मासे आणि फुलांनी सजलेली खाद्यसंस्कृती – गोवा

मनस्विनी प्रभुणे -नायक

downloadगोवेकरांचं पहिलं प्रेम हे फक्त आणि फक्त ‘नुस्त्यां’वर (मासळीवर) असतं. इथे मासळीला ‘नुसते’असं म्हणालं जातं. मासळीशिवाय गोमंतकीयांचे जेवण अपूर्ण आहे. मासळी बाजारात गेल्यावर स्वतःपेक्षा शेजारची व्यक्ती कोणती मासळी घेतेय याकडे जास्त लक्ष असतं. रस्त्यात कोणी भेटला तर त्याची ख्यालखुशाली विचारण्याऐवजी ‘आज कोणते नुसते आणले?’ हे सहज विचारलं जातं. कोणाचा फोन आला तर गप्पांमध्येही आज जेवणात कोणते नुसते होते हे विचारल्याशिवाय संभाषण पूर्ण होत नाही. इतके मासळीवर प्रेम करणारे जगात गोमंतकीयांशिवाय दुसरे कोणी सापडणार नाहीत. गमतीचा भाग सोडा पण खरंच माशांचे असे चाहते सापडणं कठीण आहे. पण फक्त मासळीवरच इथलं ‘उदरभरण’ होत असं नाही. इथल्या ‘शिवराक’ म्हणजेच शाकाहारी स्वयंपाकाची लज्जत काही निराळीच आहे. या शिवराक पदार्थांमध्ये देखील खूप विविधता दिसून येते. गोव्याचं वरवर दिसणारं चित्र थोडेसं भासमान आहे. ते पर्यटनच्या दृष्टिकोनातून कदाचित तयार झालं असावं. त्याला जबाबदार असलेल्यांपैकी एक महत्वाचा धागा हॉटेल इंडस्ट्रीचा आहे. इथल्या कोणत्याही रेस्टॉरंट- हॉटेलमधील मेनू लिस्ट बघा ‘सी फूड’ म्हणून मिळणारे वेगवेगळे पदार्थ सोडले तर अगदीच बोटावर मोजण्याइतक्या अस्सल गोमंतकीय पदार्थांचा समावेश यात आढळतो. त्यामुळे मासळीशिवाय दुसरं काही इथले लोक खात नाही असंच काहीजणांना वाटतं. जसजसे तुम्ही इथल्या मातीत रमायला लागता तसतसे इथल्या अंतरंगातील विविधता चकित करून सोडते.

समृद्ध असे खाद्यजीवन 

गोमंतकीयांचे खाद्यजीवन अतिशय समृद्ध आहे. ते इथल्या हवामानाला अनुसरून असतं. धार्मिक सणवार, बदलत जाणारे ऋतुमान याप्रमाणे स्वयंपाकघरातील पदार्थ बदलत असतात. आजूबाजूचा परिसर, जंगल, शेती, परसबाग, नद्या आणि समुद्र या सगळ्यांचे प्रतिबिंब इथल्या स्वयंपाकात दिसतं. अंगणात, शेतीत जे काही पिकतं त्या सगळ्यांचा वापर स्वयंपाकात केला जातो. दारातील नारळ, केळी, पपई, आंबा, फणस, नीरफणस, चिबूड, अंबाडीची फळं, सोलं (कोकम), अंगणात पिकवलेला भाजीपाला- धवी भाजी, तांबडी भाजी (लालमाठ), शेवगा, मुळा, भोपळा या सगळ्यांचा वापर रोजच्या स्वयंपाकात असतो. जरा ग्रामीण भागात गेलात तर यातलं विकत काही आणावं लागत नाही. सगळं दारातच असतं. कोणतीही गोष्ट वाया घालवायची नाही याची शिस्त गोमंतकीयांमध्ये दिसते.

खाद्यसंस्कृतीवरील पोर्तुगीज प्रभाव

गोव्यावर अनेकांनी राज्य केले. पण पोर्तुगीजांची प्रदीर्घ अशी कारकीर्द राहिली. जवळ जवळ साडेचारशे वर्ष पोर्तुगीजांनी इथे राज्य केलं. त्यामुळे इथल्या समाजजीवनावर, राहणीमानावर आणि खाद्यसंस्कृतीवर त्यांचा खूप मोठा प्रभाव दिसून येतो. पाश्चिमात्य जीवनशैलीचा अनुभव- उदाहरण भारतात प्रथम पोर्तुगीजांकडून गोव्यातल्या लोकांना अनुभवायला मिळाले. पोर्तुगीजांनी भारताला आणि गोव्याला एक महत्वाचा पदार्थ दिला तो म्हणजे ‘पाव’ (ब्रेड).  देशातली पहिली बेकरी गोव्यात सुरु झाली. आज प्रत्येक घराघरात ब्रेडने जागा मिळवली असली तरी ब्रेडचा हा प्रवास इतका सोपा नक्कीच नव्हता. या पावाचाच आधार घेऊन पोर्तुगीजांनी धर्मांतर घडवून आणलं होतं. त्यामुळे आपण पाव खाल्ला तर ख्रिश्चन होणार या भीतीने हिंदू समाज पावला शिवायलाही तयार नसायचा. आज इथली सकाळ आणि संध्याकाळ पावाशिवाय सुरु होत नाही की संपत नाही. ‘पोदेर’ (पाववाला) च्या सायकलचा हॉर्न इथल्या समाजजीवनात रुळून गेलाय. अगदी सवयीचा झालाय.

मुंबईमध्ये सकाळी सकाळी कापड गिरण्यांचे भोंगे ऐकायला यायचे तशी इथली सकाळ पोदेरांच्या भोंग्यांनी म्हणजेच विशिष्ट प्रकारे हॉर्न वाजवण्याने होते. पोदेरसुद्धा इथल्या लोकजीवनाचा महत्वाचा भाग झाले आहेत. त्यांना देखील साडेचारशसे वर्षांची परंपरा आहे. असं म्हणतात पोर्तुगीज काळात गोव्यातून मुंबईमध्ये स्थलांतरित झालेल्या गोमंतकीय लोकांनीच मुंबईकरांना पावाची ओळख करून दिली. वडापाव सारखा पदार्थ आज मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकला जातो. पावाचा मुंबईमधला प्रवास देखीलअसाच रंजक आहे. सकाळ संध्याकाळ गरमागरम उंडे (पावाचा एक प्रकार), पोळी (ब्राऊन ब्रेड), माडाच्या सूरेपासून (नीरापासून) बनवलेला पाव हीदेखील गोव्यातली खासियत आहे. पावाबरोबरच, केकची ओळख पोर्तुगीजांकडून झाली. खरपूस भाजलेल्या पावसाचा वास अगदी दुरूनही आला की आपोआप भूक लागते. गरम गरम कुरकुरीत, खरपूस भाजलेला पाव खाणं हा अगदी स्वर्गीय सुखाचा आनंद देणारा प्रकार आहे. गोव्यात असताना कधीतरी अवश्य अनुभवाला पाहिजे.

पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी इथले लवंगा, मिरी, वेलदोडा, जायफळ हे मसाल्याचे पदार्थ सातासमुद्रापार नेले तसेच त्यांनी टोमॅटो, मिरची, काजू, बटाटा यासारख्या भाज्या- फळं भारतात रुजवली. गोवाच काय पण संपूर्ण भारतीयांच्या ताटात अढळ स्थान पटकावलेल्या टोमॅटोबद्दल अतिशय गंमतीशीर गोष्ट इथे जाणकारांकडून ऐकायला मिळते. पोर्तुगीजांनी टोमॅटो इथे रुजवला पण स्थानिक गोमंतकीय लोकांनी त्याला नाकारलं. का तर? त्याचा लाल रंग आणि त्यातील आतील लाल भाग बघून त्याला ते ‘रक्ताचे फळ’ समजू लागले. पुढे कुठल्या तरी भीषण आजाराच्या साथीमध्ये या आजारावरचं औषध त्याच्या उग्र चवीमुळे आणि वासामुळे टोमॅटोच्या रसातून घ्यायला लागल्यामुळे औषधासाठी म्हणून हळूहळू टोमॅटोचा वापर होऊ लागला. सायबाने आणलेलं फळ म्हणून कित्येक वर्ष धार्मिक विधीतील नैवेद्यामध्ये टोमॅटो वर्ज्य होता. आता मात्र स्वयंपाक घरात टोमॅटोशिवाय खरंच पानही हालत नाही. या साऱ्यांबरोबर गोमंतकीयांना व्हिनेगरची ओळख देखील पोर्तुगीजांनी करून दिली. विशेषतः इथल्या मांसाहारी स्वयंपाकात व्हिनेगर वापरण्याची कला अस्तित्वात नव्हती. ती सायबाने शिकवली. पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी सुरुवातीला त्यांचे स्वयंपाकी आणले होते. नंतर काहींनी आपली कुटुंबं देखील गोव्यात आणल्यामुळे पोर्तुगीज पाककृती इथल्या समाजाला समजल्या. बिबिंकासारख्या पदार्थाची निर्मिती यातलीच आहे. आज इथल्या काही हॉटेल्समध्ये यातले काही पदार्थ मिळतात.

अस्सल गोमंतकीय चविष्ट स्वयंपाक 

गोव्यातल्या घरांमध्ये होणाऱ्या स्वयंपाकात खूप कमी मसालेदार पदार्थ बनतात. रेडीमेड मसाल्यांऐवजी रोज ताजा, वाटून केलेला ओला मसाला ज्यामध्ये खोवलेलला नारळ, लाल मिरच्या, थोडेसे धणे, थोडी हळद, दालचिनीचा छोटा तुकडा या सगळ्याचं अगदी बारीक एकजीव पेस्ट होईल असं वाटण वापरलं जातं. कोणता पदार्थ बनवणार त्याप्रमाणे त्यातले मसाल्याचे पदार्थ बदलत असतात. पदार्थांना खरी चव या ताज्या वाटलेल्या मसाल्यांमधून येते. यामुळे रेडीमेड मसाल्यांना इथल्या घरांमध्ये जागा नसते. मसाल्यांचा वापर न करता देखील चविष्ट भाज्या करता येऊ शकतात हे इथल्या भाज्या खाल्ल्या की लक्षात येतं. इथे मिळणाऱ्या माशांच्या व्हरायटीप्रमाणे म्हणजेच वेगवेगळ्या माशांसाठी वेगवेगळ्या प्रकारचा मसाला, त्याची बनवायची कृती वेगळी असते. इतक्या असंख्य प्रकाराने मासळीचे पदार्थ करून पानात वाढले जातात. इसवण (सुरमई), बांगडा, तारले, मोरी, चणक, कर्ली, शेवटो, लेपो, सुंगटं (प्रॉन्स), शेलफिशमध्ये तिसरे, खुबे, कालवं, शिंदाणे इतकी इथल्या मासळीमध्ये विविधता आढळते. या प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारचा मसाला वापरला जातो शिवाय प्रत्येक मासळीची चव देखील एकदम वेगळी असते. गोव्यासारखी ताजी मासळी क्वचितच मिळू शकते. रोजच्या जेवणात वाफाळलेला भात, सुंगटाचे हुमण, रवा लावून तळलेला माशाचा तुकडा. सुक्या सुंगटाची किसमूर, तिसऱ्या आणि चवीला एखादी पालेभाजी असते. यातले माशांचे प्रकार बदलतात तशी ते बनवण्याची पद्धत आणि त्यासाठी लागणारे मसालेही बदलतात. नुसत्या सुंगटाचे अनेक प्रकाराने हुमण केले जाते. मुळा घालून, म्हस्का सांगो (शेवग्याच्या शेंगा) घालून, अंबाडी घालून  केलेलं हुमण. यातील प्रत्येक घटकामुळे त्या-त्या हुमणाची चव न्यारी बनून जाते. असेच बांगड्याचे देखील विविध चविष्ट पदार्थ बनवले जातात. गोव्यातला माणूस माशांच्या प्रेमात का अडकतो हे यावरून समजू शकतं.

नुसत्याप्रमाणेच शाकाहारी पदार्थांमध्ये देखील भरपूर विविधता आहे. गोव्यातील सारस्वत ब्राह्मण मासळी खातात पण जे भट आहेत ते मासळी अजिबात खात नाहीत. त्यांच्याबद्दल कायम कुतूहल वाटतं. ते कसे काय मासळीच्या रुचकर पदार्थांपासून दूर राहू शकतात. गोव्यात राहून पूर्णपणे शाकाहारी असणं म्हणजे अवघड गोष्ट वाटते. भटांच्या घरात केल्या जाणाऱ्या शाकाहारी पदार्थांची रेलचेल बघून आपण अवाक होऊन जातो. भटांच्या बायका खूप रुचकर असे शाकाहारी पदार्थ बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गोड, तिखट, उकडलेले, शिजवलेले, भाजलेले, तळलेले, वाटलेले अशा अनेक प्रकाराने शाकाहारी पदार्थ बनवून त्यातली विविधता जोपासली जाते.

गोव्याच्या म्हणून एरवी कायमच मासळीच्या पाककृतींना प्रसिद्धी मिळत असते. पण या खाद्यसंस्कृती विशेषांकाच्या निमित्ताने गोव्यातल्या स्वयंपाकातले आणखी एक वेगळेपण समोर आणण्याचा हा प्रयत्न. खाद्यसंस्कृतीचं वेगळेपण बघत आहोत तर वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांपासून बनवलेल्या पदार्थांची माहिती आपण जाणून घेऊ या.

img20161013093944खाद्यपदार्थांमध्ये फुलांचा वापर

परसात उगवणाऱ्या, उमलणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा स्वयंपाक घरात काही ना काही उपयोग केला जातो. काहींना आश्चर्य वाटेल पण अंगणात उमलणाऱ्या काही फुलांचे पदार्थ देखील केले जातात. फळांचे, भाज्यांचे, फळभाज्यांचे पदार्थ माहित असतात पण फुलांपासून देखील एकदम चविष्ट पदार्थ बनत असतील हे बघून विशेष वाटते. विशेषतः भटांच्या घरात फुलांचे पदार्थ करण्याची पद्धत दिसते. या पाककृतींच्या निर्मात्या भटांच्या घरातील अनामिक महिला आहेत.

फुलांपासून बनवलेले रुचकर पदार्थ 

केळफुल 

१. केळफुलाची किसमूर

२. केळफुलाचे कटलेट

३. केळफुलाची भजी

 

भोपळ्याच्या कळ्या आणि फुलं 

१. भोपळ्याच्या कळ्यांची भजी

२. भोपळ्याच्या फुलांची भाजी

३. भोपळ्याच्या फुलांचे थालीपीठ

म्हस्काची (शेवग्याची) फुलं 

१. म्हस्काच्या फुलांचा रोस (रसभाजी)

२. म्हस्काच्या फुलांचे डांगर

सुरणाचे फुल

१. सुरणाच्या फुलांची भाजी

केळफुलापासून बनवलेले पदार्थ 

केळफुलाची किसमूर (कोशिंबीर) 

साहित्य – एक कोवळे केळफूल, खोवलेल्या ओल्या खोबऱ्याच्या २ वाट्या , २-३हिरव्या मिरच्या, अर्ध्या वाटीपेक्षा जराशी कमी भिजवलेली मुगाची डाळ, एक कांदा, कोथिंबीर, मीठ

कृती– कोवळे फूल सोलताना हाताला तेल लावून घ्यावे. म्हणजे हात केळफुलामुळे काळे पडणार नाहीत. केळफुल सोलून त्यातील आतील नाजूक छोटी छोटी कोवळी केळी काढून कोमट पाण्यात घालून ठेवावी. २ वाट्या खोवलेल्या खोबऱ्यात २ वाटलेल्या मिरच्या घालून ते त्यात एकजीव करून घ्यावे. त्यात चांगली भिजलेली मुगाची डाळ घालावी. कोमट पाण्यातून कोवळी शेंगांसारखी असलेली केळी काढून बारीक चिरून थोडीशी शिजवून घ्यावी. अगदी लगदा होईल अशी शिजवू नये. मग ती शिजवून झाल्यावर ती बारीक चिरलेली केळी, खोवलेलं खोबरं, वाटलेल्या मिरच्या आणि भिजवलेली मूग डाळ यात घालून, बारीक चिरलेला कांदा, चवीप्रमाणे कोथिंबीर आणि मिरची, मीठ घालून एकजीव करून घ्यावे. कोणत्याही प्रकारची फोडणी ना देता अतिशय चविष्ट अशी केळफुलाची किसमूर तयार होते. यात अर्ध्या लिंबाचा रसही वरून घालू शकता. शेंगदाणे आधी भिजवून मग थोडंसं मीठ घालून उकडून घेऊन ते देखील चवीसाठी यात घालू शकता. केळफुलाची भाजी हा जरा तरी ऐकीवात असलेला पदार्थ आहे पण केळफुलाचे किसमूर हा गोव्यातल्या भटांच्या घरी होणारा वैशिष्ट्यपूर्ण असा पदार्थ आहे.

केळफुलाचे पॅटिस 

साहित्य – केळ्याचे फुल, २ उकडलेले बटाटे, २ हिरव्या मिरच्या, ब्रेड स्लाइस, मीठ, आले लसूण पेस्ट, एक चिरलेला कांदा, कोथिंबीर, पॅटिस भाजण्यापुरते तेल

कृती – केळ्याचे फूल सोलून कोमट पाण्यात घालून ठेवावे. उकडलेल्या बटाट्यांना एकजीव करून त्यात आले लसूण पेस्ट, चिरलेला कांदा घालावा, आवडीनुसार कोथिंबीर घालावी. अगदी सर्वात शेवटी कोमट पाण्यात घातलेली केळफुलातील कोवळी केळी काढून एकदम बारीक चिरून घ्यावीत. ही बारीक चिरलेली केळी या बटाट्याच्या सारणात घालावी. ब्रेड स्लाइसच्या कडा काढून घ्याव्यात. पाण्यातून ब्रेडची स्लाइस काढून ती दोन्ही हातांनी दाबून त्यातलं पाणी काढून टाकायचं. त्यात तयार केलेलं सारण भरून हाताने त्याला हवा तसा आकार द्यावा. पॅटिससारखे चपट्या आकाराचे केल्यास तव्यावर भाजण्यास सोपे पडते. तवा तापला की त्यावर आधी थोडेसे तेल घालून त्यावर तयार केलेले पॅटिस भाजायला ठेवावे. छान खरपूस भाजून झाले की टोमॅटो सॉसबरोबर खायला द्यावे. यात कोवळी केळी खरपूस भाजली जातात त्यामुळे त्याची एक वेगळी चव तयार होते.

याच तयार सारणापासून कटलेट, भजी देखील बनवता येतात.

भोपळ्याच्या कळ्यांची भजी 

साहित्य – भोपळ्याच्या कळ्या, डाळीचं पीठ, थोडंसं तांदळाचं पीठ, ओवा, हळद, तिखट, तळण्यासाठी तेल

कृती- भोपळ्याच्या कळ्या धुऊन घेऊन त्याचा देठाच्या बाजूचा भाग कापून टाकावा. कळ्यांमध्ये कीटक असू शकतात त्यासाठी कळ्या नीट स्वच्छ करून घ्याव्या लागतात. भज्यांसाठी भिजवतो तसं डाळीचं पीठ आणि थोडेसे तांदळाचे पीठ, त्यात थोडी हळद, चवीप्रमाणे तिखट, मीठ घालून हे मिश्रण भज्यांसाठी तयार करावे. भोपळ्याच्या कळ्या या भिजवलेल्या मिश्रणातून काढून गरम तेलात तळून घ्याव्यात. भोपळ्याचा कळ्यांची भजी छान कुरकुरीत होतात.

भोपळ्याच्या फुलांची भाजी

साहित्य – भोपळ्याची फुलं, तुरीची डाळ, कांदा, हिरवी मिरची, खोबरं, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग

कृती – आधी भोपळ्याची फुलं स्वच्छ धुऊन घ्यावी. मग ती बारीक चिरून घ्यावी. अर्धी वाटी तुरीची डाळ शिजवून घेऊन त्यात थोडं खोवलेलं खोबर घालावे. फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी तडतडली की हिंग, चिरलेला कांदा, हळद, चवीपुरते तिखट घालून त्यात भोपळ्याची चिरलेली फुलं घालावी. फुलं थोडी परतून झाली की त्यात तुरीची डाळ घालावी. आवश्यक तेवढे मीठ, कोथिंबीर घालावं. फुलांचा एक वेगळा वास या भाजीला येतो. भोपळ्याच्या फुलांची भाजी खातोय असं वाटतच नाही.

भोपळ्याच्या फुलांचे थालिपीठ 

थालिपीठाची भाजणी घेऊन त्यात भोपळ्याची फुलं आणि कांदा बारीक चिरून घालून छान घट्ट मळून घ्यावे. आणि याचे हलक्या हाताने तव्यावर थालपीठ थापावे. एकदम खरपूस भाजलं गेलं की थालिपीठ चटणीसोबत खायला द्यावे .

म्हसक्याच्या फुलांच्या पाककृती 

म्हसक्याच्या (शेवग्याची) फुलांचा रोस 

साहित्य – म्हसक्याची कोवळी फुलं, कांदा, तुरीची डाळ, खोवलेलं खोबरं अर्धी वाटी, २ मिरच्या, लसूण,

कृती – म्हसक्याची कोवळी फुलं धुऊन घ्यावीत. तुरीची डाळ शिजवून घ्यावी. अर्धी वाटी खोवलेल्या खोबऱ्यात मिरच्या, लसूण घालून मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्यावे. शिजलेल्या तुरीच्या डाळीत हे वाटलेले वाटण घालून घालून एक उकळी द्यावी. दुसऱ्या बाजूला गॅसवर कढई ठेवून फोडणीसाठी तेल घालून त्यात मोहरी तडतडली की हळद, हिंग घालून कांदा परतून घ्यावा. त्यात शेवग्याची कोवळी फुलं घालावी परत एकदा या फुलांना देखील हलक्या हाताने परतून घ्यावे. मग यात शिजवलेली आणि वाटण घातलेली तुरीची डाळ घालावी. चवीप्रमाणे मीठ घालून छान उकळू द्यावी.

म्हसक्याच्या फुलांचे डांगर 

साहित्य – १ वाटी शेवग्याची फुलं, अर्धी वाटी चिरलेला कांदा, अर्धी वाटी खोवलेलं खोबरं, १ चमचा मिरची पावडर, थोडीशी चिंच, १ चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, थोडासा गूळ, अर्धी वाटी रवा.

कृती – शेवग्याची फुलं, अर्धी वाटी चिरलेला कांदा, अर्धी वाटी खोवलेलं खोबरं हे सगळं एकत्र करून त्यात १ चमचा मिरची पावडर, १ चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, किंचितसा गूळ आणि चवीपुरतं मीठ घालून सगळं नीट मिसळून घ्यावं. मग यात अर्धी वाटी रवा मिसळून पाणी घालून थोडंसं सैलसर भिजवून घ्यावं. गरम तव्यावर छोट्या छोट्या आकाराचे डांगर घालावेत. कडेनं तेल सोडून छान खरपूस होऊ द्यावेत.

सुरणाच्या फुलाची भाजी

साहित्य – १ वाटी सुरणाची फुलं बारीक चिरलेली, १ मूठ तूरडाळ, १ वाटी खोवलेलं खोबरं, सुक्या मिरच्या, कोथिंबीर, मिरीदाणे ४-५, थोडीशी चिंच, हळद, मीठ, थोडासा गूळ

कृती – मिरं, मिरच्या, कोथिंबीर थोड्याशा खोबरेल तेलावर भाजून घ्यावं, भाजलेलं सगळं साहित्य खोवलेल्या खोबऱ्यात घालून त्यात चिंच, हळद घालावे. हे सगळं मिक्सरमधून एकदम बारीक वाटून काढावं. तूरडाळ आणि हिंग घालून कुकरमधून शिजवून घ्यावी. कढईत सुरणाची चिरलेली फुलं, आणि मिक्सरमधून काढलेलं वाटण घालून एकत्र करून घ्यावे. त्यात चवीप्रमाणे मीठ घालून गॅसवर ठेऊन एक उकळी येऊ द्यावी. उकळी येत असतानाच त्यात कुकरमध्ये शिजवलेली तूरडाळ घालावी. थोडासा गूळ त्यात घालावा. या सगळ्याला वरून मोहरी आणि हिंगाची फोडणी द्यावी. सुरणाच्या फुलांची ही आगळीवेगळी भाजी तयार.

मनस्विनी प्रभुणे-नायक

12800118_1072438749443976_4420556405825668454_n

लेखक-संपादक. समदा नावाचा दिवाळी अंक संपादित करते. गोव्यातल्या ग्रामीण भागात अनेक वर्षं सामाजिक काम.

फोटो – मनस्विनी प्रभुणे-नायक, सायली राजाध्यक्ष, विकीपीडिया     व्हिडिओ – YouTube

7 Comments Add yours

  1. तुषार दामगुडे says:

    खुप सुंदर माहिती , बऱ्याच गोष्टी आजपर्यंत माझ्यासाठी अपरीचित होत्या.
    धन्यवाद

    Like

  2. Prashant Kale says:

    One of the best… “Majhe Khadyajeevan” by Pu. La. …. a nice concept of Digital Diwali Aanka..

    Like

  3. Hemalee Bobhate says:

    Chhan lekh again pakakruti. Pan solkadhi cha kuthech ullekh nasalyache khatakale. Govekaranche jevan solkadhi shivay apure aahe.

    Like

  4. फुलांच्या रेसिपी आणि लेख आवडला.
    आपल्याकडे विशेषतः मराठवाड्यात अगस्ती किंवा हादगा फुले भाजीसाठी वापरतात ते आठवले.

    Like

  5. Deepa says:

    साईली ताई, लेख आगदी बारकाईने अभ्यास करून लिहिलेली आहे. अस वाटल की काही माझ्या घरात राहून लिहिले आहे.

    Like

  6. मृण्मयी says:

    मनस्विनी, मस्त लिहिलंयस गं, अगदी मनापासून. एकदा यायला हवं तुझ्याकडे हे सगळं चाखून पाहायला.

    Like

  7. Amruta says:

    हा लेख सुरेखच झालाय. !!

    आईचं आजोळ व आमचं कुलदैवत गोव्यात असल्याने वर्षाकाठी एखादी दुसरी फेरी होईच गोव्याला.

    हा लेख वाचून गोव्यातल्या आठवणी ओल्या झाल्या क्षणभर वाटलं जावं सगळं सोडून.. आणि तिथे बसावं..

    महालसेच्या देवळात तिन्हीसांजेला देवळातली आरती, घंटानाद, देवळाबाहेर लागणारी दिपमाळ…त्याखाली असलेल्या कटट्यावर संध्याकाळच्या आरतीनंतर तासभर बसून येणा-जाणाऱ्या भक्तांचं निरिक्षण करावं. शेवंती- बकुळीच्या वेण्या, खाजं आणि शेवाचे लाडू, आंबट गोड चविची तिखट मिठ लावलेली करमळं, पातळ भाजी आणि पाव, मंगेशीच्या समोरच्या मांगीरिश नामक खानावळीतील माश्याची थाळी.. देवधर्म उरकूनच मासे (नुसते) नाहीतर देवळातला गरम भात (शित) आणि टिपिकल सारस्वती पद्धतीचं जेवण.. मंगेशीच्या दारातलं संथ हिरवं तळं.

    डोळे भरून आले..!

    तुमच्या लेखातील गोव्याच्या वर्णनाने व खाद्यापदार्थांच्या वर्णनाने मन भरकन गोव्यात एक चक्कर मारून आले..! धन्यवाद!

    Liked by 1 person

Leave a reply to मृण्मयी Cancel reply