सिनेमातली खाद्यसंस्कृती

शर्मिला फडके आणि सायली राजाध्यक्ष

बरजात्यांच्या एका गोड-गुळगुळीत सिनेमात (बहुतेक हम साथ साथ है) नेहमी असतो तसाच एक कुटुंबियांनी मिळून एकत्र जेवण्याचा सीन आहे. कुटुंबप्रमुख आलोकनाथ आपल्या २५-३० माणसांच्या कुटुंबकबिल्यासमवेत एका भल्यामोठ्या, साधारण दोनशे लोकांना पुरेल इतकं खाणं मांडून ठेवलेल्या डायनिंग टेबलवर जेवायला बसलेला असताना आपल्या प्रेमळ कुटुंबियांकडे एक (साजूक) तुपकट कटाक्ष टाकून उद्गारतो,” फॅमिली दॅट ईट्स टुगेदर.. ” आजूबाजूचे कुटुंबिय एका आवाजात त्याला साथ देत म्हणतात.. “स्टेज टुगेदर.” आलोकनाथ कृतार्थतेने हसतो आणि प्रेक्षागृहातले सारे हिंदी सिनेमाचे पारंपरिक प्रेक्षकही समजूतदारपणे आणि खुशीत हसून माना डोलावतात.

बरजात्याने नेहमीच्याच अचूकतेने तमाम भारतीय जनतेच्या दोन अतिसंवेदनशील, जिव्हाळ्याच्या सांस्कृतिक गोष्टींवर बोट टेकवलेले असते. एकत्र कुटुंबपद्धती आणि जेवणाची पंगत.

सिनेमाच्या पडद्यावरील फॅमिलीज पंजाबी असोत की गुजराथी किंवा मारवाडी, त्यांचं एकत्रित बसून जेवणं, घरातल्या खानदानी बहुबेटियांनी त्यांना आग्रह करकरुन वाढणं हे तमाम भारतवासियांना आपल्या संस्कृतीला उच्च बनवणार्‍या अनेक पैलूंपैकी एक वाटतं.
अर्थात हिंदी सिनेमामधली ही एकत्र कुटुंबपद्धतीचे गोडवे गाणारी संस्कृती जितकी टिपिकल तितकीच त्या सिनेमांमधली खाद्यसंस्कृतीही. ती सुरु होते ‘गाजर का हलवा’ पासून आणि संपते ‘मूली के पराठे’ पाशी. अधूनमधून त्यात खीर, बेसन के लड्डू वगैरे क्रिएटिव्ह पदार्थांची भरही पडत असते, नाही असं नाही. पण त्याव्यतिरिक्त हिंदी सिनेमामधले कुटुंबिय काही फारसं इतर खात नसतात.

साठीच्या दशकातल्या हिंदी सिनेमांमधे अजून एक भारतीय प्रेक्षकांच्या काळजाला हात घालून त्यांच्या डोळ्यांमधून हमखास पाणी काढणारा एक जेवणाशी संबंधित सीन हमखास असे. मूर्तिमंत दारिद्र्य अंगावर आणि चेहर्‍यावर वागवणारी हिरोची आई (हो! लीला चिटणीसच अर्थात) आपल्या फर्स्टक्लास फर्स्ट बीएच्या डिग्रीचं भेंडोळं हातात घेऊन नोकरी मिळवण्यासाठी दर दर की ठोकरें खात फिरणार्‍या लाडक्या लेकाची डोळ्यांत निरांजनं लावून वाट पहात बसलेली असते. तिचा तगडा, खात्यापित्या घरात जन्माला आल्यासारखाच दिसणारा पण सिनेमात गरिबीने गांजलेला, अर्धपोटी पंचविशीतला मुलगा नोकरी शोधल्यानंतरच्या वेळात आपल्या श्रीमंत, खानदानी घरात एकुलत्या एक(च) जन्मलेल्या मैत्रिणीसमवेत बागेतल्या झाडांभोवती पळत गाणी म्हणण्याचा व्यायाम पुरेसा करुन झाल्यावर दमलेला, भुकेला असा घरी परततो. आई लगेच त्याला जवळ घेऊन ‘थक गया ना मेरा बेटा’ म्हणत जेवायला बोलावते.
आई चुलीभोवती मोठमोठी, दहा माणसांसाठी सहज भाजी, आमटी मावू शकेल अशी पातेली आजूबाजूला घेऊन दाल ढवळत बसलेली. हिरो येतो. ‘वाह! कितना अच्छा खाना बनाया हैं मां,’ असं म्हणत भराभर रोटीचे घास घेतो. आई मोठ्या पातेल्यांत खडखड आवाज करत डावेने तळाशी ढवळत त्याला अजून दाल आणि सब्जी वाढते. मधेच हिरोला आठवण येते आपली आई जेवलीय की नाही? मग तो तिलाही जेवायचा आग्रह करतो. ती अर्थातच त्याला ‘तू खा ले बेटा, मै बाद में खाऊंगी.’ सांगते. हिरोला ते पसंत पडत नाही. तो परत आग्रह करतो. आई परत नाही म्हणते. मग त्याला काहीतरी शंका येते आणि तो आजूबाजूच्या पातेल्यांवरच्या झाकण्या काढून आत डोकावतो. त्या अर्थातच रिकाम्या. कुठे तळाशी थोडा भात वगैरे. (मगाशी आई मुद्दाम इतकी खडखड आवाज करत तळापर्यंत ढवळत त्याला वाढत असते त्यावरुन त्याला काही अर्थातच समजलेले नसते इतका तो मंद).
आता हिरोला कळवळून येतं. ” तू कितनी अच्छी है मां, और मै तुम्हारा नालायक बेटा तुम्हें खाना भी नही दे सकता. “अशा अर्थाचे काही संवाद तो म्हणतो. आता प्रेक्षकांनाही कळवळून येतं. पुढे तो हिरो कशाही पद्धतीने पैसे मिळवून श्रीमंत होवो किंवा तुरुंगात जावो. प्रेक्षकांची सहानुभुती त्याच्याच पाठीशी. आपल्या गरीब मांला पेट भरके खाना देण्यासाठी हिरो जे काही करेल ते सारे त्याला माफ.

हिंदी सिनेमांवर पंजाबी संस्कृतीचे अधिराज्य असल्याने सिनेमांमधल्या गरीब, शेतकरी घरांत मक्केकी रोटी आणि सरसोंका साग आणि श्रीमंत घरात गाजर का हलवा, सामोसे हेच खाद्यपदार्थ आपल्याला जरी प्रामुख्याने दिसत राहिलेले असले तरी काही इतर संदर्भही कधीकधी दृष्टीस पडले. अर्थातच फार क्वचित. मराठी खाद्यपदार्थ पोहे आणि थालीपिठ किंवा बटाटेवड्यांपलिकडे गेलेले कधी दिसले नाहीत.
सई परांजपेंच्या ‘कथा’ मध्ये लीला मिश्रांची प्रेमळ आजी आपल्या लाडक्या नातवाला थालिपिठासोबत लोण्याचा गोळा भरवत असते. ‘विरुद्ध’ मधे विद्याधर पटवर्धन नामक भूमिकेतला अमिताभ बच्चन त्याच्या बायकोकडे म्हणजे शर्मिला टागोरकडे सकाळच्या नाश्त्याला खायला ‘पोहे’ मागतो ते उगीचच अस्थानी वाटत राहिले. ‘थ्री इडियट्स’मधे करिना कपूर गुजराथी पदार्थांच्या नावांचा मजेशीर उल्लेख करते. खांडवी, रोटला, फाफडा, ढोकळा अशी एखाद्या मिसाईल्सना शोभेशी नावे कां असावीत गुजराथी पदार्थांची हा तिचा प्रश्न. एखाद्या ‘पेस्तनजी’मधली जेरु पार्शी स्पेशल ‘लेसी कटलेट्स’ चा उल्लेख करते. हिंदी सिनेमांमधल्या खाद्यसंस्कृतीतली प्रादेशिकता यापलिकडे फारशी कधी गेली नाही.

तरी काही काही सिनेमांमधले खाद्यपदार्थांशी संबंधित चटपटीत दृष्ये एकंदर सिनेमाच्या मानाने फारशी महत्वाची नसली तरी उगीचच लक्षात मात्र राहिली. जसे सईच्याच ‘चष्मेबद्दूर’ मधे दीप्ति नवल आणि फारुक शेख दिल्लीतल्या रेस्टॉरन्टमधे भेटून ‘एक टुटीफ्रुटी और एक कॉफी’ रोज खात असतात ते त्यांना आणून देणारा वेटर ‘इंटर्वल के बाद’ असं म्हणून जातो ते दॄष्य किंवा ऋषिदांच्या ‘गोलमाल’ मधे उत्पल दत्त घरी आलेल्या अमोल पालेकरकडे त्याच्या तोतयेपणाचा संशय आल्यावर निरखून पहात असतो आणि अमोल पालेकर खात असताना त्याची खोटी चिकटवलेली मिशी सरकते तेव्हा ‘कसा सापडला’ भाव चेहर्‍यावर आणत ‘खाओ खाओ बेटा.. आग्रेका पेठा खावो, बनारसका सोहनहलवा खावो, कलकत्तेके रसगुल्ले खावो’ वगैरे जे काही बडबडतो ते अफलातून आहे.

शम्मी कपूरच्या ‘जंगली’ मधे तो आणि सायरा बानू बर्फाच्या वादळात एका पहाडावर लाकडी केबिनमधे अडकून रहातात. त्यांच्याकडे एका टिफिनमधे एका व्यक्तिला पुरेल इतकेच जेवण असते. सायरा बानू ते शम्मी कपूरला देऊ करते. तिच्यामुळेच आपण या वादळात सापडलो याचा राग मनात असल्याने शम्मी कपूर ते खायचं नाकारतो त्याला आग्रह करुन दमल्यावर सायरा शेवटी डबा तसाच त्याच्याशेजारी ठेवून झोपते. मध्यरात्री भूक असह्य होऊन शम्मी उठतो आणि डबा उघडून बका बका खायला लागतो. त्याचं ते खाणं बघून सायरा मनातल्या मनात त्याला ‘जंगली कही का’ म्हणते ते आपल्याला शब्दशः पटतं.

खाण्यापिण्याचा माध्यमातून हिंदी सिनेमांमधे प्रेम, आपुलकी, दुष्मनी वगैरे भावभावना व्यक्त केल्या जाण्याच्या घटना फारशा नाहीत. मात्र बासूदांच्या ‘छोटीसी बात’ मधे मध्यमवर्गीय साध्यासुध्या, अगदी बावळटच अशा नायकाच्या व्यक्तिमत्वामधे परिवर्तन घडून त्याचे चतुर, अग्रेसिव्ह बनणे, हिरॉईनवर छाप मारण्याइतके स्मार्ट बनणे एका अशाच एका खाण्याच्या प्रसंगातून छानच फुलवले.
अमोल पालेकरचा अरुण बर्‍याच खटपटींनंतर धीर एकवटून विद्या सिन्हाला लन्चसाठी सॅमोव्हारमधे बोलावतो. पण तिचा आगावू मित्र नागेशही आपल्यासाठी स्वतःहून आमंत्रण लावून घेऊन त्यांच्याबरोबर तिथे येतो. आणि मग नागेशने अरुणला बाजूला सारत स्वतःचा स्मार्टनेस दाखवत ‘चिकन आलाफूस’ नामक डिश ऑर्डर करणं, पीटर नामक वेटरची ओळख काढत इम्प्रेशन मारणं यासगळ्यात बिच्चारा अरुण बाजूलाच पडतो आणि मनातल्या मनात नागेशवर पिस्तुलातून गोळी मारण्याचे मनसुबे लढवत मनातून अगदी खट्टू होतो. शिवाय ‘चिकन आलाफूस’चं भरमसाठ बिलही त्यालाच भरावं लागतं ते वेगळंच. मात्र उत्तरार्धात अरुण जेव्हा कर्नल नगेन्द्रनाथांकडून ‘ट्रेनिंग’ घेऊन पुरेशा तयारीनिशी परततो तेव्हा आता त्या आगाऊ नागेशवर डाव उलटवून त्या सॅमोव्हारमधल्या उपेक्षेचं उट्टं काढण्याची संधी अचूक घेतो. मात्र यावेळी तो सॅमोव्हारमधे पुन्हा जायचा नागेशचा बेत हाणून पाडतो आणि त्याला त्याकाळात नव्यानेच फेमस झालेले ‘चायनीज’ खायला सुप्रसिद्ध ‘फ्लोरा’मध्ये घेऊन जातो. तिथे सराईतपणे नूडल्स ऑर्डर करुन चॉपस्टिकने खायला सुरुवात करतो जे नागेशला अजिबात जमत नसतं. अमोल पालेकरचा नव्याने निर्माण झालेला आत्मविश्वास, त्यामुळे विद्या सिन्हाने इम्प्रेस होणे, नागेशने आता खट्टू होणे हे बासूदांनी मस्त फुलवलंय.
खाद्यपदार्थ, रेस्टॉरन्ट यासंदर्भांचा चित्रपटाच्या पटकथेमधे असा ताकदीने वापर करुन घेणारा बासूदांसारखा दिग्दर्शक विरळाच.

मराठी सिनेमांमधे असाच वापर पण वेगळ्या पद्धतीने सचिन कुंडलकर या नव्या दिग्दर्शकाने आपल्या ‘रेस्टॉरन्ट’ नावाच्याच सिनेमात फार सुरेख केला.
केटरिंग कॉलेजात शिक्षण घेऊन आपल्या जुन्या वाड्यात नव्या धर्तीच्या रेस्टॉरन्टची उभारणी करणारी नायिका, तिला एकेकाळी स्वतः स्वयंपाक करण्याची खूप आवड असूनही आता ती त्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करते. तिच्यातल्या ह्या बदलाची उकल तिच्या भूतकाळात घडलेल्या काही घटनांच्या मदतीने तिचा एक सहाध्यायी करु पहातो. हे सारे घडत असताना पार्श्वभूमीवर खानावळ, रेस्टॉरन्ट यांची उभारणी, तिथले व्यवहार हे सारं सचिन कुंडलकरने छान दाखवलं होतं.

बाल्कीच्या ‘चीनी कम’ सिनेमाचीही पार्श्वभूमी संपूर्णपणे शेफ अमिताभ बच्चनच्या लंडनमधल्या भारतीय रेस्टॉरन्टची होती. त्यातला तब्बू आणि अमिताभच्या प्रथम भेटीचा प्रसंग हैद्राबादी जाफरानी पुलावाच्या संगतीने छान खुलला. आपल्या रेस्टॉरन्टसारखा जाफरानी पुलाव अजून कुठेच बनत नाही याचा अमिताभला सार्थ अभिमान असतो पण नेमका एकदा तब्बूने ऑर्डर केलेल्या ह्या डिशमधे बनवणार्‍याच्या हलगर्जीतून मिठाऐवजी साखर पडते. तब्बू तो पुलाव किचनमधे परत पाठवते. तो का परत केला याची शहानिशा न करताच अमिताभ बाहेर येऊन तिला ताडताड सुनावतो. तेव्हा काहीही प्रत्युत्तर न करता तब्बू परत जाते आणि एक दिवस घरी असली हैद्राबादी जाफरानी पुलाव स्वहस्ते बनवून शेफ अमिताभला भेटीदाखल पाठवते. अमिताभच्या त्या रेस्टॉरन्टमधे काम करणारे इतर शेफ हा सगळा प्रकार व्यवस्थित एन्जॉय करतात. अर्थात चित्रपट पुढे सरकताना या पिक्चरचा फोकस रेस्टॉरन्टवरुन जाऊन भलतीकडेच वळला आणि चित्रपट नंतर फसतच गेला.

शाहरुखच्या ‘डुप्लिकेट’ नावाच्या सिनेमामधे नर्म विनोदी प्रसंगांच्या माध्यमातून शेफ आणि रेस्टॉरन्टची पार्श्वभूमी छान वापरुन घेतली. त्यात शेफ जुही चावला उमेदवार म्हणून आलेल्या शाहरुखला हॉटेलातल्या जपानी डेलिगेशनसाठी खास जपानी पद्धतीचा खाना बनवायला सांगते आणि शाहरुख तो एकहाती बनवतोही. पण आपला मुलगा बिचारा एकट्याने कसा काय इतका मोठा स्वयंपाक करेल या काळजीने त्याला मदत करायला हॉटेलच्या किचनमधे शिरलेली त्याची पंजाबी आई त्या पदार्थांची चव घेते आणि किती सगळं अळणी बनवलय असं म्हणत त्या सगळ्या पदार्थांमधे सढळ हाताने पंजाबी गरम मसाले टाकते तो प्रसंग अफलातून आहे. अर्थातच नंतर त्या जपानी पाहुण्यांना हा जपानी-भारतीय चवींच्या मिश्रणातून बनवलेला स्वयंपाक प्रचंड आवडतो आणि शाहरुख खानची तारीफ होते. असे काही दोन तीन चित्रपट वगळता फार काही हिंदी सिनेमे खाद्यपदार्थ-हॉटेल्स-शेफ अशा पार्श्वभूमीवर बनलेले आठवत नाहीत.

हृषिकेश मुखर्जींच्या बावर्ची या चित्रपटाचं नाव जरी बावर्ची असलं तरी त्यात खाद्यसंस्कृतीचं चित्रण आढळत नाही. काही वर्षांपूर्वी आलेला प्रिटी झिंटा आणि सैफ अली खान अभिनित सलाम नमस्ते या चित्रपटात नायक शेफ आहे. पण फक्त नावालाच, त्यातही खाण्याबद्दलचं चित्रीकरण नाहीच.

खरंतर भारताची खाद्यसंस्कृती इतकी विविधांगी, रसदार, रंगीबेरंगी आहे, तिला प्राचीन इतिहासाची पार्श्वभूमी आहे, अनेक लोककथा, लोकसंस्कृती या खाद्यसंस्कृतीला चिकटून आहेत. तरीही इतका रसभरीत, सर्वांच्या आवडीचा हा विषय हिंदी सिनेमांमधून संपूर्णपणे एक्स्प्लोर अजून का केला गेला नाही कळत नाही.
‘खाणे’ या एका गोष्टीभोवती भारतीयांच्या कितीतरी भावभावना गुंफलेल्या असतात. त्याचे काही संदर्भ सिनेमांमधून येतातही, उदा, एखाद्याचं मीठ खाल्लेलं असणे किंवा जिस थाली में खाया उसीमे छेद करना सारखे चित्रपटांमधून घडणारे प्रकार वगैरे. पण सारे नातेवाईक, मित्रपरिवार एकत्र बांधून ठेवण्याची ताकद असलेली भारतीय खाद्यसंस्कृती सिनेमाच्या पडद्यावर मात्र अजूनही दुर्लक्षित राहिलीय हे सत्य आहे.

असं म्हणतात हैद्राबादी आणि लखनवी नवाबांच्या घराण्यांमधे एखाद्या पाककृतीच्या मालकी हक्कावरुन आणि तिच्यातल्या मसाल्यांच्या घटकांच्या प्रमाणांचं गुपित जपण्याच्या प्रश्नांवरुन युद्धं घडून येत असत. युरोपातही मसाले, चॉकोलेट्स, कॉफी इत्यादींच्या व्यापारावरचा आपला हक्क शाबूत राखण्यासाठी लढाया होत असत. एखाद्या पारंपरिक खाद्यपदार्थाची कृती ऑथेंटिक सोर्सकडून मिळवण्यासाठी जातिवंत शेफ आणि आचारी जीवाचं रान करतात. जेवण बनवण्याची, ती योग्य रितीने सजवून, मांडून ठेवण्याची संस्कृती युरोपातही फार परिश्रमपूर्वक विकसित झाली. काही मोजक्या चित्रपटांमधून हा खाद्यपदार्थांना वेढून असलेला स्वाद, चव प्रेक्षकांपर्यंतही पोचली.

‘टॅमपोपो’ नावाचा एक जपानी सिनेमा मध्यंतरी टीव्हीवर पाहिला होता. खाद्यपदार्थांच्या मध्यवर्ती कल्पनेभोवती फिरणार्‍या सिनेमांपैकी हा माझ्यामते सर्वात उत्कृष्ट सिनेमा. एक ट्रक ड्रायव्हर आणि त्याचा पोरगेलासा असिस्टंट एकदा हायवेला लागून असलेल्या एका धाब्यावर जेवायला थांबतात. रामेन नूडल्स बनवून विकणारी त्या धाब्याची मालकीण एक तरुण विधवा असते. तिला काही तो धंदा जमत नसतो. तिचं त्यात लक्षही नसतं. पण उदरनिर्वाहाला अजून दुसरं कोणतंच साधन तिच्यापाशी नसतं त्यामुळे नाईलाजाने ती तो धाबा चालवत असते. धाब्यावर झालेल्या एका मारामारीत या ट्रक ड्रायव्हर आणि मुलाच्या हातून नकळत त्या धाब्याचं नुकसान होतं. मग त्याची भरपाई करायला किंवा त्या तरुण विधवेची दया आल्याने म्हणा पण दोघेजण तिला तो नूडल्स बनवून विकण्याचा धंदा चालवायला मदत करु लागतात. मग बघता बघता (म्हणजे त्या दोघांच्या परिश्रमानेच अर्थात) बेचव नूडल्स बनवणारा तो धाबा आसपासच्या गावांमधे सर्वोत्कृष्ट चवीचं नूडल्स सूप मिळणारं एक्स्क्लुजिव ठिकाण बनतं.

या सिनेमामध्ये खाद्यसंस्कृतीशी निगडित अनेक मजेशीर उपकथानकं आहेत. एक सामान्य क्लार्क, ज्याला काहीच कल्चर नाही असं त्याचे वरिष्ठ समजत असतात. एकदा ऑफिसमधल्या प्रतिष्ठित पाहुण्यांना घेऊन एका फ्रेन्च गुर्मे रेस्टॉरन्टमधे जेवायला घेऊन जायची वेळ वरिष्ठांवर येते तेव्हा हाच सामान्य क्लार्क अगदी सराईत माहीतगाराप्रमाणे त्या क्लासी हॉटेलात फ्रेन्च खाद्यपदार्थांची, त्याला साजेशा वाईन्सच्या निवडीसकट ऑर्डर देऊन आपली ‘संस्कृती’ दाखवून देतो आणि वरिष्ठांची जाणारी लाज सावरतो. एक अगदी मरायला टेकलेली घरातली गृहिणी घरच्यांसाठी ‘शेवटचा’ स्वयंपाक करुन सार्‍यांना जेवू घालण्याच्या तीव्र इच्छेतून अक्षरशः डेथबेडवरुन उठून ओट्यापाशी जाते तो प्रसंग अचाट आहे. एका महिलेने चालवलेला ‘आवाज न करता स्पॅगेटी खाण्याची कला’ शिकवणारा क्लास, आणि एका कोपर्‍यावरच्या दुकानदाराला दुकानात येऊन खाद्यपदार्थ कुस्करण्याची विचित्र सवय असलेल्या म्हातार्‍या बाईला सहन करताना कराव्या लागणार्‍या कसरती हसवून जातात.

‘रातातुई’ मध्ये एका स्वयंपाकाची आवड असलेल्या उंदराला हिरो बनवलेल्या अ‍ॅनिमेटेड चित्रपटाने तर सर्व वयोगटाच्या लोकांना खुश करुन टाकले होते. हॉलिवुडमधे खाद्यपदार्थ, रेस्टॉरन्ट्स, शेफ, कुक यांना मध्यवर्ती कल्पना म्हणून वापरुन काढलेले सिनेमे खूप गाजले. मला आवडलेले काही- ‘ नो रिझर्वेशन्स, वुमन ऑन टॉप, ज्युली अ‍ॅन्ड ज्युलिया, वेट्रेस’, शोकोला (Chocolat) ,  अ गुड इयर (A good year) , इट प्रे लव्ह (Eat Pray Love), शेफ (Chef) .

मेल गिब्सनच्या ‘अ‍ॅपोकॅलिप्टो’ मधे प्राचीन मायन आदिवासींच्या संस्कृतीतल्या काही विचित्र खाद्यसंस्कृतीचं चित्रण होतं. रानडुक्कर किंवा रानबैलाची शिकार केल्यावर टोळीचा जो प्रमुख असेल त्याला त्या प्राण्याचं हृदय आणि मग अशाच क्रमाक्रमाने इतरांमधे उरलेल्या अवयवांची वाटणी केली जात असे. एखाद्याला काही आजार असेल किंवा मूल होत नसेल तर त्या अनुषंगाने काही विशिष्ट अवयवांची भेट त्यांना दिली जाई.
अमरिश पुरीने काम केलेल्या ‘ईंडियाना जोन्स अ‍ॅन्ड द टेम्पल ऑफ डूम्स’ मधलं नरभक्षकांचं अंगावर शहारे आणणारं चित्रणही एका वेगळ्याचं खाद्यसंस्कृतीचं चित्रण करणारं म्हणायला हवं.

हॉलिवुडमधल्या बहुतांश चित्रपटांमध्ये युरोपियन खाद्यसंस्कृतीचं चित्रण आहे. शोकोला हा सिनेमा घडतो तो साठच्या दशकातल्या फ्रान्समधे. चित्रपटाची नायिका आपल्या सात-आठ वर्षांच्या मुलीबरोबर फ्रान्समधल्या एका काल्पनिक खेड्यात येते. त्या खेड्यावर चर्चचा आणि रूढी-परंपरांचा पगडा आहे. तिथे राहणारे लोक साध्याशा, छोट्या छोट्या आनंदापासून वंचित आहेत. ही नायिका येते तेव्हा नेमका तिथं लेन्ट सुरू होणार आहे. आपल्याकडे जसा श्रावण पाळला जातो तसाच इस्टरच्या आधी धार्मिक ख्रिश्चन हा चाळीस दिवसांचा काळ पाळतात. या काळात स्वतःवर निर्बंध घालून घेतात. अशा वेळेलाच ही नायिका तिथे येते आणि चॉकलेटचं दुकान उघडते. ही नायिका त्या गावातल्या पारंपारिक स्त्रियांपेक्षा अधिक मोकळी ढाकळी आहे त्यामुळे लोकांना विशेषतः त्या गावच्या चर्चच्या बिशपला तिचं वागणं मान्य नाहीये. तिच्यातल्या आणि बिशपमधल्या संघर्षाला चॉकलेट प्रेमाची मस्त किनार आहे. तिच्या वागण्यामुळे आणि तिच्या दुकानामुळे लोक हळूहळू बदलत जातात. या चित्रपटातलं चॉकलेट बनवण्याचं चित्रण बघण्यासारखं आहे.

ज्युली अँड जुलिया हा तर हल्लीच तीन चार वर्षांपूर्वी आलेला चित्रपट. ज्युलिया चाइल्ड ही पाककला तज्ज्ञ. नव-याच्या नोकरीच्या निमित्तानं ती पॅरिसला येते. मूळची अमेरिकन पण फ्रेंच कुकिंगची चाहती. ती आजच्या काळात अमेरिकेत राहणा-या, खाण्यातली दर्दी असलेल्या आणि स्वयंपाकाची आवड असलेल्या ज्युली पॉवेलला भारावून टाकते. जुलियाच्या ५२४ फ्रेंच पाककृती वर्षाच्या ३६५ दिवसांत करून बघायचं ज्युली ठरवते. एकीकडे या पाककृती करून बघताना तिच्या आयुष्यातही उलथापालथ होत असते. आपल्या या अनुभवांवर ती ब्लॉग लिहायला लागते आणि शेवटी एक मान्यताप्राप्त प्रकाशन संस्था तिचं पुस्तक काढायचं ठरवते. दोघींच्याही नव-यांचा त्यांच्या या छंदाला पाठिंबा असतो. मेरिल स्ट्रीप आणि एमी एडम्सच्या अप्रतिम अभिनयासाठी हा चित्रपट बघायलाच हवा. विशेषतः मेरिल स्ट्रीप टीव्हीवर पाककृती करून दाखवत असतानाचे प्रसंग अप्रतिम आहेत.

इट प्रे लव्ह या चित्रपटाची नायिका घटस्फोट घेऊन आपली आत्मखूण शोधायला बाहेर पडली आहे. प्रथम ती इटलीला जाते. जिथे ती वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊन आयुष्यातला आनंद शोधायचा प्रयत्न करते. नंतर ती भारतात येते आणि अध्यात्माच्या मार्गानं मनःशांती मिळवण्याचा प्रयत्न करते आणि शेवटी इंडोनेशियामधे तिला तिच्या आयुष्यातलं खरं प्रेम मिळतं. इटालियन खाद्यसंस्कृतीच्या नयनरम्य चित्रणासाठी हा चित्रपट बघायलाच हवा.

नो रिझर्व्हेशन्स हाही असाच एक चित्रपट. चित्रपटातली दोन्ही प्रमुख पात्रं ही न्यू यॉर्कमधल्या एका रेस्टॉरंटमध्ये शेफ आहेत. नायिका मुख्य शेफ तर नायक हा सू-शेफ किंवा तिच्या हाताखाली काम करणारा आहे. नायिकेची बहिण आणि तिचा नवरा एका रस्ता अपघातात मरण पावलेले आहेत आणि त्यांची सात-आठ वर्षांची मुलगी आता नायिकेकडे राहते आहे. रेस्टॉरंटमधलं शेफ्समधलं राजकारण, त्यांच्यातली चढाओढ आणि दुसरीकडे नायिकेचं एकाकी आयुष्य असा समांतर हा चित्रपट सुरू राहतो. बहिणीच्या छोट्या मुलीला आपलंसं करण्याची नायिकेची धडपड कॅथरीन झिटा-जोन्सनं जिवंत केलीय.

अ गुड इयर रूढार्थानं खाण्याशी संबंधित आहे असं म्हणता येणार नाही. पण या चित्रपटातली नायिका प्रोव्हान्स या फ्रान्समधल्या अतिशय सुरेख, निसर्गरम्य अशा प्रांतातल्या एका गावात एक रेस्टॉरंट चालवते. नायक लंडनमधला अतिशय व्यस्त आणि यशस्वी कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह. त्याचे एक दूरचे काका मरण पावतात आणि आपली सगळी मालमत्ता याच्या नावावर करतात. अट एकच आहे त्या मालमत्तेची व्यवस्था लावण्यासाठी त्याला स्वतःला काही दिवस तिथं राहावं लागणार आहे. नायिकेचं टुमदार रेस्टॉरंट, द्राक्षांचे मळे आणि अतिशय निसर्गसुंदर परिसर यासाठी हा चित्रपट बघायलाच हवा.

रातातुई ही एनिमेशन फिल्म तर खाद्यसंस्कृतीबद्दलची कल्ट फिल्म मानली जाते. रातातुई ही एक फ्रेंच डेलिकसी. एक उंदीर नायकाला पाककला तज्ज्ञ बनण्यासाठी कसा मदत करतो ते बघणं फार रंजक आहे.
गंमतीची गोष्ट अशी की वर उल्लेख केलेल्या बहुतेक चित्रपटांमधे फ्रेंच खाद्यसंस्कृतीचंच प्राबल्य आहे. फ्रेंच लोक खाण्याचे शौकीन आहेत ते उगाच नाही!

चित्रपटांव्यतिरिक्त काही लघुचित्रपट किंवा माहितीपटांमधूनही विशिष्ट खाद्यसंस्कृती न्याहाळता आल्या. लहानशा धाब्यांवर, गली नुक्कडवर, छोट्या गावांमधे बहरलेल्या ओरिजिनल भारतीय खाद्यसंस्कृतीचे खरे दर्शनही याच माहिती आणि लघुपटांद्वारे झाले. ट्रॅव्हल अ‍ॅन्ड लिव्हिंग किंवा डिस्कव्हरी चॅनलवर असे माहितीपट मधून मधून पहायला मिळतात. प्रचंड मेहनत घेऊन, संशोधन करुन हे माहितीपट बनवलेले असतात. ‘स्टार्व्हिंग आर्टिस्ट्स कुकबुक’ नावाच्या एका पाच वर्षं बनत असलेल्या एका माहितीपटाच्या प्रोजेक्टची बनण्याची कहाणी पाहाण्यासारखी होती. युरोप, अमेरिका, मध्य अमेरिका आणि अजूनही जगात कुठे कुठे विखुरलेल्या चित्रकार, शिल्पकार कलावंतांचा खाण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा या माहितीपटाचा मध्यवर्ती हेतू होता. कलावंत कलेच्या साधनेत मग्न असल्यावर, बरेचदा रिकाम्या खिशाने कंगाल होऊन वावरत असताना त्यांच्या मनात डोकावून जाणारे खाद्यपदार्थांचे विचार, काहीवेळा त्या विचारांना कलेच्या माध्यमातून मिळालेली अभिव्यक्ती, ते स्वतः करत असलेला स्वयंपाक, त्यांच्या काही खास रेसिपीज अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव यात होता. जवळपास ९० तासांच्या व्हिडिओटेप्स यातून चित्रित केल्या गेल्या. त्यातून जो काही माहितीपट बनला असेल तो काही मी पाहिला नाही. पण हे जे मेकिंग दाखवले ते अफाट होते.
असाच एक गाजलेला माहितीपट ‘सुपरसाईझ मी’. मॅक्डोनाल्ड या प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या फास्ट फूड चेनमुळे अमेरिकेच्या लागोपाठ कित्येक पिढ्यांना अतिरिक्त मेदसंचय, हृदयविकार वगैरे विकारांशी सामना करावा लागला. मॅकचा सुपरसाईझ बर्गर खाण्याचे व्यसनच शाळकरी मुले, तरुणांना लागले होते. ते धोकादायक होते पण त्याकडे कोणी फारसे लक्ष देत नव्हते. एका सडसडीत, निरोगी तरुणाने याला आव्हान म्हणून एक महिना फक्त या बिग मॅकबर्गरवर जगायचे ठरवले. आणि केवळ ३० दिवसांत या सशक्त, हेल्दी तरुणाचे रुपांतर एका अतिलठ्ठ, निष्क्रिय, बटाट्याच्या पोत्यासारख्या माणसात झाले. हे सगळं या माहितीपटात चित्रीत झालं आणि असंख्य आईवडिलांचे, काही शाळाचालकांचे डोळे खाडकन उघडले. काहींचे कदाचित अजूनही उघडलेले नाहीत. आता खरं तर भारतात जागोजागी या अशा माहितीपटाच्या प्रदर्शनाची गरज आहे.

शर्मिला फडके

img_20150323_194836

सायली राजाध्यक्ष

img_20160907_194653

शर्मिला कला अभ्यासक आहे तर सायली फूड ब्लॉगर आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s