मत्स्याहारी नॉर्वे

स्नेहा काळे

e39ff9cb73c99bbcf2540ffa1043e568

नॉर्वे हा जेमतेम ५० लाख लोकवस्ती असलेला देश. म्हणजे आपल्या पुण्याएवढी लोकवस्ती म्हणा ना. पण अतिशय संपन्न आणि त्यामुळे महागडासुद्धा. त्यात सफरचंद आणि बेरीज सोडले तर फारसे काही पिकत नाही. सर्व काही आयात. जगाच्या नकाशावर पाहिले तर अगदी छोटासा देश. पण खडकाळ समुद्र किनारा आणि विलोभनीय सृष्टीसौंदर्याने नटलेला. त्यामुळे नॉर्वेजिअन लोकसुद्धा निसर्गप्रेमी. हवामानात टोकाचे बदल, त्यामुळे खाण्याच्या पदार्थांमध्ये सिझनप्रमाणे बदल होतात.

इथल्या हवामानाशी जुळवून घ्यायलाच आपल्याला खूप वेळ लागतो. नॉर्वेजियन भाषेत एक म्हण आहे. Ikke dårlig vær, bare dårlig klær. याचा अर्थ हवामान खराब नाही तुमचे कपडे अयोग्य आहेत. हे खरंच आहे. जर व्यवस्थित कपडे घातले तर पाऊस आणि थंडीचा त्रास कमी होतो.

खडकाळ समुद्र किनारा असल्यामुळे येथे मासे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. येथील सामन हा मासा प्रसिद्ध आहे. तो खाण्यासाठी जगभरातून खूप लोक येथे येतात. तसेच त्याची निर्यातसुद्धा केली जाते. नॉर्वे हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा माशांचा निर्यातदार आहे. मासे आवडणाऱ्या लोकांनी एकदा तरी नॉर्वेला जरूर भेट द्यावी.

पारंपरिक नॉर्वेजिअन फूडमध्ये कच्च्या मालाचा वापर जास्त केला जातो. तसेच कमीत कमी साहित्याचा वापर करून पदार्थ केला जातो. यामुळे पदार्थाची मूळ चव टिकून राहते असे या लोकांचे म्हणणे आहे. मांसाहार, ब्रेड, दुधाचे पदार्थ, कंदमुळे आणि सलाड हेच जेवणातील मुख्य घटक. इथे दूध हे टेट्रापॅकमधून मिळते. दूध तापवणे वगैरे प्रकार नाही. तसेच दुधाला विरजण लागत नाही. त्यामुळे योगर्ट विकत आणून खायचे. तसेच ताक पण विकत मिळते. इथे वेगवेगळ्या फ्लेवरची योगर्ट मिळतात.

पूर्वीच्या काळी जेव्हा इलेक्ट्रिक ओव्हन नव्हते तेव्हा जे ब्रेड असायचे ते अगदी वेगळे होते. साधारण आपली भाकरी असते तसे ब्रेड. एकदा माझ्या मुलाच्या शाळेत हे ब्रेड बनवून दाखवले होते. हे ब्रेड बनवताना त्यामध्ये प्रामुख्याने बार्ली ह्या धान्याचा वापर असायचा. त्या मागचं कारण होतं नॉर्वेमधली थंडी. गहू हा फ़क़्त दक्षिण नॉर्वेमध्ये पिकत होता व तो तिकडून आयात करावा लागायचा. बार्ली हे नेहमी उपलब्ध असायचे. त्यामुळे गव्हाचे ब्रेड हे फ़क़्त सणासुदीच्या दिवशीच असायचे. हल्ली मात्र बार्लीऐवजी ओट्सचा वापर जास्त होतो.

रोजच्या जेवणाचं म्हणाल तर अगदी साधा सोप्पा स्वयंपाक. सकाळी रोज ब्रेकफास्ट (frokost) मध्ये ब्रेड, बटर, चीज आणि मटणाचे स्लाईस. या बरोबरच दूध आणि दुधाच्या पदार्थांचा वापरही खूप असतो. दुधात मुसली किंवा कॉर्नफ्लेक्स घालून खातात. लेफ्से हा ब्रेडचा प्रकार पारंपरिक आहे. लेफ्से म्हणजे बटाट्याची गोड पोळी. चवीला थोडी दालचिनी घालतात. यामध्येच कधी कधी Ham किंवा Salami चे पातळ काप घालून खातात.

ऑफिसमध्ये किंवा शाळेत जाताना दुपारचे जेवण हे प्रामुख्याने डब्यातून किंवा बॅगमधून पॅक करून नेतात त्यासाठी Matpakke हा एक विशिष्ट शब्द वापरला जातो. खरंतर इथे इतकी थंडी असते की कधी कधी प्रश्न पडतो की थंड जेवण कसं काय बरं जेवतात. जेवणात ब्रेडचा वापर मुख्य असतो. येथे ब्रेड करताना त्यामध्ये जवस, किनोआ, तीळ, भोपळ्याच्या बिया, ओट्स असे वेगवेगळे जिन्नस  वापरलेले असतात. हे ब्रेड फारच छान लागतात. त्याबरोबर बकरीच्या दुधापासून केलेले चीज खातात. जिथे कॅन्टीन असते तिथे सूप, सलाड पण मिळते.

येथील kindergarden मध्ये मुले शाळेतच जेवतात. दर शुक्रवारी मुलांना गरम जेवण असते. म्हणजे सूप, पिझ्झा, पास्ता, किंवा तांदळाची खीर करतात. हे करताना मुलांना पण मदतीला घेतात. त्यामुळे मुलांना खूपच मजा येते. मला आठवतंय एकदा माझ्या मुलाच्या शाळेत असंच एका शुक्रवारी फिश केक बनवले होते. तेव्हा त्याने पहिल्यांदा मासा असा कापताना पाहिला आणि ते बघून त्याने रडून रडून शाळा डोक्यावर घेतली होती. कारण या आधी मासे फ़क़्त मत्स्यालयातच पाहिले होते.

लहानपणापासून शाळेत स्वयंपाक करायला शिकल्यामुळे इथे मोठं झाल्यावर शक्यतो सगळ्यांनाच जेवण बनवता येते. इथे स्त्री व पुरुष असा भेदभाव नाही. स्त्रियांप्रमाणेच पुरुषसुद्धा उत्तम स्वयंपाक करतात.

इथल्या शाळांमधली एक पद्धत मला खूप आवडली. इथे दुपारी २ वाजता फ्रुटब्रेक असतो. म्हणजे शाळेत मुलांना फळे खायला देतात. ती खाऊन झाली की एकत्र बसून गाणी म्हणायची आणि त्याबरोबर घरून आणलेला छोटा डबा खायचा. यामुळे सगळी फळं खाल्ली जातात. अशा प्रकारे काही ऑफिसमध्येसुद्धा फ्रुटब्रेक असतो.

मुलांच्या डब्यात चॉकलेट किंवा बिस्कीट हे सहसा चालत नाही. गोड कमी खाण्यावर इथे भर दिला जातो. मुलांनी फ़क़्त शनिवारी चॉकलेट खायचे असा नियमच म्हणा ना. मुलांना शाळेत जे दूध मिळते त्यात सुद्धा साखर अजिबात नाही. माझ्या मुलांची मात्र फार पंचाईत होते. दोघांनाही गोड खूप आवडतं आणि दुधात साखर लागते.

नॉर्वेमधील अजून एक वैशिष्टय़ म्हणजे इथला बेरीज् सीझन. हा साधारण जूनच्या शेवटी सुरू होतो आणि साधारण ऑक्टोबरमध्ये संपतो. Strawberries (jordbær), Cloudberries (molter), Cherries (moreller), Blackberries (bjørnebær), blueberries (blåbær), Raspberries (bringbær), Cowberries (tyttbær) and solbær इतक्या प्रकारच्या बेरीज इथे मिळतात. अशी ताजी ताजी फळं तोडून खाण्याची मजा काही औरच असते. शाळेत मुलांना अगदी आवर्जून यासाठी घेऊन जातात. मग मुलं अगदी मनसोक्त आनंद घेतात. परवा माझ्या मुलाने अशाच ब्रिंगबेरिज तोडून आणल्या. त्या पाण्याच्या बाटलीत घालून खूप हलवलं. घरी येऊन ते गाळून त्याचं सरबत बनवलं. फार सुंदर लागत होतं. एकदम फ्रेश वाटलं.

या सर्व बेरीजचे जाम पण मिळतात. हे फार गोड नसतात आणि यामध्ये कुठलंही केमिकल घातलेलं नसतं. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात खाल्ले जातात. विशेषतः वॅफल आणि पॅनकेकबरोबर तर खातातच.

याचबरोबर बाकीची फळे सुद्धा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. सफरचंद, केळी, द्राक्षे, कलिंगड, संत्री, किवी, अननस ही फळे तर बाराही महिने मिळतात. गंमत म्हणजे अननसाला नॉर्वेजियन भाषेतसुद्धा अननस म्हणतात.

नॉर्वेजियन पदार्थांमध्ये तेल आणि मसाल्यांचा वापर फारच कमी असतो. सलाडमध्ये ऑलिव ऑईल वापरतात. मीठ आणि मिरपूड हे बऱ्यांच पदार्थात वापरतात. इथे मोठ्या प्रमाणात Dill चा वापर करतात. Dill म्हणजेच वाळलेला शेपू. मी तर एका दुकानात शेपूच्या फ्लेवरचे बटाटा चिप्स पण बघितलेत. मला शेपू आवडत नसल्यामुळे घ्यायची हिम्मत केली नाही. हे पारंपरिक झालं पण बेसिल, पार्सलि, ओरेगनो हे वापरण्याचं प्रमाणही वाढतंय.

येथील मुख्य जेवणात मांसाहारच मुख्य असतो. मी स्वतः शाकाहारी आहे, हे ऐकून माझ्या इथल्या नॉर्वेजियन मैत्रिणींना फार आश्चर्य वाटतं. आपले भारतीय पदार्थ इथल्या लोकांना खूप आवडतात. माझ्या मुलाला मी जो डबा देते तो त्याच्या शाळेतल्या मुलांना खूप आवडतो. म्हणून मी एकदा त्याच्या शाळेत आलू मटारची भाजी आणि पालक पराठे केले होते सगळ्या मुलांसाठी. खूप आवडीने खाल्ले सगळ्यांनी.

इथे संध्याकाळी ४ ते ६ मध्ये रात्रीचं जेवण जेवायची पद्धत आहे. सुरुवातीला मला जरा हे वेगळंच वाटायचं. इतक्या लवकर कसं काय जेवतात. पण खरंतर ४ वाजता ऑफिस आणि शाळेतून घरी आलं की खूप भूक लागलेलीच असते. त्यामुळे त्यावेळी जेवण करणे हेच योग्य असते. मग परत भूक लागली तर फळं खायची. इथे मुलं ८ वाजता झोपतात. आम्ही सुद्धा हल्ली ६.३० वाजताच जेवतो. आणि मग रात्री चहा किंवा कॉफी घ्यायची. सकाळी ७ वाजता ब्रेकफास्ट , ११ ला दुपारचं जेवण आणि ५.३० वाजता रात्रीचं जेवण अशा जेवणाच्या वेळा असतात.

इथले मांसाहारी पदार्थ बनवताना त्यामध्ये मसाले अगदीच कमी असतात. त्यामुळे ते भारतीय लोकांना फारसे रुचत नाहीत. इथे सर्व प्रकारचे मांस खाल्ले जाते. Fårikål  हा नॉर्वेचा राष्ट्रीय पदार्थ आहे. हा बकरीचं किंवा मेंढीचं मासं आणि कोबी वापरून करतात. या बरोबर उकडलेले बटाटे, गाजर आणि त्यावर pinch of dill.

Polsa म्हणजेच हॉटडॉग हे इथलं प्रसिद्ध फास्टफूड आणि त्याच्या बरोबर मस्टर्ड सॉस किंवा टोमाटो सॉस. त्याचं प्रमाण इतकं आहे की एक माणूस प्रतिवर्षी १०० म्हणजे जवळपास दर तीन दिवसांनी एक, इतके हॉटडॉग खातो. या बरोबरीने बर्गर आणि रॅप्ससुद्धा आता बरंच खाल्लं जातं.  जरी असं असलं तरी बाकीचं खाणं हे हेल्दी असतं. या बरोबर रोज व्यायाम, त्यामुळे नॉर्वेमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण फार कमी आहे. तसेच माणसे खूप काटक असतात.

कुसकुस
कुसकुस

बाहेर हॉटेलमध्ये माझ्यासारख्या शाकाहारी लोकांची फारच पंचाईत होते. काही ठिकाणी मात्र मला शाकाहारी छान खायला मिळालं. त्यांपैकी एक म्हणजे IKEA. इथे.  IKEA या दुकानाच्या रेस्टॉरंटमध्ये कुसकुस (Couscous) वापरून केलेला एक शाकाहारी पदार्थ मिळतो. खुसखुस हा एक गव्हाचा प्रकार आहे. अगदी आपला दलिया असतो तसा. तो वाफेवर शिजवतात आणि त्यामध्ये शिजवलेले गाजर, फ्रेंच बीन्स, राजमा घालतात. फोडणी वगैरे काही नसते. पण उपम्यासारखाच. हा गार खाल्ला तरी चांगला लागतो. याबरोबरच व्हेजिटेबल बॉल्स देतात. म्हणजेच भाज्या घालून केलेली गोल भजी आणि त्या सोबत काकडीची कोशिंबीर. म्हणजेच मेयोनीजमध्ये काकडी घालतात. गरमगरम खुसखुस, भजी आणि कोशिंबीर या तिन्हीचं कॉम्बिनेशन फार छान लागतं.

नॉर्वेमधली मद्याची सर्व दुकाने ही सरकारी आहेत. दारू महाग आहे कारण त्यावर जास्त कर भरावा लागतो. सरकारने हे खप नियंत्रित करण्यासाठी केले आहे. त्यामुळे नॉर्वेमध्ये मद्यपानाचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत कमी आहे.

१७ मे हा नॉर्वेचा राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी जो केक बनवतात तो खास बेरीजनी सजवतात. नॉर्वेच्या झेंड्यामध्ये पांढरा, निळा आणि लाल असे तीन रंग आहेत. म्हणून केकवर पांढऱ्या रंगाचे क्रीम लावून निळ्या आणि लाल बेरीचं डेकोरेशन. या दिवशी हॉटडॉग आणि आइस्क्रीम हेच खातात.

जसाजसा उन्हाळा जवळ येतो तसे बार्बेक्यूला सुरुवात होते. सगळीकडे ग्रीलचा घमघमाट सुटतो. दुकानातून ग्रीलचे सामान घ्यायचे. बॅग पॅक करायची आणि एखाद्या बागेत किंवा नदीकाठी बसून गप्पा मारत बार्बेक्यू करायचे आणि त्यावर ताव मारायचा. हाच सुट्टीच्या दिवशीचा प्लॅन असतो. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जिथे कुठे तुम्ही हे करता ती जागा काम झालं की स्वच्छ करायची, हे ठरलेलेच. त्यामुळे कितीही लोक जमू देत कुठेही कचरा दिसणार नाही. या दिवसात कोकबरोबरच संत्री आणि सफरचंदाचा ज्यूस पितात.

हळूहळू थंडी पडायला सुरुवात होते आणि वाफाळलेल्या कॉफीचे मग लोकांच्या हातात दिसू लागतात. या लोकांना कॉफी अगदी प्रिय. इथे ब्लॅक कॉफी पितात. मला मात्र एवढी नाही आवडली. इथली कॉफी जरा जास्तच कडवट वाटते. जशी जशी थंडी पडायला सुरुवात होते तशी सगळे अगदी आतुरतेने वाट बघतात ती ख्रिसमसची. डिसेंबरचा पूर्ण महिना सेलिब्रेशन सुरू असतं. या दिवसात एक स्पेशल गोड ब्रेड बनवतात. त्याला julekake म्हणतात. यामध्ये बेदाणे आणि वेलची घालतात. पण याचबरोबर जिंजरब्रेड बिस्किट्स (paperkaker) महत्त्वाची. मैदा वापरूनच बनवतात, पण यामध्ये सुंठ आणि दालचिनी घालतात. मी बेर्गन इथे राहते. इथे ही बिस्किट्स वापरून एक मोठ्या शहराचा देखावा तयार करतात. त्याला नॉर्वेजियनमध्ये Paperkakebyen असं म्हणतात. हे बघायला मुलांना फारच मजा येते.

बिस्किटांचा देखावा
बिस्किटांचा देखावा

२४ डिसेंबर म्हणजे Christmas Eve. या दिवशी भाताची खीर बनवतात. त्यावर दालचिनी, बटर किंवा क्रीम घालून खातात. आणि एक गमतीशीर परंपरा आहे. या खिरीत एक बदाम घालतात. तो बदाम ज्याच्या वाट्याला येईल त्याला एक marzipan pig मिळते. Marzipan म्हणजे बदाम आणि पिठीसाखरेपासून केलेला एक कणकीसारखा गोळा. याला पिगचा आकार दिलेला असतो. Marzipan चा वापर हा प्रामुख्याने केकवर डेकोरेशनसाठी केला जातो. मुख्य जेवण हे पोर्क, मटण किंवा वाळलेले मासे यापासून केलेले असते. त्याबरोबर व्हिनेगर घालून शिजवलेला कोबी आणि उकडलेला बटाटा खातात. हे घरीच बनवले जाते. या दिवशी Gløgg हे ड्रिंक घेतात. हे रेड वाईनपासून तयार करतात. थोडे स्पायसी असते. पण बरेच लोक non alcoholic version ला प्राधान्य देतात. या दिवशी संध्याकाळी बहुतेक हॉटेल्स बंद असतात. रस्ते सुद्धा सामसूम असतात. सर्वजण आपापल्या कुटुंबातील लोकांबरोबर एकत्र हा दिवस साजरा करतात.

एकूणच काय, पौष्टिक खाण्यावर नॉर्वेजियन लोकांचा भर आहे. पण शेवटी एक सांगू, आपल्या भारतीय जेवणातला चमचमीतपणा इथे नाही. त्यामुळे आमच्याकडे आपला भारतीय स्वयंपाकच रोज असतो. हल्ली भारतीय हॉटेल्स परदेशातही होऊ लागली आहेत. पण नॉर्वे या बाबतीत थोडा मागे आहे. मी राहते त्या बर्गन शहरात फ़क़्त दोन भारतीय हॉटेल्स आहेत. तिथे फ़क़्त पंजाबी जेवण मिळते. बाहेर काही आयते उपलब्ध नसल्यामुळे इथे आल्यावर मी नवीन नवीन पदार्थ करू लागले. मदतीला यु ट्युब आहेच.

भारतात जसे व्हेज पफ्स मिळतात तसे मी इथे घरी करते. मैद्याच्या फ्रोझन शीट्स मिळतात. आत आपल्या आवडीची भाजी घालून बेक करायचं. खूप छान होतात. एकदा तर मी गोड पफ्स केले होते. खरंतर मुलाच्या शाळेत काही कार्यक्रमानिमित्त गोड पदार्थ करून द्यायचा होता. वेळ खूप कमी होता. आदल्या दिवशी केलेले गुलाबजाम शिल्लक होते. मग मैद्याच्या शीट्समध्ये अर्धा अर्धा गुलाबजाम भरला. थोडे पिस्ता आणि बदामाचे काप घातले. दुमडून बेक केलं. थंड झाल्यावर एका काचेच्या पसरट भांड्यात मांडून वर गुलाबजामचा पाक घातला. सजावटीला परत थोडे पिस्ते. हे साधारण टर्किश बखलावासारखं दिसत होतं. ह्यावर नॉर्वेजिअन लोकांनी अगदी ताव मारला.

इथे बऱ्याच वेळा मित्र – मैत्रिणींना घरी बोलावणे होते. जेवायला बहुतेक सर्व पदार्थ भारतीयच असतात. कधी कधी भरीला थोडं नॉर्वेजियन सलाड. माझ्या मैत्रिणी या भारतातील वेगवेगळ्या प्रांतांतील असल्यामुळे एकमेकीकडून निरनिराळे पदार्थ शिकता येतात. बरेचसे सणसुद्धा आम्ही एकत्र साजरे करतो. असे सगळे असले तरी कायम ओढ असते ती भारतात जायची. कारण कितीही पदार्थ आपण इथे स्वतः करत असलो तरी भारतात जाऊन वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद काही वेगळाच.

 

पिवळ्या वाटाण्याचं सूप

१ कप पिवळे वाटाणे

२ लिटर पाणी

१ कांदा मध्यम चिरून

१ गाजर चौकोनी तुकडे करून

१ लीक चिरून (हे साधारण कांद्याच्या पातीसारखं दिसतं)

१ चमचा थाइम (हे हर्ब ओव्याच्या झाडाच्या फुलांचे असते )

मीठ आणि पांढरी मिरपूड चवीनुसार

कृती

रात्रभर वाटाणे गार पाण्यात भिजवून ठेवायचे. दुस-या दिवशी हे वाटाणे स्वच्छ धुऊन त्यात पाणी घाला. यामध्येच चिरलेला कांदा, थाइम घालून उकळून घ्या. मग यामध्ये वेगळी झालेली वाटण्याची सालं चमच्यानं काढून घ्या. आता यामध्ये गाजर आणि लीकचे तुकडे घालून २ ते ३ मिनिटे उकळून घ्या. मीठ व मिरपूड घालून गरम सर्व्ह करावे.

स्नेहा काळे

profile-pic-1

 

 

 

 

 

 

 

मी मुळची कोल्हापूरची. लग्नानंतर ६ वर्ष पुण्यामध्ये होते. आता नॉर्वे मधील बर्गन या शहरात स्थायिक आहे. नवऱ्याच्या नोकरीच्या निमित्ताने चार वर्षापूर्वी आम्ही इकडे आलो. सुरवातीच एक वर्ष थोड अवघडच गेलं. नवीन देश, नवीन भाषा सगळंच वेगळं. पण हळू हळू नवीन ओळखी होत गेल्या तसं सोपं वाटू लागलं. मित्र परिवार वाढत गेला आणि कधी या शहरानी आपलंसं केला कळलचं नाही. आता सध्या मी, माझा नवरा, दोन मुलं आणि सासूबाई इथे राहतो. नवरा प्रसाद हा इमर्सन या कंपनीमध्ये कामाला आहे. मुलं नॉर्वेजिअन शाळेत शिकतात. भारतात असताना बॅंकेत नोकरी करत होते. इथे सध्या नॉर्वेजिअन भाषेचा अभ्यास करत आहे.

सर्व फोटो – स्नेहा काळे    व्हिडिओ – YouTube

2 Comments Add yours

 1. Yogita Kale says:

  Wow you are amazing Sneha. You described Norway very well in indian point Of view. And you utilised your time very nicely. Loved your article.

  Like

 2. Sanjay Ambekar says:

  Very elaborate food tour of Norway,a country of most honest people.Me and my wife had been in Norway 🇳🇴 in June 14 to participate in midnight sun marathon at tromso We were invited by Oddray for lunch It was a real experience We had been to Bergen
  The food in fish market was awesome It’s a paradise for fish connoisseurs
  ONS has to add Norway in bucket list
  I regret this article was not available on digital katts Anyways will contact you wen we will revisit NWay
  Dr Sanjay&Suniti

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s