ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट

नीरजा पटवर्धन

एक होती ठकू. स्वैपाकाच्या बाबतीत महानाठाळ. आईने स्वैपाक शिकवायचा प्रयत्न केला, पण ठकूने कधी दाद दिली नाही. कॉलेजबरोबर हजारो उद्योग असत, त्यामुळे ठकू घरी कमीच असे. मुळात स्वैपाकघरात खादाडीशिवाय इतर कशासाठीही जायची संकल्पनाच ठकूला फारशी पसंत नव्हती. वरण-भात आणि भरपूर दूधसाखरवाली उकळी कॉफी हे दोनच पदार्थ होते, जे ठकूला कुणाच्याही मदतीशिवाय सुरुवातीपासून शेवटापर्यंत जमत असत. पोहे आणि साबुदाण्याची खिचडी कशी करतात हे ठकूला फक्त बघूनच माहिती होते. पण ठकूला खाण्याबद्दल मात्र प्रेम होते.

ठकूने वयाची दोन दशके पूर्ण केल्यावर ‘स्वैपाक येत नाही तर लग्न झाल्यावर कसे होणार?’ वगैरे कंटाळवाणे प्रश्न गणगोतात मूळ धरू लागले होते. तिच्याबरोबरीच्या मुली कशा स्वैपाकात एक्स्पर्ट झाल्यात, वगैरेची वर्णने असायचीच तोंडी लावायला. तेवढ्यात ठकूला सुटकेचा मार्ग मिळाला. ठकू अमेरिकेत शिकायलाच निघाली. पण हाय रे कर्मा! जशी जशी एकेक माहिती मिळायला लागली तसे ठकूला कळून चुकले की अगदी नॉनव्हेज खायची सुरुवात करायची ठरवली तरी आता तिथे गेल्यावर जेवणखाणाच्या बाबतीत ‘स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही!’ हेच अंतिम वगैरे सत्य आहे.

ठकूबरोबर पाठवायच्या संसाराची खरेदी झाली. त्यात प्रेशर पॅन नावाची एक आखुडशिंगी बहुगुणी वस्तू आणली गेली. रंगीत तालीम म्हणून त्यात डाळतांदळाची खिचडी ठकूकडून करून घेण्यात आली. खिचडी बरी झाली होती बहुतेक. आणि आपल्या नेहमीच्या प्रेशर कुकरप्रमाणेच याचेही तीन शिट्ट्यांचे गणित आहे हे वगळता बाकी काही ठकूच्या लक्षात राह्यले नाही.

बाकी संसारात दोन लंगड्या (म्हणजे प्रेशर कुकरात ज्यात डाळ भात लावतात ती भांडी), एक दोन कुंडे, एक दोन पातेली, तवा, दोन ताटे, दोन कपबशा, दोन वाट्या-भांडी, चमचे, बेसिक डाव, छोटी विळी, मिसळणाचा डबा – त्यात डबल पिशव्या लावून भरलेल्या हळद-जिरं-मोहरी-हिंग-तिखट वगैरे वस्तू, काकूने घरी करून दिलेला गोडा मसाला हे सगळे होते. त्यात ठकूच्या युनिव्हर्सिटी टाऊनमधे म्हणजे जॉर्जिया प्रांतातल्या अथेन्स नावाच्या गावामधे देसी स्टोअर नव्हते. त्यासाठी अटलांटालाच जावे लागेल, असे कळले होते. तिथे जायला लगेच वेळ मिळेल न मिळेल हा विचार करून डाळी-तांदूळ-पोहे-साबुदाणा असा सगळा बेसिक शिधाही भरून दिलेला होता.  ‘मी तिकडे शिकायला जाणारे, स्वैपाक करायला नाही हे लक्षात आहे ना?’ ठकूने एकदा विचारलेही आईला. आईने अर्थातच दुर्लक्ष केले.

ठकू पुण्यातून निघाली. व्हिसा आयत्यावेळेला झाल्याने ठकू दोन दिवस आधीच मुंबईत मामाकडे पोचलेली होती. एअरपोर्टवर निघायच्या आधी सेण्डॉफचे जेवण म्हणून मामीने खास पुरणपोळ्या केल्या होत्या. सगळ्या गडबडगोंधळात ठकूला जेवण गेलं नाही. शेवटी मामीने दोन पुरणपोळ्या बांधून दिल्या तूप घालून. त्या चुकून ठेवल्या गेल्या चेक इन लगेजमधे. त्यांचं दर्शन अथेन्सला पोचल्यावरच झालं.  गेल्या गेल्या देशमुख काकांच्या घरीच गेल्याने पुरणपोळ्यांकडे बघायची वेळच आली नाही. भरपूर तूप लावल्यावर काहीही टिकतेच, या कॉन्फिडन्सने ठकूनेही दुर्लक्ष केले. मग चार-पाच दिवसांनी जेव्हा ठकूने आपल्या अपार्टमेंटमधे जाण्यासाठी बॅग परत आवरायला घेतली तेव्हा ते पाकिट बघितले. मामीने प्रेमाने दिलेल्या त्या पोळ्यांना एव्हाना बुरशी लागलेली होती. पुरणाच्या पोळ्या टिकत नाहीत हे नीटच कळले ठकूला. ते पाकिट कचर्‍यात टाकताना पहिल्यांदा घरच्यांपासून इतके लांब आलोय, आता कदाचित तीन वर्षं कुणाची भेटही होणार नाही, आता लाड संपले आणि आता आपल्या जेवणाची जबाबदारी आपली, हे सगळे पारच अंगावर आले. अमेरिकेत पोचल्यावर ठकू त्या दिवशी पहिल्यांदा भरपूर रडली.

ठकूला अपार्टमेंट मिळाले. देशमुख मावशींनी ग्रोसरी स्टोअरची ओळख करून दिली होती. पण कांदे, बटाटे, ब्रेड, दूध सोडल्यास अजून काय घ्यायचे हेही ठकूच्या लक्षात येत नव्हते. मॅगीची पाकिटे दिसत नव्हती. “या ग्रीन पेपर्स. कॅप्सिकम नव्हे. इथे ग्रीन पेपर्स म्हणायचे. भेंडीला ओक्रा म्हणायचे. लेडीज फिंगर नाही. आणि ही कोथिंबीर! म्हणजे सिलॅंट्रो. नीट बघून घे नाहीतर पार्स्ली घेशील चुकून. या अनसॉल्टेड बटर स्टिक्स. या कढवायच्या तुपासाठी. बाकी तुला अंडी, फळं, बटर, केचप वगैरे लागेल. हा किचन टॉवेल्सचा रोल. इथे जुनी फडकी वापरत नाहीत.” मावशी ट्रेनिंग देत होत्या. चार कांद्यांच्याएवढा आकार असलेला एक कांदा, तसलेच अवाढव्य बटाटे, भोपळी मिरच्या बघून ठकू चकित झाली होती. बहुतेक सगळ्याच भाज्या आकाराने अजस्र होत्या.

मिळालेल्या रूममेटने ताटवाटी सोडले तर किचनचे काहीच आणले नव्हते. कधी आयुष्यात कुकरही लावला नव्हता. कांदा चिरणे यापलीकडे तिचा अनुभव नव्हता. स्वैपाक या विषयात आपल्यापेक्षा ढढ्ढमगोळा कुणी असेल याची ठकूने कल्पनाच केली नव्हती. ठकूने मग उगीच आपण सिनीयर असल्यासारखी मान उडवून घेतली. स्वैपाक सुरू झाला. एक दिवस वरणभात तूप मीठ लिंबू, एक दिवस डाळ तांदूळ खिचडी, एक दिवस तांदूळ डाळ खिचडी आणि त्यात एक भोपळी मिरची, एक दिवस बटाट्याची भाजी ब्रेडबरोबर इत्यादी. पहिल्यांदा वरणभात तूप मीठ लिंबू करून खाल्ल्यावर जी तृप्ती आली होती, ती आजही ठकूला आठवते. कोणाला कळले नाही, पण त्या घासागणिक ठकूला त्या परक्या देशात सुरक्षित वाटत गेले होते.

पहिल्या दिवशी लक्षात आले की कुकरच्या शिट्ट्या पटापटा वाजतायत आणि वस्तू शिजतच नाहीयेत. मग दोन स्वैपाक-ढ प्राणी संशोधनाला लागले. शेवटी कळले की ’अरे हा गॅस नाही, ही तर कॉइल आहे!’ कॉइलचे गणित समजून घेताना थोडी करपा करपी, भात सांडणे वगैरे झाले पण हळूहळू जमले. त्यातच पहिल्यांदा जेव्हा कुकरची शिट्टी वाजली तेव्हाच अजून एक भोंगा सुरू झाला. कुठून काय वाजतेय काहीच कळेना. मजल्यावर समोर राहणारी देसी मुले लगेच धावत आली आणि त्यांनी एका कोपर्‍यात छताला लावलेल्या एका वस्तूला टपली मारून शांत केले. तो स्मोक डिटेक्टर असतो आणि तो ’लांडगा आला रे!’ सारखी ’आग लागली रे!’ अशी हूल उठवत असतो. त्यामुळे शेगडीच्या वरचा भणाणा आवाजाचा एक्झॉस्ट चालू केल्याशिवाय काहीही रांधायला घ्यायचे नाही. तरीही उगाच तो बोंबललाच, तर त्याला टपली मारून पाडायचा. तळण बिळण करायचे तर काढूनच ठेवायचा आणि तळणाचा धूर गेला की मग लावायचा इत्यादी ज्ञानदान त्या मुलांनी केले.

%e0%a4%ae%e0%a5%85%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a5%80-2

पहिल्यांदा हॉटेलमधे जाऊन पास्ता खाल्ल्यावर त्यातल्या चीजने घशात कसेतरी झाले होते. नंतर बरेच दिवस कुठलीही वस्तू ऑर्डर करताना ठकू चीज नको म्हणूनच सांगे. ९८ साली सदाशिव पेठेतून उठून अमेरिकेत गेल्यामुळे ठकूला अभारतीय पदार्थांची फारशी ओळख नव्हती. जिभेला चीज हे प्रकरण फारसे माहिती नव्हते. डोमिनोजचा पि्झ्झा पुण्यात तेव्हा मिळायला लागला होता, पण ते सगळं पुलाच्या पलीकडे. पुलाच्या अलीकडच्या सर्वसाधारण जिभांना त्या चवी तेव्हा फार माहिती नव्हत्या.

ठकूचे रूटीन चालू झाले. लेक्चर्स आणि कॉस्चुम शॉपमधले काम आणि असाइनमेंटस् या सगळ्यातून स्वैपाक करून जेवायला संध्याकाळचा जेमतेम तासभर मिळे. बाहेरचे खाणे खिशाला झेपणार नाहीये, हे कळायला लागले होते. रोज करून करून ठकूला हळूहळू स्वैपाकाचे लॉजिक लक्षात यायला लागले होते. ‘फोडणी – चिरलेली भाजी किंवा डाळ-तांदूळ किंवा दोन्ही – मसाला किंवा नो मसाला – परतणे – पाणी – शिजवणे – मीठ घालून सारखे करणे’ हा क्रम लक्षात ठेवला की हाताशी असलेले कुठलेही पदार्थ वापरून जेवणाची वेळ निभू शकते आणि तिखट-आंबट-नेमके खारट-इलुसे गोड या चवींचे गुणोत्तर बरोबर राखले की जे काय तयार होते ते चविष्टच घडते हे ठकूच्या लक्षात आले होते. ठकू आणि रूममेटची ‘बटाट्याचे व खिचड्यांचे १००१ प्रकार’ असे पुस्तक लिहिण्याच्या दिशेने वाटचाल चालू झालेली होती.

दरम्यान टॉर्टिया नावाचे ग्रोसरी स्टोअरमधे मिळणारे प्रकरण रोट्यांसारखे खाता येते आणि क्रोगरमधे (ग्रोसरी स्टोअरची एक चेन) खवलेला, फ्रोजन ओला नारळ मिळतो असे दोन शोध लागले. एकीकडे भरलं वांगं, गवार-बटाटा रसभाजी, फ्लॉवरची साबुदाणा खिचडी भाजी अशा सगळ्या आवडत्या भाज्यांची आठवण यायला लागलीच होती. बेसिक लॉजिक कळल्याने कॉन्फिडन्सही वाढला होता. मग आई काय काय करते, त्याचे चित्र नजरेसमोर आणून एक दिवस भरली वांगीही घडली. शप्पथ, आईच्या हातच्या भाजीसारखीच चव आली होती! त्या चवीने एकदम त्या अपार्टमेंटचे घर होऊन गेले ठकूसाठी. असा ‘पोळीभाजी’चा डबा नेताना तर ठकूला भरूनच आले होते.

ठकू संध्याकाळीच स्वैपाक करायची. अर्धा स्वैपाक रात्री जेवायची आणि उरलेला अर्धा म्हणजे ‘लेफ्टोव्हर’ दुसर्‍या दिवशी लंचला डब्यातून घेऊन जायची. दुपारी ग्रेड स्टुडंटससाठी ठेवलेल्या मायक्रोवेव्हमधे गरम करून घ्यायची. संपूर्ण डिपार्टमेंटमधे ती एकटीच भारतीय असल्याने तिच्या डब्याबद्दल लोकांना उत्सुकता असायची. कधी कुणी चव घ्यायचे, कुणी नाही. एका अमेरिकन मैत्रिणीने साध्या वरणभात तूप मीठ लिंबू प्रकरणाची चव घेऊन हे थोडेसे पार्मेजान राइससारखे लागतेय असे सांगितले. त्यानंतर इतके वेळा पार्मेजान घातलेल्या वस्तू खाऊनही अजून ठकूला साधर्म्य सापडलेले नाही.

सॅलड म्हणजे लेट्यूस, काकडी, गाजर, टोमॅटो वगैरे घासफूस एवढेच नव्हे हे नव्यानेच कळले ठकूला. ग्रोसरी स्टोअरमधे सॅलडसाठी घासफूसच्या तयार पिशव्या मिळतात. त्यातला मूठभर पसारा घेऊन त्यावर अजून हव्या त्या वस्तू आणि ड्रेसिंग घालून पोटभरीचे सॅलड तयार होऊ शकते हे लॉजिक लक्षात आल्यावर ठकूला प्रयोग सुचला. आदल्या रात्री बटाटे उकडून ठेवले. सकाळी तूप जिर्‍याच्या फोडणीवर परतून उपासाच्या स्टाइलची भाजी केली. ती भाजी एका डब्यात घेतली. एका डब्यात घासफूसच्या पिशवीतला दीड दोन मूठ पसारा आणि एका डब्यात दही बरोबर घेतले. लंचच्या वेळेला भाजी गरम केली. घासफूस, भाजी + ड्रेसिंग म्हणून दही असे सॅलड मिक्स केले. चव महान लागली. पुढच्या वेळेला ठकूने तिचे ‘इंडियन स्टाइल पोटॅटो सॅलड’ अमेरिकन मित्रमैत्रिणींना चाखायला दिले. आवडले बहुतेकांना. चक्क ठकूने रेसिपी वगैरे सांगितली. त्यांनी ठकूला ‘सुगरण’ किताब बहाल करून टाकला. मग हे अनेकदा झालं. प्रयोग करण्यासाठी खरोखरीचे सुगरण असायची गरज नाही आणि लॉजिक लक्षात ठेवून केलेले प्रयोग यशस्वीच होतात हे ठकूला पक्के कळले.

दरम्यान ठकूला तिच्या अमेरिकेतच राहणार्‍या मामीआज्जीने एक सॉलिड पुस्तक भेट दिले. तिथल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाने प्रकाशित केलेले ‘मॉम्स किचन’ नावाचे ते पाककृतींचे पुस्तक. घरचे लाड सोडून परदेशात शिकायला येणार्‍या आणि स्वैपाकात पूर्ण ढ असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी पार फोडणी कशी करायची, वरणभात अशा बिगरीतल्या गोष्टींसकट सगळे शिकवलेले होते. भारतातल्या अनेक वस्तूंची अमेरिकन नावे त्यात दिलेली होती. मापे दिलेली होती. नवख्या येरूंच्या डोक्यावरून जाईल अशी खास शेफवाली भाषा न वापरता, प्रत्येक कृती सोप्या भाषेत दिलेली होती. त्या पुस्तकामुळे मुळातली स्वैपाक-ढ असलेली ठकू वर्षभरात १०-१५ जणांना पार्टीला बोलावून चार पदार्थ करून घालण्याइतकी एक्स्पर्ट झाली.

img_20160607_215401

पहिल्या वर्षाच्या अखेरीपर्यंत हमस व पिटा ब्रेडची ओळख झाली होती. मेक्सिकाली ग्रिलमधले व्हेज कॉम्बो, लोकल पिझ्झा शॉप्समधले वेगवेगळे पिझ्झा वगैरेंची सवयही झाली होती. चीजबद्दल बसलेली अढीही निघून गेली होती. तिसर्‍या वर्षापर्यंत साऊथचे वॉफल हाऊस तिचेही आवडते झाले होते. वॉफल्स, हॅश ब्राऊन्स आणि ब्रेकफास्ट करताना कॉफी व ऑरेंज ज्यूस आलटून पालटून घेताना एकत्र होणारा स्वाद हे तिला आपलेसे वाटायला लागले होते. युनिव्हर्सिटीच्या कॅफेटेरियामधे असलेल्या ट्रेजमधून स्वत:चे स्वत: सॅलड करून घ्यायचे असे. ड्रेसिंग्ज पण ठेवलेली असत. त्याची मग वजनाप्रमाणे किंमत ठरे. गार्बान्झो बीन्स म्हणजे भिजवलेले छोले वापरून आणि त्यावर रांच ड्रेसिंग ओतून घेऊन ती सॅलड करून घेत असे, स्वत:चे लंचलाड म्हणून. अथेन्सच्या डाऊनटाऊनमधल्या गिरो / यिरो रॅपमधे मिळणार्‍या फलाफल रॅपने ती जिवाचे अथेन्स करू लागली होती.

तिथल्या तिन्ही उन्हाळ्यात ठकू न्यू मेक्सिको प्रांतातल्या सॅन्टा फे गावात सॅन्टा फे ऑपेरा कंपनीमधे उन्हाळी इंटर्नशिप करायला गेली. इतके दिवस डिपार्टमेंटला ती एकटीच भारतीय असली तरी रूममेट देसी होती. आता इथे पूर्ण ऑपेरा कंपनीत ती एकटीच भारतीय होती. रूममेटस अमेरिकनच होत्या. ठकू अजूनही शाकाहारीच होती. भारतीय मसाल्यांच्या वासाचा अभारतीय माणसांना त्रासही होऊ शकतो, हे आता तिला कळले होते. पण तिच्या भारतीय जेवणाचा प्रॉब्लेम कुणालाच नव्हता. ‘आम्हांलाही कधी चव बघू देशील का?’ हीच विचारणा असे. ‘चव बघायला विचारायचं काय त्यात!’ भारतीय ठकूला प्रश्न पडे. ‘तू हिंदू आहेस तर तुला मी घरात बीफ शिजवले तर चालेल का? तुझा अपमान तर नाही ना होणार?’ किंवा ‘शाकाहारी आहेस तर आम्ही मांसाहारी पदार्थ शिजवले/ खाल्ले घरात तर चालेल का?’ असे मात्र प्रत्येक वर्षीच्या अमेरिकन रूममेटस विचारत. ‘बायांनो, तुम्ही काय शिजवता, खाता याबद्दल बोलणारी मी कोण? तुम्ही तुमच्या सवयीचे अन्न खाण्याने माझा अपमान कसा काय होईल?’ ठकू सांगायची. मग सगळं मजेत पार पडायचं. ठकूच्या मोठ्ठ्या नॉनस्टिक भांड्यात नॅन्सी तिचं बीफ लझानिया करायची. झालं की भांडे साफ करून ठेवायची. मग त्या भांड्यात ठकूच्या साबुदाणा खिचडीची फोडणी पडायची.

photo-1

सॅन्टा फे गावानेच नाही तर तिथल्या स्थानिक मेक्सिकन अन्नानेही ठकूवर गारूड केले. उन्हाळी रविवार दुपारी शाकाहारी मेक्सिकन जेवण आणि बरोबर फ्रोजन स्ट्रॉबेरी मार्गारिटा आणि मग सिएस्टा (चक्क वामकुक्षी!) हा कार्यक्रम तिच्या अगदीच आवडीचा झाला. इथेच मेक्सिकन चवीची झालर असणारी वेगवेगळी चीजही ठकूने चाखली आणि चापलीही. त्यातलेच एक हालापिनो जॅक चीज.

ठकूला मांसाहार करणे जमले नाही, पण अपेयपान मात्र ठकूने चवीने आपलेसे केले. विविध दारवांची चव घेणे, त्यांची वळणे ओळखणे, कशात काय आणि कसे मिक्स करता येऊ शकते वगैरे सगळ्या गमतीजमती तिला फार आवडल्या. स्वैपाकासारखेच कॉकटेल्स बनवणे हे प्रकरण कला आणि शास्त्र दोन्ही आहे हेही उमजले.

पदवी पूर्ण करून तीन वर्षांनी ठकू परत देशात आली. स्वैपाकाबद्दलची मोडलेली अढी आणि पेयांच्या प्रांताची तोंडओळख या दोन गोष्टी या अमेरिकेच्या वास्तव्याने दिल्या. तिथे असताना नव्याने ओळख झालेले अभारतीय पदार्थ करायला शिकण्याइतके सुगरणपण तिला डसले नाही. पण अमेरिकन, इटालियन, मेडिटेरेनिअन, मेक्सिकन, ओरिएंटल अशा खाद्य आणि पेयांच्या चवी मात्र आपल्या संवेदनांमधे साठवून घेऊन आली.

त्या चवींची आठवण येते. मग ठकू प्रयोगाला लागते. आता अनेक परदेशी मसाले व विशिष्ट वस्तू इथे मिळायला लागलेल्या असल्यामुळे ठकूचे प्रयोग तिच्या आठवणीतल्या चवींच्या जवळ जातात. अथेन्सच्या ड’पाल्मामधल्या पास्त्याचे आणि सॅन्टा फे च्या मारियाजमधल्या फ्रोजन मार्गारिटाचे गणित तिला इथे सुटलेय. तिथे असताना वरणभात तूप मीठ लिंबू याने जितके छान वाटले होते, तितकेच छान आणि आश्वस्त तिला आता स्वत:च्या हातच्या या पदार्थांनी वाटते.

नीरजा पटवर्धन

neeraja-pic

नाटक व चित्रपटांचे कॉश्च्युम डिझायनिंग करणे हा मूळ व्यवसाय. कॉश्च्युम डिझायनिंग याच विषयात अथेन्स, जॉर्जिया येथील युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जियामधून एमएफए केले आहे. महाराष्ट्रातल्या अनेक विद्यापीठांच्या नाट्यविभागांमधे कॉश्च्युम व मेकप याचे अध्यापन. विशेषत: पुणे विद्यापिठाचे ललित कला केंद्र आणि मुंबई विद्यापिठाचे अ‍ॅकेडमी ऑफ थिएटर आर्टस या ठिकाणी. आता येऊ घातलेल्या संदीप सावंत दिग्दर्शित ’नदी वाहते’ या चित्रपटासाठी कॉश्च्युम व आर्ट (प्रॉडक्शन डिझायनिंग) बरोबरच निर्माती म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. थोडेफार कथा व कवितालेखन केले आहे.

फोटो – सायली राजाध्यक्ष   व्हिडिओ -YouTube

8 Comments Add yours

 1. mrin says:

  अगं नी, किती मस्त वाटलं वाचून.

  Liked by 1 person

 2. काळा सरदार says:

  पुण्याचे लोक आपला nostalgia कशाचाही नावाने दाबून विकू शकतात.

  Like

 3. साती says:

  छान लिहिलंस हो ठके.
  यातलं अधलं मधलं तुझ्या लिखाणात इथे तिथे वाचलं आहे.
  पण सलग असा हा स्वयंपाकाचा प्रवास वाचायला मजा आली.

  Liked by 1 person

 4. शलाका says:

  खूपच छान.. ठकू आणि ठकूचे स्वयंपाक घर👍

  Liked by 1 person

 5. shraddham says:

  Khupch chan vatale vachun.. somewhere mi pan ya thaku la bhetley 😉 🙂

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s