चिनी आणि भारतीय रूचींचा मिलाफ – मलेशिया

स्नेहा पांडे

malaysiastatesmapलहानपणापासूनच चटकमटक खाण्याची सवय. मला रोज तेच खायला आवडायचं नाही आणि त्याहून तेच तेच पदार्थ बनवायला तर मुळीच नाही. त्यावेळी पोटात सगळं गेल पाहिजे म्हणून आई अगदी मागे लागून युक्तीयुक्तीने सगळं खाऊ घालायची. मग लग्नानंतर मी आणि माझा नवरा दोघेच पुण्यात राहू लागलो. तेव्हापासून माझी स्वयंपाकाची आवड खरी सुरु झाली. वेगवेगळे पदार्थ करून सगळ्याचे प्रयोग नवऱ्यावर करणं हा माझा एक छंदच बनला. आपल्या साध्या महाराष्ट्रीयन जेवणापासून देश-विदेशातील पदार्थ करण्यापर्यंत प्रगती झाली.
आता तर परदेशीच म्हणजे मलेशियात राहायला असल्यामुळे सगळं घरीच करावं लागतं. इथे बाहेर जाऊन खाणं हा पर्याय खूपच कमी. इथे शुद्ध शाकाहार मिळणं म्हणजे वाळवंटात पाणी मिळण्यासारखं. तरीही मी शाकाहारी मलेशियन पदार्थांचा शोध घेणं सुरू केलं. एखादा आवडलेला पदार्थ, पेय कसं केलं हे  तिथल्या लोकांना विचारलं की आनंदाने सांगतात. मग तोच पदार्थ घरी बनवण्याची मजा काही औरच.


मलाय खाद्यसंस्कृतीमध्ये भारतीय, चायनीज आणि मलेशियन पदार्थांची सुंदर सरमिसळ आहे. त्याच बरोबर पारंपारिक मलाय खाद्यपरंपराही इकडे छान जपली आहे.

मलाय स्पेशल

_20160915_163736

हरीराया म्हणजेच ईद. त्या दिवशी इकडे केतुपात (ketupat) बनवतात. केतुपात तांदळापासून तयार करतात. यासाठी पामच्या  झाडाची पानं वापरतात. ही पानं चौरस आकारात गुंफून त्यामध्ये मीठ घालून शिजवलेला भात भरतात. काही ठिकाणी हा भात नारळाच्या दुधातही शिजवतात. भात भरलेली पानं बांधून आणि उकळलेल्या पाण्यात सोडतात. ही अशी शिजलेली  केतुपातची भात भरलेली पानं गरम सर्व्ह करतात. यासोबत संबल, म्हणजे लाल मिरची, कांदा लसूण, लिंबू, तेल, मीठ वापरून केलेला सॉस आणि काही पारंपरिक मांसाहारी पदार्थासोबत देतात.

image_20160915_163514मलाय जेवणामध्ये भात हा मुख्य पदार्थ, भाताला इथे नासी म्हणतात. नासी लेमाक हा मलेशियाचा राष्ट्रीय पदार्थ आहे. प्रामुख्याने नारळाच्या दुधात शिजवलेला भात, भाजलेले शेंगदाणे, शिजवलेले अंडे, संबल, काकडीचे काप आणि मटणाचा एखादा प्रकार आणि तळलेले छोटे मासे म्हणजे नासी लेमाक.
मलेशियामधील गोडाच्या पदार्थांत कुईह मुईह (kuih muih) म्हणजे बर्फी आणि वेगवेगळ्या चवीचे केक बनवले जातात. अंग कु कुइह ही गोड सारण भरलेली चायनिज पेस्ट्री आहे. आपम बालीक  ही क्रीम्ड कॉर्न, शेंगदाणे, ओलं खोबरं आणि साखर यांची बनवतात. आपल्या फालुदासारखा सँडोल. सँडोलचा मुख्य भाग शेवया. या मूगपीठ आणि पानादानच्या पानापासून बनवतात. ही पानं मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस मूगपीठासोबत शिजवून शेवया बनवतात. वाढताना लाल सोयाबीन शिजवून त्यात शेवया, गुळाचा पाक, जेली, चेरी, नारळाचं दूध आणि किसलेला बर्फ घालून देतात.

स्ट्रीट फूड

मलेशियन स्ट्रीट फूड हे इण्डो-मलाय, मलाय-चायनीज असं मिश्र असतं. साते  हा पदार्थ वेगवेगळ्या प्रकारच्या मांसापासून बनवतात, अगदी सापाच्या सुद्धा. स्ट्रीटफूडचा एक शाकाहारी प्रकार म्हणजे टोफूपासून बनवलेला साते.
या पदार्थाला हळद, सोया सॉस सोबत मॅरीनेट करतात, बांबू काठीला लावून तो ग्रिल करतात. सर्व प्रकारचे साते हे शेंगदाणाच्या सॉससोबत खातात.  पॅनमध्ये  तेल गरम करून त्यात रेड करी पेस्ट, पीनट बटर, नारळाचे दुध, साखर, मीठ घालून शिजवल्यावर हे सॉस बनतं.
साते स्ट्रीट फूड असलं, तरी पारंपरिक सणांमध्येही हा पदार्थ आवर्जून बनवला-खाल्ला जातो.

पोपीह हा स्प्रिंग रोलसारखा पदार्थ. वरचा पदर कणकेपासून बनवतात. आतमध्ये लेट्युस, फ्रेंच बिन्स, मोड आलेले मूग, बारीक चिरलेलं गाजर आणि तयार ऑम्लेट घालतात. ताहू सुम्बट (tahu sumbat) म्हणजे भरलेले टोफू. टोफू तळून  त्याला चीर देऊन त्यात काकडीचे काप, मोड आलेले मूग, मीठमसाला भरतात आणि वरून चिली सॉस पसरून खायला देतात. करी पफ हा आपल्या पफसारखाच. पण थोडा मलाय टच असलेला पदार्थ. याच्या मांसाहारी प्रकारात मटण, बीफ असं सारण भरलं जातं. ABC(air batu campur) म्हणजे आपला बर्फ गोळा. यात आंबट गोड जेली. सोबत शिजवलेले स्वीट कॉर्न आणि सोयाबीन घालतात.

image_20160915_163439लक्सा (laksa) हा स्थलांतरीत चायनीज लोकांचा आवडता पदार्थ. हे खूप लोकप्रिय तिखट असं नूडल सूप आहे. त्यामध्ये नूडल्ससोबत चिकन, प्रॉन्स किंवा मासा हे घालून देतात. व्हेज लक्सा हा एक खास पदार्थ. कढई गरम करून त्यात नारळाचं तेल आणि तयार मिळणारी लक्सा पेस्ट घालून २-३ मिनिटं शिजवतात. त्यात व्हेज स्टॉक, साखर, नारळाचं दूध, लिंबू रस आणि सोया सॉस घालून चांगले परतून घेतात. एक उकळी आणून मंद आचेवर ठेवून त्यावर झाकण ठेवून शिजू देतात. यात वडीप्रमाणे गाजर, टोफू, झुकिनी घालतात. दुसऱ्या एक भांड्यात पाणी गरम करून त्यात राईस नूडल्स शिजवून घेतात. त्या तयार झाल्यावर त्यातलं पाणी काढून त्याला थंड पाण्याने धुवून घेतात.
एका बाउलमध्ये नूडल्स घालून  त्यावर तयार गरम सुप ओततात. सगळ्यात वरती मोड आलेले सोयाबीन घालतात. आणि कोथिंबीर, पुदिना, तीळ घालून लिंबू पिळून गरम गरम पितात. हे फारच चवदार लागतं.

फळफळावळ 

img1473927145966

डुरियनला मलेशियामध्ये फळांचा राजा म्हणतात.  वरून उग्र वास असलेल्या या फळाची चव गोड असते. डुरियनपासून बरेच खाद्यपदार्थ बनवतात. मँगोस्टीनला फळांची राणी म्हणतात. हे फळाचे तीन भाग असतात. आतला मऊ, मधला टणक भाग आणि साल हे जांभळ्या रंगाचं. हे फळ थंड असतं आणि चव आंबट-गोड असते. स्टारफ्रुट हे फळ कापल्यावर त्याच्या प्रत्येक फोडीचा आकार ताऱ्यासारखा दिसतो. रामबुतान हे केसाळ फळ लाल रंगाचं, गोल आकाराचं असतं. यात काळे, लाल आणि हिरव्या रंगाचे तंतू असतात. गोड रसाळ असतं हे फळ. लंगसाट हे फळ सोनेरी असतं. ते बटाट्यासारखं दिसतं. त्याच्या बिया तुरट लागतात. गाभा मात्र पांढरट गोड असतो.
या फळात क जीवनसत्व भरपूर असल्याने ते औषध म्हणून वापरलं  जातं.
केळी, आंबा, नारळ, फणस याप्रकारची फळझाडं मलेशियामध्ये खूप आढळतात. अनेक घरांच्या आजूबाजूला  ही झाडं दिसतात.

पेयपान

मलेशियामध्ये आल्यावर जाणवलं की इथे खूप पाऊस पडत असला तरी पाण्याची किंमत आहे आणि पाण्यालाही किंमत आहे.  सगळीकडे गाळून शुद्ध केलेलं पिण्याचं पाणी अल्पदरात नळाद्वारे मिळतं. पाण्याचा वापर मीटरने मोजला जातो. पाण्याचं बिल दर महिन्याला येतं.
रेस्टॉरंटमधे गेल्यावरही पाणी विकतच घ्यावं लागतं. लोक पाण्याऐवजी फळांच्या रसापासून हार्ड ड्रिंक्सपर्यंत वेगवेगळी पेयं पितात. उसाचा रस, लस्सी ही पेयंही मेन्यूकार्मध्ये असतात. तेह(चहा) आणि कोपी(कॉफी) हे मलेशियन लोकांची आवडती पेयं सगळीकडे उपलब्ध असतात. सॉफ्ट ड्रिंक्स, उसाचा रस, वेगवेगळे ज्युसेस हे भरपूर बर्फ घालून प्लॅस्टिकच्या पिशवीतून स्ट्रॉसह देतात.

img1473927937937

भाषेची गंमत

मलेशियाची भाषा मलाय. शहरापासून दूर आयलंडवरच्या लोकांना इंग्रजी खूप कमी समजते. अशावेळी मलाय बोलावं लागतं. त्यामुळे आम्ही एक इंग्रजी-मलाय डिक्शनरी फोनमध्ये ठेवली आहे. काही दिवसांपूर्वी पॅंगकोर नावच्या बेटावर गेलो होतो. तर तिकडे शाकाहारी पदार्थ अजिबात नव्हते. मग आम्ही एका रेस्टॉरंट मधे व्हेज फुड मिळेल का असं विचारलं. तर ते लगेच त्यांच्या स्वयंपाक्याला घेऊन आले.  मग त्यांना व्हेज फ्राईड राईस बनवायला सांगितला. इकडे व्हेज म्हटलं तरी एखाद्या प्राण्याचा डोळा नाहीतर पाय  असं काही त्या पदार्थात असतंच. म्हणून त्या स्वयंपाक्याला मी चक्क पूर्ण साहित्याची यादीच सांगितली, तो वैतागला की काय, ते कळलं नाही.

माझी मागणी नोंदवून तो किचनमध्ये  गेला आणि थोड्या वेळाने त्याने आमचा राईस पाठवला. मी एकदा तपासणी केली खात्री पटल्यावरच खायला सुरुवात केली. पहिला घास खाल्ला तर काय! त्यात मीठच नव्हतं.  मी माझ्या साहित्याच्या यादीत सांगितलं नाही म्हणून घातलं नसावं. तिथल्या वाढपीण बाईंकडे मीठ (अर्थातच इंग्रजीत) मागितलं, तर तिला काही कळेना.  मग मी डिक्शनरीत बघून सांगितलं  गरम (मिठाला मलाय शब्द) हवं आहे. तेव्हा मात्र तिला मला मीठ हवं आहे, हे नेमकं कळलं. तेवढ्यात  माझी अडीच वर्षांची मुलगी मला म्हणाली, अगं आई,अजून गरम कशाला? हे खूप गरम आहे आधीच.

एकदा आम्ही फुड मॉलमध्ये आठवड्याच्या भाजी, फळ खरेदीसाठी गेलो होतो, नवरा फळं घेत होता. त्याच्यासोबत माझी मुलगी होती. थोड्याच वेळात मुलगी रडत माझ्याकडे आली. आंन्टी तिला  मारीन म्हणते आहे म्हणून. तिने दाखवलं तर ती फळविक्रेती ‘मारी मारी’ म्हणत होती. म्हणजे “या.. या.. फळं घ्यायला” असं मोठ्या आवाजात ग्राहकांना बोलावत होती.  मलाय आणि मराठी भाषेत समान शब्द बरेच आहेत. पण त्या शब्दांच्या अर्थात मात्र फरक आहे.

मलेशियामध्ये मामाक रेस्टॉरंट्स बरीच आहेत. मामाक म्हणजे स्थलांतरित दक्षिण भारतीय. या मामाक रेस्टॉरंटमधे खास इण्डो-मलाय खाद्यपदार्थ दिले जातात, नासी बिर्याणी, रोटी कनाई (पराठा ), ठोसई (डोसा), पासेंबुर (मिश्र भाज्यांचं सॅलड), रोटी तेलूर (अंड्याचा पराठा)  अशा प्रकारच्या डिश मिळतात.

कोणत्याही खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणजे ती थोड्याथोड्या अंतरावर बदलत असते. मलाय खाद्यसंस्कृतीही त्याला अपवाद नाही. अन्न हे पूर्णब्रह्म असल्याने आपल्या देशबाहेरचे खाद्यप्रकारही आपल्याला रसास्वादाचा आनंद देतात.

स्नेहा पांडे

img_20160905_130935_1

गृहिणी. वास्तव्य मलेशिया.

फोटो – स्नेहा पांडे     व्हिडिओ – YouTube

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s