रसदार फॉन्ड्यू

मृदुला देशमुख-बेळे

swiss_fondue_2

तीन वर्षांपूर्वी बौद्धिक संपदा कायदा शिकण्यासाठी चार महिने इटलीमध्ये राहायचा योग आला. माझा हा अभ्यासक्रम इटलीमधली तुरीन युनिव्हर्सिटी आणि जेनेव्हा, स्वित्झर्लंड इथली जागतिक बौद्धिक संपदा संघटना (वायपो) यांनी एकत्रितपणे आयोजित केलेला होता. मी राहिले प्रामुख्याने तुरीन, इटली इथे. पण अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून जेनेव्हा इथल्या जागतिक वायपोच्या कार्यालयात काही दिवस काम करण्याचा योग आला. बरोबर सगळे वर्गमित्र होतेच. आणि हे वर्गमित्र कोण? तर चाळीस वेगवेगळ्या देशांतून आलेले चाळीस लोक… वय वर्ष २४ ते ५२ या वयोगटातले. वेगवेगळ्या वयाचे.. वेगवेगळ्या खंडातून आलेले… वेगवेगळ्या भाषा बोलणारे… वेगवेगळ्या संस्कृती जपणारे.. वेगवेगळे अन्न खाणारे हे माझे मित्रमैत्रिणी म्हणजे एक अफलातून सांस्कृतिक भेळ होती. संस्कृतीचा एक मोठा भाग असतो खाद्यसंस्कृती. आणि ती चाखणं हा एक सुंदर अनुभव होता. मी शाकाहारी असल्याने मी बर्‍याच खाद्यपदार्थांना मुकले… पण तरी मला सगळं समजून घ्यायला आणि  पाहायलाही खूप मजा आली.

जेनेव्हामधला आमचा मुक्काम संपत आला. आम्ही तुरीनला जायला निघणार, त्याच्या आदल्या रात्री वायपोतर्फे आम्हांला रात्रीच्या जेवणासाठी एका रेस्तराँमध्ये आमंत्रित केले गेले होते. आमचे प्रोग्राम संचालक आणि वायपोमधले त्यांचे सहकारी असे आम्ही सगळे या रेस्तराँमध्ये येऊन पोचलो. शाकाहारी खाणं फारसं मिळत नसल्याने मला सतत मेन्यू कार्डमध्ये काहीतरी शोधून काढायला लागत असे. तसं मी ते करायला लागले. पण मार्था या आमच्या वायपोमधल्या मैत्रिणीने संगितलं, “आज सगळ्यांनी फॉन्ड्यू खायचं आहे… तुम्हाला हवं ते ‘अ ला कार्त’ ऑर्डर करता नाही यायचं.” माझ्या चेहर्‍यावर हे ऐकून भलंमोठं प्रश्नचिन्ह उमट्लेलं मार्थाला दिसलं. ती म्हणाली.. “काळजी करू नकोस. फॉन्ड्यू शाकाहारी असतं.”  मी एक मोठा सुटकेचा निःश्वास सोडला आणि आमच्या टेबलवर जाऊन बसले. थोड्याच वेळात आमच्या टेबलवर वेटरने एक स्टोवसारखी शेगडी आणून ठेवली. आणि त्यावर एक मोठं भांडं आणि त्यात रटरट्णारा एक पांढरा पदार्थ. त्याबरोबर एका वेताच्या बास्केटमध्ये पाव… आणि काही इटालियन हर्ब्स. प्रत्येकाच्या पुढ्यात एक एक क्वार्टर प्लेट आणि त्यात नेहमीच्या काट्यांपेक्षा प्रचंड लांब असलेला एक एक काटा. भांड्यात रटरट्णारा तो पदार्थ वाढून घेण्यासाठी मी वेटरला चमचा मागू लागले. तर व्हेरा म्हणाली, “नाही नाही… तो प्लेटमध्ये वाढून नाही घ्यायचा.” “तो त्या भांड्यातूनच खायचा?” मी विचारलं,“ ‘‘सगळ्यांनी एकाच भांड्यातून?” तर व्हेरा म्हणाली, ‘‘हो… फॉन्ड्यू हे स्वित्झर्लंडचं राष्ट्रीय खाद्य आहे…. आणि ते असं सामुदायिक पद्धतीनेच खातात. मला रमजानमध्ये होणार्‍या इफ्तार पार्ट्यांचीच आठवण आली… माझ्यासोबत होते अमेरिकन मार्क रांदाझ्झा, पाकिस्तानी आमीर लतीफ, इराणची लैला झराई आणि व्हेरा आणि तिचा नवरा जॉन. व्हेरा जानोस्की ही मूळची जर्मन. तिचा नवरा स्विस. त्यामुळे ती आता स्वित्झर्लंडमधल्या जेनेव्हापासून जवळ असलेल्या लुझान्न नावाच्या गावात राहते. मी व्हेराला विचारलं, “हे फॉन्ड्यू ही काय भानगड आहे?” आणि मग तिने मला फॉन्ड्यूबद्दल फारच रोचक माहिती पुरवली.

स्विस चीज संघटनेने १९३० साली फॉन्ड्यू हे स्वित्झर्लंडचं राष्ट्रीय खाद्य म्हणून घोषित केलं. खरं तर आता फॉन्ड्यू हे कुठल्याही ‘डिप’मध्ये बुचकाळून खाण्याच्या पदार्थासाठी वापरण्याचं सर्वनाम बनलाय. पण खरं अस्सल स्विस फॉन्ड्यू असं बनवतात. दोन-तीन प्रकारच्या चीजच्या मिश्रणात थोडा स्टार्च आणि वाइन घालून ते पातेल्यात गरम करायला ठेवायचं. ते पातेलं खालच्या शेगडीसकट आणून ठेवायचं. त्याच्या भोवती सगळ्यांनी कोंडाळं करून बसायचं आणि पावाचे तुकडे लांब दांड्याच्या काट्यात धरून यात बुचकाळून खायचे. मेजवानी करण्यासाठी हे प्रकरण सोपं आहे नाही का? आपल्याकडच्या मेजवान्यांच्या मानाने तर फारच सोप्पं!

या फॉन्ड्यूच्या पातेल्याला म्हणतात काकेलॉन आणि ते ज्या स्टँडवर ठेवून उकळतात त्याला म्हणतात रेचौ. या स्टँडच्या खाली मेणबत्ती किंवा स्पिरीटचा दिवा लावून त्यावर हे पातेलं उकळत ठेवलेलं असतं. फॉन्ड्यू बनवायला वेगवेगळ्या प्रकारच्या चीजचं मिश्रण वापरतात. पण सगळ्यात प्रसिद्ध आहे ते ग्रूये चीज. काकेलॉन तयार करताना त्याच्या आतल्या भागावर ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या चोळतात आणि मग त्यात चीज घालून गरम करायला ठेवतात. कुठलीही व्हाइट वाईन घेऊन त्यात थोडा कॉर्न स्टार्च घालून गुठ्ळ्या होऊ न देता या चीजमध्ये मिसळायचं आणि मग हे मिश्रण गरम करायला लागायचं. गरम करतानाचं तापमान अतिशय महत्त्वाचं… ते इतकं गरम तर नक्कीच हवं की हे मिश्रण द्रव राहील… पण ते जरा जास्त झालं तर मग चीज करपायला लागतं. याबरोबर बागेतसारख्या कुरकुरीत आवरणाच्या पावाचे तुकडे ठेवायचे. आपल्या नेहमीच्या काट्याच्या दुप्पट लांबीच्या काट्यात पावाचा तुकडा टोचायचा, तो या चीजच्या मिश्रणात नखशिखान्त बुचकळायचा… आणि मग तो मटकवायचा. हवं तर बुचकळण्याआधी तो इटालियन हर्ब्समधेही घोळवायचा. याच्याबरोबरीने प्यायला व्हाइट वाईन द्यायची. कधी कधी पावाच्या जोडीने पीच किंवा स्ट्राबेरीज अशी फळं किंवा बटाट्याचे कापही देता येतात. स्विस माणसं फॉन्ड्यूची मेजवानी करताना माणशी प्रत्येकी पाव पाव किलो चीज फस्त करतात.

अशाच प्रकारे चॉकलेट फॉन्ड्यूही करतात. म्हणजे गरम करून वितळलेल्या चॉकलेटमध्ये सुका मेवा आणि फळं बुडवून खायची! फॉन्ड्यूशी संबंधित अनेक गमतीजमती तिथे आहेत! म्हणजे चीजमध्ये बुचकळताना एखाद्या पुरुषाचा पावाचा तुकडा मध्ये पडला (आपलं बिस्किट चहात गुडुप होतं तसा) …तर त्याने इतरांना एक एक ड्रिंक पाजायचं…आणि कुठल्या स्त्रीकडून हे झालं तर तिने तिच्या शेजारच्याचं चुंबन घ्यायचं. शिवाय पावाचा तुकडा चीजमध्ये फक्त एकदाच बुचकळायचा!!

स्वित्झर्लंड इटलीचा दौरा संपवून मी नाशिकला परत आले आणि नंतर मला कळलं की माझ्या घराच्या अगदी जवळ असलेल्या एका टपरीवजा हॉटेलमध्ये फॉन्ड्यू मिळतं. ते चाखून पाहायला गेले तर तिथे फॉन्ड्यूचे वेगवेगळे स्वाद होते. टोमॅटो फॉन्ड्यू किंवा पालक कॉर्न फॉन्ड्यू वगैरे… पालक कॉर्न फॉन्ड्यू चाखून पहिलं. पालक आणि मका घालून वितळवलेलं थोडं मसालेदार चीज, आणि बुडवून खायला वाफावलेला बेबीकॉर्न, गाजर, फरसबी, फ्रेंच फ्राइज आणि पाव…. फॉन्ड्यूचा हा भारतीय अवतार मला जामच आवडला!

full_cheese_fondue_set_-_in_switzerland

मृदुला देशमुख-बेळे

12193847_10154526282098561_6773247301897084788_n

औषधनिर्माण शास्त्रात पीएच.डी. नाशिकच्या एका प्रतिथयश औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात प्राध्यापिका. फ्रीलान्स पेटंट सल्लागार म्हणूनही काम करते. मागचे वर्षभर लोकसत्तेत कथा अकलेच्या कायद्याची या नावाचा बौद्धिक संपदा कायद्यावरचा स्तंंभ लिहीत होते. 

फोटो – विकीपीडिया    व्हिडिओ – YouTube

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s