेखील म्हणतात) बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, सरसोचे तेल (झालमुडी सरसो तेलातच करायची पद्धत आहे. नको असल्यास आपल्या पसंतीचे तेल निवडावे )
चनाचूर आजकाल रेडी अवेलेबल आहे. नसल्यास साधा चणा भिजवून करून घेता येईल. विकृती चनाचूर मीठ, तिखट मसालायुक्त असतेच. ते आधी पाहून घ्यावे, नसल्यास ते साहित्य घरी असावे.
प्रथम मुरमु-यात तेल घालावे, त्यात सर्व साहित्य बारीक चिरून घालावे. झालमुडीत मीठ घालायची गरज नाही, कारण मुरमुरे खारे असतात. शिवाय चनाचूरदेखील मीठयुक्त असते. तरीही गरज वाटल्यास चवीनुसार घ्यावे. सर्व्ह करताना बारीक चिरून टोमॅटो घालावा, शेव हवी असल्यास घ्यावी !
झालमुडी सर्वात लोकप्रिय पदार्थ आहे !
माझ्या शेजारच्या काकीमां सुंदर पुरणपोळी करतात, तितकीच सुंदर झालमुडी पण. माणूस आपल्या प्रांतातून दुस-या ठिकाणी दूर स्थायिक झाला की, आपल्या सर्व सवयींना, आवडींना, श्रद्धांना दुप्पट मिस करतो. ते इथे बंगाली कँप परिसरात राहून कळते. दुर्गापूजेचा उत्सव केवळ देखणा आणि आनंदमय असतो. इतकेच नव्हे तर बांगला नाटके, रबिन्द्रसंगीत, बाउल गीते याची दुर्गापूजेत रेलचेल असते. इथला सिंदूर ख्येला केवळ अनुभवावा असाच आहे.
काकीमां माझ्याशी बोलताना त्यांच्या कोलकात्याच्या बहिणीबद्दल, भाचरांबद्दल खूप सांगत असतात. त्यांनी मला देवघरात नव्याने स्थापन केलेल्या रामकृष्ण ठाकूर आणि मां यांच्या दर्शनाला अतिशय आस्थेने बोलावतात. मला गाणी गाऊन दाखवतात. नातीला अंगाई गातात. एपिक वर रवींद्रनाथांच्या कथा येतात हे सांगितल्यावर त्यांनी ठाकूर मोशाययेर कोथा… भागवत ऐकल्यासारख्या पहिल्या…!
मी विचार करते तेव्हा मला जाणवतं की इतकी वर्षे या सर्वांसोबत राहून मला त्यांचा रंग लागणं हे अतिशय साहजिक आहे. बंगाल प्रांताचा रंग गहिरा आहे. तो एकदा लागला की उतरत नाही. त्या बाउल गीतासारखी आपली स्थिती होते आणि आपणही मनात कबुली देतो –
तोमाय ह्रिद माझारे राखीबो…छेडे देबो ना…..!
माधवी भट
लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय,चंद्रपूर इथं मराठी विषयाचं अध्यापन. सध्या डॉ.अरुणा रामचंद्र ढेरे यांच्या समग्र कवितेवर प्रबंध लेखनाचे काम सुरु आहे. नाट्यलेखन आणि अभिनय. तसंच इतरही लेखन.
फोटो – माधवी भट व्हिडिओ – YouTube
माधोबी, भीषण भालो! असं म्हणायचा मोह आवरला नाही. मलाही लहानपणापासून बंगाली भाषेचं नि साड्यांचं वेड होतं. पण ते वेड मी तसंच जपलं नाही, याचं फार वाईट वाटतंय. बंगाली मित्रगण आहेत अजून, पण असं घरगुती सख्य नाही. खूप छान वाटलं वाचून. लिहिती राहा सखे.
LikeLike
हे निव्वळ स्पेल बाऊंडचा अनुभव देणारं आहे. मुळात बंगाली प्रदेश, तिथल्या खाद्यपद्धती, रवींद्र संगीत आणि अर्थातच बंगाली ललनासुद्धा… मोहात पाडणारीच गोष्ट आहे. पण ते तुझ्या समर्थ लेखणीतून अनुभवताना अजून संमोहक होऊन येतंय. आवडेश…
LikeLike
मी काही वर्ष बंगालात राणीगंज कोळसा खाणीत काढली आहेत.तुमच्या लिखाणाने सर्व खाद्य.स्मृती उफाळून आल्या.एक आणखी माझा आवडता पदार्थ ..आलूपिश्टी..म्हणजे खसखस ..आलूची भाजी
LikeLike
माधोबी, खूब भालो गो. छानच जमलाय लेख. लिहित राहा.
LikeLike
लेख आवडला. बंगाली लोकांसोबत राहिल्याने बेगुन भाजा, खिचुरी, झालमुडी चाखलंय. छान आहे वर्णन.
LikeLike