सचिन म. पटवर्धन
व्हॉलंटरी सर्विस ओव्हरसीज (व्हिएसओ) ह्या संस्थेतर्फे परदेशातील व्हॉलंटीयरींगसाठी माझी २०१० साली निवड झाली. त्यांनी मला जे वेगवेगळे प्लेसमेंटचे पर्याय दिले होते, त्यात पहिला होता बोंगो नावाच्या गावाचा. बोंगो हे घाना या देशाच्या उत्तर सीमावर्ती भागातील गाव. घाना हा पश्चिम आफ्रिकेतला देश. मी हा पहिलाच पर्याय स्वीकारला. हे ऐकल्यावर त्यावेळी बऱ्याच जणांना वाटत असे, की मी डिस्कवरी वाहिनीवरच्या कार्यक्रमांमध्ये दाखवतात तसे आफ्रिकन आदिवासींसोबत राहून जंगलातले प्राणी मारून, भाजून, खाऊन जगणार वगैरे!
जायच्या आधी मी इंटरनेटवरून तसेच तिथे असलेल्या अन्य व्हॉलंटीयर लोकांशी संपर्क करून बरीच माहिती मिळवली होती. तेव्हा जाणवलं होतं की हे व्हॉलंटीयर जेवण्या-खाण्याबाबतची बरीचशी माहिती त्यांच्या पाश्चात्त्य दृष्टिकोनातून देत होते. व्यवस्थित माहिती मिळत नसल्यामुळे जे समोर येईल ते खाण्याशिवाय पर्याय नाही, ही खूणगाठ मनाशी पक्की बांधली. आणि मी माझ्या पहिल्या परदेशप्रवासाला सुरुवात केली ती घानामधील एका गावाच्या दिशेने. त्या देशातील खाद्यजीवन प्रत्यक्ष अनुभवणे बरेच मजेशीर आणि नव्या गोष्टी शिकवणारे ठरले.
पहिली वेळ
तिथे पोचल्यानंतर पहिल्याच दिवशी आमचे ओरिएंटेशन ट्रेनिंग होते. ते ज्या हॉटेलमध्ये होते तिथले ओळखीचे वाटणारे, पण पूर्णतः पाश्चात्त्य चवीचे स्पॅगेतीसारखे पदार्थ खाऊन वेळ निभावली. आजचं मरण किती दिवस उद्यावर ढकलत राहणार, असा विचार करत त्याच दिवशी मी माझा मोर्चा स्थानिक आफ्रिकन पदार्थांकडे वळवला.
“तुला हे हवंय? नक्की हेच हवंय ना?” जेवणाच्या काऊंटरवरील वाढपी बाईने मला दोनदोनदा विचारत एका मोठ्या वाडग्यामध्ये फुफु नावाचा एक चिकट गोळा टाकला आणि त्यावर मटणयुक्त रस्सा ओतला. आजूबाजूच्या आफ्रिकन लोकांकडे मी पाहिलं. ते लोक त्यांच्या वाडग्यांमधल्या मोठ्या गोळ्यांचे छोटे गोळे करून त्याच्यासोबत थोडासा रस्सा घेऊन गपकन गिळताना दिसत होते. मीही तसंच करण्याचा प्रयत्न केला. तो फुफुचा गोळा मला तोंडातच चिकटून राहिल्यासारखा वाटत होता. आणि त्या रश्श्याच्या विचित्र वासामुळे मला पोटातलं सगळं ढवळून वरती येईल असं वाटत होतं. माझ्या सर्व प्रतिक्षिप्त क्रिया दाबून टाकत मी जेवढं खाता येईल, तेवढं खाल्लं आणि बाकी सर्व तसंच टाकलं. आफ्रिकन पदार्थ खाण्याची ही पहिलीच वेळ.
सामग्री ओळखीची, पदार्थ अनोळखी
रात्री या प्रसंगाचा विचार केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की मी खाल्लेला तो पदार्थ ज्या सामग्रीपासून बनवला होता ती सर्व सामग्री भारतीय जेवणातही वापरली जाते. फुफु ज्या कसावापासून बनवतात त्याच कंदापासून आपल्याकडे साबुदाणा बनवला जातो. बकऱ्याचे मटण आपल्याकडेही असते. पामतेल, टोमॅटो, कांदा, आलं, लाल तिखट या सगळ्याचा वापर आपल्या जेवणातही असतो. फक्त त्यावर केली गेलेली प्रक्रिया पूर्णतः वेगळी होती. तिथेच सगळा फरक होत होता. त्यानंतर तिथे काढलेल्या एका वर्षात असे ओळखीच्या साहित्यापासून बनवलेले अनेक अनोळखी पदार्थ खाऊन पाहिले. भारतीयांना फारशा परिचित नसलेल्या घानाच्या खाद्यसंस्कृतीची ही तोंडओळख.
धान्य, भाज्या, फळं, दूध
घानाचा दक्षिण भाग अधिक पावसाचा, विषुववृत्तीय जंगलांचा; तर उत्तर भाग कमी पावसाचा, गवताळ आणि झुडुपी जंगलांचा. दक्षिण भागामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारचे कंद, राजेळी केळी, तेलताड, मका, भात अशी पिकं घेतली जातात. उत्तर भागामध्ये प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, मका, भुईमुग, शिआनट्स, चवळी, अंबाडी, बंबारा बीन्स ही प्रमुख पिकं आहेत. मसाल्यासाठी इथे ओल्या सुक्या लाल मिरच्या, आलं, दालचिनी, मिरी आणि स्थानिक जातीची तिरफळं वापरली जातात. एक अतिशय उग्र आणि विचित्र वासाचा दावादावा नावाचा पदार्थही वापरला जातो. खाद्यतेलांमध्ये पामतेल, शेंगदाणा तेल, शीया बटर हे प्रामुख्याने दिसतात.

टोमॅटो, कांदा, भेंडी, अंबाडी, अळू, चवळीचा पाला, कांदापात, भोपळा, दुधी या आपल्या ओळखीच्या भाज्यांबरोबर अयोयो, अलेफु, कोंटॉमीरे, गार्डन एग्ज, रताळ्याचा पाला, वेताचे कोंब अशा भारतात प्रचलित नसलेल्या भाज्याही खाल्ल्या जातात. शेंगवर्गीय भाज्या मात्र इथे आहारात दिसत नाहीत. फळं इथे ताजी आणि नुसतीच खातात. फळांचे ज्युस किंवा पदार्थ केले जात नाहीत. दक्षिण भागात अननस, संत्री, अवोकाडो, नारळ, केळी मोठ्या प्रमाणावर होतात. देशाच्या सर्व भागात ही फळं वर्षभर उपलब्ध असतात. उत्तर भागात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर हंगामी स्वरूपात कलिंगडं आणि आंबे मिळतात. घानामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ फारसे खाल्ले जात नाहीत. देशाच्या उत्तर भागात फुलानी नावाची एक भटकी जमात गाईगुरे पाळते आणि ते लोक दुधापासून पनीर करून बाजारात विकतात.
…आणि पक्षी-प्राणीदेखील
शाकाहार ही संकल्पना इथल्या स्थानिक लोकांना माहीत नाही त्यामुळे बहुतांश पदार्थांमध्ये मांसाचं मिश्रण केलं जातं. मासे देशाच्या सर्वच भागात मिळतात आणि सुक्या मासळीच्या स्वरूपात वर्षभर उपलब्ध असतात. गाई, शेळ्या, डुकरे, कोंबड्या आणि गिनीफाऊल हे प्राणी-पक्षी इथे मांसासाठी पाळले जातात. पण कुत्रे, मांजरे, गाढवे, वटवाघळे, रानघुशी हेही त्यांना वर्ज्य नाहीत. उलट यांचं मांस खाल्याने एक प्रकारची शक्ती मिळते असा समज इथल्या लोकांमध्ये आहे. दक्षिण घानामध्ये मोठ्या आकाराच्या आफ्रिकन गोगलगाई फार आवडीने खाल्ल्या जातात. तिथला समाज विविध जमातींमध्ये विभागला गेला आहे. प्रत्येक जमातीचा एक पवित्र पशू असतो. त्याला मारणं त्या त्या जमातीच्या लोकांसाठी निषिद्ध असतं; तर काही पशू बळी देण्यासाठी महत्त्वाचे समजले जातात.
जेवणाचा मेन्यू
इथे मुख्य जेवणातले खाद्यपदार्थ म्हणजे मी लेखाच्या सुरुवातीला लिहिल्यानुसार रश्श्यात बुडवलेले स्टार्चयुक्त पदार्थांचे चिकट गोळे. हे गोळे दक्षिणेत प्रामुख्याने उकडलेल्या यॅम, कसावा, अळकुड्या किंवा राजेळ्या केळ्यांपासून बनवलेले असतात. उत्तरेत ते मक्याच्या आणि बाजरीच्या पिठाचे असतात. रस्से कधी मटणाचे असतात तर कधी पालेभाज्यांचे. हे गोळे आणि रश्श्यातल्या भाज्या उकडून कांडून इतकं मऊ केलेलं असतं की दातांचं काम फक्त मटणाचे तुकडे चावायचंच राहतं. बाकीचं फक्त गिळायचं असतं. दररोज इथे घरांमध्ये हे पदार्थ लाकडी उखळीत कांडण्याचं काम चालतं. या कांडण्याचा आवाज आसमंतात घुमत राहतो.
कधी कधी पदार्थ नुसते उकडून, तळून किंवा आंबवूनही बनवले जातात. यॅम, रताळी, कच्ची राजेळी केळी आणि कसावाचे उकडलेले किंवा तळलेले काप प्रामुख्याने पालेभाज्यांसोबत खाण्याची पद्धत आहे. ग्रिल केलेला तिलापिया मासा यासोबत खाल्ला जातो.
घानामध्ये सर्वत्र मिळणारा एक पदार्थ म्हणजे केंके. मक्याचं भिजवलेलं पीठ आंबवून पानांच्या बंद द्रोणात भरून वाफवलं जातं. हा केंके पाच सहा दिवस टिकू शकतो. ह्याचाच दुसरा प्रकार म्हणजे बांकू. आंबवलेलं मक्याचं पीठ थोडंसं पाणी घालून उकडवलं जातं. या आंबट चवीच्या आणि वासाच्या बांकूसोबत भेंडीचा बुळबुळीत रस्सा आणि तळलेला माशाचा तुकडा. हे सर्व चवीने खाणारा भारतीय अजून तरी मला भेटलेला नाही. पण तिथे हे असंच खातात.
घानाचा भात
घानात भातही खातात. जाड, बुटक्या दाण्याच्या तांदळाचा चिकट मऊसर भात शिजवून त्याचे गोळे करतात. त्याला ओमो तुओ असं नाव आहे. हे गोळे शेंगदाण्याच्या रश्श्याबरोबर खातात. हा पदार्थ त्यातील शेंगदाण्याच्या वापरामुळे देशावरच्या मराठी पदार्थांच्या चवीजवळ जाणारा आहे. साधा भात, भाज्यांचा घट्ट रस्सा आणि तळलेलं चिकन हे कॉम्बिनेशन इथल्या रेस्टॉरंटमध्ये साधारणपणे मिळतं. जोलॉफ राईस नावाचा टोमॅटो घालून केलेल्या भाताचा प्रकार घानाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम आफ्रिकेत लोकप्रिय आहे. उत्तर घानामधल्या ग्रामीण भागात उकडा तांदूळ बराच वापरला जातो. लग्न, अंत्यविधी या प्रसंगी भात आणि चिकन हा महत्त्वाचा मेन्यू असतो.
चटण्या
तीन प्रकारच्या चटण्या घानाच्या सर्वच भागांमध्ये भरपूर वापरल्या जातात. फ्रेश पेपे नावाचं एक वाटण दररोज ताजं बनवून वापरलं जातं. या वाटणामध्ये टॉमेटो, कांदे, ओल्या लाल मिरच्या आणि मीठ एवढेच पदार्थ असतात. खाचा केलेल्या मातीच्या एका पसरट भांड्यात हे सर्व पदार्थ घालून लाकडी बत्त्याच्या साहाय्याने हे बारीक वाटले जातात. शितो नावाची एक झणझणीत टिकाऊ चटणी लाल मिरच्या, कांदे, टोमॅटो आणि जवळा वापरून केली जाते. याझी नावाची एक सुकी चटणी लाल मिरची पावडर, शेंगदाण्याची पावडर, भाजलेले मक्याचे पीठ आणि मीठ हे पदार्थ वापरून केली जाते. या चटण्या ज्याला जसं पाहिजे त्या प्रमाणात पदार्थ तिखट करण्यासाठी वरून घातल्या जातात. मराठी लोकांच्या तुलनेत घानामध्ये फारच कमी तिखट खातात. मी जेव्हा या चटण्या अधिक प्रमाणात घालायला सांगायचो तेव्हा हा कुठून आलाय.. अशा प्रकारच्या लोकांच्या नजरा मला बऱ्याच वेळा झेलायला लागत असत.
खानपान महिलाराज
तिथे खानपानाच्या कार्यक्षेत्रात जवळजवळ महिलांचंच राज्य चालतं. घरांमध्ये पुरुषांनी अन्न शिजवणं कमीपणाचं मानलं जातं. इथल्या बऱ्याचशा खानावळी, टपऱ्या महिलाच चालवतात. काही स्पेशल रेस्टॉरंट, आम्लेट व कबाब स्टॉल वगळता पुरुष खानपानाच्या क्षेत्रात कुठेही दिसत नाहीत. स्नॅक म्हणजे थोड्याप्रमाणात खाण्यापिण्यासाठी घानाच्या सर्व छोट्या मोठ्या शहरांमध्ये दिवसभर काहीबाही मिळत राहतं. बऱ्याच मोठ्या प्रमाणावर स्त्रिया हे छोटे व्यवसाय करण्यात गुंतलेल्या असतात. मी राहत असलेल्या बोंगो या छोट्या गावामध्येही जर ठरवलं असतं, तर स्वतः न शिजवता, विक्रीला येणारे पदार्थ खाउनही राहू शकलो असतो!
कृत्रिमतेचा लवलेश नाही
इथल्या बऱ्याचशा पदार्थांमध्ये दिखाऊपणाला थारा नसतो. त्यामुळे कृत्रिम रंग, प्रिजर्वेटिव, साखर यांचा वापरही नसतो. बरेच घानावासी सकाळी कॉकॉ नावाची मक्याच्या पिठापासून केलेली आंबील पितात. सोयाबीनच्या पिठापासून तळून केलेले सोया कबाब, चवळीच्या पिठापासून वाफवून केलेले मेंब्सा, सोयाबीनच्या पिठापासून वाफवून केलेले तुबानी, आंबवलेल्या चवळीच्या पीठाचे कोसे नावाचे तळलेले वडे हे सर्व पदार्थ शाकाहारी लोकांची व्यवस्थित सोय लावतात. केलेवेले नावाचा एक पदार्थ माझ्या फार आवडीचा आहे. यात पिकलेल्या राजेळी केळ्यांचे तुकडे मसाले लावून तळले जातात.
ड्रिंक्स, घानायीन संगीत आणि गप्पा
घानाच्या स्थानिक इंग्रजी बोलीमध्ये बरेच मजेशीर शब्द आहेत. To chop food चा अर्थ इथे खाणे असा असतो. इथल्या खानावळींना चॉप बार असं म्हणतात. बीयर हे इथले सर्वात आवडीचे पेय. स्त्रिया आणि पुरुष दोघेही बियर पितात. जिथे थंड पेयं मिळतात अशा ठिकाणांना घानामध्ये स्पॉट म्हणतात. या स्पॉटच्या बाजूला एखादा कबाबवाला असतोच. हे कबाब म्हणजे कोळशावर खरपूस भाजलेले छोटे किंवा मोठे मांसाचे तुकडे.
संध्याकाळच्या वेळेस गरमागरम कबाबसोबत थंडगार बीयर आणि लोकप्रिय घानायन संगीताच्या बॅकग्राउंडवर मित्रमंडळींसोबत गप्पा हा इथला बऱ्याच लोकांचा संध्याकाळचा टाईमपास. गावांमध्ये आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांमध्ये ब्रॅंडेड बीयरची जागा ज्वारीपासून केलेली पिटो नावाची गावठी बीयर घेते. दक्षिण घानामध्ये पिटोची जागा काही ठिकाणी पाम वाईन म्हणजेच ताडी घेते. हे सर्व सर्व्ह करतात कलाबाशमधून. कलाबाश म्हणजे भोपळ्याच्या जाड आवरणापासून बनवलेली विविध आकाराची भांडी. प्लास्टीक आणि धातूच्या काळातही इथल्या ग्रामीण भागात अजूनही कलाबाश भांड्यांचा वापर होत असतो, हे विशेष.
चहा, कॉफी ही दोन्ही पेये आपल्यासारखी तिथे सर्रास व सारखी प्यायली जात नाहीत. तरीही त्यांचे वेगळे स्टॉल रस्त्यांवर असतात. आणि मोठा पाऊण लिटरचा मग भरून चहा, कॉफी किंवा चॉकोमाल्ट तिथे दिलं जाते. अंबाडीच्या लाल पाकळ्यांपासून केलेलं बिस्साप हे सरबत उत्तर घानामध्ये खूप लोकप्रिय आहे.
कोक आणि पेप्सी या कंपन्यांचे हातपाय घानात व्यवस्थित पसरलेले आहेत आणि भारतात मिळणारी त्यांची सॉफ्ट ड्रिंक्स तिथेही सर्वत्र मिळतात. अल्कोहोल नसलेलं बिअरच्या माल्टपासून बनवलेलं पेय तिथे एक एनर्जी ड्रिंक म्हणून पितात.

भारतीयांसारख्याच सवयी
त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बर्याचशा भारतीयांसारख्याच आहेत. ते हातानेच जेवतात. जेवण्यापूर्वी हात स्वच्छ धुण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. जेवताना फक्त उजव्या हाताचाच वापर करता येतो. डाव्या हाताचा वापर पूर्णतः निषिद्ध मानला जातो. सुरुवात केल्यापासून जेवण संपेपर्यंत घानायन लोक फारसे बोलत नाहीत. गोळे गिळताना बोलणं त्यांना शक्यही नसतं म्हणा! जेवताना मध्येच पाणी न पिता जेवण झाल्यावरच पितात. खाल्लेलं पचायला पाहिजे आणि दात स्वच्छ राहायला हवेत म्हणून घानामध्ये बरेच लोक काही झाडांच्या फांद्यापासून तयार केलेल्या काड्या चावत राहतात.
त्यांच्या विस्तारित एकत्र कुटुंबात नातेवाईक लोक एकमेकांकडे जात-येत असतात. परंतु बाहेरच्या मित्रांना खास घरी बोलावून आदरातिथ्य करण्याची पद्धत मला फारशी दिसली नाही. अर्थात जर तुम्ही नेमकं जेवायच्या वेळेस एखाद्याकडे गेलात तर तुम्हाला हे लोक जरूर आग्रहाने जेवू घालतात, असा अनुभव आला.
अशी बहुविध खाद्य आणि पेय पदार्थांची ही घानाची खाद्यसंस्कृती अन्य देशांत अनुभवायला मिळणं तसं कठीण आहे. आफ्रिकेत कामानिमित्ताने जाणारे बहुतांश भारतीय लोक तिथल्या स्थानिक लोकांमध्ये फारसे मिसळत नाहीत. त्यामुळे स्थानिक खाद्यपदार्थांपासूनही दूर राहतात. या खाद्यसंस्कृतीचा अनुभव घ्यायचा तर कुठलाही पूर्वग्रह न ठेवता इथल्या खाद्यपदार्थांना, पेयांना सामोरं जाणं आवश्यक आहे.
युएसए, युके, नेदरलॅंड्स, जर्मनी, फ्रान्स या देशांत मोठ्या प्रमाणावर पश्चिम आफ्रिकेतले लोक असल्यामुळे तिथे त्यांची रेस्टॉरंट्स आहेत. मी वर्णन केलेले बरेच पदार्थ थोड्याफार फरकाने आणि वेगवेगळ्या नावांनी तिथे उपलब्ध असतात. इंटरनेटवर पाककृतीही उपलब्ध आहेत. शाकाहारी लोकांना बरेच घानायन पदार्थ मांस न वापरता, सोयासारखे अन्य पर्याय वापरून बनवता येतात. परंतु मला वाटतं की घानासारख्या देशात गेल्यावर तिथली खाद्यसंस्कृती मूळ स्वरूपात अनुभवणं हे खास आणि तुलना न करता येण्यासारखंच आहे.
पाककृती
जोलॉफ राईस
हा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये शिजवलेला भात आहे. हा पदार्थ सेनेगलपासून नायजेरियापर्यंत संपूर्ण पश्चिम आफ्रिकेत या एकाच नावाने ओळखला जातो. लांब व जाड दाण्याचा तांदूळ यासाठी वापरतात. मटण शिजवून घेतलं जातं. त्यानंतर ते तेलावर परतून घेऊन बाजूला ठेवलं जातं. त्याच भांड्यात बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून त्यात टोमॅटोची ग्रेव्ही, बारीक चिरलेली लसूण, मिरपूड, लाल तिखट पावडर, मटणाचा स्टॉक घालतात आणि हे मिश्रण थोडं शिजू देतात. ह्या ग्रेव्हीतच तांदूळ घालून आणखी परतले जातात. साधारण 20 मिनिटे शिजल्यानंतर त्यात परतलेलं मटण घालून, थोडं पाणी घालून भात पूर्ण शिजेपर्यंत मंद आचेवर ठेवतात.
कधी कधी मटण किंवा भाज्या वेगळया तयार करून या भाताबरोबर सर्व्ह करतात. मटणाऐवजी चिकन, स्मोक्ड फिश, अन्य सीफुड, भाज्या किंवा त्यांचं विविध प्रकारचं मिश्रण, विविध मसाले अशी वेगवेगळी कॉम्बिनेशन्स यात केली जातात.
रेड रेड
राजेळी केळ्यांचे तळलेले मोठे काप आणि चवळीची एक प्रकारची उसळ अशी ही कॉम्बिनेशन डीश आहे.
उसळीसाठी चवळी १० तास भिजवून मग पूर्ण मऊ होईल अशी शिजवून घेतात. पाम तेलात कांदा परतून घेतात. त्यावर लाल मिरचीसह व अन्य काही मसाल्यांच्या पावडरी घालतात. शिजवलेली चवळी त्यामध्ये घालतात. मिश्रणात स्मोक्ड फीश घालतात आणि थोडावेळ शिजवतात. त्याच्यावर वरून फ्रेश पेपेचं वाटण आणि थोडं कच्चं पामतेल घालतात. ज्यांना अधिक तिखट हवं ते लोक त्यात शितो चटणी मिसळून घेतात. अर्धपिक्या केळ्यांचे काप पामतेलात तळून काढतात आणि या उसळीसोबत खातात. पामतेलाच्या वापरामुळे ह्या पदार्थाला गडद लाल रंगाची छटा येते म्हणून त्याला घानाच्या स्थानिक इंग्रजीत रेड रेड म्हणतात.
बिटो सूप
अंबाडीची पानं चिरून पाण्यात थोडा वेळ उकळून घेतात. ते पाणी काढून टाकतात. त्यानंतर हा पाला परत एकदा पाण्यात उकळत ठेवला जातो. त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, कांदे, आलं, लसूण, लाल मिरची बारीक वाटून (खरं तर उखळीत कांडून) घालतात. अतिबारीक आकाराच्या माशांची पेस्ट करून ह्या रश्श्यात घालतात. जरा उकळल्यानंतर शेंगदाण्याची पेस्ट किंवा पावडर घालतात. त्यासोबत दावादावा तसंच अन्य काही मसाल्यांच्या पावडरीही घालतात. हा रस्सा घट्ट व्हावा ह्यासाठी थोडं मक्याचं पीठ घालून त्याच्या गुठळ्या होणार नाहीत अशा प्रकारे ढवळतात. सर्व घटक शिजले की विस्तवावरून काढतात. बोंगोमधील स्थानिक लोक हे बिटो सूप तुओ झाफी नावाच्या बाजरीच्या किंवा मक्याच्या शिजवलेल्या पिठाच्या गोळ्याबरोबर खातात.
सचिन म. पटवर्धन
सध्या वास्तव्य रत्नागिरीजवळील गोळप नावाच्या गावात. मी सामाजिक सेवा क्षेत्रात सल्लागार म्हणून काम करतो. सोबत आमचा कौटुंबिक आंबा व्यवसायही आहे. कामानिमित्ताने देशाच्या विविध भागात अधूनमधून फिरती चालू असते व त्यामुळे तेथील स्थानिक खाद्यपदार्थ चाखायला मिळत असतात. लेखन हा माझा एक छंद आहे. ब्लॉगच्या माध्यमातून माझं लेखन लोकांसोबत शेअर करतो. `शेती आणि खाद्यजीवन’ ह्यांचा असलेला संबंध या विषयावर अधिक ज्ञानवर्धन करण्याचा आणि थोडंफार लेखन करण्याचा मानस आहे. मला खाद्यपदार्थांमधील साधेपणा अधिक पसंत आहे. बायको सुगरण असल्यामुळे घरात काय बनवायचं आणि खायचं या बाबतीत जास्त लुडबूड करत नाही. कधी कधी सोप्या नवीन पाककृतींचे प्रयोग मात्र आवर्जून करतो. एक कोकण प्रदेशाभिमानी असल्यामुळे असेल कदाचित, पण उकडीचे मोदक हा माझा एक वीक पॉईंट आहे.
सर्व फोटो – सचिन पटवर्धन व्हिडिओ – YouTube
अतिशय नवीन माहिती दिलेली आहे. लेख छान झालाय
LikeLike
धन्यवाद!
LikeLike
purnpane navin mahiti ani vishay
LikeLike