शहर आणि खाद्यसंस्कृती – दिल्ली

मयूरेश भडसावळे

दिल्लीचा एक जुना फोटो - स्त्रोत विकीपीडिया
दिल्लीचा एक जुना फोटो – स्त्रोत विकीपीडिया

कुतुबमिनार आठवतो हरहमेशा….दिल्ली म्हटलं की आधी कुतुबमिनारच आठवतो हरहमेशा ! सोनेरी उन्हात झळाळून निघालेला, अलवार धुक्यात गुरफटलेला, म्युरल्स, ग्राफिटीज, पेंटिंग्ज, सुव्हिनिअर पीसेसमधून डोळ्यांत भरणारा किंवा ‘तंत्रा’च्या टी-शर्टसवर, ‘चुंबक’च्या प्रॉडक्ट्सवर मिरवणारा, टुरिस्ट एजन्सीजच्या लोगोवर झळकणारा कुतुबमिनार ‘दिल्ली’ बनून राहतो अनेकांसाठी-जगभरात. प्रतीक! प्रतीकच !!

स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, लाल किल्ला, जामा मस्जिद ,संसद भवन, नॉर्थ ब्लॉक- साऊथ ब्लॉक, इंडिया गेट-राजपथ, राजघाट-शांतीवन, करोल बाग- चांदणी चौक,पगडी-दाढी-सरदारजी, बटर चिकन-दाल मखनी-छोले-भटुरे-लस्सीवस्सी, शर्मा-वर्मा-ब्रेड पकोडे-जिलबीकचोरी….प्रतीकेच सारी पुनःपुन्हा ! अनेक प्रतीकांनी सजलेली ‘राजधानी’ दिल्ली भरभरून भेटत राहते आपल्याला वेगवेगळ्या प्रतिमांमधून, रचितांमधूनही पण शहराचं काय ? कितीही ओळख झाली वाटलं तरी हे महानगर सहजासहजी आवाक्यात येत नाही. प्रसन्न तजेलदार सकाळी, आळसावलेल्या दुपारी, उत्साहाने फुलून आलेल्या संध्याकाळी वा रात्रीही, कडाक्याच्या उन्हात-गोठवून टाकणाऱ्या थंडीत इतिहासात लपेटलेल्या या शहराच्या अंगाखांद्यावर खेळू पाहताना अव्याहत बदलांचे पायठसे तेवढे नजरेवर कोरले जातात. कुठल्याशा अलिप्त क्षणी या स्थित्यंतरांकडे थबकून बघताना बदलांमागून डोकवणारे सातत्य जेव्हा खुणावते तो क्षण मात्र आपला – शहराशी जोडून देणारा.

आठ वेळा वसवलं गेलेलं शहर हे – किला राय पिठोरा ते नवी दिल्ली व्हाया सिरी, तुघलकाबाद, जहांपनाह, फिरोजाबाद, शाहजहानाबाद- उध्वस्त होताना, पुनःपुन्हा वसतानाही स्थलांतरितांच्या भक्कम खांद्यावर पेललेलं दिसेल-पहिल्यापासून आत्तापर्यंत. स्थलांतरितांनी आकारलेली जीवनशैली,दैनंदिन व्यवहार,कला यांनी दिल्लीच्या सांस्कृतिक विश्वात एक सुंदरसा गोफ विणलेला दिसतो- किनारी बाजारच्या रंगीबेरंगी दुनियेइतकाच देखणा, बहुपेडी. इतिहासाचे बोट धरून जसेजसे हे धागे उलगडत जावेत तसे प्रतिमांमध्ये, प्रतीकांमध्ये गुदमरलेल्या शहरावरचे लेप उडून जाऊ लागतात, शहर बोलू लागतं आपल्याशी. त्याचा तोंडवळा वरवर रंगवला जातो तसा फक्त पंजाबी उरत नाही वा डिफेन्स कॉलनी, खान मार्केट, ग्रेटर कैलाश, साकेत सिलेक्ट सिटीवोकसारख्या अपटाऊन ओसंडत्या ‘मार्केट प्लेसेस’ पुरता मर्यादितही रहात नाही. खूप काही लिहिलं-बोललं गेलेले जामा मस्जिद-माटिया महाल टाळूनही शाहजहानाबादच्या धमन्यांमधून भटकताना, सिव्हील लाईन्सपल्याड तिबेटी निर्वासितांच्या छावण्यांतून निरुद्देश फिरताना, लाजपतनगरच्या सेन्ट्रल मार्केटमागे दडलेल्या अफगाणी वसाहतींतून वावरताना, अर्जुन नगरमधल्या आफ्रिकन वस्त्यांमधून वा ग्रीन पार्कच्या ईशान्य भारतीयांच्या छोट्या छोट्या सांस्कृतिक बेटांमधून ‘डोळे’ उघडे ठेऊन चालताना किंवा करोल बागेच्या रिगडपुऱ्यामध्ये ‘गलावटी’ करण्यासाठी आलेल्या सांगलीकडच्या मराठी कुटुंबियांशी संवाद साधताना जे शहर दिसतं,  ते स्थलांतरितांच शहर असतं – जितं जागतं, घडत राहणारं. स्थलांतरितांची जीवनशैली – विशेषतः आपापला ‘प्रदेश वा देश’ जिथे राहतो तिथे जमेल तसा उभा करण्याची असोशी, नव्या शहरात रुळताना आपले घरगुती मसाले-पाककृती-अन्नसेवनाच्या सवयी टिकवून ठेवताना नवं काही स्वीकारण्याची धडपड एका खाद्यसंस्कृतीला जन्म देऊन जाते. त्या नागरी समाजाच्या आर्थिक-सामाजिक व्यवहारांमध्ये स्थलांतरित समूहाचे जे स्थान आहे, त्याचा जो स्वभाव वा भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत वा धार्मिक-जातीय समीकरणे आहेत त्यावर अर्थातच त्या खाद्यसंस्कृतीचा परीघ – ‘समाजमान्यता’ वा ‘लोकप्रियता’ – अवलंबून असलेली दिसेल.

बादशहा शाहजहानचा एक किस्सा आवर्जून आठवतो. आयुष्याच्या संध्याकाळी गलितगात्र शाहजहानला त्याच्या मुलाने, औरंगजेबाने जेव्हा आग्र्याच्या किल्ल्यात बंदिस्त केले होते, तेव्हा एक सूट मात्र जरूर दिली होती. स्वतःचा सर्वात आवडता ‘पदार्थ’ निवडण्याची मुभा शाहजहानला होती. तो पदार्थ त्याला रोज मिळू शकणार होता. मात्र अट एकच – जो पदार्थ निवडला जाईल तोच शेवटपर्यंत खावा लागेल, त्यात बदल होणार नाही. असं म्हणतात शाहजहानच्या खानसाम्याने त्याला ‘दाल-खिचडी’ निवडण्याचा सल्ला दिला. कारण तो धुरंधर साधीशी दालखिचडीच रोज वेगवेगळ्या प्रकारे करू शकणार होता! मुघलाई खानसाम्याच्या कौशल्याला दाद देणाऱ्या या कथेतील वा दंतकथेतीलही ‘दाल-खिचडी’ मला तरी आजच्या शाहजहानाबादचं रूपक वाटतं. वरकरणी साधं भासणारं रूप, पण रोज उलगडत जाणारं नवं वैशिष्ट्य – आणि हे वैशिष्ट्य बहाल करणारे जनसमूह…स्थानिक, फिरस्ते, स्थलांतरित..वेगवेगळे धर्म, जाती, भाषा, संस्कृती, अभिव्यक्तींचे. या अभिव्यक्ती शाहजहानाबादच्या खाद्यसंस्कृतीमध्ये खूप ठळकपणे उठून दिसतात. त्यातही मुघलाई खाद्यसंस्कृतीचं, इथल्या जामा मस्जिद-माटीया महालमधील ‘लीजंडरी’ करीम वा अल जवाहरकडे मिळणाऱ्या नल्ली निहारी, मटन कोरमा, बिर्याणी-कोफ्ता  वा हलीमचं डॉक्युमेंटेशन, अभ्यास वा ‘सेलीब्रेशन’ही वेगवेगळ्या प्रकारे झालं आहे. ही संस्कृती राजाश्रयामुळे बहरत गेलेली आढळेल.

मात्र राजाश्रयाव्यतिरिक्त शाहजहानाबादमधील स्थलांतरितांनी आकारास आणलेल्या खाद्यसंस्कृतीचे अनेक पदर हवे तसे उलगडले गेलेले आढळत नाहीत. एक जरूर, राजाश्रयाविनाही शाहजहानाबादमधील एकांड्या शिलेदारांच्या कथा, त्यांची उद्योगशीलता, आंत्रप्रीन्युरशिप आणि त्यांनी या शहरामध्ये रुजवलेल्या ‘चवी’ वा ‘पदार्थ’ यांच्या कथा आहेतच. फाळणीनंतर शहरात आलेल्या पंजाबी निर्वासितांपैकी पेशावरहून आलेल्या कुंदनलाल गुजराल या हुनरबाजाने बटर चिकन, तंदुरी चिकन हे पदार्थ कसे विकसित केले आणि दिल्लीच्या खाद्यसंस्कृतीमध्ये कशी भर घातली किंवा शंभरेक वर्षांपूर्वी पतौडी-रेवारीहून आलेल्या कुरेमल मोहनलालने चावडीबाजारातून दिल्लीमध्ये ‘कुल्फी’ कशी रुजवली याच्याही सुरस-रंजक-विश्वास ठेवण्याजोग्या कहाण्या अनेक ठिकाणी ऐकायला-वाचायला मिळतील. करीमपासून कुरेमलपर्यंत, या ‘लीजंडरी कुझीन्स’चे महत्त्व आणि माहात्म्यही मान्य केले तरी खाद्यसंस्कृती म्हणून घेणं मला महत्त्वाचं वाटतं. समूहांच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा झाल्यास शाहजहानाबादची स्थापना हा एक महत्त्वाचा संदर्भबिंदू मानावा लागेल.

शाहजहानसोबत दिल्लीमध्ये प्रवेशलेले बनिया उत्तरमोघलाईच्या काळात मुघल बादशहाचे, सरदारांचे ‘सावकार’ म्हणूनही काम करत असत. शहराच्या अर्थकारणावर, सामाजिक-सांस्कृतिक व्यवहारांवर त्यांचा एक प्रभाव पसरत गेला. त्यांची ‘शुद्ध शाकाहारी’ खाद्यसंस्कृती शाहजहानाबादमध्ये रुजत गेली. बनियांच्या स्वयंपाकघरातून बाहेर येऊन हलवायाच्या ठेल्यावर विराजमान झालेले मोजकेच पदार्थ आजही चांदणी चौकाच्या आसपास बनिया-बहुल ‘कटरा नील’, ‘कुचा महाजनी’, ‘कुचा पातीराम’, ‘सीताराम बाजार’ येथे आपला आब आणि लोकप्रियता राखून आहेत. परंपरागत नक्षी मिरवणाऱ्या भव्य हवेल्या, मिठाई-नमकीन विकणारे परंपरागत हलवाई आणि केवळ २-३ पदार्थांमधील वैविध्याने सकाळच्या नाश्त्याला दिलेले ‘चवदार’ वळण ही बनियांची थोर देणगी. आग्र्याच्या फतेहपूर, बुलंदशहर, भिंड, मोरेना किंवा आजचा मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश जिथे एकत्र येतो त्या भागात जी पारंपरिक पिकं घेतली जातात त्यांत तृणधान्य महत्त्वाची. साहजिकच बनियांच्या स्वयंपाकघरात आणि भटारखान्यातही कडधान्यांचे प्रस्थ फार.. त्यातही आग्रा भागातील बनियांमध्ये उडदाचा वापर सढळहस्ते. उडदाची डाळ वाटून, त्यात घरगुती मसाले घालून–परतून मात्र कांदा-लसूण सोवळेपणाने टाळून जे वाटण करतात ते भरून केलेल्या पुऱ्या, कचोऱ्या आणि सोबत ‘आलू-सब्जी’ यातील वैविध्य पाहण्यासाठी बेडमी-आलू वा खस्ता कचोरीचे प्रकार खाऊन पाहावेत. बेडमी-पुरी, नागौरी-हलवा, कचालू आणि जिलेबीच्या चुलतघराण्यातील इमरती/झांगरी हा कमाल लोकप्रिय नाश्ता…सकाळी सकाळीच मिळणारा. दुपारी-संध्याकाळी वा रात्री बेडमी, नागौरी तळणारा हलवाई सापडणे महामुश्कील. दिवसभरासाठी ‘खस्ता’ म्हणजेच सुंदर पापुद्रे सुटलेल्या खुसखुशीत कचोऱ्या आणि कधी मटार वा उडीद मसाल्याचं सारण भरलेल्या भरवा कचोऱ्या, आलू सब्जी असतेच. बेडमी पुरी उडदाचे सारण भरून करतात, गव्हाच्या आट्यापासून तर नागौरी पुरी मात्र मैद्यापासून बनवतात. बटाटा-टोमाटो आणि कधी भोपळा घालून केलेली सरसरीत स्वादिष्ट ‘आलू-सब्जी’ बेडमी वा नागोरीसोबत सुखाने नांदते. मात्र सुजीहलवा नागोरी पुरीची चव अधिक वाढवतो. कैरी-लिंबू-मिरची आणि गाजर यांचं स्वादिष्ट लोणचं ‘कचालू’ या नावाने सोबत येतंच; मात्र कचालू तयार करणे हे अधिक कौशल्याचं मानलं जातं. ऊठसुठ हरेक ठिकाणी बेडमी-आलू मिळेलही, पण कचालू मात्र मोजक्याच ठिकाणी मिळू शकतो.

churuwala-sweets-%e0%a4%9a%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8dसुजीहलव्याला मात देणारा मुंग-दाल हलवा हा नागौरी पुरीसोबत खायची पद्धत आहे; मात्र जाता-येता तयार होऊ शकणाऱ्या सुजीहलव्यापेक्षा अतिशय निगुतीने, कौशल्याने तयार करावा लागणारा मुंग-दाल हलवा अनेक हलवाई ठेवतातच असं नाही. तसं पाहिलं तर भौगोलिकदृष्ट्या –सांस्कृतिकदृष्ट्या नागौरी पुरी मुंगदाल हलव्यासाठीच बनवली गेली असावी असे दिसते. ईशान्य राजस्थानमधील शेखावती भागात – चुरू, झुनझुन, नागौर या लगतच्या जिल्ह्यांमध्ये- या पदार्थांचा बोलबाला आढळतो. तिथला लालसर, खमंग भाजलेला आणि बाहेर न ठिबकताही अंगात अस्सल देसी घी मुरवून घेतलेला मुंगदाल हलवा मारवाडी व्यापार्‍यांनी दिल्लीमध्ये आणला. कुचा महाजनीसारख्या व्यापारी केंद्रातून पंडित दीनदयाळ हलवाई यांनी मुंगदाल हलवा शाहजहानाबादमध्ये रुजवला. त्यांनी विकसित केलेली चव चार पिढ्यांनंतरही टिकून आहे. आज पंजाबबाहेरील ‘पंजाबी’ लग्नांमध्ये एक अविभाज्य घटक बनलेल्या या हलव्याचं ‘Braing’ मात्र पंजाबी हिंदूंनी-सरदारजींनी केलेलं आढळेल.

गोड पदार्थांचंच म्हटलं तर बनिया हलवायांची आणि एका खासियतीचा उल्लेख अटळ आहे. इमरती किंवा झांगरी ! पर्शियातून आलेल्या ‘झुलेबिया’ भारतीय जिभेवर ज्या ‘जिलेबीचा’ अवतार घेऊन रुळल्या त्या प्रेरणेतून तयार झालेल्या इमरतीचा उगम मात्र खास ‘फतेहपुर सिक्री’मधील मुघल मुदपाकखान्यातील आहे. बादशाह अकबराचा मुलगा जहांगीर गोड खाण्याचा मोठा शौकीन; मात्र त्याला गोडातही रुचिपालट हवा असे. माव्याच्या व दुधाच्या पारंपरिक मिठायांना नकार देणाऱ्या जहांगिराचे मन राखण्यासाठी जिलेबीवर जे प्रयोग सुरु झाले, त्यातून इमरतीचा जन्म झाला. शाही अदबीने त्याला ‘जहांगिरी’ मिठाई म्हटले जाऊ लागले आणि झांगरी हा त्याचा अपभ्रंश चांगलाच रुळला. आग्रा प्रदेशातील उडद डाळीचा आग्रह इमरती/झांगरीमध्येही पुरेपूर उमटलेला आढळतो. जिलेबी मैद्यापासून तयार होते तर इमरती उडदाच्या पिठापासून. चार कडी पाडून जिलेबीला रुप दिलं जातं, पण इमरतीमध्ये मात्र त्या कड्यावरही कमावलेल्या हाताने ‘स्पायरल’ उमटवले जातात. पुढे शाहजहानच्या काळात ‘इमरती’ दिल्लीत प्रवेशली खरी, मात्र त्याचा प्रसार मात्र बनिया हलवायांनी केला. आग्र्याची इमरती आज पुराण्या दिल्लीची ओळख बनली आहे.

खानदानी तेहजीब जपणाऱ्या जर्जर वास्तुशिल्पांच्या सावलीत सीताराम बाजारच्या अरुंद गल्ल्या पायाखाली घालताना आपण बनिया हलवायांच्या दुकानांसमोर वा भटारखान्यासमोर येत राहतो. चार-चार पाच-पाच पिढ्या या व्यवसायात मुरलेले ‘राम-स्वरूप हलवाई’ ‘श्याम स्वीट्स-मटर कचौडीवाले’, ‘नेमीचंद’ पुरीवाले, शिव मिठाईवाले असतील वा कमल कचौडी, जंगबहादूर कचौडीवाले असे तुलनेने नवखे, दोनएक पिढ्या जुने व्यावसायिक असतील, बनिया खाद्यसंस्कृतीचा एक हिस्सा शाहजहानाबादपासून ‘पुराण्या दिल्ली’मध्ये रुजवण्याचे श्रेय निःसंशय त्यांचे आहे. एखाद्या हवेलीच्या कट्ट्यावर बसून बेडमी-आलूचा किंवा हिंग-खस्ता कचोरीचा स्वाद जिभेवर घोळवताना अनेक धागे जुळून येतात. मुंबईचा प्रसिद्ध ‘पंचम पुरीवाला’ आग्र्याचा असल्याची जाणीव होते. त्याच्या खास शिफारसीवरून चाखलेली ‘मसाला पुरी’ प्रत्यक्षात ‘बेडमी’ पुरी असल्याचा साक्षात्कार होतो. एखादी तरल तार हिंदी साहित्यिक प्रेमचंद यांच्याशीही जुळून येते…. त्यांच्या श्रेष्ठ कथांपैकी एक कथा –‘बुढी काकी’मधील उतारे डोळ्यांदेखत जिवंत होताना दिसतात.

बूढ़ी काकी की कल्पना में पूड़ियों की तस्वीर नाचने लगी। खूब लाल लाल, फूली फूली, नरम नरम होंगी। रूपा ने भलीभांति मोयन दिया होगा। कचौरियों में अजवाइन और इलायची की महक आ रही होगी। एक पूरी मिलती तो ज़रा हाथ में लेकर देखती। क्यों न चलकर कढ़ाह से सामने ही बैठूं। पूड़ियां छन छन कर तैरती होंगी। कढ़ाह से गरम गरम निकल कर थाल में रखी जाती होंगी। उन्होंने मन में तरह तरह के मन्सूबे बांधे पहले तरकारी से पूड़ियां खाऊंगी, फिर दही शक्कर से; कचौरियां रायते के साथ मज़ेदार मालूम होंगी। चाहे कोई बुरा माने चाहे भला, मैं तो मांग मांग कर खाऊंगी। “ …बुढी काकीच्या, लाडलीच्या, पश्चातापदग्ध रूपाच्या आठवणीने डोळ्यांसमोर धुकं दाटून येतं, तोवर उत्तरेकडील सांस्कृतिक-सामाजिक विश्वात मानाचे स्थान मिळवलेल्या पुरी-सब्जीच्या सीताराम बाजारातील अस्सल अवताराने अनेक वर्तुळं जोडून आणलेली असतात.

कधी कधी मोठी गंमत वाटते… फाळणीनंतर आलेल्या पंजाबी कुटुंबांनी छोले-कुलचे, छोले भटुरे दिल्लीतल्या रस्त्यांवर रुजवले तरी सीताराम बाजारात मात्र आजही नावारूपाला आलेला छोले-कुलचेवाला सापडणे मुश्कील. तिथे राज्य चालते ते बेडमी-आलू, नागौरी-हलवा यांचेच…. खरं पाहता ‘सीताराम बाजार’ हा बनिया समाजापेक्षाही काश्मिरी पंडितांचा बालेकिल्ला. काश्मिरातील धार्मिक अत्याचाराला कंटाळून परागंदा झालेल्या अनेक काश्मिरी पंडितांनी अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून दिल्लीला आपलेले केले. कौल, अटल, हक्सर, गंजू, झुत्शी आणि अशा कित्येकांनी सीताराम बाजारात केवळ हवेल्या नाही उभारल्या, तर ‘कर्मठ काश्मिरी ब्राह्मणी संस्कृती’ जोपासली. ‘गली कश्मिरीया’ आजही याची साक्ष देते, कमला नेहरूंचे माहेर असणारी ‘हक्सर हवेली’ – जिथे त्यांचा पंडित नेहरुंशी विवाह झाला – ती तर आत्ता आत्तापर्यंत उभी होती. मात्र ना येथे कधी ‘कश्मिरी खाद्यसंस्कृती’ रुजलेली आढळली ना त्याचे काही अवशेष उरले.

फाळणीनंतर अक्षरशः देशोधडीला लागलेल्या पंजाबी वर्गाने दिल्लीमध्ये केवळ शून्यातून सुरुवात करूनही आपल्या खाद्यसंस्कृतीद्वारे एक प्रबळ ‘आयडेंटीटी’ निर्माण केली.  बनिया समाजाने आग्र्याच्या स्वयंपाकघरांतील ‘चव’ दिल्लीत रुजवली. पण किमान दीडएकशे वर्षं मोठ्या संख्येने सीताराम बाजारात राहिलेले काश्मिरी कुटुंबीय मात्र इथे आपली खाद्यसंस्कृती का रुजवू शकले नसावेत, हा प्रश्न सतावत राहतोच… इथल्या काश्मिरींनी अंगिकारलेल्या जीवनशैलीमध्ये त्याचे उत्तर असावे का? स्थलांतरित काश्मिरींची आत्मकथने किंवा त्यांच्याबद्दलचे अभ्यास दर्शवतात त्याप्रमाणे जन्मभूमी सोडून आल्यानंतरही बराच काळ या पंडितांना आपले ‘ब्राह्मण्य’ मात्र सोडता आले नाही. स्वयंपाकाच्या पद्धती, अन्न वाढण्याच्या-सेवन करण्याच्या चालीरिती यांवर ‘सोवळे-ओवळे’ पाळण्याचा प्रचंड पगडा राहिला. ‘अन्य’ लोकांकडून अन्न ‘शिजवून घेतल्यामुळे’ वा ‘स्वीकारल्या’मुळे ते दूषित होते, या समजुतीचा भयंकर पगडा सुरुवातीपासूनच काश्मिरी पंडितांवर असल्यामुळे ते समाजात भरभरून वावरले तरी ‘मिसळले’ मात्र नाहीत. एका आत्ममग्न पोकळीत त्यांचे स्वतःला आश्वस्त करणारे जीवन सुरू राहिले. गंमत(!) हीच की बदलत्या ‘Aspirations’ मुळे सीताराम बाजारातील अनेक बनिया आज अन्यत्र स्थलांतरित झाले असले तरी आपली खाद्यसंस्कृती समस्त खाद्यप्रेमींसाठी मागे ठेवून गेले आहेत मात्र हाच सीताराम बाजार काश्मिरी पंडितांचा एकेकाळचा बालेकिल्ला होता, यावर विश्वास बसणेही अवघड झाले आहे. आज जाणिवेत दिसत नसली तरी आपल्या नेणिवेत रुजलेली ‘जात’ आणि त्यावर आधारलेले आडाखे एखाद्या भागाचा सांस्कृतिक चेहरामोहरा कसा ठरवते याचं चपखल उदाहरण वाटतं मला हे !

सीताराम बाजार जिथे सुरू होतो, त्या हौज काझी चौकातच चावडी बाजार मेट्रो स्टेशन आहे. लाल कुआ बाजारकडे जाणारा रस्ता आणि जामा मशिदीकडे जाणारा रस्ता जिथे छेदतात, तिथेच अशोक चाट भांडार आहे. तोबा लोकप्रिय ! मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून तिथे नेमाने एक मोमो विक्रेता दिसू लागला आहे. त्याचे ‘लॉयल’ गिऱ्हाईकही आहेत. चांदणी चौक मेट्रोस्टेशनपाशी वा दरियागंज-सदरबाजारमध्ये सायकल रिक्षावाल्यांच्या stand जवळ कचौरी-सामोसे मिळता मिळता त्याच्या आसपास ‘लिट्टीsssचोखाssएए’ अशी हाळी ऐकू येऊ लागली आहे. बाकी दिल्ली पादाक्रांत करून सीताराम बझारच्या वा पुराण्या दिल्लीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेले हे बदलाचे वारे मला अतिशय स्वागतार्ह वाटते. या महानगरीतील नव्या स्थलांतरितांनी आपल्यासोबत आणलेल्या खाद्यसंस्कृतीची ही बीजं एका सातत्यपूर्ण बदलाचीच ग्वाही देतात हे तर आहेच, पण हे बदल घडून येण्यासाठी, रुजण्यासाठी जो अवकाश लागतो तो मोकळा अवकाश एक महानगरच देऊ शकतं, हे त्याहूनही खरं आहे.

५० च्या दशकात दलाई लामांसोबत तिबेट सोडून भारतात आलेल्या आश्रयार्थी तिबेटींनी सिव्हील लाईन्स – मजनू का टिला परिसरात उभारलेले ‘न्यू तिबेटीयन कॅम्प’, ‘ओल्ड तिबेटीयन कॅम्प’ उभारले, प्रति-तिबेट उभं करण्याचा प्रयत्न केला. तिथल्या छोट्या छोट्या रेस्तौरांनी दिल्लीमध्ये रुजवलेले ‘मोमोज’ व ‘तिबेटी क्युझिन’ ही कहाणी एका संघर्षाची, आत्मसन्मानाचीही आहे, तर बदलतं महानगर स्थलांतरितांना खेचून कसं घेतं, आपल्यात सामावून कसं घेतं याची कहाणी ‘लिट्टीचोखा’चं सार्वत्रीकरण सांगून जातं. लिट्टीचोखा बिहारचा…सत्तूच्या पिठात मिर्चमसाला घालून, मळून जे गोळे करतात ते निखाऱ्यावर भाजून काढले कि लिट्टी तयार. खरपूस भाजलेल्या वांग्याचं, कांदा-टोमाटो आणि तेज मिरच्या घालून केलेलं सरसरीत भरीत चोखा म्हणून समोर येतं. बिहारच्या घराघरांतून बनणारा हा पदार्थ बिहारी श्रमजीवींची एक ओळख बनून राहिला आहे. स्थलांतरित बिहारी मजूर आणि दिल्ली यांचं नातं तसं बरंच जुनं आहे. कुशल वा अर्धकुशल नाका कामगार, अतिशय कमी मजुरीत जिथे मोठी प्रोजेक्ट्स राबवली जातात तिथे अंगमेहनतीचं काम करणारा रोजंदार म्हणून बिहारी मजूर राबतो. दिल्लीतील बहुतांशी सायकलरिक्षा चालक बिहारमधून येतात. त्यांच्या अत्यल्प मजुरीमध्येही परवडू शकणारे खाण्या-पिण्याचे जे पर्याय उपलब्ध आहेत, त्यात छोले-कुलचे, सामोसेब्रेड पकोडे यांसोबत लिट्टी-चोखा एक समर्थ पर्याय म्हणून उभा राहिला आहे. ‘आपल्या प्रदेशातील’ खाणं ‘परक्या’ मुलखात झगडण्याचं जे बळ देऊन जातं तो भावनिक-मानसिक अवकाश कसा निर्माण होतो याचं निदर्शक आहे हे लिट्टी-चोख्याचं सार्वत्रिकरण !

पंजाबी, बंगाली, बिहारी, तिबेटी, आफ्रिकी, अफगाणी, मराठी आणि असे कित्येक मानवी समूह एखाद्या महानगराच्या पोटात जेव्हा विरघळून जात असतात, तेव्हा त्याकडे बघण्याचा एक अदृश्य झरोका त्यांची त्यांची खाद्यसंस्कृती आपल्याला उपलब्ध करून देत राहतो हे नक्की. हा झरोका दृश्यमान होण्यासाठी प्रतीके निर्माण करतात. ते सापळे सावधपणे टाळायची खोटी असते फक्त, इतकंच!

 

मयुरेश भडसावळे

14712961_1239617822771703_7509621065182787333_o

मुळात कॉम्प्युटर इंजीनियर असलो तरी सामाजिक प्रश्नांकडे अधिक ओढा असल्यामुळे भारतातील नामांकित अशा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून ‘अर्बन पॉलिसी & गव्हर्नंस’ मध्ये एम.एस्सी संपादित. शहरांच्या प्रश्नांवर, शहरीकरणावर सातत्याने action oriented research work  केले आहे. अर्बन डेव्हलपमेंट प्रॅक्टिशनर म्हणून हॅबिटॅट लॅब इंडिया या थिंक टंक सोबत सध्या काम सुरू आहे.
स्थलांतरित समूहाने आकारलेली शहरे अथवा  शहरातील  माणूस समजून  घेणे  हा विशेष अगत्याचा विषय.

सर्व फोटो – मयूरेश भडसावळे   दिल्ली श्वेत श्यामल छायाचित्र – विकीपीडिया   व्हिडिओ – YouTube

2 Comments Add yours

  1. मृण्मयी says:

    बहारदार वर्णन. नुसतं खाण्याचं नाही तर शहराचंही. तुझा सामाजिक अभ्यासाचा चष्मा लावूनच हे वाचलं गेलं.

    Like

  2. अशोक नायगावकर says:

    खरा खवैय्या आणि आस्वादक

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s