स्कॉचची पंढरी – आईला

इंग्रजी लेखन – रूपल कक्कड

अनुवाद – गौरव सबनीस

img_9284

मादक पेयांमध्ये स्कॉचचीही एक प्राप्त रुची, acquired taste असते. बरीच वर्षे माझा नवरा, त्याचे मित्र मोठ्या हौशीने जेव्हा ड्रिंक्ससाठी बसायचे तेव्हा मलाही आग्रहाने त्याची चव द्यायचे. पण मला एका घोटापलीकडे जाता यायचं नाही. स्कॉच औषधासारखी वाटते, मी आपली वोडका-रमच्या कॉकटेलवर समाधानी. पण चार वर्षांपूर्वी अशा एका मद्यपानाच्या बैठकीत माझा रुचीपालट झाला. लागवूलीन १६ (म्हणजे, १६ वर्षे मुरवलेली) नावाच्या महागड्या स्कॉचचा एक छोटा ग्लास माझा मित्र योगेश याने चार थेंब पाणी घालून माझ्या हाती दिला. आणि तो घोट औषधासारखा न लागता चक्क चांगला वाटला. तो ग्लास संपेस्तोवर मी देखील स्कॉचप्रेमी झालेले होते.

त्यानंतर हळूहळू विविध प्रकारच्या स्कॉच मी पिऊन पाहिल्या. आणि आता माझ्या नवर्‍याप्रमाणेच ते माझं लाडकं मद्य झालं आहे. सिंगल मॉल्ट स्कॉच.  तेही Islay (ज्याचा स्थानिक उच्चार चक्क ‘आईला’ असा करतात) नावाच्या स्कॉटलंडमधल्या विशिष्ट बेटावरचं. आईला स्कॉचचं वैशिष्ट्य त्याची धूम्रयुक्त (smoky) आणि थोडीशी कोळसट (peaty) चव. पीट नावाचा कोळश्याचा एक प्रकार आईलावर मुबलक प्रमाणात सापडतो. तो जाळून त्याच्या धुराने barley (मराठीत जव किंवा सातू) भाजून ही स्कॉच बनवतात. त्यामुळे त्याला ही चव येते.

img_9212साहजिकच, या वर्षी स्कॉटलंडला जायचा योग आला तेव्हा आम्ही चार दिवस त्या चिमुकल्या रम्य बेटासाठी राखून ठेवले. स्कॉटलंडच्या पश्चिमी किनाऱ्यावर चाळीस किमी लांब आणि पंचवीस किमी रूंद आईलावर जेमतेम तीन हजार लोक राहतात. मुख्य उद्योग अर्थात स्कॉचनिर्मितीचा. बेटावर आठ  जगप्रसिध्द distillery म्हणजे दारूखाने आहेत. स्कॉचप्रेमींसाठी ही श्रद्धास्थानंच. प्रत्येक distillery मध्ये पर्यटकांसाठी दौरे व इतर कार्यक्रम आखलेले असतात. तासभर चालणार्‍या दौर्‍यात तुम्हाला स्कॉच बनविण्याच्या प्रक्रियेचं सविस्तर प्रात्यक्षिक दिलं जातं आणि शेवटी स्कॉचचा एक dram (साधारण ३० मि.ली.) प्यायला दिला जातो. कंदिलाच्या आकाराच्या छोट्या नाजुक काचेच्या ग्लासात ते देतात. तो ग्लास तुमच्यासाठी distillery कडून भेट दिलेला असतो. या सगळ्याची किंमत फक्त ६ पौंड! मी अणि माझ्या पतीने असे बरेच दौरे करत निरनिराळ्या distillery चे दहा ग्लास गोळा केले.

आम्हाला स्कॉच बनविण्याची प्रक्रिया तोंडपाठ झाली आहे. स्कॉचचे घटक फक्त तीन – बार्ली, पाणी, आणि यीस्ट. सर्वात आधी बार्लीचं धान्य २-३ दिवस पाण्यात भिजवून ठेवतात. मग त्याला अंकुर फुटतात. मग त्या सातूला कोळशावर जाळून मंद आचेवर दोन दिवस भाजून वाळवतात. ते पाहून मला हुरड्याची आठवण झाली. खरोखरच, आईला स्कॉच अलौकिक आहे. स्कॉटलंडमध्ये इतर ठिकाणी देखील स्कॉच बनवितात. पण तिथे बार्ली वाळवायला लाकूड किंवा गॅस वापरतात. त्यामुळे त्यांना आईला स्कॉचसारखी स्मोकी चव नसते.

वाळवलेल्या बार्लीचं मग गिरणीत पीठ करतात. ते गरम पाण्यात मिसळतात. या मिश्रणाला मोठ्या पिंपात ढवळतात. मग त्यातलं द्रव वेगळं काढून घेतात. या द्रवाला maltose हे नाव आहे. या maltose ची नंतर स्कॉच होते. द्रव काढल्यानंतर जो चोथा उरतो तो गाय-बैलांसाठी खाद्य म्हणून वापरतात. Maltose ला गार होऊ देतात. मग त्यात यीस्ट टाकतात. यीस्ट घातल्यावर ३६ तासांनी द्रव फसफसतो. त्याला Wash म्हणतात. लागवूलीनच्या दौऱ्यात आम्हाला Wash ची चव दिली. ती बियरसारखी असते. तिथले कामगारदेखील म्हणाले की एक प्रकारे Wash म्हणजे बियर. या Wash चं मग भल्या मोठ्या ५० फूट उंच मोदकाच्या आकाराच्या stills मध्ये distillation अर्थात उर्ध्वपतन करतात. म्हणजे त्या मिश्रणाची चांगली वाफ होते. वर तरंगते आणि त्यातला शुद्ध मद्यार्क पुन्हा द्रवरुपात बदलतो. त्याबरोबर थोडेसं पाणी देखील असते. हा द्रव साधारण वाइनसारखा असतो.

त्याचं पुन्हा एकदा distillation करतात. मद्यार्काचं प्रमाण आणखी वाढतं. त्या मोठ्या stills वर नळ्या असतात. तिथे बाष्पाचा द्रव होतो. त्या नळीचे कोन प्रत्येक distillery मध्ये वेगळे असतात. काही ठिकाणी काटकोन तर काही ठिकाणी तीव्र कोन. आईलामधील सर्व distillery एक सारखे बार्ली, कोळसा आणि पाणी वापरतात. तरीही त्यांच्या चवीत फरक का?  तो फरक त्या नळीच्या कोनामुळे येतो, असं कळलं.

यानंतर मिळणारा द्रव म्हणजे शुद्ध आणि यंग व्हिस्की. ही यंग व्हिस्की पारदर्शक असते. तिचा मद्यार्क असतो साधारण ७०%.  या यंग व्हिस्कीला मग लाकडी पिंपात टाकतात. आणि मग त्या पिंपात ३ ते २५ वर्षे मुरवतात. याला ageing हे नाव आहे. म्हणजे माझी लाडकी लागावूलीन १६, जी मी आज पीत आहे ती २००० साली प्रथम पिंपात घातली होती. या ageing प्रक्रियेत दर वर्षी साधारण २% मद्यार्क वाळून उडून जातो. आणि द्रवाचा पारदर्शीपणा जाऊन बदामी-सोनेरी रंग यायला लागतो. त्याला ते लोक angel’s share म्हणतात. असं बरीच वर्ष मुरवल्यानंतर ते लाकडी पिंप उघडतात आणि बाटलीत टाकतात. कधीकधी चवीसाठी वेगवेगळ्या वर्षातलं पिंप उघडून मिसळतात.

सिंगल मॉल्ट म्हणजे नक्की काय? तर सिंगल मॉल्ट म्हणजे एकाच कारखान्यातल्या पिंपातून बनविलेली व्हिस्की. आमच्यासारख्यांना त्या आवडतात. पण काही लोकांना निरनिराळ्या कारखान्यातून सहा-सात वेगवेगळ्या स्रोतांपासून मिसळून बनविलेल्या स्कॉच आवडतात. त्यांना blended स्कॉच हे नाव आहे. आणि त्यातला सगळ्यात प्रसिद्ध ब्रँड आहे Johnny Walker.

व्हिस्की मुरवायला जे लाकडी पिंप वापरतात तेही फार महत्वाचं असतं. इतकी वर्ष त्या लाकडाच्या आत मुरविल्यामुळे साहजिकच व्हिस्कीला त्या लाकडाचीही थोडी चव येते. स्कॉटलंडमध्ये जी लाकडी पिंपं वापरली जातात ती चक्क अमेरिकेहून second hand विकत घेतलेली जातात. अमेरिकेतल्या bourbon व्हिस्कीला मुरवायला वापरलेली असतात ती. अमेरिकन कायद्यानुसार ओक किंवा सायडर झाडाच्या लाकडापासून बनविलेली ही पिंपं फक्त एकदाच वापरली जाऊ शकतात.  हा कायदा अमेरिकेतील लाकूड उत्पादकांच्या राजकीय प्रभावामुळे त्यांच्या भरभराटीसाठी अस्तित्वात आला आहे, असं म्हणतात. पण स्कॉटलंडमध्ये असला कायदा नाही. त्यामुळे ते ही अमेरिकेत एकदा वापरलेली पिंपं विकत घेऊन दोन तीनदा वापरतात. म्हणजे प्रत्येक स्कॉचच्या घोटात किंचित तरी अमेरिकन bourbon व्हिस्कीचा अंशही असतो.

आईलामध्ये पोहोचल्यावर आम्ही सर्वात आधी आमच्या लाडक्या लागवूलीन distillery ला गेलो. एका हसतमुख तरुणीने आम्हाला तासाभराच्या दौ-यावर नेलं. सगळी प्रक्रिया समजावली. Wash ची चव दिली. आणि शेवटी एक ड्राम व्हिस्की दिली आणि तो ग्लास आम्हाला भेट म्हणून दिला. इथे फोटो काढायची परवानगी नसते. त्यांना त्यांची गुपितं राखून ठेवायची असणार. लागवूलीन १८१६ मध्ये स्थापन झालं. २०१६ मध्ये त्यांचा चक्क दोनशेवा वाढदिवस. लोकांना लागवूलीन इतकी का आवडते हे सांगायला एक विडीयो बूथ उघडला होता. मी आणि माझ्या नवर्‍यानेदेखील तिथे आमचे सुंदर अनुभव सांगितले.

त्यानंतर आम्ही शेजारच्या आर्डबेगला गेलो. त्यांच्या Old Kiln Cafe नामक हॉटेलात जेवायला गेलो. आणि एक ५ ड्राम व्हिस्की टेस्टिंगसुद्धा मागविलं. एका तरुणीने येऊन आम्हाला त्या पाच ड्रामचं वर्णन सांगितलं. आणि नंतर एक ग्लास आम्हाला भेट दिला. या कॅफेमध्ये काही स्थानिक लोकांशी गप्पा झाल्या. आईलाची लोकसंख्या फक्त ३,००० असल्यामुळे जवळजवळ सगळे लोक एकमेकांना ओळखतात. व्हिस्की उद्योगातून लोकांची भरभराट झाली असल्याने तिकडे गुन्ह्याचं प्रमाण शून्य! आम्ही भाड्याने सायकली घेतल्या तेव्हा त्यांना कुलुपंही नव्हती. आम्ही विचारलं तेव्हा दुकानदार म्हणाला, “आईलावर कुलुपं कशाला? वाट्टेल तिकडे सोडून जा सायकल. कोणी चोरणार नाही”. इथे सगळे स्थानिक अतिशय मनमिळाऊ आणि मदतीला सज्ज.

स्कॉच टेस्टिंगचंही एक खास तंत्र आहे. distillery मधले लोक तुम्हाला ते समजावतात. आधी ग्लास नाकाखाली धरून वास घ्या. अनुभवी मंडळींना ओक, शेरी, पीट वगैरे वास येतात. मग एक छोटा घोट घ्या. त्यातून जी चव येते ती अनुभवा. मग हवं तर थोडंसं पाणी घाला. जे मी नेहमी घालायचे. माझ्या मते थोडेसे पाणी घातल्याने स्कॉचची चव बहरून येते. बर्फ घालण्याला मात्र त्यांची हरकत असते. बर्फामुळे स्कॉच सुसंगत राहत नाही आणि त्याची चव बदलत राहते. एका distillery मध्ये एक  कुत्सित प्रतिक्रिया ही होती,  “बर्फ घालून प्यायचं तर Johnny Walker प्या. आणि पेप्सी, सोडा वगैरे मिसळायचा विचार जरी केलात तर तुम्हाला आईलामधून ताबडतोब तडीपार करतील.”

त्यानंतर आम्ही लॅफ्रॉयला गेलो. त्यांचं अभ्यागत केंद्र समुद्रकिनार्‍यालगत असल्यामुळे मला ते सगळ्यात प्रेक्षणीय वाटले. तिथे आम्ही Flavor Tasting चा अनुभव घेतला. १५ पौंड मध्ये व्हिस्कीचे तीन ड्राम आणि त्यांच्याबरोबर पेअर केले जाणारे खाद्यपदार्थ. जसे winepairing असते तसे scotch pairing. ते तीन घास होते ब्लू चीझ, संत्रं आणि चॉकलेटचे. तो घास घ्या आणि मग त्याबरोबर जुळविलेल्या स्कॉचचा घोट घ्या. म्हणजे स्कॉचची चव आणखी बहरुन येईल, असं आम्हाला सांगितलं. मला ब्लू चीज नंतरचा घोट सगळ्यात जास्त आवडला.

त्यानंतर आम्ही लॅफ्रॉय संग्रहालय पाहिलं, तिथे पूर्ण इतिहास मांडलेला होता. अनेक गंमती ऐकायला मिळाल्या. उदाहरणार्थ, अमेरिकेत जेव्हा १९२० च्या शतकात दारू बंदी होती तेव्हा लॅफ्रॉयला औषध म्हणून तिकडे कायदेशीरपणे विकलं जात असे.  शौकीन लोक डॉक्टरला काही पैसे देऊन त्याचं प्रिस्क्रिप्शन घेत असत आणि मजा लुटत असत. लॅफ्रॉय व्हिस्कीचा वास आजसुद्धा फारच तीव्र आणि औषधी वाटतो. पण लॅफ्रॉयवाले वाईट वाटून घेत नाहीत. त्यांचं म्हणणं, “हो, आमच्या व्हिस्कीला आहे बुवा भयाण वास.” लोकांनी ज्या ज्या वासांशी त्या वासाची तुलना केली आहे, त्या सर्व वस्तू एकत्र करून एका भिंतीवर प्रदर्शित केल्या आहेत – बूटपॉलिश पासून ते कोबीपर्यंत!

आम्ही गेलो त्या सगळ्या distillery पैकी लॅफ्रॉयवाले सगळ्यात दानशूर. आम्ही आत शिरल्याक्षणी एक ड्राम ओतून दिला. मग टेस्टिंग. त्यानंतर आणखी दोन तीन. त्यांच्या दुकानातून आम्ही बाटल्या विकत घ्यायचा विचार करत होतो तेव्हा आणखी ३-४ ड्राम ओतले. असे एकूण ६-७ ड्राम पोटात गेल्यावर साहजिकच आमचा मूड थोडा प्रफुल्लित झाला होता. मग सेल्सगर्लने विचारलं, “अजून काही टेस्ट करायचं आहे?” आधीच एवढं फुकटचं प्याल्यामुळे हावरटपणा नको वाटायला म्हणून मी म्हणाले, “नको, ठीक आहे”. तेव्हा तिने डोळा मारत एक महागडी २३ वर्षीय बाटली काढली आणि म्हणाली, “ही खूप छान आहे, हिची टेस्ट मागा. ग्राहकांनी ज्याची टेस्ट मागितली ती द्यायची हा लॅफ्रॉयचा नियम आहे.” मी मनात म्हटलं, “इतक्या प्रेमाने आग्रह करत आहेस तर ओत बाई अजून फुकटची स्कॉच.” लॅफ्रॉयच्या ह्या दानशूर प्रवृत्तीचा त्यांना नक्कीच फायदा होत असेल, कारण एवढे फुकट ड्राम प्याल्यानंतर आम्ही राजी-खुशीने तिथून तीन बाटल्या विकत घेतल्या.

लागवूलीन हे माझ्या स्कॉच जीवनातले पहिले प्रेम. त्यामुळे Save the best for the last या तत्वाचं पालन करत आईलाहून निघणार त्या सकाळी त्या distillery ला पुन्हा भेट द्यायचं ठरविलं. या खेपेला आम्ही Warehouse Demonstration चा अनुभव घेतला. किंमत २३ पौंड. या अनुभवात लागवूलीन legend अर्थात तिथला दिग्गज गोंडस आणि रंगतदार वृद्ध कर्मचारी इयन मकार्थर अभ्यागतांना एका गोदामात नेऊन ५ वेगवेगळ्या वयाच्या (१२ वर्षे ते ३४ वर्षे) स्कॉचची रंजक चव वर्णनासह देतो. ते सुद्धा थेट पिंपात एक मोठ्ठी लोखंडी pipette बुडवून श्वास आत घेऊन ती स्कॉच काढून. शाळेत titration च्या वेळी नळीवर तोंड लावून ओढतात किंवा गाडीतून पेट्रोल नळी वापरून काढतात, तसंच. दोन तीन वेळेला त्याने अभ्यागतांना हे कार्य करायची संधी दिली. माझ्या नवर्‍यालाही संधी मिळाली. त्याने २३ वर्षीय स्कॉच pipette ने ओढताना लबाडपणे २-३ घोट हे घेतले. या २३ वर्षीय स्कॉचच्या एका बाटलीची बाजारातली किंमत १५०० पौंड! म्हणजे माझ्या पतीने तीन घोटात आईला ट्रीपच्या खर्चाचा एक मोठ्ठा ऐवज वसूल केला म्हणा की!

त्या pipette मधून मग ती स्कॉच एका चंबूत आणि चंबूतून वैयक्तिक ड्राम ग्लासमध्ये ओतली जाते. तासभर त्या काळोख्या गोदामात, शेकडो लाकडी पिम्पांच्यामध्ये बसून आम्ही इयनने दिलेल्या स्कॉच घोट-घोट पीत होतो. तो विनोद करत देत असलेली ऐतिहासिक माहिती ऐकत होतो. इयन गेल्या ४७ वर्षांपासून लागवूलीनमध्ये कामाला आहे. अमेरिकन टीवी मालिका Parks and Recreation च्या  दोन भागांत त्याने पाहुणा कलाकार म्हणून कामही केलं आहे.

img_20160716_150344838_hdrस्कॉच जितक्या जुन्या तितक्या महाग. त्यांची प्रत्येकी ३० मि.ली. चव, ती इयनसारख्या प्रगल्भ यजमानाकडून मिळणं. त्यासाठी देलेले २३ पौंड ही फारच माफक किंमत. ३४ वर्ष जुन्या स्कॉचची एक बाटली चक्क २००० पौंडांना विकली जाते. तिचा ड्राम पिताना विचार आला.. या स्कॉचचं आणि माझं वय एकच! आमच्या आजूबाजूला शेकडो लाकडी पिंप रचून ठेवली होती. वेगवेगळ्या वयाची स्कॉच तिथे  मुरत होती. मी इयनला विचारलं, “या गोदामातली सगळ्यात प्रौढ स्कॉच कधीपासून इथे मुरत आहे?”

हसत हसत त्याने उत्तर दिलं, “तुझ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष केनेडी होता ना, तेव्हापासून! जेव्हा तिला विकले जाईल तेव्हा एका बाटलीची किंमत इयनच्या संपूर्ण आयुष्यातल्या वेतनाच्या बेरजेच्या दहापट असेल!”

मग त्याने एक पिंप आम्हाला दाखवून गोदामातली सगळ्यात कोवळी, फक्त तीन दिवस आधी मुरवायला ठेवलेली स्कॉच दाखवली, चवही दिली. ताजी व्हिस्की असल्यामुळे अर्थातच पारदर्शक, आणि ६५-७०% मद्यार्क. मी एक छोटा घोट घेतला आणि लगेच तोंड वाकडं केलं. गोव्यातल्या फेणीसारखी घसा जाळणारी चव. घश्यापासून ते पोटापर्यंत आग लागल्यासारखं वाटलं. ageing केलेल्या स्कॉचला जे रुचकर पैलू असतात तसलं काही नव्हतं त्या चवीत. माझं तोंड पाहून इयनने विचारलं, “नाही आवडली?” मी मान हलवली. तो म्हणाला, “अरेरे, तुझा हा अनुभव या कडव्या आठवणीने नको संपवायला. आता हे घे.” आणि त्याने ३४ वर्षीय स्कॉचचा अजून एक ड्राम ओतून माझ्या हाती दिला.

तर या अतिशय आल्हाददायक आणि गोड अनुभवानंतर आम्ही अखेर आईलाचा निरोप घेतला. जर तुम्हाला स्कॉच आवडत असेल, तर ही तीर्थयात्रा नक्की करा. जरी स्कॉच आवडत नसेल तरी हे रम्य चिमुकलं बेट, आणि तिथले मनमिळाऊ आणि गोड रहिवासी नक्कीच पाहण्यासारखं आहे.

इंग्रजी लेखन – रूपल कक्कड

अनुवाद – गौरव सबनीस

kakkadmugshot

गौरव सबनीस न्यू यॉर्क मध्ये राहतो. तो एक मार्केटिंग प्रोफेसर आहे व त्याला निरनिराळ्या देशांच्या खाद्यसंस्कृतींचा अनुभव घ्यायला आवडते.रूपल कक्कड न्यू यॉर्क मध्ये राहते. ती डोळ्यांची डॉक्टर आहे व तिला प्रवास करायला, फोटो काढायला व खायला-प्यायला खूप आवडते.

फोटो – रूपल कक्कड     व्हिडिओ – YouTube

3 Comments Add yours

 1. Vidya Subnis says:

  Very interesting and informative article 👍👍

  Like

 2. sujit says:

  Interesting article,no doubt about it..but have sense while using the words..pandhari (pandharpur) is spiritual capital…one should maintain the decorum of word/place…in warkari culture and pandharpur,liquor itself is prohibited and you are putting scotch and Pandhari aside…hope author was in senses while writing article and blog moderator also was in senses while putting article on site…

  Like

 3. sujit says:

  Rajyadhakshya bai..lekh kay zopet wachta ka tumhi?

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s