प्राची परब
युरोपला भेट द्यावी, असं प्रत्येकाच्याच मनात असतं. त्यातही बॉलीवूडच्या सिनेमांतून हमखास दिसणारं लंडन पाहावं, असं साऱ्यांनाच वाटत असतं. लंडन म्हटलं की आधी डोळ्यांसमोर येतं ते इथलं राजघराणं. सर्वत्र लोकशाही असूनही एकविसाव्या शतकात या राजघराण्याला मानणारे इथले लोक, ऑक्सफर्ड – केम्ब्रिज यांसारख्या प्रतिष्ठित शिक्षणसंस्था, टॉवर ऑफ लंडनमधला प्रसिद्ध कोहिनूर हिरा, संथपणे वाहणारी थेम्स नदी, हिवाळ्यातील प्रचंड गोठवणारी थंडी आणि बरंच काही. अशा या वैविध्यतेने परिपूर्ण असलेल्या लंडनमध्ये कोणत्याही वाहनाशिवाय पायी फिरणं म्हणजे एक अभूतपूर्व अनुभव असतो. तुमच्याकडे या शहराचा नकाशा असला आणि सगळीकडे चालणारं ऑयस्टर कार्ड खिशात असलं की संपूर्ण लंडन तुम्ही पालथं घालू शकता. अगदीच कधी रस्ता चुकलात तर इथले लोक तुम्हाला नक्कीच मदत करतात.
कॉस्मोपॉलिटिन मानल्या गेलेल्या या शहरांत युरोपमधून अनेक लोक कामधंद्यासाठी आले आणि इकडेच स्थिरावले. येताना त्यांनी आणलेल्या अनेक रेसिपीज आजही लंडनमध्ये आपल्या मानूनच चवीने खाल्ल्या जातात. मूळच्या इंग्लिश पदार्थांमध्ये मला सगळ्यात जास्त भावणारा प्रकार म्हणजे द ग्रेट ब्रिटिश ब्रेकफास्ट. नावाप्रमाणेच उत्तम कॅलरीजने भरलेला हा मेनू शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारांत मिळतो. यातले मुख्य पदार्थ म्हणजे वेगवेगळे सॉसेजेस, ऑम्लेटस ,पोच्ड एग्ज, तोंडी लावायला थोडेसे हिरवे मटार, मॅश पटेटोज, रेड बीन्स, ऑलिव्ह ऑइल घालून परतलेले मश्रूम्स, चेरी साईझ टोमॅटोज आणि सोबत व्हाईट किंवा ब्राउन ब्रेड. ही डिश इतकी रंगीबेरंगी असते की तिला हातच लावू नये असं वाटतं. थोडा निवांतपणा असेल तरच हे इतके प्रकार चवीचवीने खाता येतात. एरव्ही ऑफिसला जाणारी लोकं सकाळच्या ब्रेकफास्टसाठी कॉर्नफ्लेक्स आणि दूध, पॉरिज (ओट्सचा एक पदार्थ) किंवा वेगवेगळ्या फळांच्या किंवा भाज्यांच्या स्मूदीज पिताना दिसतात. एमबँकमेण्ट, कॅनरी व्हार्फ, चेरींग क्रॉस, लंडन ब्रिज अशा कितीतरी ऑफिस लोकेशन्सजवळ या स्मूदीजचे स्टॉल हमखास दिसतात. डोळ्यांचं पारणे फिटेल अशा पद्धतीने मांडलेले हे फळांचे रस पिऊनच कितीतरी लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात करत असतील. अनेकांच्या मते दिवस सुरु करण्यासाठी ताज्या फळांच्या रसाला पर्याय नाही. या रसांमुळे दिवसभर आपल्याला ताजंतवानं वाटतंच. शिवाय दिवसभरासाठी लागणाऱ्या सगळ्या कॅलरीज या रसांमधून मिळतात. स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी, क्रॅनबेरी या सगळ्या रसांबरोबरच आजकाल ट्रेंडी असणारा रस म्हणजे ग्रीन स्मूदी. जे काही ग्रीन असेल त्यांत मध घालून केलेलं मिश्रण म्हणजे ही ग्रीन स्मूदी. यात किवीसारख्या फळापासून अवाकाडो, पालक, सेलरी या भाज्यांपर्यंत सारं काही असतं.
आणखी एक गोष्ट जी इथल्या लोकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे ती म्हणजे कॉफी. चहा पिण्याऱ्यांपेक्षा कॉफी पिणारे लोक तुलनेने इथे जास्त आहेत. त्यामुळे स्टारबक्स, कोस्टा, कॅफे नॅरो यासारखी उत्कृष्ट कॉफी शॉप्स इथे जागोजागी दिसतात. गरमागरम लाते, मशीटो, एस्प्रेसो, हॉट चॉकलेट, कापुचिनो, ब्लॅक कॉफी इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफींचे पेले रिचवत, सोबतीला एखाद्या केकच्या तुकड्याचा आस्वाद घेत आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर गप्पा मारत बसणं यासारखं दुसरं सुख नाही.
आणखी एक प्रकार अलिकडे एक सोशल इव्हेंट बनत चाललाय तो म्हणजे इंग्लिश हाय टी. असं म्हणतात की हा प्रकार इंग्लंडच्या उच्चभ्रू वस्त्या, राजघराणी यांच्यात खूप पूर्वीपासून अस्तित्वात आहे. लंच ते डिनरच्या मधल्या काळात भूक लागली तर चहाबरोबर सोपे पदार्थ आहेत खाण्यासाठी. अशा वेळी आजूबाजूला नोकर-चाकर नसल्याने सहज सोप्या पदार्थांनाच चहाबरोबर प्राधान्य दिलं जाई. पूर्वी फक्त केक, बिस्किटं आणि जॅम – ब्रेड इतकंच असे. कालांतराने वेगवेगळ्या प्रकारचे सँडविचेस, कुकीज, पेस्ट्रीज, मफिन्स अशा पदार्थांचा समावेश होत गेला. आजकाल थेम्स नदीकिनारी मोठमोठ्या बोटी दिसतात आणि तिथे हा इंग्लिश हाय टी मिळतो. समुद्राच्या लाटांवर हिंदोळे घेणारी बोट, अंगावर अलगद येणारी वाऱ्याची झुळूक आणि पुढ्यात असणाऱ्या वाफाळत्या कॉफीचा मंद सुवास. सोबत अतिशय कलात्मकतेने रचलेली सँडविचेस आपल्याला एका वेगळ्याच विश्वाची सफर घडवून आणतात. बोटीतून उतरल्यानंतरही कितीतरी वेळ इथल्या सँडविचेस आणि केकची चव जिभेवर रेंगाळत राहते. आफ्टरनून टीच्या क्लासिक सिलेक्शन प्रकारांत ज्यांची गणती होते ती म्हणजे क्युकम्बर सँडविच, एग मेयोनीज अँड क्रेस सँडविच, स्मोक्ड सामन विथ क्रीम चीज, हॅम विथ मस्टर्ड चिकन कॉरोनॅशन आदी प्रकार.
एग मेयॉनीज विथ क्रेस हा प्रकार– बस दो मिनिट प्रकारांत मोडतो. त्यासाठी ब्रेडच्या एका बाजूला मेयोनीज लावून त्यावर उकडलेल्या अंड्यांच्या चकत्या लावल्या जातात आणि दुसऱ्या बाजूला आपल्याकडे मिळणारी बारीक मेथी चिरून (कच्चीच फक्त धुवून) काळ्या मिरीत कुस्करून भरली जाते. आपलं सॅन्डविच तयार. यामुळे शरीराला हिरव्या पालेभाजीतले घटक आणि अंड्यातली प्रथिनं दोन्ही मिळतात. सुरुवातीला खूप चविष्ट लागत नसलं तरी एकदा दोनदा चाखल्यानंतर ही चव हळूहळू आपल्याला आवडू लागते. शिवाय त्यातील प्रथिनांमुळे पोटही खूप वेळ भरलेलं राहतं.
मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे लंडनची खाद्यसंस्कृती खूप रंगीबेरंगी आहे. दुपारच्या जेवणामध्ये ऑफिसात असणारे लोक शक्यतो ‘वन बोल मिल’ ला पसंती देतात. त्यातही इथे भरपूर वैविध्य दिसते. बहुधा सगळ्या ऑफिसेसच्या आसपास व्हिएतनामी फ, वाघामामा, ईत्सु , पॉलस, वसाबी, झीझी अशी चेन रेस्टारंटस दिसतात. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या सुशी, जपानी कात्सु करी अँड राईस, फमध्ये मिळणारं मिश्र भाज्यांचं सूप, मांसाहारींसाठी मासांचे तुकडे, वाघामामामधले पाड थाय नूडल्स, पॉलमधले डेलिशियस केक आणि पेस्ट्रीज आणि वसाबी स्पेशल फ्लेवर्ड चिकन, झीझीमधला गार्लिक ब्रेड, सोबत पिझ्झा किंवा क्रिमी पास्ता अशा चवदार गोष्टीना खवय्यांची पसंती असते.
लहान मुलांच्या टिफिनमध्ये शक्यतो एखादं सँडविच, वेफर्सचं पॅकेट, थोडी फार चॉकलेट्स आणि एक तरी फळ हमखास आढळतं. जर तुम्हाला फारच कमी वेळ असेल किंवा जर फारच घाईत असाल तर सगळ्या सुपर स्टोअर्समध्ये मील डील नावाचा प्रकार मिळतो. तो घाईच्या वेळेला एक पूर्णान्न असतो. यात एक बगेट (फ्रेंच पाव ) शाकाहारींसाठी आत भाज्या घातलेला आणि मांसाहारींसाठी चिकन किंवा मटणच्या तुकड्यांसह. सोबत ज्यूस, एखादं फळ आणि कधी कधी डेझर्ट म्हणून चॉकलेट इतकं सारं देतात. हे तुम्ही ऑफिसमध्ये डेस्कवर बसून किंवा प्रवासातही खाऊ शकता.
घरी असणारे वृद्ध आणि गृहिणी शक्यतो सूप – सॅन्डविच असेच प्रकार खाताना दिसतात. शनिवार-रविवारचा बेत मात्र थोडा वेगळा असतो. वीक एन्ड ही संकल्पना आपल्या आधीपासून इथे अस्तित्वात आहे. घरी असणारे लोक रोस्ट चिकन, रोस्ट लँबसोबत ब्रोकोली, गाजरासारख्या स्टीम्ड व्हेजिटेबल्स खातात. शिवाय इटलीतून आलेला पिझ्झा, पास्ता, लझानिया हेही प्रकार सोबतीला असतात. फिश अँड चिप्स नावाचा प्रकार इथे लोकप्रिय आहे. मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलंही हा पदार्थ अतिशय आवडीने खातात. सगळ्यात जास्त खायला काय आवडतं ? असं विचारल्यावर फिश अँड चिप्सsssss असं एकसुरात आणि त्यांच्या बोबड्या भाषेत सांगणाऱ्या छोट्या छोट्या मुलांना मध्यंतरी एका कार्यक्रमांत मी पाहिलं होतं. आपल्याकडे जसे वडापावचे स्टॉल गल्लोगल्ली आढळतात तसंच इथे फिश अँड चिप्सची दुकानं गल्लोगल्ली दिसतात. आपल्या देशात जसे लोक क्रिकेटवेडे आहेत तसे इथले फुटबॉलचे चाहते आहेत. खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये नजर फिरवली तर अर्ध्यापेक्षा अधिक लोकांची पसंती मॅच बघताना फिश अँड चिप्स खाण्यालाच असते. कॉड नावाचा गोड्या पाण्यातील मासा बटाट्याच्या चिप्स म्हणजेच फ्रेंच फ्राईज सोबत देतात. तोंडी लावायला टोमॅटो केचप, मेयोनीज, हॉट चिली गार्लिक असे वेगवेगळे सॉस मिळतात. हा प्रकार खाताना मत्स्यप्रेमींची निराशा होण्याची शक्यता असते. कारण आपल्यासारखे माशाला मीठ-मसाला हळद ,आलं-लसूण असं काहीही न वापरता मैद्याच्या पिठात मध मिसळून त्या पिठात मासा घोळवून तो तळला जातो. पण निदान एकदा तरी खाऊन बघावा असं या पदार्थाबाबतीत म्हणता येईल. जसं पॅरिसला जाऊन आल्यानंतर तिकडच्या पॅटीसरी मधले मॅकरुन्स खाल्ले असं लोकं सांगतात तसं लंडनला भेट देऊन तिकडचे फिश अँड चिप्स आम्ही ट्राय केले असं आपण नक्की म्हणू शकता.
इथे गल्लोगल्ली दिसणारी दुकानं म्हणजे मॅक डोनाल्ड आणि बर्गर किंग. या फास्ट फूड चेन रेस्टॉरंटची संख्या भारताच्या तुलनेने इथे अधिक आहे. आदल्या दिवशी फास्ट फूड खाऊन दुसऱ्या दिवशी जिममध्ये त्याच्या दुप्पट घाम गाळणारे लोक पहिले की हसू येतं.
आणखी एक आवर्जून उल्लेख करण्यासारखी जागा म्हणजे इकडच्या काही स्टेशन जवळ असणारे टर्किश फूड स्टॉल. तिथला पिटा ब्रेड आणि थंडगार हमस म्हणजे माझा जीव कि प्राण. इथलं एक वैशिष्ट्य म्हणजे रोस्टेड हमस. वेगवेगळ्या रंगांच्या भोपळ्या मिरच्या ऑलिव्ह ऑइलमध्ये रोस्ट करून यात मिसळतात. शिवाय तुमच्या चवीनुसार अतिशय ताजं चिरलेलं सॅलड ज्यात लाल कोबी, हिरवा कोबी, कांदा ,काकडी, बीट ह्या भाज्यांबरोबरच फलाफल (मिश्र डाळींचे वडे) पिटा ब्रेड मध्ये भरून देतात. तोंडी लावायला इथे पिकल्ड चिली मिळते. व्हिनेगरमध्ये बुडालेली ही हिरवी मिरची फार तिखट नसते.
आणखी एक मुद्दाम उल्लेख करावा असा प्रकार म्हणजे पिकल्ड व्हेजिटेबल्स. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खारवून व्हिनेगरमध्ये बुडवून बाटलीबंद ठेवलेल्या अनेक सुपर मार्केटमध्ये दिसतात. ते पाहून हे लोक अगदी कशाचंही लोणचं घालू शकतात की काय असा प्रश्न दरवेळी माझ्या मनात येतो. हल्लीच एका हॉटेलमध्ये मी कोंबडीच्या अंड्यांचं लोणचं पाहिलं. असं म्हटलं जातं की अंड्याचं लोणचं हे इंग्लडमध्ये सतराव्या-अठराव्या शतकापासून घातलं जात होतं. अंडी साठवून ठेवण्यासाठी असं लोणचं घातलं जाई. त्यासाठी अंडी स्वच्छ धुवून आधी उकडून घेतात. थंड झाल्यावर सोलून शक्यतो माल्ट व्हिनेगर किंवा अपल सायडर व्हिनेगरच्या मिश्रणात बुडवून ठेवली जातात. सोबतीला व्हिनेगरच्या रसात काळी मिरी, रोझमेरी, थाईम असे मसाल्याचे पदार्थ घातले जातात. आवडीप्रमाणे त्यात काही जण बीटाचा रस घालतात. त्यामुळे लोणच्याला येणारा गुलाबी रंग अनेकांना आवडतो. काहीजण व्हिनेगरमध्ये बुडालेली पांढरीशुभ्र अंडी पसंत करतात.
लंडनमधल्या सणांविषयी लिहायलाच हवं. ख्रिसमस, गुड फ्रायडे, इस्टर याव्यतिरिक्त दिवाळी, चायनीज न्यू इयर असे सणही इथे मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. त्यातही युरोपची खास ओळख असलेला नाताळ हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची पद्धत आहे. ऐन हिवाळ्यात येणारा हा सण म्हणजे प्रत्येकासाठी एक आनंदाची पर्वणीच असते. 25 डिसेंबरला सण येत असला तरी त्याची तयारी मात्र कित्येकांच्या घरी आधीपासूनच सुरु असते . या ख्रिसमसला तुम्ही काय नवीन करू शकता, कोणता पोशाख घालू शकता, डिनर पार्टीचा मेनू काय ठरवाल अशा प्रकारच्या जाहिराती सप्टेंबर-ऑक्टोबरपासूनच टीव्हीवर सुरु झालेल्या असतात. या काळात युरोपमधल्या आजूबाजूच्या देशांत घरं असणारे आपापल्या घरी गेलेले असतात. त्यामुळे कामकाजाच्या ठिकाणी थोडा निवांतपणा असतो. वेगवेगळी दुकानं, शॉपिंग मॉल्स अगदी भरघोस सूट देऊन ग्राहकांना आकर्षित करताना दिसतात. प्रत्येक घरात ख्रिसमस ट्री उभारलंच जातं आणि त्या ट्रीपुढे घरातील लहान मुलं आदल्या रात्री दूध आणि बिस्कीट ठेवतात, त्यांच्या लाडक्या नाताळबाबासाठी! त्या दिवशी पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद असल्याने रस्त्यावर एकही माणूस किंवा गाडी दिसत नाही पण प्रत्येकाच्या घरी मात्र सेलिब्रेशनची जंगी तयारी असते. या दिवशी सगळ्यांकडेच केला जाणारा पदार्थ म्हणजे व्होल रोस्टेड टर्की. कोंबडीसारखाच पण थोडा मोठा असा हा प्राणी परंपरेचा भाग म्हणून खाण्याची पद्धत आहे. स्वच्छ धुवून कोरडी करून अख्खीच्या अख्खी टर्की ओव्हनमध्ये ऑलिव्ह ऑइल शिंपडून शिजवली जाते. या टर्कीच्या पोटात आणि बाहेरही ब-याचशा भाज्या भरून शिजवल्या जातात. शिवाय आपापल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या साईड डिश आणि भरपूर डेझर्टही असतात. इस्टर आणि गुड फ्रायडे या सणांना आपण लहानपणी कवितेत ऐकलेले हॉट क्रॉस बन्स खाण्याची परंपरा आहे. फक्त त्यांची किंमत कवितेत म्हटल्याप्रमाणे एक पेनी किंवा दोन पेनी नसून त्यापेक्षा जास्त असते.
वेगवेगळ्या कलागुणांनी नटलेल्या, सृष्टीसौंदर्याने बहरलेल्या आणि असंख्य चवी ज्या शहरात एकत्र नांदत आहेत अशा लंडनला आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्या.
प्राची परब
मूळची मुंबईची. तिथल्याच एका कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनची इंजिनीअरिंगची पदवी घेतलेली असून दहा वर्षे एका नामांकित कंपनीत नोकरी केल्यानंतर आता लंडनमधे स्थायिक. वाचनाची अतिशय आवड. शिवाय मी स्वतः एक फूडी आहे. वेगवेगळ्या देशांना भेट देऊन तिकडचे लोकल कुझिन्स ट्राय करायला खूप आवडतं. प्रवासातून परत आल्यानंतर तेच पदार्थ घरी करून बघणं हा माझा आवडता उद्योग.
खूप सुंदर वर्णन व फोटोज
LikeLike