टेस्ट ऑफ पॅरडाइज – इराण

कल्याणी केदार कुमठेकर

iranmap1

“आपलं पुढचं पोस्टिंग आता इराण आहे” असं माझ्या नवर्‍याने, केदारने मला सांगितलं तेव्हा खरंतर खूप भीती वाटली. “इराण? दुसऱ्या कुठल्या देशामध्ये नाही का आपल्याला जाता येणार?” मी प्रतिप्रश्न केला. त्यावर त्याचं नेहमीचं उत्तर – “कल्याणी,  पापी पेट का सवाल है. जाना तो पडेगा.”

माझ्या नवऱ्याच्या नोकरीमुळे आम्हांला वेगवेगळ्या देशांमध्ये राहायची संधी मिळते. स्वतःचा देश सोडून गेलं की तुम्हांला तुमचे आप्तस्वकीय, तुमची ओळखीची ठिकाणं, तुमच्या सवयी हे सगळं मागे सोडून यावं लागतं. पण त्याबरोबरच तुम्हांला वेगवेगळे अनुभव मिळतात. नवीन गोष्टी पाहायला, शिकायला मिळतात. निरनिराळ्या स्वभावाची माणसं, त्यांच्या चालीरीती, परंपरा, संस्कृती, भाषा, त्यांचे सण-समारंभ, सगळं काही जवळून पाहायला, अनुभवायला मिळतं.

ओळख इराणची, इराणी लोकांची

इराण हा त्यातलाच एक देश. मात्र इराणला जाताना मनात असंख्य प्रश्न होते.  तिकडे ओळखीचं कुणी नाही. इराणबद्दल उलटसुलट गोष्टी ऐकल्या होत्या. कसं राहणार आपण तिकडे? या संभ्रमावस्थेतच आम्ही २०११ मध्ये इराणला पोहोचलो. इराणच्या राजधानीचं शहर तेहरान. आम्ही तेहरानमध्ये जेमतेम दीड वर्षं राहिलो. पण इराणमधल्या त्या दिवसांनी खूप नवीन गोष्टी आणि न विसरता येणाऱ्या आठवणी आणि मित्र-मैत्रिणी दिले.

आपल्याकडे इराणी लोकांची ओळख म्हणजे गोल टोपी घातलेले पारसी बावा आणि इराणी बेकरी. परंतु इथले इराणी अगदी वेगळे. पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील परंपरांचा सुंदर मिलाफ त्यांच्या राहणीत दिसतो. पश्चिमेकडची आधुनिक राहणी आणि पूर्वेकडील संस्कृती आणि परंपरा यांचं मिश्रण म्हणजे इराण. इराणचं पूर्वीचं नाव पर्शिया. हे खूप मोठं आणि प्राचीन साम्राज्य होतं. इराण हा देश कला, वास्तुशास्त्र, साहित्य यासाठी जगभरात प्रसिद्ध. सादी, फिर्दोसी, हाफिज या कवींचा देश. इराणी गालिचांचा देश. इराणी मूळचे अग्निपूजा करणारे, झोराष्ट्रीय. इराणमध्ये बायकांना हिजाब सक्तीचा. पण कधी तो नकोसा वाटला नाही, तोही सवयीचा होऊन गेला.

तेहरानमध्ये फारसी भाषा बोलली जाते.  आपल्याला ज्या मराठी भाषेचा अभिमान आहे त्या भाषेतील २० ते ३० टक्के शब्दांचा उगम फारसी भाषेतून झाला आहे. दार, कारखाना, गुलाब, किल्ली, वकील, पोशाख, दिवाणखाना, बाग, जमीन, तंबी, आदब, अंदाज, आजार हे, आणि असे बरेच शब्द फारसी भाषेतून आले आहेत.

इमानी इराणी

सुरुवातीला इथल्या पैशांचा गोंधळ काही केल्या लक्षात येत नसे. रियाल आणि तोमानमध्ये सगळ्या किमती. एक हजार तोमान म्हणजे दहा हजार रियाल. लाखभर रियाल खर्च केले की एक कोथिंबिरीची जुडी मिळत असे. त्यांच्या नोटेवरचं हे शून्य नेहमीच गोंधळ उडवून टाकत असे. मी फक्त हिरवी नोट म्हणजे एक डॉलर आणि निळी नोट म्हणजे दोन डॉलर असं लक्षात ठेवलं होतं.

एकदा एका दुकानात एक सुंदर स्कार्फ पाहिला, दुकानदाराला किंमत विचारली तर त्याने पन्नास हजार असं सांगितलं. आता हे रियाल कि तोमान? दुकानात खूप गर्दी होती. मला तर तो स्कार्फ आवडला होता. त्याला विचारणार तरी किती वेळा? त्याला माझ्या डोक्यात चाललेला गोंधळ कदाचित लक्षात आला. मी पर्समधले पैसे काढून मोजत असतानाच त्याने हलकेच माझ्या हातातून त्यातली एक नोट काढून घेतली आणि म्हणाला, बस्स, एवढेच! मला खूप आश्चर्य वाटलं.

तेव्हापासून मी बिनदिक्कत सगळीकडे खरेदी झाल्यावर दुकानदारांसमोर पर्सच उघडी करून धरायला लागले. योग्य  किमतीच्याच नोटा कुठलेही दुकानदार माझ्या पर्समधून घेत असत. इथे फसवाफसवीला स्थानच नाही. परक्या देशातून आलेला माणूस त्यांच्यासाठी देवासमान असतो.

केशराची फुलं
केशराची फुलं

केशर, सुकामेवा, गुलाबपाणी

आज जगभरात इराण ओळखलं जातं ते इराणी केशरासाठी. जगातल्या एकूण केशर उत्पादनापैकी ८० ते ९० टक्के केशर इथे बनतं. ते इतकं महाग असण्याचं कारण म्हणजे जवळपास १५० फुलांमधून १ ग्रॅम केशर निघतं. जांभळ्या रंगाच्या केशराच्या फुलांमधलं स्टिग्मा अर्थात पराग म्हणजेच केशर. या फुलांना वसंतऋतूतच बहर येतो. या फुलांची खुडणी पहाटे सूर्यप्रकाशाच्या आधी करतात. कारण जसा दिवस उगवेल तशी ही फुलं सुकू लागतात. त्यामुळे एकावेळी असंख्य कामगार महिला याची खुडणी करण्यासाठी लागतात. माशाद या गावात सगळ्यात जास्त केशराची निर्मिती होते.

इराणी लोक नुसता पांढरा भात बनवत नाहीत. असं करणं ते अशुभ मानतात. त्यामुळेच एक तरी केशराची काडी त्यांच्या भातात आपल्याला दिसते.

इराण हे प्रामुख्याने ओळखलं जातं ते पिस्ते, बदाम, अक्रोड, केशर, पुदिना, संत्री, द्राक्षं, आणि डाळिंब यासाठी. आपण आज जे कबाब, बिर्याणी, कोफ्ते खातो, त्यांची सुरुवात इथूनच झाली असावी. इराणी लोकांच्या आहारात ताजी फळं, कच्च्या पालेभाज्या, सुकामेवा यांचा समावेश प्रामुख्याने असतो.

दरवर्षी इराणमध्ये गुलाबाच्या फुलांचं मोठं प्रदर्शन भरतं. इराणच्या कानाकोपऱ्यातले लोक इथे वेगवेगळ्या प्रकारचे, रंगांचे गुलाब घेऊन येतात. गुलाबजल आणि अत्तर हे पहिल्यांदा इराणमध्येच बनवलं गेलं.

अगत्यशीलता

इराणी लोकांच्या घरी गेलं की त्यांचं अगत्य पाहून आपल्याला अगदी भरून येतं. प्रत्येकाच्या घरामध्ये टीपॉयवर पिस्त्याने भरलेले बोल्स कायमच असतात. पाहुणचाराची सुरुवात चहाने होते. मग सुकामेवा, फळं, आणि तरीही तुमचं काम किंवा गप्पा संपल्या नाहीत तर ते वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ आणतात. गप्पा मारताना किंवा काही काम करताना या सगळ्याचा भरपूर आग्रह करत राहतात.

%e0%a4%87%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3-%e0%a5%a8

इराणी लोकांचा आवडीचा कार्यक्रम म्हणजे पिकनिक. तेहरान हे खूप सुंदर बागांचं गाव. त्यामुळे अगदी सकाळी सहा- सात वाजताही लोक आपला जामानिमा घेऊन बागेमध्ये दिसत. प्रत्येकाच्या चार चाकी वाहनांमध्ये सतरंज्या, प्लेट्स, कबाब बनवण्यासाठी लागणारे छोटे तंदूर, खुर्च्या, मोठ्या छत्र्या, तंबू ,गॅस स्टोव्ह आणि चहाच्या किटल्या असा सरंजाम कायमच असणार. आमचेही मग सुट्टीचे दिवस  कधी सायकलिंग, तर कधी पतंग उडवणे किंवा कधी नुसत्याच गप्पाटप्पांमध्ये, अर्थातच बरोबर खाण्यापिण्याचा सरंजामासहित जात.

‘स’च्या सात गोष्टी

इराणमधला मुख्य सण नोरुज. म्हणजे पर्शियन न्यू ईअर. सूर्याभोवती फिरताना ज्या क्षणी पृथ्वी वसंत ऋतूत प्रवेश करते, तो क्षण म्हणजे नोरुज. हा सण ते २१ मार्चच्या आसपास साजरा करतात. सगळीकडे वातावरण खूपच उत्साही असतं. लोक एकमेकांना शुभेच्छा द्यायला जातात. आपण जशी गणपती- गौरीमध्ये घरोघरी सजावट करतो, तसं यांच्याकडेही घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी, दुकानांमध्ये हाफते सीन सजतो. हाफते म्हणजे सात. आणि सीन म्हणजे स. इराणी `स’ अक्षरापासून सुरू होणाऱ्या सात गोष्टी.

त्यांपैकी एक सब्झे. म्हणजे गव्हाचे हिरवे कोंब, पुनर्जन्माचं प्रतीक. सामानु हे गव्हाच्या कोंबापासून बनवलेलं पक्वान्न. हे समृद्धीचं प्रतीक. सेजेद म्हणजे ऑलिव्ह, प्रेमाचं प्रतीक. सिर म्हणजे लसूण, औषधाचं प्रतीक. सिब म्हणजे सफरचंद. सौंदर्य आणि आरोग्यचिन्ह. सुमाक हे एक फळ, उगवत्या सूर्याचं प्रतीक. सिरके म्हणजे व्हिनेगर. हे वार्धक्य आणि संयमाचं प्रतीक. या सात पदार्थांसोबत टेबलवर एक आरसा, दिवा, रंगीबेरंगी अंडी, डाळिंब, पर्शियन कवितासंग्रह, पवित्र ग्रंथ, गोल्डफिश, नाणी अशाही गोष्टी ठेवल्या जातात. ही प्रत्येकच गोष्ट इराणी संस्कृतीत कशा ना कशाचं प्रतीक आहे.

सण आणि उत्सव

चाहारसंबेसुरी म्हणजे अग्निदेवतेचा दिवस. नवीन वर्ष सुरु होण्याआधीच्या आठवड्याच्या शेवटच्या बुधवारी हा साजरा करतात. तेव्हा सगळीकडे फटाके उडवले जातात. लाकडाची छोटीशी होळी पेटवली जाते आणि त्यावरून सगळे उड्या मारतात. ते अशासाठी की तुमच्या काळज्या, अडचणी, आजारपणं, हे सगळं या आगीत नाहीसं होऊदे; आणि आता नवीन वर्षाची सुरुवात पुन्हा नव्यानं होऊदे.

नोरुजचा शेवटचा दिवस म्हणजे सेझदाह बेदार. से म्हणजे तीन, आणि दाह म्हणजे दहा. बेदार म्हणजे दाराच्या बाहेर. नोरुजनंतरचा हा तेरावा दिवस. या दिवशी घरातील सगळेजण घराबाहेर अगदी मध्यरात्रीपर्यंत बागांमध्ये जमलेले दिसतात. वसंतोत्सव म्हणून हा दिवस अगदी आजारी माणसांनी देखील बाहेर पडून साजरा करायचा असतो. जगातील हा एकमेव देश असेल जो हा दिवस निसर्गाच्या सान्निध्यात या अनोख्या पद्धतीने  साजरा करतात. आम्ही तिकडे पोचलो त्याचा दुसरा किंवा तिसरा दिवस हा सेझदाह बेदार होता. त्यावेळचा त्यांचा उत्साह पाहूनच लक्षात आलं होतं की आपलं इराणचं वास्तव्य खूपच छान छान अनुभव देऊन जाणार आहे.

इराणमध्ये सर्व सण कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत साजरे केले जातात. त्यामुळे अर्थातच पाहुण्यांच्या स्वागतासाठी खास पदार्थ बनवले जातात. त्यातील ऑबगोष्त हा थोडासा अनोखा प्रकार. ही डिश मातीच्या भांड्यात सर्व्ह केली जाते. मटणाचे किंवा बीफचे छोले, बटाटा, कांदा, टोमॅटो वापरून कोफ्ते बनवले जातात आणि ते ग्रेव्हीबरोबर दिले जातात. खाणाऱ्याला नंतर एक छोटा खलबत्ता दिला जातो. ते बॉल्स खलबत्त्यात कुटून त्यात ग्रेव्ही मिक्स करून नानबरोबर खाल्ले जाते. पहिल्यांदा हा प्रकार पाहताना खूप गंमत वाटली. हा खूप चविष्ट आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे.

झोराष्ट्रीयन लोकांचं फायर टेम्पल आपल्या हिंदू मंदिरासारखंच. या मंदिरात कधीही न विझणारी आग तेवत असते. ही आग सतत जळत ठेवण्याची जबाबदारी त्या मंदिरातल्या पुजाऱ्यांवर असते. त्यासाठी ते जर्दाळू आणि बदामाच्या झाडांची लाकडं वापरतात. एका बाजूला आहुरा माझदाची मूर्ती. त्याच्यासमोर दिवा, उदबत्ती, प्रसाद. अगदी हिंदू मंदिरांमध्ये असतं तसंच.

इथल्या मशिदीही सुंदर, बारीक पानाफुलांची कलाकुसर असलेल्या. अतिशय सुरेख पेटिंग केलेल्या.

पुरातन खाद्यसंस्कृती

इराणची खाद्यसंस्कृती तीन हजार वर्षं जुनी आहे. पर्शियन साम्राज्याची सुरुवात इराणमध्ये झाली. त्याच्या शेजारचे देश म्हणजे इराक, अझरबैजान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, आखाती देश तसंच टर्की.  अलेक्झांडर द ग्रेटनं चौथ्या शतकात पर्शियन साम्राज्य काबीज केलं आणि नंतर ते अरब, तुर्की, मोंगोल तसेच उझबेक लोकांनी काबीज केलं. इराणी खाद्यसंस्कृती ह्या सगळ्यांच्या पूर्वीची असली तरी इराणने या सगळ्या देशांचीही खाद्यसंस्कृती आत्मसात केली.

इराणमध्ये चारही ऋतू असतात. त्यामुळे हिवाळ्यात डोंगरावर साठलेला बर्फ वितळून त्याचा शेतीसाठी फार चांगल्या तऱ्हेने ते उपयोग करून घेतात.

इराणची खासियत जरी कबाब असले तरी इराणच्या उत्तरेला कॅव्हिअर, मासे, आणि वेगवेगळ्या प्रकारची लोणची फार छान मिळतात. तसेच इराणच्या दक्षिणेला सामोसा, फलाफल तसेच कोळंबी चांगली मिळतात. नूडल्स, नान, आणि गुलाबजल घातलेलं आईसक्रीम हे मात्र तुम्हाला सगळीकडे मिळतं.

नानचे नाना प्रकार

मुख्य जेवणात आणि ब्रेकफास्टसाठी रोज जवळच्या बेकरीमधून ताज्या नान आणतात. नान चार वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. आणि प्रत्येक बेकरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नान तयार केल्या जातात. त्यापैकी संगक हा गव्हाच्या पिठापासून बनवलेला, तीळ लावलेला आयताकृती मोठा नान. संगक म्हणजे दगड. हा नान पूर्वीपासून दगडावर भाजतात, म्हणून संगक. बर्बरी हा आणखी एक प्रकार, तो मैद्यापासून बनवतात. लवाश ही खूप पातळ, मैद्यापासून बनवलेला नान. तो गरम गरम खायचा; नाही तर नानचा पापड बनतो. तफतून हा लवाशसारखाच पण थोडासा जाड आणि गोल नान.

मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलं की त्या बेकरीमधले खमंग वास काही पुढे जाऊ द्यायचे नाहीत. मग आमचंही तेच रुटीन झालं. बऱ्याचदा आम्ही पण सर्व इराणी लोकांप्रमाणे बर्बरी, कच्चे टोमॅटो, चीझ, अक्रोड आणि गाजरापासून तयार केलेला जॅम हाच ब्रेकफास्ट करत असू. इराणी रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तुम्हाला मुख्य जेवणाआधी सब्जी खोरदान सर्व्ह केली जाते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या अक्रोड आणि फेटा चीझसोबत दिल्या जातात. अर्थातच त्यासोबत गरमागरम नान. ही डिश तुमचं जेवण संपेपर्यंत तुमच्या टेबलवर ठेवलेली असते. जेवणासोबत तोंडी लावणं म्हणूनही तुम्ही ती खाऊ शकता.

भात, बिर्याणी

खोरेस्त हा एक सूपसारखा पदार्थ इराणी लोकांचा आवडता. यामध्ये अंडी, मासे, पालेभाज्या, फळं, सुकामेवा, डाळी असे वेगवेगळे पदार्थ वापरून, अत्यंत कमी आचेवर शिजवलेला पदार्थ. हा नेहमी चेलो म्हणजे भाताबरोबर खाल्ला जातो. पुलाव किंवा  बिर्याणीला इथे पोलो म्हणतात. पोलोचे प्रकारही बरेच. कधी तो बटर आणि केशर घालून खाल्ला जातो तर कधी तो हिरवे मोठे वाल, शेपू, ड्रायफ्रूट्स वापरून बागाली पोलो म्हणून सर्व्ह केला जातो. झेरेष्क पोलो सुक्या क्रॅनबेरी वापरून बनवतात. पांढऱ्या भातावर लाल चुटुक बेरीज असा हा पदार्थ खूपच सुंदर दिसतो. याला ज्वेल राईस असं यथार्थ नावही आहे. हा पुलाव चवीला काहीसा आंबट असतो. ताहाचीन हा इराणी लोकांच्या घरी खास पाहुण्यांच्या स्वागतासाठी बनवलेला पदार्थ. बऱ्याच रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ खचितच / क्वचितच मिळतो. हा पदार्थ बनवण्यासाठी पॅनही निराळा. हा राईसकेकसारखा एक प्रकार. माझी पहिलीवहिली इराणी मैत्रीण तो आमच्यासाठी बर्‍याचदा बनवे. कोणत्याही पार्टीमध्ये पटकन संपणारी डिश म्हणजे ताहाचीन.

जगप्रसिद्ध कबाब

इराणी कबाब हे तर जगप्रसिद्ध. छोट्या गावांमध्ये तसेच शहरांमधल्या काही भागांमध्ये कबोबीज म्हणून फूड स्टॉल्स असतात. कामगार वर्गासाठी, विद्यार्थ्यांसाठी तसंच ज्यांना घरी बनवून खाण्यासाठी वेळ नाही अशा सर्वांसाठी हे कबोबीज म्हणजे पर्वणीच. सर्वात स्वस्त आणि मस्त कबाबचा प्रकार म्हणजे कुबीदे. हा प्रकार मटण किंवा बीफ खिमा वापरून बनवतात. कबाब – ए – बार्ग हा त्यातलाच एक प्रकार. जूजे कबाब हा इराणी लोकांचा पारंपरिक कबाबचा प्रकार. यामध्ये चिकन वापरतात. कबाब हे बर्‍याचदा भाताबरोबर सर्व्ह केले जातात. हे बनवणा-या कबाबींना समाजात खूप मानाचं स्थान असतं. जसे आपल्याकडे आचारी तसेच इथले कबाबी.

गोरमे सब्जी हा एक आपल्याकडील पालेभाजीसारखा प्रकार. पण यामध्ये वापरले जाणारे जिन्नस म्हणजे राजमा, मटण, आणि अर्थातच मेथी, पार्सली, कोथिंबीर या पालेभाज्या. यामध्ये सुकं लिंबू सालासकट वापरलं जातं. त्यामुळे या डिशला आंबट, तुरट अशी एक वेगळी चव असते.

डोलमे हा एक खास पदार्थ. भाताबरोबर भाज्या किंवा मटण मिक्स करून द्राक्षाच्या पानात भरून त्याचे रोल्स बनवतात. हा थोडासा आंबट पण रुचकर पदार्थ आहे. फेसेनजून हा प्रकारही रेस्टॉरंटमध्ये सहज मिळत नाही. परंतु हा लग्नकार्यात आवर्जून केला जाणारा पदार्थ आहे. यासाठी अक्रोड रात्रभर पाण्यात भिजत घातले जातात आणि सकाळी त्याची पेस्ट करून, जेवढी ती पेस्ट तेवढंच बटर घालून ती पेस्ट भाजतात. नंतर त्यामध्ये आंबट डाळिंबाची पेस्ट बनवून ती घालतात आणि या सगळ्या मिश्रणामध्ये चिकन घालून शिजवतात.

मासे, अंडी, भाज्या

चेलो माही हा पदार्थ कॅस्पियन समुद्राच्या जवळच्या भागात मोठ्या प्रमाणावर बनवला जातो. माही म्हणजे मासा. कधी माशांमध्ये पालेभाज्या स्टफ करून ते मासे बेक केले जातात, तर कधी ताजे मासे कांदा, सिमला मिरची, लसूण स्टफ करून, दुधात डीप करून तळले जातात. हे मासे भातासोबत सर्व्ह केले जातात. मिर्झा गासेमी हे वांग्याचं कांदा, टोमॅटो, आणि लसूण घालून बनवलेलं भरीत. फक्त यामध्ये नंतर अंडयाची प्लेन भुर्जी बनवून मिक्स केली जाते आणि भात किंवा नानबरोबर सर्व्ह केली जाते. हा पदार्थ म्हणजे इराणच्या उत्तरेकडच्या कॅस्पियन समुद्राजवळच्या भागातली खासियत.

कुकू हा पदार्थ साईड डिश म्हणून केला जाणारा जाड ऑम्लेटचा प्रकार. हा वेगवेगळ्या पद्धतीने करतात.  कुकू-ये-साब्ज हा एक प्रकार. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, अंडी, सोडा आणि कणीक वापरली जाते. आधी भाज्या तेलात छान परतवून त्यामध्ये बाकीचे पदार्थ घातले जातात. अर्थातच चवीसाठी मीठ, मिरपूड घालतात. पॅनमध्ये याचं जाड ऑम्लेट बनवून घेऊन त्याच्या वड्या पाडतात, आणि त्या कापून तळतात. कुकू-ये-बादेंमजान म्हणजे पालेभाज्यांऐवजी वांगं तर कुकू-ये-सीबजमिनी म्हणजे बटाटा वापरून बनवलेलं ऑम्लेट. सीबजमिनी म्हणजे बटाटा. जमिनीमध्ये येणार सफरचंद असा इराणी लोक बटाट्याचा उल्लेख करतात. कुकू-ये-मोर्घ म्हणजे चिकन वापरून, कुकू-ये-लुबिया साब्झ म्हणजे हिरव्या शेंगा वापरून, कुकू-ये-गोल-कलाम म्हणजे फ्लॉवर वापरूनही हा पदार्थ बनवला जातो.

इराणमध्ये सगळीकडे फ्लेवर्ड दही मिळते.  त्यामध्ये कधी पुदिना, कधी काकडी, शेपू, तर कधी भाजलेली वांगी घालून तयार केलेले असते. जेवणासोबत तयार काकडीची कोशिंबीर, किंवा वांग्याचे दह्यातले भरीत म्हणून बरेचदा ते घरी आणले जात असे.

इराणी चाय आणि केक

इराणच खास पेय म्हणजे इराणी चाय. हा नेहमी कान नसलेल्या कपातून दिला जातो. तो काळा असतो.  दूध न घालता बनवला जातो. तो गोड नसल्याने एक छोटासा साखरेचा क्यूब चहा पिताना जिभेखाली ठेवण्याची पद्धत आहे. कधी कधी या सोबत तिळगुळासारखी पातळ वडी किंवा केशर घातलेल्या शुगर स्टिक्स देतात. चहा संपेपर्यंत त्या स्टिक्स चहामध्ये बुडवून ठेवतात. घरोघरी, दुकानांमध्ये, ऑफिसेसमध्ये या चहाच्या किटल्या सतत गॅसवर उकळताना दिसतात. कुठल्याही चर्चेची, गप्पांची सुरुवात इथे चहापासूनच होते.

इराणमध्ये गोड पदार्थांना शिरीनी म्हणतात. केक हा इथल्या खाद्यपदार्थांमधला अविभाज्य घटक. इराणी चायसोबत केक असणारच. बरेचदा जेवणानंतर स्वीट डिश म्हणून फळ खाण्याची पद्धत आहे. पण तरीही इराणमधील वेगवेगळी शहरं त्यांच्या शिरीनीसाठी प्रसिद्ध आहेत. ईशफहानमध्ये गाज नावाचा तिळाच्या वडीसारखा पदार्थ मिळतो. कोम हे शहर सोहनसाठी प्रसिद्ध आहे. सोहन म्हणजे पिस्ते आणि आलं वापरून बनवलेला गोड पदार्थ. उरुमिये या शहराची खासियत आहे साखरेत घोळवलेले ड्रायफ्रूट्स. केरमन हे शहर कोलोम्पे म्हणजे खजुराचं सारण भरलेल्या बिस्किटांसाठी प्रसिद्ध आहे.

इराणी डेझर्ट्स

जुलबिया हा एक जिलबीसारखा प्रकार. फार गोड नसला तरी जिलबी खाल्ल्याचं काही प्रमाणात समाधान नक्की मिळे. बाहमीये हा गोड पदार्थ मैदा, अंडी आणि साखरेचा पाक करून तयार केला जातो. मैद्याचे बॉल्स तळून पाकात सोडले जातात. गुलाबजामसारखा दिसणारा पदार्थ त्याच्या इतका चविष्ट नसला तरी छान असतो. शोले जार्द हा तांदळाच्या दूध न घातलेल्या खिरीसारखा गोड पदार्थ. यामध्ये बनवताना भरपूर केशर आणि गुलाबपाणी वापरलं जातं. आणि सर्व्ह करताना त्यावर दालचिनी पावडरनं हुसेन असं लिहिलं जातं. मोहर्रममध्ये जवळजवळ १०० किलो तांदळाची खीर बनवून काहीजण घरोघरी वाटतात. आमच्याही शेजाऱ्यांनी आम्हाला पाठवलेली आठवते.

फालुदा आणि आइस्क्रीम

इराणी लोकांचा फालुदे हा प्रकार जगप्रसिद्ध.  हा बारीक, कडकडीत शेवया, रोझ सिरप, आणि लिंबू घालून मिळे. माझ्या इराणी मैत्रिणीसोबत बाहेर पडलं की आमचा पहिला स्टॉप फालुद्याचं दुकान. गप्पा मारत गाडीत बसून खात असू, आणि मग पुढची कामं किंवा खरेदी. मला गोड आवडत नसल्याने तो प्रकार फारसा आवडत नसे. पण तिच्या चेहऱ्यावर मला तो खायला घातल्याचं समाधान दिसत असे. तिच्या त्या आनंदासाठी कितीही आवडत नसला तरी मी तो बरेचदा खाल्ल्याचं आठवतं. इराणी लोक आइस्क्रीमला बस्तानी म्हणतात.

परंतु आम्हा भारतीय मैत्रिणींचा आवडीचा पदार्थ म्हणजे मार्केटमध्ये मिळणारं फलाफल सँडविच, आणि दूघ (मसाला ताकाचा प्रकार). डोक्यावरचे हिजाब सांभाळत खरेदी करायची आणि त्यानंतर दमूनभागून रांगेत उभं राहून मिळणारं ते गरम गरम फलाफल सँडविच खाऊनच घरी परतायचं, हे ठरलेलं.

इराणी लोकांच्या बोलण्यातल्या गोडव्याइतकीच त्यांच्या पदार्थांची चवही अजून जिभेवर रेंगाळते आहे. असा देश आणि अशी माणसं सोडून निघणं खूप कठीणच होतं.

पर्शियन गोरमे सब्जी :

साहित्य: राजमा, कांदा, लसूण, वाळलेलं लिंबू, मटण किंवा चिकन, मेथी, पार्सली, मीठ, तिखट, पर्शियन मसाला, टोमॅटो पेस्ट.

कृती: कांदे, लसूण बारीक कापून घ्या. सुकं लिंबू १५ मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. चिकन किंवा मटणाचे तुकडे करून घ्या. मेथी, पार्सली चिरून घ्या. एका भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवा.

प्रथम तेलात कांदा आणि लसूण परतून घ्या, त्यामध्ये चिकन किंवा मटणाचे तुकडे घालून परता. नंतर त्यात उकळलेलं पाणी घाला आणि बारीक गॅसवर साधारण २० ते ३० मिनिटे उकळा.

थोड्या तेलात मेथी, पार्सली परतून घ्या. शिजवलेला राजमा घाला, भिजत ठेवलेलं लिंबू घाला आणि हे सगळं मिश्रण चिकनमध्ये घालून चांगलं ढवळून झाकून ठेवा. नंतर त्यामध्ये तिखट, मसाला, मीठ घालून अगदी मंद गॅसवर पुन्हा २० ते २५ मिनिटे ठेवा.

गोरमे सब्जी नेहमी भाताबरोबर सर्व्ह केली जाते.

जूजे कबाब:

साहित्य: चिकन खिमा, कांदा, मीठ, मिरपूड, हळद, सुमाक पावडर, केशर.

कृती: केशर पाण्यात भिजवून ठेवा. कांदे किसून घ्या. कांद्याची पेस्ट चिकन खिम्याबरोबर एकत्र करून घ्या. त्यामध्ये मीठ, मिरपूड, सुमाक पावडर आणि भिजवलेलं केशर घाला. हे चांगलं मळून घ्या. नंतर हे मिश्रण झाकून फ्रिजमध्ये ८ ते १२ तास ठेवा. नंतर हे कबाब कोळशाच्या तंदूरवर किंवा ओव्हनमध्ये सळईवर लावून भाजून घ्या. याबरोबरच टोमॅटो आणि सिमला मिरची भाजून घेऊन भाताबरोबर सर्व्ह करा.

फेसेनजून:

साहित्य: कांदा, चिकन ब्रेस्ट-2, अक्रोड, साखर, मीठ, डाळिंबाची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट.

कृती – थोड्याशा तेलामध्ये कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्या. दुसऱ्या पॅनमध्ये तेल घालून त्यात चिकन ब्रेस्टचे तुकडे भाजून घ्या. अक्रोडची पेस्ट करा. कांदा परतल्यावर अक्रोडची पेस्ट त्यामध्ये मिक्स करा. यामध्ये पाणी घालून थोडा वेळ गॅस मंद करून १० मिनिटं ठेवा. नंतर त्यामध्ये भाजलेले चिकन घाला. पुन्हा चिकन शिजेपर्यंत मंद गॅसवर हे मिश्रण ठेवा. यात मीठ, साखर, डाळिंबाची पेस्ट, आणि टोमॅटो पेस्ट घालून शिजवा. १५-२० मिनिटे शिजवल्यावर गॅस बंद करा. फेसेनजून चेलो भाताबरोबर सर्व्ह करा.

कल्याणी केदार कुमठेकर

%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80

 

 

 

 

 

 

 

मूळ सातार्‍याची. सध्या बँकॉकमध्ये राहते. मला आणि केदारला भटकायला खूप आवडतं. नवनवीन ठिकाणी जाऊन राहणं, नवीन गोष्टी शिकणं याचं जणू आम्हांला व्यसनच लागलं आहे. त्यामुळे आम्ही १९ वर्षांच्या आमच्या सहजीवनात भारतात जोधपूर, अहमदाबाद, बंगलोर, हैदराबाद, मुंबई आणि पुणे या ठिकाणी तर भारताबाहेर रियाध (सौदी अरेबिया), तेहरान (इराण), दुबई (यूएई), मापुतो (मोझाम्बिक) या शहरांमध्ये राहिलो आहोत. तिथे राहताना अर्थातच त्याच्या आजूबाजूचे देश, ठिकाणं पाहतो, मित्रमंडळ जमवतो, नवीन गोष्टी शिकतो. मला नवीन नवीन पदार्थ बनवून पाहायला, पेंटिंग करायला आवडतं, तसंच मराठी वाचायलाही आवडतं. हा लेख लिहिताना मला माझी मुलगी ऋचा, मैत्रीण कीर्ती आणि माझ्या इराणी मित्रमैत्रिणी शबनम आणि मासी, वीणा, मंजू तसेच विजय, जवाद यांची खूप मदत झाली.

फोटो – कल्याणी आणि तिची मित्रमंडळी   व्हिडिओ – YouTube

2 Comments Add yours

  1. मृण्मयी says:

    इतकं एंजाॅय केलं मी हा लेख वाचणं, तू किती आनंद घेतला असशील इराणमध्ये राहण्याचा त्याची कल्पना करता येतेय. लिहीत राहा आणखीही

    Like

  2. Vidya Subnis says:

    मला हा लेख अतिशय आवडला. खूप सविस्तर व interesting वर्णन केलंय.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s