प्रीती देव
धोनो धान्यो पुष्पे भोरा, अमादेर एई बोशुनधोरा
ताहार माझे आछे देश एक, शोकोल देशे शेरा……
ओ शे शोप्नो दिये तोईरी शे जे श्रीष्टी दिये घेरा…..
द्विजेंद्रलाल रॉय ह्यांनी संपूर्ण वसुंधरेची स्तुती करत बंगालचीही स्तुती केली आहे. ह्या कवितेतून बंगालची सुंदरता आपल्या डोळ्यांपुढे येते. निसर्गसानिध्यातल्या बंगाल प्रदेशात पंधरा वर्षं राहून तिथल्या संस्कृतीविषयी वेगळीच आपुलकी निर्माण झाली आहे.
सिटी ऑफ जॉय अशा शहरात म्हणजेच कोलकात्याला माझं शिक्षण झालं. इथल्या प्रत्येक मुलीप्रमाणेच मला गायनाची आणि नृत्याची आवड निर्माण झाली. मा दुग्गा, भोद्रो लोक, बाऊल गाणारा, माछेर झोल, अड्डा नेहमीचेच कानावर पडणारे शब्द. १२ तास लोडशेडींग आणि काही महिने संपावर जाणारं हे शहर.
ठेला, माणसाने ओढलेल्या रिक्षा, ट्राम, मिनी बस अशा सवारीने मी या शहरात फिरले. खूप सुंदर अनुभव आहेत ह्या शहरात अनुभवलेले.
आठवण येते सकाळच्या शाळेच्या वेळेची. आमच्या घरासमोर राहणाऱ्या दीदा (आजी) आणि माशीची (मावशी) ओट्यावर उनून (मातीची चूल) पेटवून दिवसाच्या स्वयंपाकाला लागायच्या. त्या घरातील पुरुष रोज सकाळी बाजारहाट करून तोर्कारी, माछ, मंग्शो आणि रोज लागणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांची सोय करत. रोज भाजी बाजारात जाऊन ताज्या भाज्या आणि मासे घेऊन येणं बंगाल्यांचा छंदच आहे. सणावारी आणि एरवी कुठल्याही आनंदाच्या क्षणी अड्डा (स्नेहमिलन) आणि जेवण हे बंगाली माणसाच्या आयुष्यातले महत्त्वाचे क्षण. इंग्लंडला आल्यावर मला बऱ्याचदा अशी जाणीव होते गेट टूगेदरची ब्रिटिश सवय बहुधा बंगाल्यांनी भारतीय रूपात चालू ठेवली आहे.
दर वर्षी आम्हा सर्वांना सरस्वती पूजेला आणि दुर्गा पूजेला त्यांचं आमंत्रण असायचं. स्वागतासाठी तांदूळ भिजवून त्याच्या मिश्रणाने रांगोळीसाठी वापरून घरभर सुंदर अल्पना काढलेली. घर साधेपणाने सजवलेलं. शुक्तो, चरचरी, शाग, चटणी, भाजा, दाल, भात, लूची आणि गोड नार्केल नाडू आणि पायेशच्या जेवणाने आम्ही अगदी तृप्त व्हायचो. चटण्यांमध्ये आम सत्तो, खेजुर (खजूर) चटणी आणि पुष्कळदा टोमॅटोची गोड चटणी असायची. वीज नसणंही काही नवीन नव्हतं. जेवढा वेळ आम्ही बसून जेवण करायचो, दीदा तिचा पाखा (बांबूचा पंखा) घेऊन वारा घालत आम्हांला हवं-नको ते पाहायची, आम्हांला काय वाढायचं आहे ते माशीला सांगायची. आम्ही भावंडं लहान असल्याने आमच्या जेवणाकडे तर अगदी विशेष लक्ष असायचं. त्यांच्या आदरातिथ्याने आम्ही अगदी भारावून जायचो.
सरस्वती पूजेच्या वेळचे नार्केल नाडू आणि दुर्गापूजेच्या वेळेची भोगेर खिचुडीची चव आज २५-२६ वर्षांनंतरही अजून माझ्या जिभेवर रेंगाळते आहे. पानात वाढलेली प्रत्येक गोष्ट अगदी काळजीपूर्वक आणि तन्मयतेने बनवलेली असायची. एखाद्या पदार्थात फक्त मोहरीचं तेल आणि पांचफोडन घालायचं. जिरे पूड, हळद, लाल तिखटाचं मिश्रण घालून झोल (रस्सा) बनवायचा… तर भाजीचे तुकडे चोर्चोरी आणि शुक्तोसाठी ठरलेलेच. हे घटक, भाज्यांच्या तुकडे आणि त्यांच्या योग्य प्रमाणाने पदार्थाला चव येते हे त्यांना चांगलं माहीत होतं.
खरंच. ‘भोजोन राषिक बांगाली…’ ही म्हण अगदी उचित आहे!
शुक्तो हा मिश्र भाज्यांचा पदार्थ. शुक्तो म्हटलं की कारलं आलंच त्यात. प्रत्येक भाजीचे औषधी गुण असल्यामुळे शुक्तो जेवणाच्या सुरुवातीला खाल्लं तर शरीरासाठी चांगलं, असा समज आहे. खसखस, मोहरीचं वाटण आणि मोहरीच्या तेलात बनवलेलं शुक्तो मुखशुद्धीचं काम करते. बऱ्याच घरांमध्ये दूध वापरून शुक्तो बनवतात. मोहरीमुळे येणारी मिरमिरीत चव सौम्य करण्यासाठी दूध वापरतात.
भाजा म्हणजेच तेलात भाजलेल्या भाज्या. जेवणात कुरकुरीत चव आणण्यासाठी भाज्यांचे भजे वाढले जातात. बेगुन भाजा हा त्यातला अप्रतिम प्रकार. सोबत गोन्धोराज लेबू – लिंबाच्या फोडी. या जेवणाची लज्जत वेगळीच.
बंगालमध्ये तांदूळ जास्त प्रमाणात पिकत असल्यामुळे भात हाच त्यांचा मुख्य आहार.
कोशा, मंग्शो आणि मिष्टी पुलाव (गोड पुलाव) असा मेन्यू बऱ्याच वेळी असतो. सणासुदीला आणि विशेष प्रसंगी मैद्याची पुरी म्हणजेच लूची बनवतात. अलूर दोम लूची, चोलर दाल लूची हा पुष्कळदा न्याहारीचा मेन्यू असतो. पोईला बोईशाख, म्हणजेच नववर्षारंभ. हा दिवस भाताचाच पदार्थ खाऊन साजरा करतात आणि तोही शिळा भात! आदल्या दिवशी शिजवलेल्या भातात भरपूर पाणी, मोहरीचं तेल आणि चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून कालवतात. ह्या भातासोबत हिल्सा मासा आवडीने खाल्ला जातो.
चोर्चोरी पांच फोडोन (फोडणीचे पाच मसाले) फोडणीत घालून बनवलेली कोरडी भाजी असते. मला आवडणारी पांचमिशाली चोर्चोरी. यात पाच प्रकारच्या भाज्या असतात. मसूर, मूग, चोलार डाल मुख्यतः नेहमीच्या जेवणात भाताबरोबर वाढले जाते. श्री भगवती महामाया देवीच्या या विशाल प्रदेशात तिला भोग – नैवेद्य अर्पण करतात. या पूजेनिमित्ताने एक विशिष्ट खिचडी बनवली जाते. ही चवदार भोगेर खिचुडी. यात विशेष म्हणजे मूगडाळ तव्यावर आधी भाजून घेतात. खिचडी करण्याआधी मूग पाण्यात भिजवतात. तेलात जिरं, लवंग, वेलची, सुकी लाल मिरची, तेजपान आणि दालचिनीची फोडणी करतात. फ्लॉवर, बटाटा, आलं घालतात. भिजवलेली डाळ आणि बंगाल्यांचे प्रिय गोबिंदोभोग तांदूळ यांची ही खिचडी. मसाला म्हणून वर जिरेपूड आणि लाल तिखट. पाणी घालून, झाकण ठेवून शिजवलेला हा भात जेव्हा नैवेद्य म्हणून वाढला जातो त्याची चव निराळीच असते!!
दसऱ्याच्या वेळची गंमत आठवते. आईचा नवरात्रात उपास असायचा आणि दसऱ्याला आम्हांला हमखास आमंत्रण असायचं, मांसाहारी जेवणाचं! आम्ही भावंडं खुश असायचो. कारण नऊ दिवस घरी शाकाहार असायचा आणि आम्ही माछ, चीन्ग्री, मुर्गी, मंग्शोच्या जेवणाची अगदी आतुरतेने वाट बघायचो! बंगाल्यांच्या मांसाहारी पदार्थांमध्ये कमीत कमी मसाल्यांचा वापर करून मुख्य घटकाचं स्वरूप आणि चव जपून ठेवलेली असते. कोशा मंग्शो (मंद आचेवर शिजवलेले मास) आणि चीन्ग्री मलईकरी (कोळंबी) आणि माचेर पातला झोल अगदी आवडीने खाल्लं जातं. चीन्ग्री मलईकरी नारळाच्या दुधात बनवलेलं असल्याने त्याच्या तोडीचा आणखी कुठला पदार्थ असू शकतो, असं मला वाटत नाही! फक्त अप्रतिम!!
आता माझ्या आवडीचा विषय! गोडाचे पदार्थ! मीही दाना, मिष्टी दोई, संदेश, रोसोगोल्ला, पान्तुंआ, चमचम…. माझी यादी कदाचित अपुरी आहे! मला पुष्कळदा वाटतं, या गोड पदार्थांमुळेच बंगाली भाषा इतकी गोड वाटते ऐकायला.
मला आठवतंय, दीदा सांगायची संदेशविषयी. पूर्वी एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे चांगली बातमी किंवा निरोप घेऊन जाताना घरातल्या बायका पुरुषांना दुधाची मिठाई बनवून द्यायच्या. या कारणानेच या गोड पदार्थाला संदेश हे नाव मिळालं. दुधाचा छेना (खवा) बनवून त्यात पिठीसाखर घालून हातानेच मळून मऊ गोळा बनवतात. ह्याच गोळ्याला वगवेगळ्या साच्यात घालून पेढ्यासारखे विविध आकार दिले जातात.
छेन्याचेच रसगुल्ले साखरेच्या पाकात घालून वाफवतात. चमचम हा प्रकार रसगुल्ल्याचा भाऊ किंवा बहीण म्हटलं तरी चालेल. मात्र चमचममध्ये पाक घट्टसर असतो.
बंगाली लोक दोन प्रकारचं दही आवडीने खातात. टोक (आंबट-नेहमीचे) दोई आणि मिष्टी दोई. मिष्टी दोई हा गूळ घालून मातीच्या भांड्यात बनवलेला अतिशय सुंदर पदार्थ आहे. भापा दोई (वाफवलेले दही) मिष्टी दोईचाच एक प्रकार आहे. हा प्रकार मी घरी ओवनमध्ये बनवत असते.
कविगुरू रवींद्रनाथ ठाकुरांना खाण्याची खूप आवड होती. गोडाचे पदार्थ तर त्यांच्या अतिशय आवडीचे. असं म्हणतात की त्यांच्या ५० व्या वाढदिवसाला खास त्यांच्यासाठीच, त्यांच्या भाचीने फ्लॉवर वाफवून त्याचीच बर्फी बनवली होती. त्याला काविशम्बार्दना बर्फी असं नाव दिलं गेलं.
बंगालमध्ये गल्लोगल्ली मिठाईची छोटीमोठी दुकानं दिसतात. येताजाता मिठाई मिळेल, अशी व्यवस्था जणू करून ठेवली आहे.
दर संक्रांतीला दीदा आम्हांला तांदळाच्या घावनाशी मिळतंजुळतं पण मैदा आणि तांदळाच्या पिठीच्या मिश्रणाचे पतीसाप्ता पाठवायची. ह्यात गूळ खोबरं आणि खव्याचं मिश्रण भरलेलं असतं.
बाळाच्या अन्नप्राशनापासून ते लग्नापर्यंतच्या सर्व शुभकार्यात पायेश असलंच पाहिजे. गोबिंदोभोग तांदूळ घेऊन, दूध छान आटवून बेदाणे घालून पायेश बनवतात. विशेष म्हणजे ह्यात वेलची पूड आणि तेजपान टाकतात.
नेहमीचे जेवण तर वर्णन करण्याजोगं आहेच. त्याखेरीज बंगाली पुच्का/फुचका (पाणी पुरी), बीट चोप, शिंगरा (सामोसा), झाल मुरी (मोहरीचे तेल घालून केलेली भेळ) आणि एग्ग रोल हे कलकत्याच्या रस्त्यावर छोट्या दुकानात किंवा रेल्वेगाडीत खाण्याचे माझे अनुभवदेखील अवर्णनीय आहेत.
बीट चॉप मध्ये बटाटा, बीट, भाजलेले शेंगदाणे आणि खास भाजा मोश्ला (भाजलेला गरम मसाला) आणि आलं इतकंच असतं. पण बंगालमध्ये हे बीट चॉप आणि गरम चहा सेवन करण्याची अनुभूती महाराष्ट्रात पाऊस पडत असताना वडा पाव, भजी आणि गरम चहा घेण्यासारखीच आहे.
झाल मुरी आणि भारेरचा (मातीच्या भांड्यातला चहा)चा अस्सल अनुभव तिथल्या गल्लीबोळातून फिरूनच मिळेल!
रवींद्रसंगीत आणि नृत्य, मिष्टी दोई आणि सोन्देश, दीदा, माशी, बोन्धू बांधुबी आणि ‘सिटी ऑफ जॉय’च्या रस्त्यास्त्यांतले स्वप्नमय अनुभव यांनी माझं कोलकत्यातलं वास्तव्य भारलेलं होतं. माझ्या जीवनात या सगळ्या सुंदर आठवणी कोरून ठेवल्या आहेत. माझ्या जीवनाचा हा अभिन्न भाग आहे.
प्रीती देव
गेली ९ वर्षं special education specialist म्हणून काम करते आहे. मला स्वयंपाक करायला तसंच पदार्थांचे फोटो काढायला आवडतं.रुचिरा या आद्य रेसिपी बुकमधले सर्व पारंपरिक मराठी पदार्थ करून(ज्युली अँड ज्युलियासारखे) रुचिरा विदेशिनी ह्या पेजवर अनुभव लिहीते. Ising cakes and more हा माझा ब्लॉग आहे.
फोटो – प्रीती देव व्हिडिओ – YouTube
Preeti,
Tu sampadan kelelya yasha baddal tuze sarvapratham Abhinandan. Tula awadnarya “Bengali mithai” saarkhya agdi god shabdacha tuzya likhanat vaapar kela ahes. Tuze vishesh Abhinandan karavese vaatte mala ani Sangeeta mavshi la te tuzya Marathi bhashevar milavlelya prabhutwache. Tu tithe rahun “special education specialist” mhanun ek mothe saamaagik karyakarte ahes yacha hi abhimaan vatto amhala. Tula ya pudhe hi asech yash milo hi sadichha.
Sangeeta mavshi ani Shyam Kaka
LikeLike
लेख खूप आवडला. मी बंगाली लोकांसोबत बरीच राहिले आहे व यात लिहिलेले बरेच पदार्थ चाखले आहेत. खरंच त्यांची खाद्य परंपरा समृद्ध आहे.
LikeLike