मुलं आणि पौष्टिक खाणं

मधुरा देव

आज सकाळपासून दुसऱ्या, आठवड्यातल्या पाचव्या आणि महिन्यातल्या कितव्यातरी तक्रारीचं निराकरण करायच्या प्रयत्नात होते. तक्रार तरी कसं म्हणायचं याला? अक्षरशः हवालदिल झालेल्या पालकांना धीर देणे, हे मुख्य काम होऊन गेलं आहे. हरकत नाही! पालक आणि मूल हे वेगळं काढता येतच  नाही. परस्परावलंबी आहे हे नातं! इतर नात्यांपेक्षा जरा अधिक जबाबदारीची मागणी असलेलं.

तर तक्रार अशी असते की, ‘माझं मूल खात नाही. आवडीने तर काहीच नाही. पौष्टिक खाण्याचा प्रश्नच नाही. इतके कष्ट करून सगळं करतो मुलांसाठी. पण त्यांना काहीच वाटत नाही. घरचं ताजं अन्न नको म्हणतात. जंक फूड रोज द्या. नको नको म्हणेपर्यंत खाऊन दाखवतील. मी काय केलं म्हणजे माझं मूल योग्य खाईल? कोणते पदार्थ? भाजीपोळी सोडून सांगा! शिवाय, दोनपेक्षा जास्त घास, भरवायला न लागता, रडारड न करता मनापासून, आवडीने, हसतखेळत जेवणं… कसं जमेल हे? ऑफिसमधून दमून घरी आलं की पोरांचे हे असे चेहरे आणि कटकट… तीही रोजच्या जेवणावरून! How can I make the diner time enjoyable and not traumatic for everyone?’

मुलांच्या जेवणाच्या प्रश्नांकडे कसं बघावं, ते कसे सोडवता येतील जेणेकरून आरोग्य आणि आनंदही मिळवता येईल… या मुद्यांवर मी थोडं सांगणार आहे.

सकस आणि ताजं अन्न चवीचवीने खात, सर्व कुटुंबाने एकत्र बसून, दिवसभरातल्या हकिकती सांगत आणि ऐकत मनापासून जेवावं, हे सगळ्यांना तत्त्व म्हणून पाठ असतं. पण मग असं काय बरं झालं आहे, की लहान मुलं जेवायला उत्सुक नाहीत? बऱ्याच मुलांसाठी, जेवण ही एक त्रासदायक घटना झाली आहे. आईबाबांनी अक्षरशः गयावया केलं, तासभर मनधरणी केली तर काही घास कसेबसे पोटात जाणार. म्हणजे, कोणासाठीच हे सुखाचं नाही. पर्यायाने पचन, आरोग्य, मनःस्थिती या सगळ्यावर दुष्परिणाम. जेवणाची वेळ जवळ यायला लागली की ताण सुरू! मुलांची रडारड आणि पालकांचं ताट घेऊन त्यांच्या मागे धावणं, अजिजी करणं, धाक घालणं, आवाज चढणं वगैरे. मूल हार मानतंय की आधीच दमलेले आई-बाबा? मुलाने ‘भोकाड’ नावाचं हमखास यशस्वी शस्त्र काढलंय की त्या आधीच आईनं नंबर लावलाय?  आजच्या जेवणाची लढाई कोण जिंकणार? मूल की आई – बाबा?

बालविकासाच्या क्षेत्रात काम करताना मुलं आणि त्याहीपेक्षा पालकांबरोबर काम करणं आवश्यक असतं. मुलांच्या बाबतीतले बरेच निर्णय आई-बाबा घेणार असल्यामुळे आधी त्यांचं म्हणणं समजावून घेणं महत्त्वाचं असतं. त्यातून मुलांचा आणि संपूर्ण कुटुंबाचा प्रश्न सुटू शकतो.

मूल नीट नं जेवणं हा आईबापांसाठी खरोखर मोठा प्रश्न होऊन बसला आहे, यावर आता विश्वास ठेवावा लागेल. चिंता, काळजी, अपराधीपणाची भावना हे सगळं पालकांमध्ये वस्तीला येऊ बघतंय. We have the means but have we lost the ways?

शास्त्रज्ञांनी सिद्ध केलंय की खाण्याचे प्रश्न योग्य वयात सुटले नाहीत तर ते अधिक क्लिष्ट पद्धतीने पुढच्या आयुष्यात भेडसावू शकतात. बुलिमिया (अतिरिक्त खाणे) अनोरेक्सिया (अजिबातच न खाणे) याशिवाय ‘सिलेक्टिव इटिंग डीसॉर्डर’ (एकच पदार्थ नेहमी खाणे. उदाहरणार्थ फक्त बटाटयाचे काप. इतर कोणताही पदार्थ खायची कल्पनादेखील यांना अस्वस्थ करू शकते)  हे आजार आहेत. आणि अशा प्रकारच्या आजारांचा अभ्यास चालू आहे. असं मानलं जातंय की पुढच्या आयुष्यात, करियरमध्ये, नातेसंबंधांतसुद्धा या आजाराची लक्षणं दिसून येऊ शकतात. कोणत्याही नवीन अनुभवाची, नात्याची, घटनेची अशा व्यक्तींना भीती बसू शकते.

अर्थात लहानपणी खाण्याच्या बाबतीत थोडी आवड-निवड असणं, कंटाळा करणं, हट्ट करणं हे जितकं सहज दिसून येतं तितकं ते सोप्या पद्धतीने हाताळतादेखील येऊ शकतं. प्रश्न सोडवता येऊ शकतो.

तूर्तास याकडे आजार म्हणून न बघता निव्वळ सामान्य दृष्टिकोनातून बघू या.

समुपदेशन करताना मुळात कुटुंबाच्या संपूर्ण वातावरणाचा विचार करावा लागतो. स्वयंपाक कोण करतं, भाजीपाला- फळे कोण खरेदी करतं, नवीन पदार्थ करून बघण्याचा उत्साह आहे का, कुटुंबातल्या एकाला तरी nutrition हा विषय साधारणपणे माहीत आहे का? जेवणाची जागा टेलिव्हिजनसमोर आहे का? हे आणि असं बरंच काही विचारात घ्यावं लागतं.

‘लागली भूक की चट खातील’ हे आपल्या पिढीच्या ओळखीचं वाक्य आहे! पण काही कारणांमुळे ते आता तितकंसं परिणामकारक राहिलेलं नाही. कुटुंबं बऱ्याचदा तीन-चार व्यक्तींचीच असतात, हाताशी मोकळा वेळ कमी असतो, जेवणासारखी ‘रोजची कामं’ पटकन उरकावीत अशी मनःस्थितीही मूळ धरू लागली आहे कदाचित. बदलत्या काळाचा परिणाम!

तर समुपदेशनाची सुरुवात कुठून करावी लागते? सगळ्यात आधी काही महत्त्वाचं तपासलं गेलं आहे ना, हे बघावं लागतं.

 • मुलाची प्रकृती उत्तम आहे ना? वाढीसाठी आवश्यक जीवनसत्त्व, विशेषतः लोह आणि हिमोग्लोबिन पुरेसं आहे ना? याची तपासणी वर्षातून एकदा नक्की करावी.
 • उंचीच्या वाढीकडे लक्ष असावं.
 • मूल नीट जेवत नसलं तरी पाणी / द्रव पदार्थ आवडीने मागतंय ना?
 • मूल उत्साही आहे ना? व्यायाम / खेळ चालू आहे ना?
 • मूल आणि पालक यांच्या गप्पा होतात ना? मुलांना पालकांच्या आयुष्यात मित्राचं / बरोबरीचं स्थान, रोज, काही मिनिटांसाठी तरी आहे ना? की धाक जास्त आहे? आणि त्यामुळे संवाद नाही?
 • आई-बाबा आणि घरातली इतर मोठी माणसं काय आणि कसं खातात? मुलांसाठी ‘खास आवडीचं’ जेवण रोज तयार केलं जातंय का?
 • ‘एकत्र जेवण’ या विषयाबद्दल आस्था आहे? की येताजाता, घाईने, कसंतरी, पटकन करून टाकण्याची गोष्ट आहे ती?

अशी सगळी माहिती घेऊन, प्रत्येक कुटुंबाची जीवनपद्धती आणि त्याबद्दलचा विचार लक्षात घेऊन मग मुलांच्या खाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करता येतं. मार्गदर्शन करता येतं. उपाय सुचवता येतात.

रोजच्या स्वयंपाकात काही सोपे आणि छुपे बदल करता येतात. मूल पुरेसं खात नसेल, पण जे खाईल त्यात पौष्टिक घटक असतील याची खात्री करता येते. हे उपाय ‘लपवून’ करायचे असले, तरी गुन्हा ठरणार नाहीत.

पास्ता आवडतो? त्यात टोमॅटो, बसिलच्या बरोबरीने शिजवलेले आख्खे मसूर सालासकट घाला. पास्ता सॉसमध्ये सहज खपून जातात. कोणत्याही मसालेदार चविष्ट रश्श्यामध्ये (चिकन, कोळंबी, बटाटा, पनीर) पालक प्युरी करून घाला. मसाल्यांमुळे चव बदलत नाही फार. पिझ्झा सॉस आणि सँडविचमध्ये भारतीय चटण्या घालून बघा. (दाणे, कोथिंबीर, खोबरं) चीज भरपूर असल्यामुळे चव फार बदलत नाही.

कोशिंबिरी खात नाही? मग पदार्थाचं रूप बदलून बघा. गाजर वाफवून, मीठ लिंबू घालून द्या. काकडी छान चिरून डीपबरोबर द्या. फळांच्या कबाब स्टिक्स करून द्या. फळे, भाजी चिरण्यात नाविन्य आलं तरी मुलांना मस्त बदल वाटू शकतो. (आपल्याला सुद्धा!)

स्वयंपाकाचं नियोजन करताना मुलांना बरोबर घ्या. बेत ठरवा. त्याचं एक कॅलेंडर करायचं काम मुलांना द्या. मास्टर शेफ सारखे कार्यक्रम एकत्र बघा. रेसिपीची पुस्तकं आणा. एकत्र चाळा. भाजी खरेदी हा उपक्रम एकत्र करा. खरेदी झाली की चक्क ice cream खायला एकत्र जा.J

थोडक्यात, रोजच्या दिनक्रमात मुलांना सामावून घ्या. जबाबदारी द्या.

विचारांमध्ये / मानसिकतेमधेकरता येतील असे बदल :

प्रयत्नांचं आवर्जून कौतुक करायला हवं! ‘कोणी केलीये रे आज सलाडची सजावट?’ असा साधा कौतुकपूर्ण प्रश्नसुद्धा मुलांची जेवणाबद्दलची मानसिकता बदलू शकतो. मुळात आई-बाबा आणि घरातल्या इतरांनी सगळे प्रयत्न आणि बदल आनंदाने करायला हवेत. चिडून, नाइलाजाने नाही.

मुलांसाठी ताजं, सकस अन्न उपलब्ध करून देणं ही आणि खरं तर एवढीच जबाबदारी पालकांची आहे. तुम्ही स्वतः योग्य वेळेला, योग्य अन्न, योग्य प्रकारे खात असाल तर तुमचं निरीक्षण करून आज ना उद्या मुलं शिकणारच आहेत. त्यांच्या मागे लागून काही फार उपयोग होत नाही असाही सिद्धान्त आहेच. त्यामुळे, पालकांनी स्वतः उत्तमप्रकारे आनंद घेत जेवलं पाहिजे, निरनिराळे पदार्थ खाण्यात, करण्यात रस घेतला पाहिजे. तुमचा आनंद बघून मुलं शिकणार आहेत.

बऱ्याचदा लागू पडणारा मानसिकतेशी संबधित असा एक उपाय. चक्क वाटाघाटी / deal करा.

 • ‘दोनघास उसळ खा! मग आवडता पदार्थ दोन वेळा मिळेल’ deal?
 • २ तास जास्त टेलिव्हिजन बघ. पण संध्याकाळी मी वाढेन, ते खाशील का? deal?
 • शाळेच्या डब्यात तुला हवं, ते देईन. पण रात्रीचं जेवण मी सांगेन ते! deal?

सकस का खायचं हे समजावून सांगा. Nutrition बद्दलची पुस्तकं आणा, एखादा छोटा कोर्स एकत्र करा (ऑनलाईनही असू शकतो)

सुट्टीतला प्रोजेक्ट म्हणून एकत्र माहिती शोधा. यू ट्युबवर काही व्हिडीओ सापडतील. जंक फूड का खाऊ नये याबद्दल पुष्कळ माहिती सोप्या पद्धतीने त्यात सांगितलेली असते.J ‘दुष्ट’ उपाय आहे पण कान सोनाराने टोचले तर दुखत नाहीत. तसंच आहे.

खूप ताण घेऊ नका! काही मुलं थोडंच खाणारी असतात. किंवा ‘चरणारी’! एका वेळी, नीट बसून व्यवस्थित जेवणार नाहीत, पण थोडं थोडं, दिवसभर ‘चरत’ असतील, तरी चालेल !

आपल्या मुलांचा स्वभाव, पिंड, वागण्याची पद्धत ओळखा. थोडं त्यांच्या कलाने घ्या. आणि त्यांना थोडं तुमच्या कलानं घ्यायचा आग्रह करा. प्रोत्साहन द्या! ‘मी म्हणेन तेच आणि तसंच जेवलं पाहिजे’ असा हट्ट करू नका. काय केल्याने मूळ हेतू (सकस आणि पौष्टिक अन्न पोटात जाणे) साध्य होईल ते बघा. प्रत्येक मुलाच्या आवडीप्रमाणे जुळवून घेणं अवघड असू शकतं; पण अशक्य नाही.

शेवटचा कानमंत्र. मुलांनी नीट न जेवण्याचे दिवसही संपतील. मुलांच्या वाढीच्या आयुष्यात एकेक काळ असतो, तो काळ संपतो. त्या काळात रोज बटाट्याचीच भाजी हवी असेल तर काही दिवस तसेच होवो. अखेर त्यालाही मुलं कंटाळतील आणि ‘बदल हवा’ म्हणतील.

मग राज्य तुमचंच आहे. त्याची तयारी मात्र चालू ठेवा.

मधुरा देव

25395_101337373238661_3167277_n

चाईल्ड डेवेलपमेंट तज्ज्ञ. मुलांची सर्वांगीण वाढ होण्यासाठी साहित्य, चित्रपट, संगीत आणि ‘पालकांशी संवाद’ अशा तत्वावर गेली २० वर्ष विविध माध्यमातून मुलांबरोबर आणि मुलांसाठी काम. मुलं आणि हिंसाचार या विषयात सध्या अमेरिकेत विशेष प्रोजेक्ट चालू.
फोटो – इंटरनेट फोटो (स्वामित्व हक्क त्या-त्या स्त्रोताकडे)   व्हिडिओ – YouTube

One Comment Add yours

 1. मृण्मयी says:

  छान आणि उपयुक्त टिप्स.

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s