महेश एलकुंचवार हे लेखक म्हणून सगळ्यांनाच माहीत आहेत. पण महेशकाका फार उत्तम स्वयंपाक करतात आणि फार चवीनं जेवतात हे फार कमी जणांना माहीत आहे. १०-१२ वर्षांपूर्वी माझ्या सासुबाईंच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांच्याबरोबर नागपूरला गेले होते. तेव्हा महेश काकांशी स्वयंपाकाबद्दल खूप गप्पा झाल्या. आम्ही दोघेही शाकाहारी, शिवाय दोघांच्या जेवणातल्या आवडी सारख्याच. त्यामुळे आमचं चटकन जमलं.
डिजिटल अंक काढायला सुरूवात केली तेव्हा हा अंक महेश काकांना पाठवावा असं अनेकदा मनात येऊनही तसं करायचं धाडस मात्र झालं नाही. प्रवीण बर्दापूरकर काकांनी त्यांना अंकाची लिंक पाठवली. तेव्हा त्यांची मेल आली की मला का नाही पाठवलीस तू लिंक? मी म्हटलं हिंमत झाली नाही. त्यावर ते म्हणाले की फार तर काय मी चांगला नाही असं म्हणालो असतो. ते काही महिन्यांपूर्वी घरी आले होते तेव्हा या दिवाळी अंकासाठी काहीतरी नक्की देईन असं म्हणाले होते. मी लगेचच पडत्या फळाची आज्ञा घेतली आणि गडचिरोलीहून येताना त्यांच्या घरी गेले. त्यांच्याशी स्वयंपाकाबद्दल गप्पा मारल्या. ३-४ तास मजेत गेले.
सायली राजाध्यक्ष