रेल्वेची खानपान संस्कृती

हेमंत कर्णिक

400px-indian_railway_network_coverage_on_osmपुष्कळ, म्हणजे पुष्कळच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. बीएससी झालो होतो पण नोकरी लागली नव्हती. खिशात पैसे असायचे, नसायचे. एकदा मी आणि माझ्याबरोबर ग्रॅजुएट होऊन बेकार असलेला माझा मित्र गप्पा मारण्यात इतके रमलो की शेवटची कर्जत निघून गेली. दादर स्टेशन घरासारखं वाटत असल्याने आणि अंगात तरुणपणाची रग असल्याने एक रात्र स्टेशनवर काढणे, हा इशू नव्हता. त्यात स्टेशन दादर. माणसं आणि गाड्या यांची सतत वर्दळ. पोटात काही ढकलायची आठवण झाल्यावर लक्षात आलं की आम्हा दोघांकडे मिळून नेमके सतरा पैसे होते. सतरा. दोघांनी खिसे तपासले नव्हते आणि ’असतील पुरेसे,’ असं गृहीत धरलं होतं. खिशात रेल्वेचा पास असला, की जाण्या-येण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. इतके कमी पैसे दोघांकडे मिळून असण्याची वेळ येईल, असं त्याला किंवा मला वाटलं नव्हतं. आता, इतक्या उशीरा कोणा नातेवाइकाकडे जाणं बरं दिसलं नसतं. गेलो तरी ’जेवायला वाढा,’ म्हणायला शरम वाटली असती.

जेव्हा पर्याय नसतो, तेव्हा जो असतो तो मार्ग खळखळ न करता चोखाळण्याचा दोघांचाही स्वभाव असल्यामुळे आम्ही चटकन निर्णय घेतला. दादर ईस्टला तेव्हा ’बदरिया’ नामक एक हॉटेल ग्रिल बंद करून ग्रिलच्या जाळीतून खाद्यपदार्थ देत असे. आमच्यासारख्या निशाचरांसाठी ’बदरिया’ मोठा आसरा होता. पण आज इतक्या कमी पैशात तोही कामाचा नव्हता. शेवटची गाडी गेल्यावर बंद होऊ घातलेल्या प्लॅटफॉर्मवरच्या स्टॉलकडे आम्ही मोर्चा वळवला. करता येईल तितका उशीर केला – कारण पुढची रात्र तशीच काढायची होती – आणि एक चहा, एक चारमिनार घेतले. तेरा पैसे चहा आणि चार पैसे चारमिनार! चवीचवीने चहा प्यायलो. मोठ्या प्रेमाने चारमिनार शेअर केली. आणि ती चव, तो स्वाद जिभेवर खेळवत रात्र घालवली.

चारमिनार हा आमचा ब्रँड नव्हता. पण ती सर्वात स्वस्त सिगारेट होती. आणि रिकाम्या खिशांमध्ये विड्या भरण्यापेक्षा चारमिनारचे तिखट दम छातीत साठवणं आम्हांला जास्त बरोबर वाटलं. तेव्हाच्या चहाचीही चव अजिबात बरी नसायची. अगदी नाईलाज झाला, तरच रेल्वेतला चहा प्यायचा. पण हेसुद्धा खरं की, तशा वेळी रेल्वे हा मोठा आधार वाटायचा.

दादर रेल्वे स्टेशन
दादर रेल्वे स्टेशन

मुंबईच्या लोकल रेल्वेला मुंबईची लाइफलाईन म्हणतात. कुठून कुठून चाकरमाने आणि छोटेमोठे धंदेवाले दररोज लोकल ट्रेनने मुंबई महानगरीमध्ये येऊन पोट भरतात. आणि त्यांचं खरंखुरं पोट भरण्यामध्येसुद्धा रेल्वेचा हातभार असतो. दादर पश्चिमच्या बाहेर बबन चहावाला होता. नाटकवाले, पत्रकार आणि अपरात्री काम संपवणारे यांपैकी कुणाला भेटायचं असेल, तर मध्यरात्री बारानंतर बबनचा चहा स्टॉल ही खात्रीची जागा होती. बबन थोडंफार खायलाही देत असे. भुकेची गरज भागवत असे. अगदी ग्रँट रोडपासून खार-अंधेरीपर्यंत अपरात्री भूक भागवायची असेल, तर स्टेशनजवळ हमखास एखादी भाजीपावची गाडी असायची. दुसरं काही मिळणारच नाही, अशा वेळी नाईलाजाने ग्रहण करायचं, ते कदान्न म्हणजे भाजीपाव; असं आम्ही तेव्हा म्हणत असू. कालप्रवाहात काहीतरी झालं आणि भाजी पाव खास प्रसंगी घरी करण्याचा पदार्थ झाला! एका बाजूने गरती बायकांमध्ये कुणी निशाचर नाही आणि दुसरीकडून निशाचर पुरुषांना अजिबातच असभ्य मानलं जात नाही; यातून कदाचित सभ्य कुटुंबातल्या बायकांमध्ये भाजीपावचं आकर्षण निर्माण झालं असावं. पण रात्री मित्राच्या रिकाम्या घरी पत्ते खेळत बसलं असताना इमर्जन्सी उद्‌भवली आणि सिगारेटी संपल्या, वा भूक लागली आणि खाणं नसलं, तर रेल्वे स्टेशनच्या दिशेने धाव घेण्याला पर्याय नव्हता.

रेल्वे आणि खाद्य यांचा संबंध दोन परस्परविरोधी गोष्टींवर ठरतो. एक म्हणजे, रेल्वेने दूरचा प्रवास करणार्‍यांना रेल्वेकडून जे मिळेल, त्याव्यतिरिक्‍त इलाज नसतो. त्यांच्या बाबतीत पोट भरण्यासारखी मूलभूत गरज भागवण्याची जबाबदारी रेल्वेला घ्यावीच लागते. त्याच वेळी हेसुद्धा खरं की रेल्वेमध्ये ऐसपैस बैठक मारून, मांडी घालून वा काटाचमचासुरी घेऊन साग्रसंगीत जेवण करण्याची अपेक्षा कुणी ठेवत नसतं. म्हणजे, रेल्वेने भोजन, हा समारंभ न मानता गरज मानावी आणि जास्त पसारा न मांडता ते चटपटीतपणे उरकावं. पण म्हणून भोजन देणे न देणे, याला महत्त्व न देण्याचा विचारही रेल्वे प्रशासन करू शकत नाही. परिणामी रेल्वे प्रवासात फुल कोर्स जेवण मिळण्याची शक्यता कमी असते. आणि चहा, बिस्किटं, इतर फराळ-नाश्ता हे घेऊन येणार्‍यांच्या फेर्‍या खूपच जास्त होत असतात.

खाणं ’उरकण्या’च्या रीतीमध्ये ’संस्कृती’ला कितीसा वाव आहे?

आहे. अजूनही भारतीय माणूस सँडविच, बर्गर, वडापाव यांना उभ्या उभ्या खाण्याच्या गोष्टी मानतो. जेवणाला पर्याय मानत नाही. सीएसटीला संध्याकाळी उशिरा गेलं, की गाडी पकडण्याअगोदर काही मिनिटं उसंत आहे म्हणून धावत पळत टिशू पेपरमध्ये सँडविच, वडापाव गुंडाळून घेणारे पुष्कळ दिसतात. ते जेवण करत नसतात; त्यांना घरी जाऊन जेवण मिळायला वेळ लागणार असतो, म्हणून मधल्या वेळात पोटाला शांत ठेवण्यासाठी केलेला तो एक उपाय असतो. त्याच वेळी सुटणार्‍या लांब पल्ल्याच्या गाडीमध्ये मात्र गाडी सुटून जागेवर स्थिरस्थावर झालं, की लोक डबे काढतात आणि जेवतात. आणि ज्यांना घरून जेवण आणणं शक्य झालेलं नसतं, ते रेल्वेच्या आयआरसीटीसी या सेवेकडून जेवण घेत असतात. मग ती व्हेज-एग-मटन-चिकन बिर्याणी असेल; पुलाव असेल नाही तर थाळी असेल. पूर्वी हे खाणं अल्युमिनियमच्या ट्रेमध्ये मिळायचं. ते खाऊन ट्रे परत द्यायचा असे; त्यामुळे वेळेत संपवावं लागायचं. लालू प्रसाद यादव यांच्या कार्यकाळात रेल्वेत ज्या अनंत सुधारणा झाल्या; त्यांपैकी एक ही होती: ट्रे जाऊन फॉइल आली. ज्यात जेवण तुलनेने गरम राहतं आणि जी जेवण झाल्यावर टाकून द्यायची असते. शिवाय ती प्रदूषणकारी प्लास्टिकची नसते. त्या जेवणाबरोबर पाण्याची बाटली वा पाउच, यातलं एक असतं. हे प्लास्टिकचं असलं तरी पेय मात्र कागदी पेल्यांमधून दिलं जातं. पूर्वी भात बर्‍याचदा अर्धा कच्चा असायचा. चपाती नीट भाजलेली नसायची. डाळ थंड आणि बेचव असायची. आज सर्व पदार्थांच्या चवीत प्रचंड फरक पडला आहे. सेवेत फरक पडला आहे. आज प्रत्येकाच्या आवडीनिवडीची पूर्तता होईल याची खात्री नसली; तरी कामचलाऊ जेवण मिळण्याची शाश्वती निश्चित असते.

आणि संस्कृती?

रेल्वेत मिळणार्‍या जेवणात इथे तिथे उन्नीस बीस असेल; पण स्टेशनवरच्या खाण्यात संस्कृती दिसते. आणि ती जशी पदार्थ, त्यांची चव, यात दिसते; तशीच सर्विसमध्येदेखील दिसते. मी पाच वर्षं उत्तर प्रदेशमध्ये राहात होतो. वर्षातून तीन चार फेर्‍या घरी, म्हणजे मुंबईला होत असत. तिथून येताना मी अमृतसर-दादर – म्हणजे एके काळची पठाणकोट – एक्स्प्रेस आग्र्याला रात्री दीड दोन वाजता पकडत असे. सकाळी झाशी-भोपाळ. आख्खा दिवस जाऊन त्यापुढच्या पहाटे साडेपाच वाजता दादर. दादरच्या पाउणेक तास अगोदर कल्याण येत असे. गाडीत गाढ झोपू शकणारे भाग्यवान. बाकीचे सर्वसामान्य लोक कल्याणला उतरून स्टेशनवरच्या स्टॉलवर चहा पीत असत. पाच, फार तर दहा मिनिटांचा मामला. तेवढ्यात तो एकटा स्टॉलवाला पन्नास-शंभर लोकांना चहा पाजून, त्यांच्याकडून पैसे घेऊन मोकळा होत असे. हे दृश्य पाहण्यासाठी मी कल्याणला उतरत असे. ’आली माझी मुंबई! मिनिटांचे सेकंद कापून एकेका तुकड्याचे पैसे करणारी, वेळेला संपत्ती मानणारी कार्यनगरी मुंबई!’ मला भरून येत असे. वेळेला जेवढी किंमत मुंबईत आहे, तेवढी आख्ख्या भारतात कुठेही नाही. आणि हे दूर कल्याणला, पहाटेच्या वेळी चहा देणार्‍यामध्ये दिसून येत असे. बाहेरून कोणी अज्ञानी आला, तर तो थक्क होईल.

त्याअगोदर आदल्या रात्री हीच गाडी साडेसात-आठला भुसावळ गाठत असे. भुसावळ मोठं जंक्शन. तिथे इलेक्ट्रिकचं इंजिन लागतं. पाणीबिणी भरलं जातं. भुसावळ स्टेशनवर थोड्या थोड्या अंतरावर गॅसच्या शेगडीवर मोठे तवे घालून दोशे होत असत. पटापट होत आणि पटापट संपत. मला भरभर खाता येत नाही; मी कागदात गुंडाळून गाडीत आणत असे. पुढलं स्टेशन जळगाव. तिथे केळी मुबलक. केळं हे एक स्वच्छ फळ. सालाच्या आत गर सुरक्षित आणि बायोडिग्रेडेबल साल खिडकीतून भिरकावताना फारसं अपराधी वाटतही नाही.

nagercoil_exp_indian_railways

सकाळच्या वेळी काय खावं, याची IRCTC कडे बरीच उत्तरं आहेत. ऑम्लेट सँडविच, कटलेट, इडली-मेदुवडा आणि शिरा-उपमा. मला सकाळी सकाळी बाकी कशाच्या अगोदर शिरा-उपमा खायला आवडतं. हासुद्धा तरुणपणाचा हँगओव्हर. मुंबईतल्या उडप्याकडे उपमा शिरा मिळतो; पण फक्‍त सकाळी. एकदा संपला की मध्ये नाही. मग दुसर्‍या दिवशी सकाळी. रात्रभर जागल्यावर आपापल्या घरी परतताना उडप्याकडे उपमा खाण्याचा रिवाज आठवून मला बरं वाटतं. रेल्वे माझे हे लाड पुरवते.

पण गाडी जर पाणी भरायला, सफाई करायला रेंगाळणार असेल, तर प्लॅटफॉर्मवर उतरून स्टॉलवर खावं. मध्यप्रदेशातल्या स्टेशनांवर सकाळी पोहे मिळतात. सगळीकडचे चांगले असतात, असं नाही; पण गरम पोहे सहसा वाईट लागत नाहीत. आग्रा-मथुरा इथे पेठा आणि पेढा. पण हे घरी न्यायचे पदार्थ. बसल्या बसल्या खाण्याचे नव्हेत. बसल्या बसल्या खाणार्‍यांच्या संस्कृतीत दक्षिणेकडचे स्वच्छ. उत्तरेतले गचाळ. दोघांच्या मध्ये मराठी लोक. पावसाळा संपला की उत्तरेत सर्वत्र ‘फली’ – म्हणजे मूँगफली, भुईमुगाच्या शेंगा – मिळते. त्या खाऊन त्यांची टरफलं तिथेच, स्वतःच्या पायाखाली टाकलेली मी ’छोट्या लाइन’वर – म्हणजे मथुरेहून कटिहारला जाणार्‍या गाडीने प्रवास करताना – इतक्या वेळा बघितली, की माझी शेंगा खाण्याची इच्छा मेली. पण आपण मुख्य लाइनी सोडून आडवळणाला गेलो, की पोटाची कॉम्प्रोमाइजेस सुरू होतात. तिथे सर्वात प्रचलित समोसे. आकारहीन, खारट, तिखट पदार्थ. दुसरं काही नसल्याने तेच खाऊन पोट भरावं लागायचं. पण त्यांना कशाला बोल लावा? कोकण रेल्वेला मुख्य प्रवाहातली मानावं की नाही? कोकणातले मराठी लोक चमत्कारिक आहेत. तिथे सिंगल ट्रॅक आहे. त्यामुळे समोरून येणार्‍या गाडीला वाट द्यायला एखाद्या लहानमोठ्या स्टेशनवर गाडी थांबून राहाते. लोक उतरतात. आळोखेपिळोखे देतात. अशा वेळी जर तिथे एखादा ताजा स्थानिक पदार्थ मिळाला, तर प्रवासी त्यावर उड्या टाकतील. पण कोकण्यांना पैसे कमावण्यात रस नाही!

मी बहुधा दर वर्षी हिमालयात ट्रेकिंगला जातो. या वेळी दिल्ली-काठगोदाम-बागेश्वर असे गेलो. दिल्ली मोठं स्टेशन. तिथे ‘कम-सुन’ नामक रेस्टॉरंट. ही एक चेन. मुंबईला आहे आणि नागपुरातही पाहिलं आहे. त्यांचं मेन्यूकार्ड छान असतं. भिंती काचेच्या असतात. पण भपक्याच्या मानाने पदार्थ खास नसतात. काठगोदाम हे एक अत्यंत स्वच्छ स्टेशन. वेटिंग रूमपासून खाण्याच्या जागेपर्यंत सगळं स्वच्छ आणि टिपटॉप. बसायला, वेळ काढायला, आणखी एखादी डिश मागवायला बरं वाटतं. मात्र दक्षिणेत खाण्याची चंगळ. नीटनेटकं वातावरण आणि स्वस्ताई. बंगलोर, चेन्नईला जसं बाहेर, तसंच स्टेशनात. खुशाल विसंबावं.

माझ्या एका मित्राचं रेल्वे प्रवासात हमखास पोट बिघडतं. त्यामुळे तो कुठेही काहीही खात नाही. नुसती फळं खाऊन जगतो. आणि देशात फळं बरी मिळतात. मुंबईतही मोसमात छोटी छोटी संत्री मिळतात. दिसण्यात देखणी नसतात; पण चवीला चांगली असतात. थंडीच्या दिवसांत यूपीत पेरू मिळतात. गोड आणि स्वस्त. तसा वेळ घालवायला चांगला पदार्थ म्हणजे भेळ. गाडीची गर्दी कमी झाली, की मुंबईच्या लोकलमध्येही भेळ मिळते. सुकी भेळ. हलकं आणि कमी अपायकारक खाणं.

आता दिवस बदलू लागलेत. आता देशभर कुठेही गाडीतून लेज वा तत्सम वेफर मिळतात. तशीच ब्रँडेड बिस्किटं मिळतात. चॉकलेटं मिळतात. ब्रँडनामाला जागून त्यात भेसळ नसते; पण म्हणून ते पौष्टिक थोडंच असतं? त्यापेक्षा वाईट म्हणजे, काश्मीर ते कन्याकुमारी एकच एक चव! चवींच्या संस्कृतीचं सपाटीकरण. गेल्या प्रवासात इंटरनेटवरून जेवण मागवण्याच्या सुविधेची घोषणा वाचली. हातात स्मार्ट फोन बाळगण्याच्या काळात हे होणारच. आणि याला प्रतिसादही मिळणार. पण म्हणून चव किंवा दर्जा वर चढेल, याची खात्री नाही. किमती वरचढ आहेतच. आणि यातून सपाटीकरणही होणार आहेच!

हेमंत कर्णिक 

self1

बँक ऑफ इंडियामधून निवृत्त. दुष्काळ आवडे सर्वांना (भाषांतर), कोंडी आदिवासींची आणि नक्षलवाद्यांची, इथे ओशाळला बालमृत्यू ही पुस्तकं प्रसिद्ध. फुटकळ सदरलिखाण बरंच. आजचा चार्वाक (सतीश तांबे, गोपाळ आजगावकर यांच्यासह), अबब हत्ती (सतीश तांबे, गोपाळ आजगावकर यांच्यासह) ही संपादित पुस्तकं प्रकाशित. अक्षर प्रकाशनसाठी संपादक म्हणून काम केलेलं आहे. (मीना कर्णिक यांच्यासह). सध्या संपर्क या स्वयंसेवी संस्थेबरोबर काम करताहेत.

फोटो – विकीपीडिया    व्हिडिओ – YouTube

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s