टकर बॅग – ऑस्ट्रेलिया

भाग्यश्री परांजपे

australiamap2सन १७८९. गुन्हेगारांच्या त्या वसाहतीत कोर्ट भरलं होतं. फाटकेतुटके आणि कमालीचे मळलेले कपडे घातलेले निराश, हताश चेहऱ्यांचे स्त्रीपुरुष घोळका करून उभे होते.  उपासमारीने बऱ्याच जणांच्या हातापायाच्या काड्या झाल्या होत्या. एक गणवेशाचा फरक सोडला तर शिपाई आणि गुन्हेगारांची अवस्था सारखीच होती. सुनावणी सुरू झाली. आरोपीने दुसऱ्या एका दुर्बल गुन्हेगाराच्या हातातला ब्रेडचा तुकडा हिसकावून खाल्ला होता. खरं तर अशा गुन्ह्याला फाशीची शिक्षाच व्हायची. पण तो ब्रेडचा तुकडा, इतका लहान होता, की त्याला साखळदंडांनी बांधून एका निर्जन बेटावर सात दिवस ठेवण्याची  शिक्षा देण्यात आली. याचा अर्थ सरळ होता. वसाहतीतील अन्नाचा साठा संपत आला होता आणि असे गुन्हे करणाऱ्यांची कुठलीही हयगय केली जाणार नव्हती. हळूहळू सगळे पांगले. भूक त्या सगळ्यांची पोटं अक्षरश: कुरतडत होती, पण इलाज नव्हता. अन्नासाठी त्यांच्या नशिबात अजून खूप वणवण लिहिली होती.

कल्पना करा, तुम्हांला तुमची इच्छा नसताना जबरदस्तीने जहाजावर ढकललं आहे आणि एका अगदी अनोळखी, वेगळ्याच प्रदेशात नेऊन सोडलंय. बरोबर थोडासा शिधा आणि अवजारं दिलीत आणि सांगितलंय – “आता हेच तुझं जग.  इथे घर बांध, शेती पिकव आणि खा. इमारती बनव, वसाहत वसव”. काय होईल? असंच काहीसं या लोकांचं झालं होतं. अगदी क्षुल्लक, खरं म्हणजे शिक्षा झाली नाही तरी चालेल असे त्यातले बऱ्याच जणांचे अपराध होते. पण अगदी क्षुल्लक गुन्हा असला तरी इंग्लंडात त्या काळी तुरुंगात पाठवत. शेवटी तुरुंग अपुरे पडायला लागले. म्हणून इंग्लंडवरून आर्थर फिलिप या सैन्याधिकाऱ्याबरोबर काही गुन्हेगार स्त्री पुरुष व मोजके नौदलातले सैनिक, ज्यांना इतिहास ‘अर्ली सेटलर्स’ या नावाने संबोधतो, एका अनोळखी खंडात पाठवून देण्यात आले. तिथे इंग्रजांची वसाहत स्थापित करण्याचा त्यांना आदेश होता. हा खंड होता टेरा ऑस्ट्रालीस, अर्थात आजचा ऑस्ट्रेलिया.

इथला रखरखीत भूप्रदेश, हवामान, प्राणी, पक्षी आणि झाडझाडोरा सगळंच जगावेगळं होतं. भर जानेवारी – फेब्रुवारीत भाजून टाकणारा कडक उन्हाळा होता. निलगिरीची आणि इतर अनेक अनोळखी झाडं- पानं सोडून साली ढाळत होती. हंसपक्षी काळेकुळकुळीत (खरं वाटत नाहीये ना?) होते. बरेचसे प्राणी मारसुपिअल्स, म्हणजे आपली पिल्लं पोटाजवळ पिशवीसारख्या एका अवयवात वाढवणारे होते, आणि एक प्राणी, प्लॅटिपस तर चक्क अंडी देई. जहाजं किनाऱ्याला लागल्यापासून प्रतिकूल परिस्थिती या लोकांची पाठ सोडत नव्हती. बरोबर दिलेला अपुरा अन्नाचा साठा इतक्या लांबच्या प्रवासात सडला आणि उपासमार सुरू झाली. शेती करण्यासाठी दिलेली अवजारे आणि इथली जमीन दोन्हीही निकृष्ट प्रतीची होती. महत्प्रयासाने पेरलेली थोडीशी बियाणं हवामान आणि पशुपक्ष्यांनी मिळून लगेच उद्ध्वस्त करून टाकली. जास्तीचा शिधा आणायला गेलेली जहाजं वेळेत परतली नाहीत तर भुकेनं तडफडून मरण नक्की होतं.

पण तसं झालं नाही बरं का. आपल्या अर्ली सेटलर्सच्या मदतीला या खंडात साधारण पन्नास हजार वर्षांपासून वस्ती करून असलेले मूळचे रहिवासी आले. त्यांच्या अनेक टोळ्या ऑस्ट्रेलियाभर विखुरलेल्या होत्या. शेती करणं, घरं बांधणं असल्या गोष्टी त्यांच्या खिजगणतीतही नव्हत्या. मग ते खात काय? जगत कसे? ते भटकत, निसर्गातून अन्न हुडकत आणि शिकार करत. त्यांना तिथल्या निसर्गाचं – जमीन आणि पाण्याच्या स्रोतांचं उत्तम ज्ञान होतं. ऋतू आणि हवामानाप्रमाणे कुठल्या प्रदेशात काय नैसर्गिकरित्या पिकेल, कुठल्या वन्यजीवांची पैदास होईल ते माहीत होते. मोसमी वनस्पतींचा पाला आणि काही विशिष्ट झाडांच्या बिया, फळे आणि मुळे हा त्यांच्या आहाराचा एक भाग होता. उदाहरणार्थ, मॅकॅडेमिया ववॉटल या झाडांच्या शेंगांतील बिया, बॉटल ट्री या झाडाचं खोड, बिया आणि मुळं ते खात. ग्रास ट्री या झाडाच्या फुलांमधला तसंच मधमाशांच्या पोळ्यातला मध ते गोडीसाठी वापरत.

काही विशिष्ट कीटक आणि अळ्या, कांगारू, इम्यु आणि मगरी, पक्षी आणि त्यांची अंडी, तसंच मासे, इतर जलचर हे त्यांचं मांसाहारी खाद्य होते. राहत्या प्रदेशातील अन्नाचा साठा संपत आला, की तो प्रदेश सोडून ते दुसऱ्या प्रदेशात स्थलांतर करत. त्यामुळे सोडलेल्या प्रदेशाला परत मोसमी अन्नाची पैदास करण्याला वेळ मिळे. निसर्गावर अवलंबून आणि त्याच वेळी निसर्गाला पूरक अशी ही त्यांची प्राचीन खाद्यसंस्कृती होती. खरं तर ही ऑस्ट्रेलियाची पहिली खाद्यसंस्कृती म्हणता येईल. काही दिवस दोन्ही समूहांत कांगारू आणि इतर प्राण्यांचं मांस यासाठी देवाणघेवाण झाली. नंतर त्यांच्यात कुरबुरी सुरू झाल्या आणि मैत्री  झाली नाही ते वेगळं. पण या वेळेपर्यंत आपले अर्ली सेटलर्स निरनिराळे मासे, खेकडे, कासवं, कांगारू, इम्यु आणि मगरीचं मास आणि वनस्पतिजन्य अन्न खायला शिकले होते. अर्थात फक्त जीव जगवण्यासाठी. मूळ रहिवाशांच्या अशा या अन्नाला अर्ली सेटलर्सनी ‘बुश फूड’ किंवा ‘बुश टकर’ असं नाव दिलं. पण त्यांना कायम निसर्गातून मिळणारं अन्न हुडकत आणि शिकार करत फिरणं शक्य नव्हतं. ब्रेड, केक, फळं आणि शिजवलेल्या मांसाचे रुचकर पदार्थ खायचे असतील तर शेतीला पर्याय नव्हता. शेतीचे प्रयत्न सुरूच होते.

सरतेशेवटी जेम्स रुस हा शेतकरी पुढच्या वर्षीच्या बियाणास पुरेल इतका का होईना, पण गहू पिकविण्यात यशस्वी झाला. ही इतकी आनंदाची बातमी होती, की त्याचा काही कोंबड्या, डुकरं आणि तीस एकर जमीन देऊन सत्कार करण्यात आला हो! त्यानंतर या लोकांनी अतोनात कष्ट केले. भूप्रदेशाची सर्वेक्षणे केली, हवामान, पाऊसपाणी यांचा अभ्यास केला. नद्या आणि पाण्याचे इतर स्रोत शोधले. शेतीयोग्य जमिनी शोधल्या आणि कसल्या. विज्ञानाची कास धरली, नवीन तऱ्हेची अवजारं बनवली.

कमी पावसाच्या प्रदेशात गहू, ज्याला कलोनिअल व्हीट म्हणतात, तो तांदूळ पिकविला. इंग्लंडहून फुलं, फळझाडांच्या बिया, कटिंग्ज, वेगवेगळे प्राणी, अगदी मधमाशासुद्धा जहाजाने आणल्या आणि इथे त्यांची पैदास केली. मेरीनो जातीच्या मेंढ्या आणि इतर पशुधन पाळलं. ऊस पिकवला. जगाशी व्यापार सुरू झाला, सिडनी एक मुख्य बंदर झालं. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या खाद्यसंस्कृतीचा पाया रोवला गेला. पण हे सगळं होईपर्यंत १८५० साल उजाडलं होतं. काय खाल्लं असेल या लोकांनी दरम्यानच्या काळात?

या काळात सतत कष्ट करणाऱ्या लोकांसाठी उपयोगी पडतील, फारशा साधनसामुग्रीशिवाय पटकन होतील अशा पाककृती शोधण्यात आल्या. बुश टकर रेसिपीज, बिली टी आणि  डॅम्पर हे या काळातील अगदी जातिवंत ऑस्ट्रेलियन देणं. अर्ली सेटलर्सनी बुश फूड त्यांना माहिती असलेल्या, हळूहळू उपलब्ध होत गेलेल्या चीझ, बटर, वेगवेगळी पिठं, मैदा, करी पावडर (भारतातून आलेली) अशा गोष्टींबरोबर मिसळून नवनवीन पदार्थ तयार केले. बुश फूडमध्ये अनेक नाविन्यपूर्ण चीजा आहेत – वाईल्ड रोझेला, सॅण्डलवूडनट्स, बुश टोमॅटो आणि खूप सारं. त्यात इथे फक्त फिंगर लाईमबद्दल बोलते. ही साधारण बोटाच्या पेराएवढी असणारी लिंबाची जात. कापल्यावर आतमध्ये आंबटगोड रसाने अक्षरश: भरलेले, अगदी छोटेसे अनेक दाणे निघतात. रंग गुलाबी, पांढरा किंवा हिरवट पण असू शकतो. सिडनीतील एका रेस्टॉरंटमध्ये हे पाहिल्यावर आणि चाखल्यावर मी धरित्रीमातेचे अक्षरशः आभार मानले, इतकं याचं रूप आणि चव मला आवडली.

बुश क्विझिन हे आजकाल चांगलंच लोकप्रिय होऊ लागलं आहे आणि अगदी फाईव्ह स्टार रेस्टॉरंट्ससुद्धा मेन्यूकार्डवर असे पदार्थ ठेवण्यात भूषण मानतात. सुपरमार्केट्समध्ये पण कांगारू बर्गर्स, सशाचं मांस, मगरीच्या शेपटीचे स्टेक, मगरीचे सॉसेजेस विकायला असतात. आजसुद्धा बरेचदा जेवणाला टकर तर जेवण ठेवायच्या पिशवीला टकर बॅग म्हणतात.

डॅम्पर, किंवा ओबडधोबडपणे बनवलेला ब्रेड हा असाच एक पदार्थ. मूळचे रहिवासी स्पिनिफेक्सच्या बियांचं पीठ मळत, आणि ते जाडसर थापून कोळसे किंवा राखेत भाजत; तर अर्ली सेटलर्स कामानिमित्ताने दूरदूरचा प्रवास करत. जवळच्या शिध्यात पिठाच्या गोण्या असत. विश्रांतीला, जेवणाला जिथे थांबत तिथेच नुसतं पीठ, मीठ, असल्यास सोडा आणि पाणी मिसळून चांगलं मळत. साधारण जाडसर गोल थापत आणि कॅम्पफायरमध्ये भाजत. ओव्हनअभावी बनणारा आणि प्रचंड गर्मीत टिकणारा हा सुटसुटीत पदार्थ त्यांची भूक भागवायला उपयोगी पडे. भूक तर भागली, पण तरतरी यायला काही पेय नको का? मग त्याच कॅम्पफायरवर एक बिली कॅन, म्हणजे अ‍ॅल्युमिनिअमचं भांडं ठेवत. त्यात पाणी टाकत. चांगलं उकळलं, की त्यात चहाची पानं आणि  दोन – तीन  स्वच्छ धुतलेली युकॅलिप्टस किंवा लेमन मर्टलची पानं टाकत. अजून थोडं उकळत आणि मग पीत. हा त्यांचा बिली टी. रेसिपी काही खास नाही, पण तिला एक प्रतीकात्मक महत्त्व आहे – अर्ली सेटलर्सच्या कठीण आयुष्याचं, अतोनात परिश्रमाचं.

बिली टी

आणि कॅम्पफायर आहेच, तर मीठ आणि जे काय मसाले  असतील नसतील ते लावून शिकार केलेलं मांस भाजा आणि खा. नाही का? मला तर वाटतं, यातूनच ऑस्ट्रेलियन बार्बेक्यूचा जन्म झाला असेल. नाही, ऑस्ट्रेलिया हा काही जगातील बार्बेक्यू करणारा एकमेव देश नाही. पण बार्बेक्यूला इथे फार म्हणजे फारच महत्त्व आहे. इतकं की प्रत्येक घराच्या मागच्या अंगणात, मग ते कितीही इटुकलं का असेना, एक बार्बेक्यू – लहान किंवा मोठं, कोळसे किंवा गॅस यावर चालणारं असतंच. आणि त्यावर मांस आणि भाज्या टाकून, गप्पा मारत, वाईन नाहीतर बीअर पीत आरामात जेवणं चालतात. एक राहिलंच – ऑस्ट्रेलियात असाल तर कृपया बार्बेक्यू न म्हणता अगदी लाडिकपणे ‘बार्बी’ म्हणा. हो हो बार्बीच. बार्बी डॉल नव्हे –  बार्बी हा इथल्या बोलीभाषेत बार्बेक्यूचा शॉर्टफॉर्म आहे. हवं असेल, तर क्रोकोडाईल डंडी या जगप्रसिद्ध सिनेमातला मुख्य अभिनेता पॉल होगन याची ऑस्ट्रेलिया टुरिझमची जाहिरात बघा. डॅम्पर, बिली टी आणि बार्बेक्यू आजही ऑस्ट्रेलियन जीवनाचा अविभाज्य भाग आहेत आणि यांच्याशिवाय आउटिंग किंवा पिकनिक साजरी होत नाही.

photo-8-bbq

बाकी रोजचे अस्सल ऑस्ट्रेलियन खाणे-पिणे सोपे, सुटसुटीत आहे. सकाळच्या न्याहारीला सिरिअल्स आणि ओट्स फळांबरोबर खाल्ली जातात. वेळ असेल तर  बेकन आणि अंडी तव्यावर टाकून ब्रेडबरोबर खातात. नाही तर पॅनकेक. बरोबर चहा किंवा कॉफी. काही लोक ब्रेडला व्हेजीमाईट हे ब्रुवर्स यीस्टपासून बनवलेलं स्प्रेड लावून खातात. हे स्प्रेड फक्त ऑस्ट्रेलियातच मिळतं आणि याची चव काहीशी, खरं तर फारच विचित्र असली, तरी यातून शरीराला भरपूर बी व्हिटॅमिन मिळतं. दुपारच्या जेवणात सँडविच, सलाड किंवा बाहेर जे आवडेल ते – चायनीज, इंडियन, थाय, स्टेक इ. खाल्लं जातं. रात्री बार्बेक्यू, बाहेरून जेवण विकत आणणे किंवा घरीच वन डिश मील बनवणे यातील काहीही चालतं. ऑस्ट्रेलियन्स सहसा आपल्या सोयीने, आरामात आणि आनंदात सर्व करतात. घाईघाई, धावपळ, जीवाला त्रास करून घेणे यातलं काहीही त्यांना बिलकूल मान्य नाही. त्यामुळे लोकलमध्ये भाजी निवडणाऱ्या किंवा रोज नेमाने स्वयंपाक करणाऱ्या गृहिणी  इथे  दिसणार नाहीत. शिवाय भाजीपाला, फळं, दूधदुभतं, मांस हे सर्व उच्च प्रतीचं असतं. रेस्टॉरंट्समध्ये एकूणच जेवण बनवणं, खाद्यपदार्थ हाताळणं याबाबतीत असलेलं सरकारी नियमन अगदी कडक आहे. म्हणूनच बहुधा बाहेर जेवायचं प्रमाण इथे जास्त आहे. रात्रीच्या जेवणाचा फार फाफटपसारा नसतो. आणि साधारण सातच्या आत जेवण्याकडे कल असतो. सुट्टीच्या दिवशी आरामात उठून आपल्या प्रियजनांबरोबर बाहेर ब्रेकफास्ट, लंच किंवा डिनरला  जाणं आणि तासन्तास गप्पा मारत खाणं बहुतेकांना आवडतं.

इथला अजून एक लोकप्रिय प्रकार म्हणजे मॉर्निंग टी.  हा एक छोटासा उत्सवच म्हणा ना. एका कार्यालयातले, संस्थेतले किंवा हॉबी ग्रुप्समधले लोक सकाळी एक वेळ ठरवतात आणि एकत्र येतात. प्रत्येक जण एक पदार्थ आणतो आणि सगळे मिळून गप्पा करत आणलेल्या पदार्थांचा फडशा पाडतात. पारंपरिक मॉर्निंग टीमध्ये तऱ्हेतऱ्हेचे केक्स, बिस्किट्स, फेअरी ब्रेड, फळं, चिप्स आणि डिप्स, भाज्यांचे काप, मिनी पाईज असतात. यात टीम टॅम आणि अँझॅक बिस्किट्स आलेच.

फेअरी ब्रेड
फेअरी ब्रेड

टीम टॅम ही ऑस्ट्रेलियात अरनॉट या कंपनीकडून बनवली जाणारी जगप्रसिद्ध चॉकोलेट बिस्किट्स. कितीही खाल्ली तरी कमीच पडतील अशी चव. अँझॅक बिस्किट्स पण  ऑस्ट्रेलियात (आणि न्यूझीलंडमध्ये) बरीच लोकप्रिय आहेत. मुख्य म्हणजे यात अंडी वापरत नाहीत. यात वापरले जाणारे घटक पदार्थ म्हणजे ओट्स, मैदा, लोणी, साखर, सुके खोबरे सहसा लवकर खराब होत नाहीत. म्हणून ही बिस्किटे सैनिकांबरोबर देण्यात येत असा उल्लेख आहे.

आता पेयांकडे वळूया. चहा-कॉफीबद्दल बोलायचं तर ऑस्ट्रेलियन्स दोन्ही आवडीने पितात. पण खरा उल्लेख करावा तर त्यांच्या मद्यपानाचा. ऑस्ट्रेलियन्स मद्यप्रेमी, सरळसरळ दारुडे म्हणून जगप्रसिद्ध आहेत. १८६९ मध्ये इंग्लिश, अमेरिकन्स आणि फ्रेंचांशी याबाबतीत त्यांची तुलना करताना त्यांना ‘नेशन ऑफ ड्रंकर्ड्स’ म्हटलं गेलं. काही अंशी हे खरं पण होतं. जहाजातून येताना त्यांनी रम आणि द्राक्षवेलींची कटिंग्ज आणली होती. आणि रम गाळायला अगदी लगेचच सुरुवात केली होती. काही दिवस रम हे चक्क इथलं चलन म्हणूनच वापरलं गेलं. शिवाय अतोनात कष्ट करायचे, मागे राहिलेल्या आपल्या देशाची, कुटुंबाची आठवण विसरायची तर दारू पिण्याला फारसा पर्याय नव्हता. ती प्रथा पुढे सुरूच राहिली. ऑस्ट्रेलियन्स सहसा एकेकटे पिणार नाहीत, तर मित्रमैत्रिणी जमवून पिणार. शाऊटिंग ही खास ऑस्ट्रेलियन प्रथा. पबमध्ये – त्याला इथे बार म्हणतात, जायचं. एकजण ग्रुपमधल्या सगळ्यांसाठी मद्य विकत घेणार. मग दुसऱ्याची पाळी. मग तिसऱ्याची. हे सगळ्यांची पाळी होईपर्यंत (किंवा सगळे पिऊन टेर होईपर्यंत) सुरूच राहतं. आता हे चित्र थोडंथोडं बदलतंय. ऑस्ट्रेलियन्स दारुडे होण्यासाठी नाही तर मद्याचा आनंद घेण्यासाठी प्यायला लागलेत.

व्हिक्टोरिया बिटर ही मेलबर्नमध्ये बनणारी बिअर इथे सर्वाधिक विकली जाते. थंड हवामानाच्या जागा पाहून अनेक वाईनरीज स्थापन केलेल्या आहेत. त्यातून साधारण सहाशेहून अधिक जातीच्या द्राक्षवेली जोपासल्या जातात आणि उत्तमोत्तम वाईन्स बनवल्या जातात. यात पीनोन्वार, शिराझ, रिझलिंग, मस्कत या द्राक्षांपासून बनलेल्या वारुणी जास्त प्रसिद्ध आहेत. इथल्या दोन वाईन्स मला विशेष उल्लेखनीय वाटतात. एक पेनफोल्ड्स ग्रेन्ज शिराझ. ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असली तरी ऑस्ट्रेलियाची सगळ्यात प्रसिद्ध वाईन आहे. दुसरी सर्वांना परवडणारी मस्कातो वेगवेगळ्या वाईनरीज ही बनवतात आणि त्यानुसार चवीत थोडाफार फरक असतो. डेझर्ट वाईन असल्याने हिची चव हलकीशी गोड, थोडीशी फ्रुटी अशी आहे. यात मद्याचा अंश बराच कमी असतो आणि मद्य न आवडणारे पण ही वाईन आवडीने पितात.

मस्कॅटो
मस्कॅटो

आज हा देश गहू, इतर धान्यं, दुग्धजन्य पदार्थ, बीफ, वाईन्स अशा अनेक गोष्टींचा आघाडीचा उत्पादक आणि निर्यातदार आहे. आजची, म्हणजे २०१६ मधली इथली खाद्यसंस्कृती सर्वसमावेशक आहे. १८५० नंतरच्या काळात युरोपिअन, अमेरिकन, चायनीज, लेबनीज, इंडियन्स आणि इतर अनेक देशातले लोकं इथे स्थलांतरित झाले. प्रत्येकाने आपापले पदार्थ आणले आणि आज इथे जगात सगळीकडे आहेत, तशी प्रत्येक देशाचे प्रतिनिधित्व करणारी रेस्टॉरंट्स आणि ग्रोसरी स्टोअर्स आहेत. इथल्या बेकरीजमध्ये तऱ्हेतऱ्हेचे ब्रेड्स मिळतात. सगळीकडे फार्मर्स मार्केट्स आहेत आणि त्यात हव्या त्या भाज्या आणि हवी ती फळं मिळतात. सगळ्या देशांतले पदार्थ भेदभाव न करता तिन्ही त्रिकाळ खाल्ले जातात. ऑस्ट्रेलियन बार्बेक्यूवर तंदूरी मसाला लावून मांस भाजलं जातं आणि भारतीय घरांमध्ये कोशिंबीर आणि बटाट्याची भाजी याबरोबर लेबनीज ब्रेड आवडीने खाल्ला जातो. मॉर्निग टी मध्ये सामोसे, चकल्या, ढोकळा, बकलावा आणि  स्प्रिंग रोल्स यासारखे पदार्थ समाविष्ट झाले आहेत. माझ्या  चायनीज मैत्रिणीचे आईवडील हल्दीरामची तिखट शेव सकाळच्या नाश्त्याला भाताच्या कांजीवर घालून खातात. पण हे जरा टोकाचं झालं, नाही का?  संगतीचा परिणाम (माझ्या), दुसरं काय?

इतिहास बघितला, तर  साधारणपणे असं दिसतं की जिथे जिथे पिण्यालायक पाणी आणि सुपीक जमीन सापडली, तिथे तिथे मानवाने वस्ती केली, आणि त्या त्या प्रदेशाला, हवामानाला अनुकूल अशी फळं, पिकं पिकवली. ऑस्ट्रेलियात याच्या अगदी उलट दिसतं. इथली खाद्यसंस्कृती प्रचंड अभावातून जन्माला आली. अक्षरश: आपला घाम शिंपून, रक्त आटवून, प्रसंगी उपाशीपोटी अतोनात कष्ट करून ती पुढे विकसित केली गेली. फ्रान्स, इटली या देशांच्या खाद्यसंस्कृतीसारखी ती नाजूक साजूक, नटलेली नक्कीच नाही.  जराशी रांगडी, दणकट, साधीसुधीच आहे खरं तर. पण अभिमान वाटावा अशी, आणि ऐतिहासिक मात्र जरूर आहे.

आता काही ऑस्ट्रेलियन पाककृती बघूया.

 • डॅम्पर (ओव्हन मधला)

साहित्य: ३ कप मैदा, ३ टीस्पून बेकिंग पावडर, ३ चिमटी मीठ, ८० ग्राम थंड बटर आणि १ कप पाणी.

कृती: मैदा, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र करून चाळणीने अगदी चांगले चाळून घ्या. अगदी एकत्र मिसळून आले पाहिजेत. या मिश्रणास बटर चोळा. आता हे मिश्रण ब्रेडक्रम्ससारखे दिसायला हवे. त्यात पाणी मिसळा आणि हाताने मळून काढा. जाडसर गोल आकारात थापा. २०० डिग्री सेंटीग्रेडला गरम केलेल्या ओव्हनमध्ये साधारण ३० मिनिटे भाजा. तुमच्या ओव्हनप्रमाणे हे तापमान आणि लागणारा वेळ कमी-जास्त होऊ  शकेल. गरम असतानाच मध, काकवी किंवा भरपूर साय आणि साखर घालून खा. हा बाकीच्या ब्रेड किंवा केक्ससारखा मऊ लागणार नाही.

२. अँझॅक बिस्किट्स

साहित्य: प्रत्येकी १ कप मैदा, ओट्स व सुक्या खोबऱ्याचा कीस, अर्धा कप गुळी साखर, एक चतुर्थांश कप पिठीसाखर, १२५ ग्राम बटर, २ टेबलस्पून्स प्रत्येकी गोल्डन सिरप व पाणी, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा.

कृती: ओव्हन साधारण १६० डिग्री सेंटीग्रेडला गरम करा आणि दोन बेकिंग ट्रे बेकिंग पेपर लावून तयार ठेवा. मैदा, ओट्स व सुक्या खोबऱ्याचा कीस, आणि गुळी साखर व पिठीसाखर, एका मोठ्या भांड्यात एकत्र करा. बटर, गोल्डन सिरप आणि पाणी मध्यम आचेवर एका छोट्या कढईत गरम करा. मिश्रण गुळगुळीत झाले पाहिजे. त्यातच बेकिंग सोडा मिसळा. हे मिश्रण आता ओट्स व मैदा यावर ओता आणि नीट मिसळून घ्या. या मिश्रणाचे एकावेळी एक टेबलस्पून घेऊन छोटे गोळे करा आणि साधारण ५ सेमी अंतरावर बेकिंग पेपरवर टाका. आता हे गोळे साधारण १ सेमी जाडीचे चपटे करा. ओव्हनमध्ये १५ मिनिट्स किंवा हलक्या सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजा. बाहेर काढून, थंड करून खा.

फेअरी  ब्रेड:

(ही रेसिपी लहान मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी उत्तम आहे.)

साहित्य: व्हाईट ब्रेड स्लाईसेस, बटर आणि केकवर टाकतात ते रंगीबेरंगी स्प्रिंकल्स.

कृती: ब्रेड स्लाईसेसला बटर लावा, त्यावर रंगीबेरंगी स्प्रिंकलस टाका. हवं तर वेगवेगळ्या आकारात कापा. एका ट्रेमध्ये मांडून खायला द्या.

भाग्यश्री परांजपे

bhagyashree_photo

ऑस्ट्रेलियात सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत. पर्यटन करणे, चित्रे  काढणे आणि वाचन करणे हे मुख्य छंद.वेगवेगळ्या पाककृती करून बघण्याची आवड. यापूर्वी मायबोली.कॉम वर थोडेसे लेखन केले आहे.

फोटो – भाग्यश्री परांजपे      व्हिडिओ – YouTube

2 Comments Add yours

 1. smpkri says:

  लेख छान आहे. भाताच्या कांजीवर चायनीज लोक हलदिराम ची शेव घालून खात असतील तर काही खास वेगळे करत नाहीत. कारण कोकणात बऱ्याच घरांमध्ये मऊ भातावर शेव भुरभुरून खाल्ली जाते.

  Like

 2. Vidya Subnis says:

  मस्त आहे लेख. खूप नवीन माहिती समजली

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s