कल्याणी कुमठेकर
२०१२ च्या डिसेंबर महिन्यात आम्ही आफ्रिकन सफारीसाठी टांझानियामध्ये गेलो होतो. तो एक वेगळाच अनुभव होता. ओपन लँडक्रुझरमधून जंगलात दिवसभर प्राणी पाहत भटकायचं, त्या स्वछंद प्राण्यांच्या विश्वात ना वेळेचं भान, ना भुकेचं. या आठवणी ताज्या असतानाच केदारला, माझ्या नवऱ्याला मोझाम्बिकचं प्रोजेक्ट मिळालं. मुलं तर भयंकर खुशीत होती. कारण आफ्रिकन सफारी ही त्यांची आतापर्यंत घालवलेल्या सुट्ट्यांपैकी ‘दि बेस्ट’ सुट्टी होती. आम्हांलाही आफ्रिकेतला हा नवीन देश जवळून पाहण्याची, तिथले नवीन अनुभव घेण्याची उत्सुकता होती.
अपरिचित मोझाम्बिक
मित्रमैत्रिणींना, आप्तस्वकीयांना ही बातमी सांगितली तेव्हा, मोझाम्बिक? अशा नावाचा देश आहे? असेल तर कुठे आहे? असे प्रश्न यायला लागले. अर्थात बरोबरच होतं ते. तोपर्यंत आम्हांलाही मोझाम्बिकबद्दल फारसं काही माहिती नव्हतं. नेहमीप्रमाणं मी काळजीत पडले. तिकडे सुरक्षित असेल ना? काही चुकीचा निर्णय तर घेत नाही आहोत ना आपण? असं सतत मनात येत होतं. पण तसे कोणतेही विचित्र अनुभव आम्हांला तिथे आले नाहीत. उलट खूप छान भारतीय मित्रमैत्रिणी तर मिळालेच; शिवाय खूप परदेशी मित्रमैत्रिणींशीही चांगली मैत्री झाली. मोझाम्बिकमध्ये आम्हांला एक नवीन खेळणं म्हणजे आमची नुका मिळाली. नुका आमच्या सगळ्यांची लाडकी गोल्डन रिट्रिव्हर आहे.
सी फूडचा देश
ज्यांना सीफूड आवडतं ते मोझाम्बिकच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाहीत. समुद्रकिनाऱ्यावरच्या रिसॉर्ट्समध्ये राहायला गेलं की हमखास बायका टोपलीमध्ये ताजे प्रॉन्स विकायला घेऊन येणार. बरेचदा त्या टोपलीतल्या प्रॉन्सची हालचाल होताना दिसत असे. म्हणजे ते किती ताजे असतील याची कल्पना येईल. प्रॉन्सशिवाय शिंपले, लॉबस्टर, स्क्विड, खेकडे, वेगवेगळ्या प्रकारचे मासे इथे उत्तम मिळतात. लॉबस्टरपासून बनवलेली डिश मकाझा. बखालाव हा प्रकार मासा आणि काही भाज्या वापरून बनवलेला पदार्थ. चोकोज हा स्क्विड माशाचा पदार्थ, त्याच्याच रसामध्ये शिजवलेला असतो. सीफूड बनवताना अर्थातच हे लोक नारळ आणि मिरचीचा भरपूर वापर करतात. इथे मिरचीला सकाना म्हणतात. त्या अगदी छोट्या छोट्या आणि खूप तिखट असतात.
मोठा समुद्रकिनारा लाभला असल्याने शेतीनंतर इथला मुख्य व्यवसाय मासेमारी हा आहे. ताजे आणि मोठे प्रॉन्स, तसंच इतरही प्रकारचे मासे यांची निर्यात इथे मोठ्या प्रमाणावर केली जाते.
ओळख मोझाम्बिकची
आफ्रिकेमधला मोझाम्बिक हा देश दक्षिण गोलार्धात आहे. त्याच्या उत्तरेला टांझानिया, तर दक्षिणेला दक्षिण आफ्रिका हे देश आहेत. मलावी, झांबिया, झिम्बाब्वे, स्वाझीलँड हे मोझाम्बिकचे शेजारी देश. मोझाम्बिक देशाला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. पूर्वेला भव्य हिंदी महासागर आहे. या देशाच्या दक्षिण किनारपट्टीवर पांढऱ्या वाळूचे सुंदर सुंदर बीचेस आहेत, तर उत्तरेकडच्या किनारपट्टीवर खडकाळ, उंच कडे. हा देश दक्षिण गोलार्धात असल्याने इथे हिवाळा जून ते सप्टेंबर, आणि उन्हाळा डिसेंबर ते मार्च.
जवळजवळ ५०० हून अधिक वर्षं या देशावर पोर्तुगीजांनी राज्य केले. १९७५ मध्ये त्यांना पोर्तुगीजांपासून स्वातंत्र्य मिळाले. मापुतो ही या देशाची राजधानी. मापुतोमध्ये प्रवेश केला की तुम्हांला गोव्यात असल्यासारखं वाटतं. तशीच काजू, नारळाची झाडं, सुंदर समुद्रकिनारा. पूर्ण गाव त्या किनाऱ्यावर वसलेलं. कुठेही जायचं तरी वाट समुद्राच्या बाजूने. अतिशय सुंदर आणि छोटंसं गाव. या गावामध्ये बरीच गुजराती कुटुंबं आहेत. १५० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी त्यांना ऊस लावण्याच्या कामासाठी आफ्रिकेमध्ये आणलं. नंतर ते इथेच स्थायिक झाले. मापुतोमध्ये एक सुंदर महादेवाचं मंदिर, तसेच एक राधाकृष्णाचे मंदिर आहे. जवळच एक सालामांगा म्हणून छोटेसे गाव आहे, तिथे शंभर वर्षं पुरातन सुरेख राममंदिर आहे. बर्याचदा आम्ही तिथे जात असू. तिथल्या पुजार्यांना आपले संस्कृत श्लोक येतील, यात नवल काय? पण आफ्रिकन लोकांना अस्सखलित संस्कृत श्लोक म्हणताना तिथे ऐकलं आणि खरोखर नवल वाटलं.
किस्सा भाषा शिकण्याचा
मोझाम्बिक हा देश १० प्रांतांमध्ये विभागाला गेला आहे. काबो, देल्गादो, गाझा, ईन्हाम्बाने, मनिका, मापुतो, नंपुला, निआसा, सोफाला, तेते आणि झाम्बेझिया, हे ते १० प्रांत. इथली अधिकृत भाषा पोर्तुगीज. पण इथे तीसपेक्षा जास्त वेगवेगळ्या आफ्रिकन भाषा इथे बोलल्या जातात. ज्या देशात जातो तिथली भाषा शिकणं क्रमप्राप्त होऊन जातं. त्यामुळे आम्हीही पोर्तुगीज भाषा शिकायचं ठरवलं. ती शिकण्याआधी सतत मजा मजा घडत असायच्या. एकदा ड्रायव्हरना कोथिंबीर आणायला सांगितली, तर त्यांनी चाळणी आणून दिली. घरातलं काम करायला एक बाई माझ्या घरमालकिणीने पाठवली होती. सुरुवातीला तिच्या-माझ्यात काही संभाषणच व्हायचं नाही. जे काही सांगायचं ते खाणाखुणांनी. नंतर मग तिने मला तिची भाषा शिकवायला सुरुवात केली, आणि मी तिला इंग्रजी शब्द. रोज आमची उजळणी चालायची. परंतु तिने शिकवलेले शब्द पोर्तुगीज पुस्तकामध्ये कुठे सापडेनात. बाहेर ते कुणाला माझ्या वेगळ्या उच्चारांमुळे कळेनात, फक्त तिला आणि मलाच ते कळायचे. मग माझ्या मैत्रिणीने सुचवलेल्या टीचरची शिकवणी सुरू केली. त्यांच्याशी बोलल्यावर कळलं की मी तिच्याकडून पोर्तुगीज नाही, तर आफ्रिकन शंघाना भाषा शिकते आहे.
रूढी-परंपरा
मुस्लिम आणि ख्रिश्चन हे दोन धर्म मुख्यत्वे इथे आढळतात. २० टक्के लोक मुस्लिम धर्माचे आहेत, तर बरेचसे ख्रिश्चन. ख्रिश्चन धर्म पोर्तुगीजांनी इथे आणला. ज्या लोकांना पोर्तुगीजांनी शिकवून सुशिक्षित बनवले ते लोक ख्रिश्चन धर्म जोपासतात. तर ज्यांना शिक्षण मिळाले नाही, ते लोक अजूनही जुन्या रूढी आणि परंपरा जपतात. त्यांच्या मते निर्जीव गोष्टींमध्येही आत्मा असतो आणि समुद्र, ढग, नदी असा निसर्गातही असतो. या आत्म्याचा प्रकोप दैनंदिन जीवनावर होऊ नये म्हणून त्यांना शांत करण्याची त्यांच्यात रीत आहे. यासाठी बरेचदा लोक समुद्रकिनारी कसलेसे विधी करत असताना दिसतात.
इथल्या माकोंदे या जमातीची एक गंमतशीर परंपरा आहे. शेतामध्ये कापणीच्या वेळी किंवा लावणीच्या वेळी एक समारंभ केला जातो. या गावकरी लोकांपैकी काहीजण अचानक गायब होण्याची घोषणा करतात. जेव्हा हे लोक काही दिवसांसाठी गायब होतात, तेव्हा गावातील इतर लोक पिकांच्या कापणीची तयारी करतात. कापणीचा दिवस येतो, त्या दिवशी रात्री काही मुखवटे घातलेले लोक हातात मोठे दिवे, ढोल घेऊन येतात. मग रात्रभर सगळेजण नाचतात, गातात आणि तो दिवस साजरा करतात. जेव्हा सेलिब्रेशन संपतं, तेव्हा गावकरी असं ढोंग करतात की ती मुखवटे घातलेली माणसं अचानक निघून गेली, आणि त्यांचे गायब झालेले गावकरी परत आले. यामागे त्यांची काय भावना आहे हे जरी कळलं नाही, तरी आमच्या पोर्तुगीज सरांकडून हे ऐकायला मजा वाटली.
सण-उत्सव आणि लोकजीवन
न्यू इयर, ख्रिसमस, रमादान, गुड फ्रायडे, इस्टर हे दिवस ज्या उत्साहाने हे लोकं साजरे करतात, तेवढ्याच उत्साहाने हे लोक ३ फेब्रुवारीचा हिरोज डे साजरा करतात. १९७५ मध्ये मोझाम्बिकमध्ये झालेल्या स्वातंत्र्ययुद्धात हुतात्मा झालेल्यांना तसंच फ्रेलिमो या राजकीय पक्षाचे संस्थापक एडवरदो मुंदलाने यांना या दिवशी श्रद्धांजली वाहिली जाते. मोझाम्बिकचा स्वातंत्र्यदिन, २० सप्टेंबर, व्हिक्टरी डे ७ सप्टेंबर हेही इथले सणच. या दिवशी राष्ट्रीय सुटी असते. नाचून, गाऊन, वेगवेगळी वाद्यं वाजवून हे लोक आपला आनंद साजरा करतात. ग्रामीण भागात तर नृत्य हे त्यांच्या मनोरंजनाचं साधन आहे. वेगवेगळ्या जमातींची ओळख त्यांच्या विविध नृत्यपद्धतीवरून होते. दक्षिणेकडची चॊपी ही आफ्रिकन जमात त्यांचा पारंपरिक शिकारी नृत्य करते. नाच करताना ते सिंहाची कातडी कमरेभोवती गुंडाळतात, भाले आणि ढाल घेऊन नाचतात; तर उत्तरेला मकुवा जमातीचे लोक उंच काठ्यांवर उभं राहून नाचतात. बायकाही त्यात सामील होतात. मोठ्या शहरांमध्येसुद्धा सुट्टीच्या दिवशी वातावरण ड्रम्स आणि गिटारच्या आवाजांनी भरून गेलेलं असतं. त्यांची काही वाद्यं ते स्वतःच घरी बनवतात.
मोझाम्बिकी खूप कष्टाळू लोक. कुठलंही आणि कसलंही काम करायला तयार. तिथल्या काही जमाती लाकडाचं कोरीव काम फार सुंदर करतात. काही जमाती बास्केट्स, बाटिक, ऑइल पेन्टिंग्ससाठीही जगभरात ओळखल्या जातात. मोझाम्बिकचं राष्ट्रीय चिन्ह आहे बोआबाबचं झाड. या झाडाची फळं खाण्यासाठी, पानं औषधासाठी वापरतात. या झाडाच्या सालापासून बास्केट्स, पेपर, दो-या आणि कपडे बनवतात. कलरफुल कापूलाना – खूप मोठी डिझाईन्स आणि भडक रंग असणार्या कापडापासून हे छान ड्रेसेस, शर्ट्स बनवतात. मुळात कापूलाना हे त्यांचं पारंपरिक वस्त्र, लुंगीसारखं.
मोझाम्बिकमध्ये ८० टक्के लोक शेतकरी आहेत. शेतीबरोबरच ते गायी, शेळ्या, मेंढ्या पाळतात. इथे प्रामुख्याने कापूस, सूर्यफूल, ऊस, मका, तूरडाळ, तीळ, बटाटा, फळ, नारळ आणि कसावा (रताळ्यासारखं दिसणारं एका झाडाचं मूळ) यांची शेती होते. तरीसुद्धा हा देश बऱ्याचशा दैनंदिन गरजांसाठी इतर देशांवर अवलंबून आहे. संत्री आणि लिंब आखाती देशांमधून, तांदूळ आणि ऊस इंडोनेशियामधून, चहा चीनमधून, आलं, मसाले भारतामधून आयात केले जातात.
खाद्यजीवन
इथली मुलं आपल्या ‘तळ्यात-मळ्यात’सारखा एक खेळ खेळतात – ‘शिकाम्बा–मशाम्बा’. शिकाम्बा म्हणजे तळ्यात आणि मशाम्बा म्हणजे शेतात. इथलं खाद्यजीवनदेखील समुद्र आणि शेतं यातून पिकणार्या पदार्थांनी व्यापलेलं आहे.
भात, मका, राजमा, कसावा, भाज्या, मासे हे इथल्या आहारातले मुख्य पदार्थ. त्यामध्ये मग पौष्टिकता वाढवण्यासाठी फळं, शेंगदाणे मिसळले जातात. त्याशिवाय काळे ऑलिव्ह, ग्रीन सलाड, चीज आणि पोर्तुगीज वाईन यांचाही त्यांच्या आहारात समावेश असतो. पाव (पोर्तुगीज ब्रेड) खाल्ल्याशिवाय यांचा एकही दिवस जात नाही. इथले पोर्तुगीज पाव अतिशय चवदार, गरमगरम खाल्ले, तर अप्रतिम लागतात.
मतापा हा पदार्थ मोझाम्बिकची खासियत आहे. कसावाची पान, दाण्याचं कूट, लसूण, आणि नारळाच्या दुधापासून मतापा बनवतात, भात आणि प्रॉन्ससोबत खातात. हा खूप वेगळा आणि इतर कुठेही न मिळणारा पदार्थ आहे. आणखी एक पदार्थ म्हणजे पोशो. कसावा आणि मका एकत्र खलबत्त्यात पाणी घालून बराच वेळ कुटतात. नंतर त्यात कसावाची पान घालून हे मिश्रण शिजवतात. आणि सुकलेल्या भोपळ्याच्या वाटीत सर्व्ह करतात. ही डिश सजवण्यासाठी त्यावर भाजलेले शेंगदाणे किंवा चिकन/मटणचे तुकडे घालतात. पाम ट्रीच्या पानापासून तयार केलेली वाईनही यासोबत सर्व्ह केली जाते.
पिरी पिरी सॉस
शिमा हा घराघरांमध्ये बनणारा पदार्थ मक्याच्या पिठापासून बनवतात. आफ्रिकेत बऱ्याच देशांमध्ये तो बनवला जातो. प्रत्येक प्रदेशागणिक त्याचं नावही बदलतं. इडलीसारखा दिसणारा हा पदार्थ आवडीच्या भाजीसोबत खातात. ही डिश पालेभाजीसोबत सर्व्ह केलेली मी अनेकदा पाहिली. मोझाम्बिक आणखी एका खाद्यकृतीसाठी प्रसिद्ध आहे – पिरी पिरी चिकन. पिरी पिरी म्हणजे मिरची. लाल मिरचीपासून बनवलेला हा पिरी पिरी सॉस मोझाम्बिकमध्ये सगळीकडेच मिळतो. हायवेवर आपल्याकडे जसे फळांचे स्टॉल्स जागोजागी असतात, त्याप्रमाणे इथेही मापुतोच्या बाहेर पडलं की पिरी पिरी सॉसचे स्टॉल्स दिसायला लागतात. कोणाच्या घरी आणि कुठल्या रेस्टॉरंटमध्ये पिरी पिरी सॉस नाही, असं कधीच घडत नाही. या सॉसमध्ये चिकन मॅरिनेट केलं जातं आणि मग ते कोळशाच्या ग्रीलवर खमंग भाजलं जातं. आणि मग सगळे मिळून बिअरसोबत त्याचा आस्वाद घेतात.
काजू आणि वाईन
मोझाम्बिक काजूउत्पादनासाठी ओळखलं जातं. काजूची झाडं इथे सगळीकडे आढळतात. पोर्तुगिजांनीच सोळाव्या-सतराव्या शतकात ही झाडं दक्षिण अमेरिकेहून आणून त्यांची लागवड केली. आज आफ्रिकेतील सर्वांत जास्त काजू निर्यात करणारा देश मोझाम्बिक आहे. मोझाम्बिकमध्ये बाजरीपासून बियर घराघरांत बनवली जाते. इथे बनवलेली कॉफीही खूप छान असते. भारतात जाताना माझी बॅग भरपूर काजू आणि कॉफीच्या पॅकेट्सनी जड झालेली असे.
मोझाम्बिकच्या ग्रामीण भागांमध्ये फारशी रेस्टॉरंट्स नाहीत. परंतु मापुतो, बैरा अशा मोठ्या शहरांमध्ये भारतीय, आफ्रिकन, पोर्तुगीज रेस्टॉरंट्स आहेत. अर्थातच मोझाम्बिकन रेस्टॉरंट्स त्यांच्या सीफूडसाठी प्रसिद्ध आहेत. चिकन किंवा सीफूड भात किंवा फ्रेंच फ्राईजसोबत खातात. इथे बनवल्या जाणाऱ्या पदार्थांवर पोर्तुगिजांचा प्रभाव आहे. पदार्थ बरेचदा वाईनसोबतच शिजवतात. कुकींगसाठी सुप्रसिद्ध पोर्ट वाईन वापरतात.
अलीकडच्या काही वर्षांमध्ये मापुतो तसंच मोठ्या शहरांमध्ये चायनीज, इटालियन रेस्टॉरंट्स तसंच फास्टफूड जॉइंट्सही ठिकठिकाणी झाले आहेत.
असं हे सुंदर, शांत ठिकाण सोडून दुसरीकडे जाणं खचितच कुणाला आवडेल.
काही पाककृती
पिरी पिरी चिकन
साहित्य:
छोटे कांदे, आलं, लसूण, लिंबाचा रस, कोथिंबीर, पिरी पिरी सॉस, एक पूर्ण चिकन, तेल, चवीपुरतं मीठ, मिरपूड.
कृती:
छोटे कांदे, आलं-लसूण, कोथिंबीर मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यामध्ये पिरी पिरी सॉस, तेल, लिंबाचा रस, मीठ आणि मिरपूड घालून मॅरिनेड तयार करून घ्या. ते एका पूर्ण चिकनवर घालून ४ तास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून द्या. नंतर ते ग्रिलवर भाजून घ्या. भाजत असताना मधून मधून चिकनला ब्रशने तेल लावत राहा. ब्राउन होईपर्यंत भाजा. भात किंवा बटाट्याच्या चिप्सबरोबर सर्व्ह करा.
प्रॉन करी
साहित्य:
कोलंबी, कांदे,आलं-लसूण-मिरची पेस्ट, किसलेली लिंबाची साल, हळद, करी पावडर, नारळाचं दूध, कोथिंबीर, तेल, मीठ.
कृती:
प्रथम तेलामध्ये कांदा परतून घ्या. त्यामध्ये आलं-लसूण-मिरचीची पेस्ट घालून परता. नंतर त्यामध्ये करी पावडर, हळद घाला. आता गॅस मंद करून नारळाचे दूध घाला. त्यानंतर त्यामध्ये प्रॉन्स घाला. चांगली उकळी आणा. १५ मिनिटं मंद गॅसवर राहू द्या. १५ मिनिटांनंतर गरम भातासोबत सर्व्ह करा. प्रॉन्स करी नेहमी भात आणि मतापाबरोबर खातात.
कोकोनट आइस्क्रीम
साहित्य:
नारळाचं दूध, साखर, पाणी
कृती:
पाणी आणि साखर एकत्र करा. याचा एकतारी पाक बनवा. तो थंड करा. नंतर त्यामध्ये नारळाचे दूध घाला. आणि फ्रीझरमध्ये ठेवा. दोन तासांनी बाहेर काढून मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्या. आणि पुन्हा ३ ते ४ तासांसाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. हे आइसक्रीम सेट झाल्यावर सर्व्ह करा.
कल्याणी कुमठेकर
सध्या बँकॉकमध्ये राहते. मला आणि केदारला भटकायला खूप आवडतं. नवनवीन ठिकाणी जाऊन राहणं, नवीन गोष्टी शिकणं याचं जणू आम्हांला व्यसनच लागलं आहे. त्यामुळे आम्ही १९ वर्षांच्या आमच्या सहजीवनात भारतामध्ये जोधपूर, अहमदाबाद, बंगलोर, हैदराबाद, मुंबई आणि पुणे या ठिकाणी तर भारताबाहेर रियाध (सौदी अरेबिया), तेहरान (इराण), दुबई (यूएई), मापुतो (मोझाम्बिक) या शहरांमध्ये राहिलो आहोत. तिथे राहताना अर्थातच त्याच्या आजूबाजूचे देश, ठिकाणं पाहतो, मित्रमंडळ जमवतो, नवीन गोष्टी शिकतो.
(हा लेख लिहिण्यासाठी माझी मुलगी ऋचा आणि मैत्रिणी रेखा, अपूर्वा, नेहा, लहरी आणि कीर्ती यांनी मदत केली.
फोटो – कल्याणी कुमठेकर व्हिडिओ – YouTube