प्राची सोमण
दस्तरखानचा शब्दशः अर्थ जेवताना (मेजवानीच्या वेळी) खाली अंथरण्याचा गालिचा. पण हा शब्द एकूणच जेवणाची तयारी, खाण्याची जागा, जेवणाचा सरंजाम यासाठी वापरला जातो.
साधारण सात वर्षांपूर्वी पहिल्यांदा कानपूरला राहायला यायचं पक्कं झालं तेव्हा, ‘माझं कसं होणार ?’ हा प्रश्न पडण्याइतकी अल्लड मी नव्हते. पण उत्तर प्रदेश, तिथलं हवामान, राहणीमान याबद्दल आपण बरेचदा फारसं चांगलं ऐकून नसतो. मनाची पाटी शक्य तेवढी स्वच्छ पुसून इथे यायचं ठरवलं. रेल्वे प्रवासात दिसणारे डोंगर मागे पडले, आजूबाजूला दूरवर फक्त सपाट मैदानं दिसू लागली. झाशी आली तसं आपण उत्तर प्रदेशात पोचलो याची जाणीव झाली. झाशी गेल्यावर थोड्याच वेळात डब्यात एक प्रकारची चुळबूळ दिसू लागली. पुणे – मुंबई प्रवासात कर्जत स्टेशन येण्याआधी जसे आपण दबा धरून बसतो तशीच काहीशी हालचाल जाणवू लागली.
गोड सुरुवात
उरई स्टेशन आलं. लोक भराभर खाली उतरले आणि मधमाश्या घोंघावत असलेल्या एका ठेल्याभोवती गर्दी झाली. मी उत्सुकतेने त्यांच्याकडे बघत होते. खरेदी करून बाहेर पडणाऱ्या लोकांच्या हातात मातीचे कुल्हड होते. मला त्यात काय आहे दिसत नव्हतं. गाडी किती वेळ थांबेल याचा अंदाज नव्हता. नाहीतर स्वतः खाली उतरून काय आहे ते पाहिलं असतं. माझ्या चेहऱ्यावरची हजारो प्रश्नचिन्ह वाचून समोर बसलेली एक प्रौढा म्हणाली, ‘‘“यहाँ बढिया गुलाबजामुन और रसगुल्ले मिलते है”.’’ मनात उरई आणि गुलाबजाम हे समीकरण पक्कं करून प्रवास संपवला. हे गुलाबजाम प्रत्यक्ष खाण्याची वेळ फार उशिरा आली, पण इथलं खानपान समजून घेण्याच्या प्रवासाची सुरुवात अशी गोड झाली. मग अनेकदा इथे गरमागरम गुलाबजाम चाखले. हो, उत्तरेत जिलबी, गुलाबजाम, गाजर हलवा ही पक्वान्नं अगदी गरम ‘परोसली’ जातात. उत्तरेतले गुलाबजाम अस्सल खव्यापासून बनवलेले, मोठे, अतिशय गोड आणि पोटभरीचे असतात. वेलचीचा सढळ वापर आणि आतपर्यंत मुरलेला घट्ट पाक हे इथल्या गुलाबजामचं वैशिष्ट्य.
भन्नाट कबाब
उत्तर प्रदेश म्हणजे अवधी आणि मुगलाई खाद्यपरंपरा असं एक ढोबळमानाने डोक्यात होतं. लखनवी कबाब आणि बिर्याणी जगप्रसिद्ध आहेच. मुगलाई बिर्याणी ही हैदराबादी बिर्याणीपेक्षा अगदी वेगळी असते. तिच्यात नावालाही तिखटपणा नसतो, मसाल्यांचा भडिमार नसतो. हळुवार आणि नेमका स्वाद हेच त्याचं विशेष. तिला केवड्याचा मोहक सुगंध असतो आणि मातीचा हलका स्पर्श. बिर्याणी इथे बरेचदा मातीच्या छोट्या मडक्यात दम आणायला ठेवली जाते. ‘दम देऊन’ पदार्थ शिजवण्याची पद्धत अवधमध्ये विकसित झाली असं मानलं जातं. कबाबचे अनेक भन्नाट प्रकार इथे चाखायला मिळतात. ‘टुंडे के कबाब’ नावाचं एक साधारण १०० वर्षं जुनं दुकान लखनौमध्ये आहे. तिथे एक प्रसिद्ध थोटा आचारी होता, त्यावरून हे नाव पडलं असं सांगतात. इथे मिळणाऱ्या कबाबमध्ये तब्बल १६० प्रकारचे मसाले वापरले जातात अशी वदंता आहे. उत्तरेत हे सारं भेटलं आणि भावलं. तरीपण मी शोधत होते प्रेमचंदांच्या कथेतली अस्सल देहाती जेवणं. मला भुरळ पाडली ती इथल्या साध्या शाकाहारी पदार्थांनी, रोजच्या जेवणातल्या पदार्थांनी. इतर प्रांतातले लोक सणासुदीला काय खातात यापेक्षा ते रोज काय जेवतात हे बघणं मला नेहमीच जास्त आवडतं.
खाद्यजीवनाचा प्राण बटाटा
भूक भूक करणाऱ्या मुलाला इथली आई रोटी बनवत असलेल्या तव्यावर झटकन आलू ‘चलाके’ देते. म्हणजे काय तर एखादा उकडलेला बटाटा तव्यावर तिखट- मीठ आणि हाताशी असेल तो मसाला टाकून परतायचा. असा खमंग बटाटा पोटाबरोबरच प्रेमाची भूकही भागवतो.
बटाटा तर इथल्या खाद्यजीवनाचा प्राण आहे. जवळ जवळ प्रत्येक भाजीत इथे भरीला बटाटा घातला जातो. इथला बटाटा हिमूळ असतो. त्यामुळे बटाट्याच्या बऱ्याच पाककृतीत गरम मसाला हमखास वापरला जातो. आपल्याकडे आग्रा बटाटा घ्यायला फारसे कोणी उत्सुक नसते ते यामुळेच.
बटाट्याच्या असंख्य तर्हा इथे खायला मिळतात. जीरा-आलू म्हणजे आपली जवळ जवळ उपासाची बटाट्याची भाजीच असते, पण त्यात दाण्याचं कूट न घालता भरपूर जिरं आणि थोडा गरम मसाला पेरतात. आलू भुजिया म्हणजे बटाट्याच्या काचऱ्या. कोणतीही भाजी पीठ पेरून किंवा नुसती परतून केली तर तिला भुजिया म्हणतात. मध्यप्रदेशात शेवेला भुजिया म्हणतात. दम-आलू, आलू-मटर, आलू-गोबी, व्रतवाले आलू, आलू-मेथी, आलू-पालक अशी किती नावं घेऊ !
‘डुबकीवाले आलू’ ही माझ्या घरची सगळ्यात आवडती डिश. गंगेमध्ये डुबकी मारून आल्यावर खायचे म्हणून म्हणे हे डुबकीवाले आलू ! ती बनवताना ताजा गरम मसाला बनवावा लागतो. त्यात बडीशेप, वेलची, दालचिनी लवंग आणि मिरे असतात. रश्याला घट्टपणा येण्यासाठी बटाटे जरा कुस्करले जातात. गरमागरम पुरी किंवा कचोरीबरोबर ही भाजी खाल्ली जाते.
कानपूरची अजून एक खासियत म्हणजे ‘चटनीवाले आलू’. जेव्हा नवा बटाटा येतो तेव्हा अख्खे छोटे बटाटे वापरून हा केला जातो. एरवी बटाट्याच्या फोडी पण वापरतात. भरपूर कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची यांच्या चटणीमध्ये उकडलेले बटाटे मुरवले जातात. दिल्लीची आलू चाट साधारण अशीच असते, पण त्यात बटाट्याच्या फोडी तळून घेतात. कानपुरी चटनीवाले आलू, तेलाचा अजिबात वापर न करता तितकेच चविष्ट लागतात. निखाऱ्यावर भाजलेले बटाटे आणि रताळी यांची पण मस्त चाट इथे मिळते. त्याला शक्करकंद की चाट म्हणतात.
खुसखुशीत कचोरी

आपल्याकडे कचोरी नावाने एक भलाभक्कम असा पोटभरू पदार्थ मिळतो. त्याची आणि इथल्या कचोरीची तुलनाच होऊ शकत नाही. इथली कचोरी पुरीच्या जवळ जाणारी असते. कचोरीत उडदाच्या डाळीचं सारण भरतात. भिजवून वाटलेल्या डाळीत हिंग, बडीशेप, मिरची, कोथिंबीर आणि आलं घालून कचोरी बनवतात. पूर्वी त्या न लाटता हातानेच बनवल्या जात असत. इथे कचोरीला बरेचदा नुसतंच खस्ता देखील म्हणतात. खस्ता म्हणजे खुसखुशीत. चाट बनवताना जो खस्ता वापरला जातो तो निमकीसारखा असतो. चौघडी घातलेल्या या खुसखुशीत पुऱ्यांवर पांढरे वाटाणे आणि बाकीचे मसाले शिवरून चाट बनवतात. इथे राहायचं म्हणजे किती ‘खस्ता खाव्या लागतात’ असं आम्ही गमतीने म्हणतो.
कच्चा – पक्का खाना

पुरी तर इथलं पूर्णान्न आहे. आपल्याकडे सणासुदीला केली जाणारी पुरी इथे रोजच्या नाश्त्याला केली जाते. बरेचदा ती फक्त मैद्याची पण करतात. भोपळ्याची आंबटगोड भाजी किंवा चने कि घुगनी. सोबत पुरी खाल्ल्याने त्याची लज्जत दुणावते. तळलेला पराठा हा या पुरीच्या प्रेमातूनच जन्माला आला असावा. पुरी, कचोरी, पराठा म्हणजे ‘पक्का खाना’ या उलट पोळी-भाजी, भात म्हणजे कच्चा खाना.
व्रत, उत्सव या दिवशी ‘पक्का खाना’ बनतो. काही विशिष्ट सणांना मात्र कच्चा खाना बनतो. जसं की संक्रांत. या सणालाच इथे ‘खिचडी’ म्हणतात. या दिवशी उडदाच्या डाळीची खिचडी बनवतात. यासाठी सालासकट उडीद डाळ वापरतात. १ वाटी उडीद डाळीला सव्वा वाटी तांदूळ घेतले जातात. बरोबर दुप्पट पाणी घालून मोकळी खिचडी बनवली जाते. यात कोणतेही मसाले न घालता फक्त तुपात हिंग जिऱ्याची फोडणी आणि आलं-लसूण घालतात. “खिचडी तेरे चार यार, घी, पापड, दही, आचार” या चार दोस्तांशिवाय खिचडी छान लागत नाही, असं म्हटलं जातं.
रोजच्या जेवणात अरहर(तूर), चनादाल, मूंग अशा अनेक डाळी वापरत असले तरी खास लखनवी डाळ करताना मात्र फक्त मसुराची डाळ वापरतात. ह्या डाळीत मलई वापरतात. त्यातूनच मग ‘ये मुह और डाल मसूर की’ सारखी म्हण तयार झाली असावी. १९५७ सालच्या ‘बारीश’ या चित्रपटातील नूतन आणि देव आनंद यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आवर्जून पहा. “जरा देखो तो सुरत हुजूर की ये मुह और डाल मसूर की …”
बुकनू

बुकनू हा एक अस्सल ‘कानपुरीया’ पदार्थ मला एक दिवस अचानकच समजला. माझा लेक बुकनू हा शब्द घोकतच घरी आला. ‘आई मला पण बुकनू देत जा ना गं डब्यात’, हा हट्ट पुरवताना बुकनूचा शोध सुरू झाला. जवळच्याच दुकानात चौकशी केल्यावर तो मिळालाही. हा एक प्रकारचा चाट मसाला असतो. प्रत्येक घरात तो विशिष्ट पारंपरिक पद्धतीने बनवला जातो. त्याची चव आपल्या हिंगाष्टकाच्या जवळ जाणारी असते. गरम गरम अजवायन (ओवा) पराठ्यावर सढळ हाताने तूप सोडायचं. मग त्याबरोबर बुकनू अफलातून लागतो. कढी-भात, डाळ-भात याबरोबर तो आवर्जून खाल्ला जातो. पाचक म्हणूनही त्याचा वापर केला जातो. यात आमचूर, सेंधव, जिरे, मिरे, वेलची, हळद, हिंग, सुंठ असे अनेक घटक असतात. हा मसाला खास कानपुरी आहे.
गर्मी-सर्दीचे पदार्थ
‘गर्मीमे थंडा, सर्दीमे अंडा’ असं लिहिलेल्या गाड्या बघून मला गंमत वाटायची. या गाड्यांवर उन्हाळ्यात मसाला कोल्ड्रिंक, शिकंजी वगैरे मिळते आणि थंडीत अंड्याचे विविध पदार्थ. मुळात इथे उन्हाळा आणि थंडी दोन्ही कडाक्याचं. त्यामुळे त्या त्या ऋतुनुसार वेगवेगळे पदार्थ खाण्याची पद्धत दिसून येते. मी पुण्याची असल्याने तापमानातले इतके बदल अंगवळणी पडायला बरीच शक्ती खर्च होते. उन्हाळ्यात रस्तोरस्ती सर्रास मिळणारा पेठा थंडीत गायब होतो. (आग्र्यात तो बाराही महिने मिळतो.) भाजलेल्या शेंगा, गजक (तिळगूळ), लाह्या हे थंडीचे खास पदार्थ ते उन्हाळ्यात सहज मिळणार नाहीत. याउलट बेलाचा मुरंबा, सरबत, पेठा हे उन्हाळ्यातच.

ताजमहाल बनवताना उन्हातान्हात काम करणाऱ्या कामगारांचा थकवा दूर करण्यासाठी पहिल्यांदा पेठा बनवला गेला अशी एक आख्यायिका आहे. इथल्या भीषण गर्मीचा सामना करण्यासाठी आग्र्याच्या गल्लोगल्ली पेठे बनवले जातात. गाढवावर लादून नेले जाणारे कोहळे छोट्या छोट्या गल्यातून सर्रास दिसतात. पंछी नावाचे पेठ्याचे एक प्रसिद्ध दुकान आहे, पण तुम्ही अगदी कोणत्याही दुकानात शिरून पेठा घेतलात तरी इथे अप्रतिम पेठाच मिळतो. त्यातला माझा सर्वांत आवडता प्रकार म्हणजे पान-पेठा. पेठाच्या पातळ अशा आवरणात पानाचा मसाला भरलेला असतो. आणि त्याला मस्त विड्याचा आकार देऊन वरून वर्ख लावतात.
मलाई माखनची नजाकत
कृष्णाच्या या प्रदेशात दूध-दुभतं भरपूर. मग ते साठवून ठेवण्यासाठी खवा बनवला गेला आणि त्या खव्यापासून पेढा. मथुरेचा पेढा भारतभर वाखाणला जातो. खवा, साखर आणि वेलची इतके तीन साधे घटक पदार्थ वापरून जी कलाकृती बनते ती म्हणजे पेढा. तसं पाहायला गेलं तर हेच तीन घटक पदार्थ वापरून आपण किती वेगवेगळी पक्वान्नं बनवतो. अगदी गुलाबजाम, श्रीखंड, बासुंदीपासून रसमलाई, रसगुल्ल्यापर्यंत सारे पदार्थ याच तीन मूळ घटकांपासून बनतात.

इथे आल्यावर पहिल्यावहिल्या मेजवानीतच ‘मलाई माखन’शी ओळख झाली. यालाच मलय्यो किंवा निमिष पण म्हणतात. गुलाबजाम, पेढे, जलेबी अशी बटबटीत चवींची शेकडो पक्वान्नं यावरून ओवाळून टाकावी. इतकं हलकंफुलकं आणि शाही पक्वान्न साऱ्या भारतभरात चाखायला मिळणार नाही. फक्त थंडीत बनणारं हे मलाई माखन इथल्या जगण्या-वागण्यातली आदब, नजाकत याचा चाखाता येण्याजोगा नमुना आहे. हे बनवण्याची प्रक्रिया बरीच गुंतागुंतीची आणि अवघड आहे. पहाटे पडणाऱ्या दवाशी याचा संबंध आहे. थंड केलेलं दूध घुसळून आलेल्या फेसापासून हे मलाई माखन बनतं. हा फेस दवात फुलायला ठेवतात आणि मग तो दाबून त्यावर साखर, केशर आणि सुकामेवा पसरतात. गुलाबी थंडीत, धुक्यात हरवून जाण्यात जे सुख आहे, तेच या चवीत आहे.
छप्पन भोग
‘छप्पन भोग’बद्दल मी ऐकून होते. मला असं वाटायचं की देवासमोर छप्पन्न प्रकारचे नैवेद्य ठेवणं म्हणजे छप्पन भोग. पण जरा शोधल्यावर त्यामागची कथा कळली. ती अशी – कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून घेतला आणि सर्व गावकऱ्यांना त्याखाली आश्रय दिला आणि त्यांचे रक्षण केले; ही कथा सर्वश्रुत आहे. तो वादळी पाऊस सलग ७ दिवस पडत होता आणि कृष्ण सलग सात दिवस पर्वत उचलून उभा होता. म्हणजे सात दिवस तो उपाशी राहिला. कृष्ण रोज ८ प्रहरांना जेवण घेत असे. तेव्हा त्याची एकूण (७ गुणिले ८) अशी छप्पन जेवणं हुकली. ती एकत्रितपणे त्याच्या समोर मांडली जातात. त्यालाच छप्पन भोग म्हणतात. यात भाताचे, भाजीचे, डाळींचे, मिठायांचे विविध प्रकार असतात. अगदी कृष्णाचा आवडता विडासुद्धा यात असतो. आता याचं तितकं पारंपरिक राहिलेलं नाही. आपल्याकडील अन्नकूटाप्रमाणेच यात बर्गर, चायनीज पदार्थांपासून सारं काही मांडलेले असतं. आणि आजकाल फक्त कृष्णच नव्हे तर इतर देवांनापण छप्पन्न भोग दाखवले जातात.
पाणीपुरी आणि भेळ
पाणीपुरी भारतात वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या स्वरूपात मिळते. कलकत्त्यात तिला गोलगप्पा म्हणतात. इकडे तिचे नाव ‘पानी के बतासे’. भय्या बतासे खिलाना अशी ऑर्डर दिल्यावर भय्या त्याच्याकडे असलेल्या विविध पाण्यांची एक-एक पुरी आपल्याला देतो. मग जे पाणी जास्त आवडेल, त्याची आपण परत द्यायला सांगायची. प्रत्येक भय्याकडे किमान ३-४ प्रकारचं पाणी तयार असतं. यात हिंग, जिरे, पुदिना अशा निरनिराळ्या चवी असतात. पाण्यात हिरव्या मिरचीचा वापर कमी असतो. आंबटपणासाठी चिंचेऐवजी आमचूर वापरतात.
एकदा खरेदीसाठी गेलो असताना खूप भूक लागली म्हणून आम्ही एका ठेल्यावर भेळ खायला थांबलो. जागतिक साखळ्या असणारी अनेक खाद्य-दुकानं समोर असली, तरी त्यातले बेचव पदार्थ खाण्यापेक्षा मला चटपटीत भेळ जास्त प्रिय. इकडे खरंतर चांगली भेळ मिळत नाही. बॉम्बे भेळपुरी नावाने ते जे काही विकतात, ते आपल्याकडच्या भेळेची अत्यंत वाईट अशी नक्कल असते. पण तरी आम्ही धीर करून भेळ बनवायला सांगितली आणि एकीकडे आमच्या गप्पा चालू होत्या. थोड्यावेळाने भेळ म्हणून जो पदार्थ हातात आला त्याच्या चवीने एक सुखद धक्का दिला. अगदी तशीच्या तशी नाही, पण आपल्या भेळेच्या बरीच जवळ जाणारी भेळ आम्ही खात होतो. लगेच त्याला पावती दिली, भेळ मस्त झालीये अशी. “आप महाराष्ट्रसे है ना? हम आपकी भाषा से पहचान गये. मी बॉम्बेमध्ये ४ साल राहिलो आहे, असं म्हणत तो चक्क मराठीवर उतरला. भेळेबरोबर एक पुरी फ्री दिली. महाराष्ट्रात भेळ पुरीने खातात म्हणून. आता जेव्हाही आम्ही त्याच्याकडे भेळ खायला जातो तेव्हा, खूप दिवसांनी आलात म्हणत आमचं मराठीत स्वागत करतो. परगावी गाववाला भेटल्याचा आनंद! चविष्ट भेळ चाखण्यासाठी आम्ही आता वारंवार त्याच्याकडे जातो.
मोठी शहरं सोडली तर एकूण उत्तरेत, कानपूरमध्येसुद्धा, आपण ज्याला मराठीत हॉटेल म्हणतो तशी साधी स्वच्छ हॉटेलं कमी आढळतात. एकतर महागडी, पॉश रेस्टॉरंटस् किंवा सडककिनारेवाले ठेले. याच्या मधलं काही नाहीच. याची सवय व्हायला वेळ लागला. पण हळूहळू इथल्या साध्या, अशिष्ट अशा जीवनशैलीच्या मी प्रेमात पडत गेले.
रेसिपीज
डुबकीवाले आलू
यासाठी आधी ताजा मसाला वाटावा लागेल. त्यासाठी ३-४ वेलदोडे, १०-१२ मिरीदाणे, पेरभर दालचिनीचा तुकडा, ३-४ लवंगा, २-३ हिरव्या मिरच्या, दोन पेरं आलं मिक्सरऐवजी खलबत्त्यात मस्त भरड किंवा ‘दरदरा’ वाटून घ्यायचं. इतक्या मसाल्यासाठी साधारण चार मध्यम आकाराचे बटाटे सोलून फोडी करून घ्यायचे.
शुद्ध तुपात फोडणी करायची. त्यात जिरं, हळद आणि सुकी लाल मिरची टाकायची आणि वर वाटलेला मसाला. फार परतायचं नाही. लगेचच फोडी केलेले कच्चे बटाटे टाकायचे आणि थोडं पाणी घालून ते मसाल्यातच शिजवायचे. आधीच उकडलेले बटाटे वापरले तर मसाल्याची चव आतपर्यंत मुरत नाही. एक वाफ आली की त्यात थोडं सैंधव मीठ, थोडं साधं मीठ, जराशी आमचूर पावडर टाकायची आणि परत बटाटे शिजेपर्यंत झाकून ठेवायचं. काहीजण यात टोमॅटो घालतात. पण मला टोमॅटो न घालता त्याची चव जास्त आवडते. बटाटे शिजले की ते डावाने जरा ठेचून घ्यायचे. म्हणजे रस्सा दाटसर होतो. रस्त्यावरील ठेल्यांवर ही भाजी मिळते. त्यात चक्क मैदा पाण्यात भिजवून दाटपणासाठी लावला जातो. मग आवडीनुसार पाणी घालून रस्सा करायचा.
ही भाजी पुरी किंवा कचोरीबरोबरच खावी.
कचोरी
लेखात मी ज्या कचोरीचा उल्लेख केला आहे ती पारंपरिक साधी कचोरी. पण तिचा एक चमचमीत अवतार पण असतो. त्याची कृती अशी.
अर्धी वाटी बिनसालीची उडद डाळ ३-४ तास भिजवायची. मिक्सरमध्ये वाटायची. मग किंचित तेलात हिंग घालून जरा परतायची. मग (पूर्वी पाट्यावर वाटल्यामुळे ती कोरडी वाटली जात असे आणि न परतता तशीच कचोरीत भरता येत असे.) त्यात सेंधव आणि साधं मीठ, कसुरी मेथी, आमचूर पावडर, जिरेपूड आणि थोडी धनेपूड टाकून मिश्रण चांगलं कोरडं होईपर्यंत परतायचं.
पारीसाठी निम्मी कणिक आणि निम्मा मैदा भरपूर मोहन घालून घट्ट भिजवायचा. मग पुरीइतकी लाटी घेऊन ती हाताने पसरवून उंडा करून घ्यायचा. त्यात लाटीच्या साधारण पाउणपट सारण भरायचं. मग हलक्या हाताने लाटून तेलात तळून घ्यायची. मसाला घातल्यामुळे ही कचोरी नुसती पण चांगली लागते.
मटार का निमोना
वाटीभर ताजे हिरवे मटार, हिरवी मिरची, आलं आणि मीठ टाकून वाटून घ्यायचे. थोडं तेल/तूप गरम करून त्यात जिरं तडतडवायचं. मग हा वाटलेला मसाला घालून चांगला कोरडा होईस्तोवर परतून घ्यायचं. थोडी मिरपूड भुरभुरवायची. खमंग वास आला की पाणी घालून हवा तितका रसदार करायचा. यात भरीला एखादा उकडलेला बटाटा किंवा मुगाचे सांडगे (मंगोडी) घालून पण मस्त लागतात.
अशाच प्रकारे सोलाणे (हिरवे हरभरे) वापरून पण निमोना बनवतात.
प्राची सोमण
मराठी साहित्यात बीए. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, बंगलोर येथून ग्रंथालय व माहिती शास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण. ‘अंगत-पंगत’ नावाचे एक फेसबुक पेज आणि त्याच नावाचा एक ब्लॉग लिहिते. खायला, खाऊ घालायला, खाण्याविषयी वाचायला, ऐकायला, बोलायला आणि लिहायला आवडतं. पदार्थ ताटात कसा वाढावा आणि त्याचा सुरेख फोटो कसा काढावा याविषयी ममत्व. कार्विंग, फूड प्लेटिंग आणि फूड फोटोग्राफी हे छंद. लहान मुला-मुलींनी स्वयंपाकात रस घ्यावा म्हणून आय. आय. टी., कानपूर परिसरातल्या मुलांसाठी कार्यशाळांचे आयोजन.
https://www.facebook.com/अंगत-पंगत-171276949648290/
http://angatpangat.blogspot.in/
फोटो – प्राची सोमण व्हिडिओ – YouTube
मी सुद्धा वेस्टर्न यूपी मध्ये राहिलेय. मला हे वर्णन खूप आवडले. कच्ची रसोई- पक्की रसोई, बटाट्याचा जास्त वापर, अगदी परफेक्ट वर्णन. मला जुने दिवस आठवले
LikeLike
धन्यवाद !
LikeLike
तसा उत्तर प्रदेशात मी कामानिमित्ताने बऱ्याच वेळा जात असतो. लखनवी बिर्याणी खाल्ल्यानंतर पहिल्यांदाच त्यात विशेष काही असू शकतं हे कळलं होतं. डुबकी वाले आलू बऱ्याच वेळा खायला मिळाले होते पण त्याचे हे नाव पहिल्यांदाच कळले. आता पुढच्या वेळेस खाद्य भ्रमंती हा लेख परत वाचून अधिक लक्ष देऊन करेन. धन्यवाद!
LikeLike
तुमच्या खाद्यभ्रमंती
ला शुभेच्छा !
LikeLike
Me pan gele 2 warsh Noida la rahate ahe. Tumacha lekh wachun farach chan waatala. UP che padarth mala maheetach navhate, ithe Delhi cha prabhav jast ahe. Aso. Tumhi sangitalele padarth matra nakki karun pahanar ahe.
LikeLike
धमाल आली वाचायला. लिहायची शैलीही अतिशय आवडली. मलैयो आताच बनारसला गेले होते तेव्हा खाल्लंय, अजून चव तोंडावर आहे. आलू करून पाहणार आता नक्की. धन्यवाद.
LikeLike
आभार ! असे प्रतिसाद किती हुरूप देतात !
LikeLike
लेख खुपच छान आहे. रेसिपीज पण छान आहेत. डुबकीवाले आलू केले काल. मस्त झाले.
LikeLike
अरे वाह ! करून पाहिलेत याचा खूप आनंद झाला.
LikeLike
एकदम सुरेख वर्णन आणि तोंडाला पाणी सुटेल अशी पदार्थांची चित्रं
LikeLike
मनापासून धन्यवाद !
LikeLike
डुबकी वाले आलू करून बघणार नक्की
LikeLike
नक्की करून पहा आणि आवडले का सांगा.
LikeLike
APALA LEKH ATISHAY SUNDAR ASUN LEKHANSHAILI JABARDAST TAKADICHI AHE. LEKHANATIL MAHITI MOHAK, TASECH MANORANJAKAHI AHE,
LikeLike