ब्रेडगाथा

समीर समुद्र

पुण्यामध्ये  मोठं होत असताना मी फारसा ब्रेड कधी खाल्ला नाही. कधीतरी रविवारी सकाळी आम्ही चहाबरोबर ब्रेड आणि अमूल बटर खात असू. त्या वेळेस फक्त व्हाईट ब्रेड मिळायचा बेकरीमध्ये. आपण काहीतरी स्पेशल आणि युनिक करतोय असं वाटायचं तेव्हा ब्रेड खाताना. कारण ८०-९० च्या दशकात ब्रेड हा तसा मध्यमवर्गीय लोकांच्या जीवनाचा भाग नव्हताच. धिरडं, थालीपीठ, पोहे, उपमा याचंच आमच्या जिभेवर राज्य होतं तेव्हा. आणि तसंही ब्रेड खाणं तब्येतीला फारसं चांगलं नसतं. कारण त्यात मैदा असतो, असंच नेहमी ऐकलेलं. त्यामुळे ब्रेड हा तसा फार भाव खाऊन जाणारा पदार्थ नव्हता तेव्हा.

ब्रेडची खरी ओळख

९८ साली जेव्हा अमेरिकेला आलो तेव्हा MS करताना ब्रेडचा खूपच मोठा आधार मिळायचा. पोळ्या रोज करायचा कंटाळा आणि भात काही सतत खाऊ शकत नाही त्यामुळे मग वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड खायला सुरुवात झाली. अमेरिकेतले वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड पाहून पहिल्यांदा खूप नवल वाटायचं. नंतर  जॉब करायला लागल्यावर आणि घरी स्वयंपाक करायला लागल्यावर घरीच ब्रेड बनवायला सुरुवात केली. बेकिंग हा प्रकार त्यापूर्वी कधीच केला नव्हता. अमेरिकेत घरीच ओव्हन असल्याने आणि ब्रेडला लागणारं साहित्य अगदी सहजी उपलब्ध असल्याने वीकएंडला ब्रेड करणं सुरू झालं. आता भारतातही बऱ्याच घरात ओव्हन किंवा मायक्रोवेव्ह असल्याने  ब्रेड घरीच करणं सोपं होऊ शकतं.

असा जन्मला ब्रेड

ब्रेडची जन्मकथा मजेशीर आहे. असं म्हणतात की खूप वर्षांपूर्वी कोणीतरी अनावधानाने गव्हाच्या पिठात पाणी मिसळलं आणि ते तसंच २-३ दिवस बाहेर राहिलं. काही दिवसांनी  ते मिश्रण नैसर्गिकरित्या आंबवलं गेलं आणि त्यावर बुडबुडे यायला लागले. आता याचं करायचं काय,असा प्रश्न पडला. मग भट्टीत ते मिश्रण भाजून बघण्याचा प्रयत्न केला आणि आधुनिक ब्रेडचा जन्म झाला. अशी मजेशीर सुरुवात असलेल्या ब्रेडचा नंतरचा प्रवासही अनोखा आहे.

ब्रेड – पदार्थ नव्हे, संस्कृती

सर्वसाधारणपणे युरोपमध्ये खूप प्रसिद्ध असलेला ब्रेड हा मध्यपूर्वेत, मोरक्को, इजिप्त इथेही खूप प्रसिद्ध आहे. या देशांच्या लोकजीवनाचा अविभाज्य भागच झाला आहे. यात  मुळीच अतिशयोक्ती नाही. मध्यंतरी नेटफ्लिक्सवर मी मोरक्कोच्या ब्रेड संस्कृतीविषयी  एक माहितीपट पाहिला आणि  अचंबितच झालो.  ब्रेड हा निव्वळ एक खाद्यपदार्थ नाही. त्याभोवती त्या देशाची प्रगल्भ संस्कृती गुंफलेली आहे. ब्रेड बनवायला खरं तर फक्त तीन गोष्टींची गरज असते – पीठ, पाणी आणि हवा.  बहुतांशी ब्रेड बघाल तर ते दाबल्यावर त्यांचं आकारमान कमी होतं. कारण त्यातली हवा निघून जाते. पण आंबवण्याच्या प्रक्रियेमुळेच पीठ आणि पाण्याचा हा गोळा spongy अशा ब्रेडमध्ये रूपांतरित होतो. आजकाल बाजारात active instant yeast मिळतं. त्यामुळे नैसर्गिकरित्या आंबवण्यापेक्षा झटपट ब्रेड  तयार करता येतो.

कालांतराने ब्रेडमध्ये लोक विविध मसाले, हर्ब्ज, भाज्या घालायला लागले आणि नवनवीन प्रकारचे ब्रेड बाजारात दिसू लागले. ब्रेडमध्ये प्रामुख्याने गव्हाचं पीठ वापरतात. पण हल्ली अनेक वेगवेगळ्या पिठांचेही ब्रेड बनवले जातात. उदाहरणार्थ राजगिरा, बदाम, तांदूळ, नारळ, मका यांची पिठं. Gluten चं वावडं  असलेल्या लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचं पीठ वापरून ब्रेड बनवता येतो. ब्रेड उत्तम प्रकारे भाजण्यासाठी उत्तम प्रकारचा ओव्हन असणं, ओव्हन pre -heat असणं,  मिश्रण ठराविक तापमानावरच भाजलं जाणं आवश्यक आहे. यीस्टचं योग्य प्रमाण, त्यात कोमट पाणी घातल्यावर त्यातले bacteria active होणं खूप महत्त्वाचं असतं. यीस्ट जर नीट ऍक्टिवेट  झालं नाही तर ब्रेडचा पोत बिघडू शकतो. त्यामुळे चांगला ब्रेड बनवण्यासाठी ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं.

मी स्वतः ब्रेड मेकिंग मशीन वापरत नाही, कारण कणिक योग्य प्रकारे भिजवण्याचं काम मशीन नाही करू शकत. त्या बाबतीत मी खूप जुन्या मतांचा आहे. जोपर्यंत मी माझ्या स्वयंपाकाला हाताने स्पर्श करत नाही किंवा जिभेवर घेऊन चव बघत नाही किंवा नाकाने वास घेत नाही, तोपर्यंत मला समाधान मिळत नाही. मी आणि अमित सिंगापूर, भारत, अमेरिका इथे राहिलो आहे. त्यामुळे या प्रवासात ज्या ज्या ब्रेड्सची माझी ओळख झाली आणि मला आवडले, त्याबद्दल मी इथे लिहिणार आहे. एरवी, ब्रेड हा विषय इतका मोठा आहे की लिहायला बसलो तर ४-५ पुस्तकंसुद्धा कमी पडतील.

काया टोस्ट 

अमित आणि मी सिंगापूर  मध्ये राहात असताना मला या ब्रेडची ओळख झाली. शनिवारी सकाळी सिंगापूरमधले बहुतांशी लोक killiney कॉफी शॉपमधल्या काया टोस्टसाठी अगदी लाइन लावून असतात. आम्ही ऑर्चर्ड रोडच्या जवळ राहायचो आणि हे कॉफी शॉप तिथेच आहे. ब्रेकफास्ट पदार्थ म्हणून प्रसिद्ध असलेला हा काया टोस्ट सिंगापूरवासियांसाठी अगदी छान कंफर्ट फूड आहे. कोळशाच्या भट्टीवर टोस्ट केलेला ब्रेड आणि त्यावर मस्त बटर आणि काया जाम लावून हा ब्रेड बनवतात. काया जाम हा सिंगापूरचा नारळ आणि अंडी वापरून केलेला पारंपरिक जाम आहे. तुम्ही सिंगापूरला गेलात तर अवश्य हा जाम आणि काया टोस्ट खा. हा काया टोस्ट, उकडलेली अंडी आणि तिथल्या लोकल कॉफी (kopi ) किंवा चहा (teh ) बरोबर अप्रतिम लागतो.

इंजेरा

मला प्रवास करायला खूप आवडतो. इथिओपियन जेवण हे माझ्या आवडत्या जेवणांपैकी एक आहे. आपल्या भारतीय जेवणाच्या चवींशी जवळचं असलेलं म्हणून असेल किंवा ते आपल्यासारखं खाली मांडी घालून बसून जेवतात म्हणून असेल, मला हे जेवण खूप आवडतं. मी लॉस एंजेलीसला  मित्रांकडे गेलो होतो तेव्हा पहिल्यांदा इथिओपियन पदार्थ खाल्ले. तेव्हापासून मी या जेवणाच्या प्रेमात आहे. इंजेरा हा त्यांचा लोकल ब्रेडचा प्रकार आहे. तो त्यांच्या जेवणाचा मध्यबिंदू आहे. अगदी आपल्या थाळीसारख्या आकाराचा असलेला इंजेरा ब्रेड ताटभर पसरलेला असतो आणि मग त्यावर वेगवेगळ्या भाज्या, मांस, सलाड वगैरे मांडलेलं असतं. आपण जसे पोळीचे  तुकडे करून भाजीबरोबर खातो तसंच या इंजेराचे तुकडे त्या भाज्यांबरोबर खायचे. ४-५ जणांत मिळून एक थाळी असते. हा इंजेरा ब्रेड आणि भाज्या एकमेकांबरोबर शेअर करत, अंगत पंगत करत जेवण्याचा हा प्रकार आहे. टेफ या इथिओपियातल्या स्थानिक धान्यापासून हा ब्रेड बनवलेला असतो. याचा पोत आपल्या डोश्याच्या जवळपास जाणारा असतो. टेफचं उत्पादन मर्यादित असल्याने हा धान्यप्रकार बऱ्यापैकी महाग असतो. त्याला पर्याय म्हणून गहू, बारली, मका किंवा तांदूळ याचं पीठ वापरूनही इंजेरा बनवतात. टेफचं पीठ पाण्यात भिजवून २-३ दिवस बाहेर ठेवून नैसर्गिकरित्या आंबवलं जाते. त्यामुळेच इंजेराला थोडीशी आंबट चव असते. अशा इंजेरावर  वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, स्ट्यू, सॅलड ठेवून खाल्लं जातं. खाली असलेला इंजेरा वरच्या खाद्यपदार्थांच्या चवी शोषून घेतो. त्यामुळे तो इंजेरा स्वादिष्ट बनतो. इथिओपियन जेवण जेवणं हा एक सुंदर अनुभव आहे. आणि इंजेरा हा त्या अनुभवाचा महत्वाचा घटक आहे.

ब्रेडस्टिक

मी अमेरिकेत येईस्तोवर इटालियन फूड कधीच खाल्ले नव्हते. पहिल्यांदा मी ब्रेडस्टिक्स खाल्ल्या त्या ऑलिव्ह गार्डन नावाच्या इटालियन रेस्टॉरंटमध्ये. मला या ब्रेडचा पोत  आणि चव खूप आवडली.  मी ज्या ब्रेडस्टिक्स खाल्ल्या त्या एकदम मऊ  आणि लांबुडक्या होत्या. पण नंतर मला कळलं की पारंपरिक ब्रेडस्टिक्स कुरकुरीत आणि पेन्सिलीच्या आकाराच्या असतात. ब्रेडचाच हा एक प्रकार जो बहुतांशी इटालियन  रेस्टॉरंट्समध्ये क्षुधावर्धक म्हणून दिला जातो. मला स्वतःला ह्या ब्रेडस्टिकबरोबर इटलीचं प्रसिद्ध bruschetta आवडतं. ताजे  टोमॅटो, बेसिल, लसूण आणि ऑलिव्ह ऑइल मिसळून केलेली ही इटालियन कोशिंबिर या कुरकुरीत ब्रेडस्टिक्सबरोबर अफलातून लागते. गार्लिक सॉस, पार्मेसान चीज ही जोडीदेखील या ब्रेडस्टिक्सबरोबर छान लागते. एकदा तर मी या ब्रेडस्टिक्स साखरेचा पाक आणि दालचिनीचा स्वाद  याबरोबर सर्व्ह केलेल्या बघितल्या आहेत.  डेजर्ट म्हणूनही हा प्रकार छान लागत असणारच.

टॉर्टिला

तुम्ही अमेरिकेत राहात असाल आणि मेक्सिकोचा हा प्रसिद्ध पोळीसारखा प्रकार खाल्ला नसेल तर आश्चर्यच! अमितला आणि मला मेक्सिकन फूड प्रचंड आवडतं. गहू किंवा मक्याच्या पिठापासून बनवलेला अगदी आपल्या पोळीच्याजवळ जाणारा हा ब्रेडचा प्रकार बीन्स, मेक्सिकन राईस, सालसा, guacamole (अवाकाडो फळापासून बनवलेली चटणी) याच्याबरोबर खूपच छान लागतो. मागच्या वर्षी आम्ही Cancun आणि Puerta Vallerta या मेक्सिकोमधल्या दोन शहरांत गेलो होतो. तिथे हा टॉर्टिला घरी कसा बनवतात हे प्रत्यक्ष पाहिलं. आमचा मित्र Josue चे Puerta Vallerta मध्ये स्वतःचं रेस्टॉरंट असल्याने त्याने आम्हाला टॉर्टिला  बनवण्याचं प्रात्यक्षिकच दिलं. अतिशय प्रेमळ अशा मेक्सिकन लोकांच्या खाद्यसंस्कृतीमधला टॉर्टिला ब्रेड एकदा तरी खाऊन बघायलाच हवा.

बनाना ब्रेड

अमेरिकेत मी विद्यार्थी असताना माझ्या होस्ट फॅमिलीकडे पहिल्यांदा केळ्याचा हा ब्रेड खाल्ला आणि अक्षरशः प्रेमात पडलो. आपण सत्यनारायणाच्या पूजेला केळं घालून जो प्रसाद करतो त्या चवीची थोडीशी आठवण करून देणारा, अतिशय मऊ आणि खुसखुशीत असलेला हा ब्रेड भारतीयांना नक्की आवडेल असा आहे. खूप वेळा केळी खूप दिवस बाहेर राहून काळी पडलेली असतात तेव्हा तर हा ब्रेड नक्कीच करून बघावा असा आहे. संध्याकाळच्या चहाबरोबर छान गरम गरम बेक केलेला हा ब्रेड लोणी किंवा बटरबरोबर खायला अप्रतिम लागतो. हा ब्रेड मी खूप वेळा करत असतो. ब्रेड ओव्हनमध्ये बेक  होत असताना घरभर जो काही छान सुगंध पसरतो, तो अनुभव काही वेगळाच ! हा ब्रेड बनवायला खूप सोपा आहे. मात्र तो अगदी आतपर्यंत शिजला आहे की नाही हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. त्याची टूथपिक टेस्टची टीप मी खाली दिली आहे.

साहित्य – २ कप मैदा, १ टीस्पून बेकिंग सोडा, १/४ टीस्पून  मीठ , १/२ कप  बटर, ३/४ कप ब्राउन शुगर (पांढरी नेहमीची साखर वापरली तरी चालेल, पण ब्राउन शुगर ने कलर छान येतो. पिठीसाखर मात्र शक्यतो वापरू नका.), २ अंडी फेटून , १/३ कप पिकलेल्या केळांचा कुस्करा .

कृती –

१. प्रथम ओव्हन १७५ डिग्री सेंटीग्रेडला प्री-हीट  करून घ्या. ९ x ५ इंच आकाराचा ब्रेडचा पॅन घ्या. त्याला खालून तूप किंवा बटर लावून ठेवा.

२. एक मोठ्या बोलमध्ये मैदा, बेकिंग सोडा, मीठ एकत्र करा. मैदा घेताना सपिटाच्या चाळणीने चाळून  घ्या.  हे कोरडं मिश्रण बाजूला ठेवून द्या.

३. दुसऱ्या बोलमध्ये बटर आणि साखर छानपैकी फेटून घ्या. हे बटर आणि साखरेचं मिश्रण एकजीव व्हायला पाहिजे. आता त्यात फेटलेली अंडी आणि कुस्करलेली केळी घाला. सगळं मिश्रण नीट एकजीव होईस्तोवर हलवा. आता हे केळीचं मिश्रण पिठाच्या कोरड्या मिश्रणात एकत्र करा. आणि परत सगळं एकत्र एकजीव करा. छानपैकी सैलसर पीठ भिजलं जाईल.

४. हे मिश्रण आता आपल्या ब्रेडच्या पॅनमध्ये ओता आणि ब्रेड pre heated ओव्हन मध्ये बेक करायला ठेवा.

५. साधारण १ तासांत  ब्रेड छान भाजला जाईल. १ तासाने, टूथपिक घेऊन ब्रेडच्या मधोमध चेक करा. टूथपिक बाहेर येताना एकदम कोरडी बाहेर आली पाहिजे. ब्रेड जर शिजला नसेल तर टूथपिक आतल्या पिठासकट बाहेर येते. असं जर झालं तर आणखी ५-१० मिनिटं ठेवा.

६. नंतर पॅनसकट ब्रेड बाहेर काढून १० मिनिटं ठेवा. नंतर पॅनमधून बाहेर काढून एका जाळीवर (wire rack) ठेवा. यामुळे त्याला खालून हवा मिळेल.

७. तुम्हाला हव्या तशा स्लाइस करून गरमागरम ब्रेडचा आस्वाद घ्या.

होल व्हिट ब्रेड – कणकेचा ब्रेड.

भारतीयांना whole wheat अर्थात गव्हाच्या पिठाचं महत्त्व आहेच. आपल्याकडे जी कणीक मिळते त्यात गव्हाचा कोंडा फारसा नसतो. पण अमेरिकेत जे whole wheat पीठ मिळतं ते आपल्या कणकेएवढं मऊसर नसतं.  ते मी या ब्रेडसाठी वापरतो. हिवाळ्यात इकडे खूप थंडी असते. तेव्हा गरम गरम सूपबरोबर हा कणकेचा ब्रेड पोटभरीचा होऊन जातो. शिवाय हा ब्रेड करताना तुम्ही पिठाचा गोळा तयार करून फ्रीझरमध्ये ठेवू शकता. मग काय.. हवं तेव्हा तुम्ही फ्रेश ब्रेड बेक करू शकता.

साहित्य

३ कप कोमट पाणी, २ अॅक्टिव्ह ड्राय यीस्टची पाकिटं (०. २५ once ची प्रत्येकी), १/३ कप मध, ५ कप unbleached मैदा (मैदा नेहमी unbleached म्हणजे फार प्रक्रिया न केलेला वापरावा जेणेकरून त्यातील जीवनसत्वं तशीच राहतील), ३ टेबलस्पून बटर, १ टेबलस्पून मीठ, १/३ कप मध, ५ कप कणीक (इकडे whole wheat flour म्हणून वेगळं पीठ मिळते, ते मी वापरतो. त्यात गव्हाचा कोंडा असतो. ते नाही मिळालं तर कणीक वापरूनसुद्धा आपण करू शकतो), २ टेबलस्पून वितळलेले बटर, १  टीस्पून जिरे (ऐच्छिक)

कृती

१. एका मोठ्या बोलमध्ये कोमट पाणी, यीस्ट, आणि १/३ कप मध एकत्र करा. यीस्ट छान पैकी अॅक्टिव्हेट होण्यासाठी पाणी कोमट हवं. खूप गार किंवा खूप गरम नको. या मिश्रणात ५ कप मैदा घाला आणि मिश्रण हलवा. आता हे मिश्रण अगदी छान गोळा होणार नाही, असं ३० मिनिटं ठेवा. आपलं यीस्ट छान अॅक्टिव्हेट होण्यासाठी हा वेळ आवश्यक आहे. यीस्ट छान अॅक्टिव्हेट झालं की तुम्हाला पीठ थोडेसं फुगलेलं दिसेल आणि थोडे बुडबुडेही दिसायला लागतील.

२. आता या पिठात ३ टेबलस्पून बटर, उरलेला १/३ कप मध आणि मीठ घाला आणि छान हलवा. त्यात आता २ कप कणीक घाला आणि साधारण गोळा बनवायला सुरुवात करा. पीठ थोडं सैलसर असेल. त्यानंतर आणखी थोड्या कोरड्या कणकेवर ब्रेडची कणीक मळा. पिठाचा छान गोळा होण्यासाठी हळूहळू आणखी कणीक वापरावी लागते. या प्रक्रियेत मला साधारण २-४ कप कणीक लागते. त्यामुळे सुकी कणीक बाजूला तयार ठेवा. आपला पिठाचा गोळा थोडासा चिकट असेल. परंतु ५-१० मिनिटे मळल्याने हळूहळू सुटा होईल.

३. आता एका बोलला आतून ऑलिव्ह ऑइल लावून घ्या. भिजवलेला कणकेचा गोळा या बोलमध्ये ठेवा. आपल्या कणकेला सगळीकडून ऑलिव्ह ऑइल लागेल हे बघा. आता बोलवर एक नॅपकिन ठेवून घरातील उबदार जागी पीठ ठेवून द्या. यीस्टमुळे पीठ फुगायला सुरुवात होते. साधारण १-२ तास तरी पीठ छान फुगू द्या. बोल उबदार जागी नाही ठेवला तर पीठ पटकन फुगत नाही, हे लक्षात ठेवा.

४. आता हे मस्त फुगलेलं पीठ परत ओट्यावर काढा आणि ते आणखी नीट मळून घ्या. (मी पिठाला चक्क गुद्दे मारतो. घरात लहान मुलं असतील तर त्यांना हे काम अवश्य द्या. त्यांना ते खूप आवडतं. माझ्या भाच्यांना हे काम खूप आवडतं.) आपण जे पीठ भिजवलेलं आहे त्यात ब्रेडचे ३ लोफ होतात. त्यामुळे आता हे जे पीठ आहे त्याचे ३ भाग करा. तुम्ही एका वेळेस एकच ब्रेड करत असाल तर बाकीचे दोन ब्रेडचं पीठ फ्रीझरमध्ये ठेवून देऊ शकता.

५. आता ओव्हन १७५ डिग्री सेन्टिग्रेडवर गरम करा. ओव्हन प्री हीट झाला की मगच त्यात ब्रेड बेक करायला ठेवा. आपण २५-३० मिनिटं ब्रेड बेक करणार आहोत. साधारण २५ मिनिटांनी तपासून पहा. वरचा थर गडद तपकिरी झाला असेल आणि टूथपिक मध्यभागी घालून बाहेर कोरडी येत असेल तर ब्रेड झाला असं समजावं. खूप वेळेला ब्रेडचा वरचा थर  कडक होतो, त्यामुळे ब्रेड बाहेर काढला की वरून तूप किंवा बटर लावा. ब्रेड गार होण्यासाठी ओव्हनच्या बाहेर १०-१५ मिनिटं ठेवा. नंतर सुरीने आपल्याला हव्या तशा स्लाइस करा. गरम गरम ब्रेड मस्तपैकी तूप किंवा बटर बरोबर खा. हा ब्रेड फ्रिजमध्ये ३-४ दिवस छान टिकतो. उरलेला ब्रेड हवाबंद डब्यात फ्रिजमध्ये ठेवून हवा असेल तेव्हा मायक्रोवेव्ह मध्ये ३० सेकंद गरम करून खावा.

फोकाशिया

हा ब्रेड मी पहिल्यांदा आमची मैत्रीण सारा हिच्याकडे खाल्ला होता. ती मूळची युकेची आहे, पण अगदी जगभरातले ब्रेड घरी आवडीने करत असते. हा ब्रेड आपल्या पिझ्झाच्या जवळपास जाणारा आहे. असंही म्हणतात की, पिझ्झाचा जन्म याच ब्रेडपासूनच झाला आहे. अतिशय चविष्ट असा हा ब्रेड तुम्ही नक्की करून पहा. मूळ इटलीत असलेल्या या ब्रेडने आता जगभरातल्या खवय्यांच्या मनात घर केलं आहे. याला आपले नेहमीचेच ब्रेड करण्यासाठी लागणारे घटक पदार्थ लागतात. आणि तो बनतोही पण पटकन. वेगवेगळ्या प्रकारचे हर्ब्ज, ऑलिव्ह ऑइल, खडे मीठ, कांदा, चीज, आवडत असेल  तर मांस अशा गोष्टी यावर टॉपिंग्ज  म्हणून टाकता येतात.  माझा मित्र शैलेशची आई नुकतीच इकडे आली होती, तेव्हा मी हा ब्रेड केला होता. त्यांना हा ब्रेड खूपच आवडला. मला पण त्या पिढीच्या कोणाला तरी हा ब्रेड आवडला, हे पाहून खूप हुरूप आला. तुम्ही पण नक्की हा ब्रेड करून पहा आणि घरातल्या सर्वांना खायला द्या.

साहित्य – ३. ५ कप मैदा, ३ टेबलस्पून wheat germ (हे नाही मिळालं तर गव्हाचा कोंडा मिळतो, तो वापरला तरी चालेल), १ टेबलस्पून इन्स्टंट यीस्ट, १/४ कप ऑलिव्ह ऑइल, १ टेबलस्पून sea salt (हे खड्याच्या रूपात असते)

कृती –

१. प्रथम मैदा सपीटाच्या चाळणीने चाळून एका बाउल मध्ये घ्या. त्यात wheat germs आणि यीस्ट घालून थोडंसं हलवा.

२. आता आपल्याला यीस्ट अॅक्टिव्हेट करण्यासाठी कोमट पाणी घालायचं आहे. १ कप कोमट पाणी आणि २ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल घाला. ऑलिव्ह ऑइल नसेल तर आपलं साधं गोडेतेलसुद्धा चालेल. आता हे मळायला घ्या. बॉलच्या आकाराचा शेप होईस्तोवर साधारण ३-४ मिनिटे मळा. आपल्याला मऊसर अशी कणीक भिजवायची आहे, त्यामुळे गरजेप्रमाणे थोडे थोडे पाणी घाला. आता हा कणकेचा गोळा आपण फुगायला ठेवणार आहोत. यीस्ट घातल्यानंतर ते अॅक्टिव्हेट होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्यामुळे हे मिश्रण २०-३० मिनिटे उबदार जागी फुगायला ठेवून द्या.

३. साधारण अर्ध्या तासाने आपला पिठाचा गोळा बोलमधून बाहेर काढून परत मळायला घ्या. आता यात १ टीस्पून मीठ घालून परत मळायचं आहे. साधारण १०-१२ मिनिटे छानपैकी मळून घ्या. मी मिक्सर किंवा फूड प्रोसेसर न वापरता हातानेच मळतो. थोडा जोर द्यावा लागतो, पण आपल्या हाताने केलेल्या गोष्टींची चव मिक्सरवर थोडीच येणार आहे? त्यामुळे जिथे शक्य असेल तिथे हाताचाच वापर हे पीठ भिजवताना करा. १०-१२ मिनिटांनी मऊसर असा कणकेचा गोळा तयार होईल.

४. एका बोलला आतून ऑलिव्ह ऑइल लावून ठेवा. त्यात हा कणकेचा गोळा ठेवा. सगळीकडून ऑलिव्ह ऑइल लागलं आहे याची खात्री करून घ्या. आता बोलवर एक नॅपकिन टाकून साधारण १ तास फुगायला ठेवून द्या. उबदार जागेवर हे ठेवून द्या. त्यामुळे आपलं पीठ मस्तपैकी फुगून येईल. जेवढं पीठ फुगेल आणि स्पंजासारखं होईल तेवढा आपला ब्रेड छान होतो.

५. आता ओव्हन २५० डिग्री सेन्टिग्रेडवर तापवा. तयार केलेलं पीठ कोणत्याही पसरट आणि थोड्या खोलगट अशा बेकिंग पॅनमध्ये घाला. पीठ सगळीकडे पसरवून घ्या. बेकिंग पॅनचा सगळा भाग भरला गेला पाहिजे. पीठ थोडं चिकट असल्याने लगेचच पूर्णपणे पसरेल असं नाही. तसं असेल तर ५ मिनिटं तसंच ठेवून द्या.

६. आता आपण या ब्रेडवर टाकायला टॉपिंग्ज तयार करू. एका बोलमध्ये थोडे ऑलिव्ह ऑइल, अगदी थोडे पाणी, खडे मीठ एकत्र करा. पाणी खूप घेऊ नका. थोडा सैलसरपणा येण्यासाठी लागेल तेवढंच पाणी घ्यायचं आहे. तसंच वेगवेगळ्या प्रकारची हर्ब्ज (थाइम, बेसिल, रोझमेरी वगैरे), लसणाचे बारीक काप, चीज हेही आपण वापरू शकतो. या ब्रेडवर लसणाचे काप अप्रतिम लागतात.

७. आता आपल्या पॅनमध्ये पसरवलेल्या कणकेवर आपल्या तळव्यांच्या मागच्या बाजूने हळू हळू दाबा, म्हणजे थोडे खड्डे पडतील. असं केल्याने ब्रेडला छान पोत येतो. वरून आपलं टॉपिंग टाका. यात प्रथम ऑलिव्ह ऑइल, मीठ आणि पाणी टाकून केलेलं मिश्रण वरून शिंपडा. नंतर हर्ब्ज, लसूण इत्यादी सगळीकडे पेरा. अगदी छान नक्षीकाम केल्यासारखा हा ब्रेड दिसतो. घरात लहान मुलं असतील तर त्यांना टॉपिंग्ज लावायला सांगा. या गोष्टी मुलं आवडीने करतात.

८. आता आपला ब्रेड ओव्हनमध्ये बेक करायला ठेवून द्या. साधारण २०-२५ मिनिटं हा ब्रेड बेक करा. ब्रेडच्या वरचा भाग सोनेरी, तपकिरी दिसायला लागला की ब्रेड तयार झाला असं समजावं.

९. गरम गरम ब्रेड ऑलिव्ह ऑइल किंवा इतर कोणतेही डिप /चटणीबरोबर खायला देऊ शकता. बरोबर कोणतीही रेड वाइन असेल तर मग एकदम छान माहौल बनून जाईल.

सर्व वाचकांना दिवाळीच्या अनेक शुभेच्छा. तुम्ही अमेरिकेत आमच्या घरी अवश्य या आणि माझ्या हातचे जेवून जा हे आग्रहाचे मनापासून आमंत्रण !!

समीर समुद्र

11138648_10153271035186913_4970110221696926047_n

मी मूळचा पुण्याचा. परंतु गेले १८ वर्षे अमेरिकेत आहे. शिक्षण इंजिनीरिंग आणि MBA असे असले तरी स्वयंपाकाची अतिशय आवड, त्यामुळे वीकएंडला किंवा संध्याकाळी किचनमध्ये वेगवेगळे प्रयोग चालू असतात. माझी आई नोकरी करत असल्याने लहानपणापासूनच स्वयंपाकाची आणि घरकामाची सवय होती. माझा जोडीदार अमित आणि मी कामानिमित्त फिरत असतो, त्यामुळे नवीन cuisines ट्राय करणे, घरी त्यातले प्रयोग करून बघणे चालू असतं. माझे भाचे – ध्रुव आणि शर्व हे पण आमच्याच गावात राहतात त्यामुळे त्यांना पण मी स्वयंपाक करताना मदतीला घेत असतो. लहान मुलांना बेसिक स्वयंपाकाची सवय आणि गोडी पहिल्यापासून लावली पाहिजे ह्या मताचा मी आहे, जेणेकरून ते कुठेही गेले तरी अडणार नाही असे मला वाटते.

फोटो – समीर समुद्र     व्हिडिओ – YouTube

2 Comments Add yours

  1. शलाका says:

    खूप छान माहीती👍

    Like

  2. Nupur Mehta says:

    तुमचा लेख फारच उत्तम झाला आहे. मला पण ब्रेड करायची फार आवड आहे, त्यामुळे वाचायला मजा आली. तुमचं जेवायला या हे आमंत्रण वाचून थोडासा research केला. Once again realized that world is really small. I am a Kelley 2015 graduate 🙂

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s