वाईन आणि चीजचा प्रदेश – फ्रान्स

डॉ. प्रियांका देवी-मारूलकर

regions-of-france-map

जर आपण ‘रातातुई’ किंवा ‘ज्युली अँड ज्युलिया’ नावाचे सिनेमे पाहिले असतील तर त्यात आपल्याला अत्यंत रोचक अशा फ्रेंच खाद्यसंस्कृतीची ओळख होते. अनेक शतके विकसित होत आलेले आणि बदलत राहिलेले फ्रेंच पाकशास्त्र म्हणजेच ‘ला क्युझिन फ्रान्से’. हे युरोपातील नावाजलेले आणि वैशिष्ट्यपूर्ण असे पाकशास्त्र आहे. २०१० मध्ये युनेस्कोने कल्चरल हेरिटेजमध्ये फ्रेंच गॅस्ट्रोनॉमीचा समावेश करून त्याचा मोठा सन्मान केला आहे.

मध्ययुगीन काळात, राजेरजवाड्यांच्या मुदपाकखान्यातून आणि नंतर १९ आणि २० व्या  शतकात रेस्टॉरंट्सच्या किचनमधून या पाककलेचा प्रवास कसा झाला, याची कथा खूप रंजक आहे. आज फ्रेंच खाद्यसंस्कृती जगभरात अत्यंत नावाजलेली अशी स्वयंभू खाद्यसंस्कृती मानली जात असली तरी १७ व्या शतकाआधी यावर इटालियन खाद्यसंस्कृतीचा खूप मोठा प्रभाव होता. इतिहासात थोडं मागे जाऊन बघितलं तर मध्ययुगीन फ्रान्समध्ये, १४ व्या शतकात, खाद्यसंस्कृतीविषयी सर्वप्रथम गीयोम तिरेल नावाच्या आचाऱ्याने लिखित रूपात ‘ल वियांदीअर’ नावाच्या पुस्तकात काही पदार्थांच्या कृती पुढे आणल्याचा उल्लेख आढळतो. सतराव्या शतकानंतर मात्र फ्रेंच खाद्यसंस्कृतीवरील इतर खाद्यसंस्कृतीचा प्रभाव कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले आणि स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण अशी खाद्यशैली विकसित झाली.

फ्रेंच राज्यक्रांतीनंतर, म्हणजे १८ व्या आणि १९ व्या शतकात या खाद्यसंस्कृतीत अनेक बदल झाले. आज देखील अनेक फ्रेंच पाककृतींमध्ये वापरले जाणारे मूळ फाऊंडेशन सॉस (espagnole,  velouté  आणि  béchamel) १७८४ मध्ये मारी- आंतुवां कारेम नावाच्या शेफनी सर्वप्रथम बनवले आणि वापरून पहिले. पुढे विसाव्या शतकातदेखील या पाककलेत अनेक बदल झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी फ्रान्सवर जर्मनीनं आक्रमण केले आणि मांसाचा  तुटवडा निर्माण होऊ लागला. या वेळी मांस उत्पादन वाढवण्यासाठी लक्षणीय प्रयत्न केले गेले आणि मग युद्धानंतरही सर्वसामान्य फ्रेंच माणसाच्या रोजच्या जेवणातील सामिष आहाराचे एकूण प्रमाण वाढले.

१९६० मध्ये बरेच पोर्तुगीज स्थलांतरित फ्रान्समध्ये आले आणि याचा प्रभाव फ्रेंचांच्या स्वयंपाकच्या पद्धतीवर झाला असाही एक मतप्रवाह आहे. २० व्या  शतकात फ्रेंच पाककलेमध्ये जे वैशिष्ट्यपूर्ण बदल झाले, त्यात पदार्थाच्या मूळ चवीत खूप बदल होऊ नयेत याची काळजी घेतली गेली. पदार्थ कमीतकमी क्लिष्ट असावेत, मासे, भाज्या, फळे आणि समुद्री फळे (fruits de mer किंवा sea animals) कमी शिजवले जावेत, जेणेकरून त्यांची नैसर्गिक चव तशीच राहील याची काळजी घेतली जाऊ लागली. मायक्रोवेव्ह ओव्हनच्या उदयामुळे अनेक नवीन प्रयोग या काळात केले गेले.

मी, २०११ पासून पॅरिसमध्ये आहे आणि फ्रेंच लोकांच्या खाद्यपद्धतीला जवळून पाहत आले आहे. प्लास मॉंजसारखा तरुणाईने रसरसलेला भाग असो किंवा ऑपेरासारखा सोफिस्टिकेटेड एरिया असो, विविध टपऱ्या, बेकरीज, रेस्टॉरंट्स नि वेगवेगळ्या रंग, वास, चवीने मला भुरळ पाडली आहे. या सगळ्यानं कधी संपूर्ण कधी पुसट ओळख करून देण्यासाठी मला आपल्याकडे खेचले आहे. माझ्यापरीने जमेल तसे आणि तेवढे मी चाखत आले आहे.

एकुणातच, उन्हाळ्यातले प्रफुल्लित करणारे सोनेरी दिवस असोत किंवा हिवाळ्यातले थंड दिवस, फ्रेंच माणसे खाण्यावर खूप प्रेम करतात आणि छोट्या क्रेप, कबाब, पानिनीच्या टपऱ्यांपासून ते अगदी मिशेलिन स्टार रेस्टॉरंटमध्ये खाण्याचा आस्वाद घेताना दिसतात. मी स्वतः शाकाहारी असल्याने काही मांसाहारी पदार्थांची चव कशी लागते हे अधिकारवाणीने सांगू शकणार नाही कदाचित, पण, तो तो पदार्थ बनवण्यामागची विचारपद्धती, त्यात वापरल्या जाणाऱ्या घटकांमागे असलेली कारणे जाणून घेणे मला फार आवडते. महत्त्वाचे म्हणजे खाद्यसंस्कृती देशाच्या समाजजीवनाचा खूप मोठा भाग असल्याने मला त्याविषयी जाणून घ्यायची नेहमीच उत्सुकता वाटते. या लेखात सर्वसाधारण फ्रेंच जेवणाचा आढावा घेतला जरी असला तरी माझा लिहिण्याचा जास्त भर फ्रेंच चीज आणि वाईनवर राहील.

सामान्यतः फ्रेंच  जेवणाच्या दिनक्रमात ब्रेकफास्ट, लंच  आणि डिनर  या तीन वेळी विविध पदार्थ खाल्ले जातात. मांस, चीज आणि वाइन हे आजच्या फ्रेंच खाद्य संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. भाज्यांमध्ये बटाटे, कांदे, घेवडा (जो फ्रेंच बीन्स म्हणून ओळखला जातो तो आरिको वेर (Haricot Vert), बटण मश्रूम्स (Champignon Paris), गाजर, लाल भोपळा यांचा अधिक वापर होतो. विविध भाज्यांबरोबरच व्हाइट (म्हणजे फिश, चिकन आणि पोर्क) आणि रेड (बदक, गीझ पक्ष्यांचे मांस, बीफ म्हणजे गाय आणि बैल यांचे मांस) मांसाचा अनेक पदार्थांमध्ये सढळ वापर केला जातो.

ब्रेकफास्ट म्हणजेच ल पती देजनेर (Le petit déjeûner)

पारंपरिक फ्रेंच नाष्ट्यामध्ये सहसा गोड बेकरी पदार्थांचा समावेश असतो. मारी आंतुआनेत या राणीच्या तोंडचे प्रसिद्ध वाक्य “जर ब्रेड परवडत नसेल तर त्यांनी केक खावा” यातील ब्रेड म्हणजे फ्रेंच बागेत! फूटभर लांब, निमुळता आणि सर्वसामान्य स्लाइस ब्रेडपेक्षा थोडा कडक असा हा बागेत फ्रेंच खाद्यसंस्कृतीची ओळख आणि अविभाज्य घटक आहे. नाष्ट्यामध्ये, फ्रेंच ब्रेडच्या स्लाइसवर विविध प्रकारचे जॅम, मार्मालेड, बटर, मध लावून खाल्ले जाते. मऊ गोड ब्रेड,  ब्रिओश (Brioshe) हा चहा किंवा कॉफीबरोबर खाल्ला जातो. क्रोसों  (Croissants), बेदाणे घातलेला पां ओ रेजाँ  (pain aux raisins) आणि चॉकोलेट भरलेला पां ओ  शोकोला (pain au chocolat) असे पदार्थ सर्व बेकऱ्यांमधून  सकाळी गरम ताजे मिळतात .

दुपारचे आणि रात्रीचे जेवण

पारंपरिक फ्रेंच जेवण खरे तर दोन तास चालते, पण आता आठवड्याभरात कामाच्या घाईमुळे एक तासाचा लंच ब्रेक घेतला जातो. पण, सुट्ट्यांच्या दिवशी आजही फ्रेंच कुटुंबे निवांत गप्पा मारत, वाईनचा आस्वाद घेत २-२.३० तास जेवण करणे पसंत करतात.  सर्वसाधारण फ्रेंच जेवण तीन टप्प्यांत केले जाते (थ्री कोर्स). ओर दु’व्र (hors d’œuvre)  किंवा आंत्रे (entrée) म्हणजे मुख्य जेवणाआधी घेतले जाणारे सूप किंवा स्टार्टर्स, प्ला प्रांसिपाल (plat principal)  म्हणजे मेन कोर्स आणि शेवटी चीज कोर्स (fromage)  ज्यामध्ये विविध चीजचे प्रकार बागेत किंवा सॅलडबरोबर खाल्ले जातात किंवा गोड पदार्थाने (देसेर म्हणजेच desserts)  जेवणाचा शेवट केला जातो.

ओर  दु’व्र (hors d’œuvre)  किंवा आंत्रे (entrée)

या मध्ये विविध प्रकारची सूप्स (फ्रेंच अनियन सूप), अपिटायझर्स किंवा स्टार्टर्स,  पोर्कपासून बनवलेले टेरीन, भाज्या किंवा सीफूडपासून बनवले जाणारे दाट सूप / पोटाज म्हणजेच बिस्क (Bisque),  डक लिव्हरपासून बनवले जाणारे जगप्रसिद्ध फुआ ग्रा (Foie Gras) हे काही जेवणाआधी आंत्रे म्हणून खाल्ले जाणारे पदार्थ आहेत.

प्ला प्रांसिपाल  (plat principal)  म्हणजे मेन कोर्स

मेन कोर्समध्ये Steak frites ही अतिशय कॉमन डिश आहे. म्हणजे बीफचा तेलावर परतलेला तुकडा उकडलेले बटाटे,  सॉसमध्ये तयार केलेल्या उकडलेल्या घेवड्याच्या शेंगा आणि / किंवा तळलेल्या बटाट्याच्या फ्रिट्सबरोबर खाल्ल्या जातात. बीफ स्टेकच्या ऐवजी कधी कधी चिकन किंवा डक पीससुद्धा खाल्ला जातो. दुपारच्या आणि संध्याकाळच्या जेवणात वेगवेगळ्या ऋतूप्रमाणे घेतली जाणारी वाईन,  बागेत आणि चीजचे वेगवेगळे प्रकार साथीला हटकून असतातच; किंबहुना त्याशिवाय फ्रेंच जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. संध्याकाळच्या जेवणात बऱ्याच वेळा हलके जेवण घेतले जाते आणि भात, पास्ता (जरी मूळ इटालियन असला तरी फ्रेंच जेवणात सर्रास वापरला जातो!)  आणि  भाज्यांचा अधिक वापर केला जातो.

ऋतुमानानुसार मेन कोर्समध्ये खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमध्येसुद्धा बदल होतो. स्प्रिंगमध्ये बार्बेक्यू म्हणजे भाज्या किंवा मांस कोळशावर भाजून खाल्ले जाते, उन्हाळ्यात पचायला हलके रसाळ भाज्यांनी युक्त (उदा. टोमॅटो, कुर्जेत यांसारख्या भाज्या आणि सॅलड्स) पदार्थ घेतले जातात, तर हिवाळ्यात स्निग्धांश जास्त प्रमाणात असलेले चीज आणि सॉसेज  (पोर्कपासून बनवलेले सॉसेज)  युक्त  ‘राकलेत’  (raclette)  खाल्ले जाते.

सॅलड,  देसेर आणि कॉफी

जेवणाच्या शेवटी गोड पदार्थ (desserts) आणि कॉफी घेतली जाते. बऱ्याच वेळी अन्न पचन चांगले व्हावे या साठी गोड  पदार्थ खायच्या आधी नुसतीच विविध प्रकारची सॅलडची पाने विनेगरयुक्त सॉस शिंपडून खाल्ली जातात. फ्रेंच गोड  पदार्थांचा सुद्धा एक विशिष्ट खजिना आहे. या मध्ये वेगवेगळे टार्ट (सफरचंद, आब्रिकोट, फ्रेझ म्हणजे स्ट्रॉबेरी अशा फळांचे टॉपिंग असलेले टार्ट), चॉकोलेट मूस, क्रेप, क्रेम ब्रुले अशा वेगवेगळ्या गोड पदार्थांचा समावेश आहे. जेवणाचा शेवट ब्लॅक कॉफी घेऊन केला जातो.

फ्रान्सच्या विविध प्रांतांमधील काही विशिष्ट पदार्थ

जसे सर्वसामान्य फ्रेंच जेवणातील काही पदार्थ मी वरती नमूद केले, तसे फ्रान्सच्या विविध प्रांतांमध्ये (त्याला प्रोव्हॉन्स असे म्हणतात)  वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. उदाहरणार्थ चीज, मीट , सीफूड आणि भाज्या यांचे कस्टर्डबरोबरील मिश्रण सारण म्हणून वापरून बनवला जाणारा ‘किश लॉरेन’ हा लॉरेन प्रांतातील प्रसिद्ध पदार्थ आहे. पिकार्डी, नॉर्मंडी आणि ब्रिटनी प्रांत समुद्राजवळ असल्याने तिथे जेवणात सीफूडचा सढळ वापर आढळतो. बेसिल सॉसमध्ये शिजवलेले शंख, शिंपले (फ्रेंच मध्ये मुल’स Moules) खूप आवडीने खाल्ले जातात. यावरून ‘मिस्टर बिन्स हॉलिडे’ या चित्रपटाची हटकून आठवण होते, आणि शिंपले पाहून मिस्टर बिनचा चित्रविचित्र झालेला चेहरा आठवूनसुद्धा हसायला येते. गस्कोनी आणि पेरीगोर्ड भागात टेरीन आणि फुआ ग्रा, बॉर्दोची वाईन, तुलूजमध्ये मिळणारे घेवड्याच्या बियांपासून तयार केले जाणारे कासुले (cassoulet), प्रोव्होन्स आल्प्स आणि क्योत द’आझूर भागात रातातुई (Ratatouille), आल्प्समध्ये  बनवले जाणारे टॉर्टीफ्लेट, फॉन्द्यू हे प्रकार केवळ फ्रान्समध्ये नाही तर जगभरात प्रसिद्ध आहेत.

फ्रेंच चीज आणि वाईन

ला व्ही फ्रान्से म्हणजेच फ्रेंच जेवणाचाच नाहीतर जीवनाचा मुख्य भाग म्हणजे चीज आणि वाईन. चीज ला फ्रेंच मध्ये फ्रोमाज आणि वाईनला द्यु वां असे म्हणतात.  फ्रेंच  माणसाच्या  दृष्टीनं  फ्रान्स  ही  चीजसाठी सगळ्यात जास्त अनुकूल  भूमी  आहे;  पृथ्वीतलावर  अन्य कोणतीही  नाही असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. वाईन आणि चीज दुपारच्या आणि रात्रीच्या  जेवणात तसेच मधल्या वेळच्या च्याऊ म्याऊ खाण्यात सुद्धा आवडीने खाल्ले जाते.  रोमन  काळापासून  फ्रेंच  जेवणात चीजचा उल्लेख आढळतो.

फ्रेंच खाद्यसंस्कृतीत रोमन साम्राज्याकडून चीजचा शिरकाव झाला आणि फ्रेंच लोकांनी चीज बनवण्याच्या कलेचा प्रसार आणि प्रचार केला असे मानले जाते. प्राण्यांच्या आतड्यांपासून बनवलेल्या पिशव्यांमधून  दूध नेताना  प्राण्यांच्या  पोटातील  रेनेट  विकराची  दुधावर  प्रक्रिया  झाल्याने त्यातून  चीजचा  शोध  लागला  असे  मानले  जाते.  गेल्या  अनेक  वर्षांत  चीज  बनवण्याच्या  पारंपरिक  प्रक्रियेबरोबर नवीन  पाककृतींचा  शोध  फ्रान्समध्ये  लागत  गेला आहे. फ्रान्सच्या विविध प्रांतांनी  आपल्या  परीने  चीजच्या  वेगवेगळ्या  प्रकारांना  चव,  रंग  आणि  वास  द्यायचा  प्रयत्न  केलाय.  आजमितीस  या  चीजचे  ३५०  हून  अधिक अधिकृत  आणि घरगुती  स्तरावर  हजार-एक  प्रकार  आहेत.  आणि  यातील  अनेक  प्रकार  जगविख्यात  आहेत.

औद्योगिकीकरणाच्या या युगात चीजची मूळ चव कुठेतरी हरवत चालल्याचा सूर निघत असतानादेखील चीजसाठीचे फ्रेंच  माणसाचे  आणि  जगभरातील  खवय्यांचे  वेड  कमी  होईल,  याची  शक्यता  नाही. प्रत्येक ऋतूनुसार  वेगवेगळे  प्रकार  फ्रेंच जेवणाचे टेबल सजवत असतात.  फ्रान्समध्ये  चीज  मुख्यत्वे  अपेरो  ( म्हणजे  aperitif  and cocktails  म्हणजे  संध्याकाळच्या  नाश्त्याच्या  वेळी)  आणि  जेवताना  खाल्ले  जाते.  चीज बनवणे  ही  इथल्या खाद्यसंस्कृतीमधली  महत्त्वाची  कला  आहे.  गाय,  मेंढी,  बकरीच्या  पाश्चराइज्ड  आणि अनपाश्चराइज्ड  दुधापासून  चीजचे  विविध  प्रकार  बनवले  जातात.  मोठ्या  मोठ्या  सेलारमध्ये  (लाकडी बॉक्समध्ये)  चीजचे  एजिंग  म्हणजे  मुरवणे  (maturation)  केले जाते. जितके जास्त दिवस चीज मुरवाल तितके ते जास्त चविष्ट असे मानले जाते.  चीजच्या चवीवर अनेक गोष्टींचा  प्रभाव  पडतो. प्राण्याने गवत कोणते खाल्ले आहे,  दुधातील Lactic acid bacteria  यांचे  परिमाण  आणि  प्रकार,  चीज  करताना  वापरलेले  रेनेट  विकर यावर चीजची चव आणि रंगरूप ठरते. औद्योगिकीकरणाच्या आताच्या युगात हे रेनेट  आता  वनस्पतिजन्य  आणि  मायक्रोबियल (जीवाणूंपासून)  रूपातूनसुद्धा  तयार  केले  जाते.  अनपाश्चराइज्ड दुधापासून बनवलेले चीज चवीला जास्त चांगले लागते असे मानले जाते. ब्रि प्रांतात तयार होणारे  Brie de Meaux (ब्रि), नॉर्मंडी भागातले  camembert (कॅमेम्बोर), emmental (एमेंताल), mimolet (मिमोले), comte (कॉम्ते), chevre (शेव्र), मिदी -पिरेनेज भागातले  roquefort,  आल्प्स  पर्वतीय  भागातून  येणारे reblochon (रेब्लोशोन) हे फ्रेंच चीजचे नावाजलेले आणि  चीज प्लॅटरमध्ये नेहमी आढळणारे प्रकार आहेत.

सॉफ्ट किंवा क्रीम आणि हार्ड असे चीजचे प्रकार आढळतात. अर्थातच चीजचा पोत जसा असेल त्यावरून हे प्रकार ठरले. ब्रि, कॅमेम्बोर, शेव्रचे काही प्रकार हे  सॉफ्ट आणि एमेंताल, मिमोले, कॉम्प्ते इ. प्रकार सेमी-हार्ड आणि हार्ड प्रकारात मोडणारे.  फ्रेंच  चीज  बहुतांश  वेळा  नुसते  किंवा  फ्रेंच  ब्रेडबरोबर  खाल्ले  जाते.  चीजचे  शेव्र,  एमेंताल,  मोझ्झारेला,  पार्मेसन  असे  काही  प्रकार  पिझ्झा,  फोन्द्यु,  सुफले  असे  पदार्थ बनवताना  वापरले  जातात.  बऱ्याचदा  चीजचा  एक  विशिष्ट  उग्र  वास  खूप  जणांना  लगेचच  आवडत  नाही,  पण  जर  चव  घेऊन  बघायला  सुरुवात  करायची  असेल  तर  कॉम्ते,  एमेंताल,  कांताल,  ब्रि  या  प्रकारांपासून  सुरुवात  करता  येईल,  या  चीजची  चव  आणि  वास  जर  तितका  तीव्र / उग्र  वाटला  नाही  तर अन्य प्रकार  देखील  चाखून  पाहता  येतील.

फ्रेंच चीजबरोबर वाईनदेखील तितकीच जगप्रसिद्ध आहे. हजारो वर्षांच्या  इतिहासाबरोबर फ्रेंच वाईन वाहात आलीये असे म्हणायला हवे खरे तर ! रोमन काळाच्या सुद्धा खूप आधीपासून, फ्रेंच वाईनच्या निर्मितीचे उल्लेख आढळतात. आज वाईन निर्मितीत फ्रान्स जगभरात अव्वल आहेच, पण वाईन निर्मितीच्या शास्त्राविषयी अभ्यास आणि प्रसारातसुद्धा अग्रगण्य आहे.  जॅपनीज वाईनच्या निर्मितीवर सुद्धा फ्रेंच वाईन निर्मितीचा प्रभाव आढळतो. फ्रान्समध्ये वाईन बनवण्याची काटेकोर नियमावली आणि कायदे आहेत. फ्रेंच वाईन जगभरात निर्यात होते.

द्राक्षाच्या वेगवेगळ्या प्रकारांपासून व्हाईट, रेड, पिंक (रोजे), स्पार्कलिंग,  फोर्टिफाइड  आणि  शॅम्पेन अशा विविध वाईन्स बनवल्या  जातात. वाईन जितकी जुनी तितकी चविष्ट असा ढोबळ नियम आपल्याला माहीत असतो पण फक्त तेवढेच त्या वाईनची चव ठरवत नाही.  द्राक्षाची जात, जमिनीचा पोत, ऋतुमानानुसार  द्राक्षाला  मिळणाऱ्या उन्हाचे प्रमाण, ज्या लाकडी ड्रम्समध्ये वाईन मॅच्युरेशनसाठी साठवली जाते त्याच्या लाकडाचा प्रकार असे लहानमोठे अनेक घटक वाईनच्या रंग, वास आणि चवीवर परिणाम करतात. त्यामुळे वाईन बनवताना या सर्व घटकांचा  खूप बारकाईने विचार केला जातो.

चीजप्रमाणेच वाईनचे शेकडो प्रकार फ्रान्समधील विविध प्रोव्होन्समध्ये तयार होतात आणि एवढ्या वेगळ्या प्रकारांमधील चवीमधील सूक्ष्म फरक फक्त फ्रेंच लोकांना आणि वाईनतज्ज्ञांना (सोमेलिअर)नाच  कळू शकतात असे वाटते. यामध्ये बॉर्दो आणि बर्गंडी (बुरगोन्य) हे वाईन निर्मितीतले अग्रेसर प्रांत आहेत. बॉर्दोची रेड वाईन आणि बर्गंडीची व्हाईट वाईन खरोखरच खूप चविष्ट असते.

मोठ्या वाईनरीज तर निर्मिती करतातच, पण पिढ्यान् पिढ्या घरगुती पातळीवर अगदी सिलेक्टिव्ह प्रमाणात पण अत्यंत चविष्ट वाईन निर्मिती करणारे शेतकरीसुद्धा फ्रान्समधील बऱ्याच प्रांतांत आढळतात.  अजून एक रंजक गोष्ट म्हणजे विशिष्ट प्रकारची वाईन विशिष्ट आकाराच्या बाटलीत पॅक केली जाते. म्हणजे ड्राय व्हाईट वाईन छोट्या निमुळत्या तोंडाच्या बाटलीत तर शॅम्पेनसारखी स्पार्कलिंग वाईन निमुळत्याहून हळूहळू मोठी मान होत जाणाऱ्या आकाराच्या बाटलीत पॅक केली जाते.

जेवणातल्या कुठल्या पदार्थाबरोबर किंवा चीजबरोबर कोणत्या  प्रकारची  वाईन  घेतली  जावी  याचेसुद्धा  इथे  शास्त्र  आहे  असे  म्हणता  येईल. सहसा  फ्रेंच  लोक  याचे  सारासार  नियम  जेवताना  पाळतात. पदार्थाची चव आणि त्याबरोबर घेतल्या जाणाऱ्या वाईनची चव याचा उत्तम मेळ साधला जावा असा त्यामागचा विचार. उदाहरणार्थ, रोस्टेड भाज्या, क्युअर्ड मीटबरोबर लाइट रेड वाईन; फक्त भाज्यायुक्त पदार्थाबरोबर ड्राय व्हाईट किंवा बीफबरोबर  बोल्ड  रेड वाईन घेतली जाते.  ढोबळ मानाने  सॉफ्ट  किंवा  क्रीम  चीजबरोबर  व्हाईट वाईन आणि हार्ड चीजबरोबर रेड वाईन घेतली जाते.

फ्रेंच वाईनमध्ये सुद्धा शेकडो प्रकार आहेत आणि फ्रान्सच्या वेगवेगळ्या भागात तयार होणार्‍या वाईननुसार ह्या चीज आणि वाईनच्या पेअरींगमध्ये खूप वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात.

आज भारतातून सहल, शिक्षण किंवा कामानिमित्त आपण जर फ्रान्समध्ये प्रवास करणार असाल तर फ्रान्सच्या खाद्यसंस्कृतीचा भाग असलेले चीज आणि वाईन याचा शक्य असल्यास जरूर आस्वाद घेऊन पाहा. भारतीय आणि फ्रेंच जेवणात खूप फरक असतो. फ्रेंच जेवण मिळमिळीत असते अशी आपल्यातल्याच काही मित्रमैत्रिणींकडून ओरड होताना दिसते, पण तरीही ती फ्रेंच खाद्यसंस्कृती आहे, एका विशिष्ट समाजाचे त्यात प्रतिबिंब आहे हे स्वीकारून काही खाऊन बघता आले ते  आनंद  देणारे  असते. जर फ्रेंच खाद्यपदार्थ, चीज आणि वाईनची चव आवडली तर खाद्यसंस्कृतीचे एक नवीन दालन तुमच्यासाठी खुले होईल यात शंकाच नाही.

डॉ. प्रियांका देवी- मारुलकर

priyanka-devi

मूळची पुण्याची. २०११ पासून पॅरिसमध्ये शिक्षणासाठी राहात आहे. पिअर आणि मारी क्युरी विद्यापीठातून कॅन्सर इम्युनॉलॉजीमध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त. त्याबरोबरच चित्रकार आहे आणि मुख्यत्वे जलरंगाचे माध्यम मला जास्त भावते. (ब्लॉग लिंक http://priyanka-devi.blogspot.fr/) विविध देशांच्या भटकंतीमध्ये मला तिथला इतिहास, संस्कृती, लोककला यांविषयी जाणून घ्यायला आवडते.

फोटो – प्रियांका देवी    व्हिडिओ – YouTube

6 Comments Add yours

  1. Amol says:

    Too good!

    Like

  2. Priyanka says:

    Thank you 🙂

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s