लोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश

शक्ती साळगावकर-येझदानी

mapहिमाचल प्रदेश हे नावच इतकं सुंदर आहे, की हे नाव ऐकताच सुंदर बर्फाची पांढरीशुभ्र ओढणी घेऊन स्वागताला उभी असलेली एक स्त्री डोळ्यासमोर येते. मी पहिल्यांदा या सुंदर प्रदेशात जायचा प्लॅन केला तो एका पंधरा दिवसाच्या ट्रेकिंग ट्रिपसाठी. टूर कंपनीने पाठवलेल्या, ट्रिपवर नेण्याच्या सामानाच्या यादीत माकडटोपी, लाँग जोनस् (लोकरीचा पायजमा), लोकरीचे पायमोजे, मफलर, लेदरचे हातमोजे इत्यादी सामान पाहून जरा भीतीच वाटली. मुंबईच्या माणसांना हिवाळा म्हणजे २० डिग्री ते २५ डिग्रीचे तापमान असे वाटते. त्यामुळे उत्तरेकडच्या डोंगराळ प्रदेशातील तापमान जरा भीतीदायकच असते. या ट्रिपची सुरूवात ३ दिवसांच्या ट्रेन प्रवासाने झाली आणि पुढे सहा तास बसमधून केलेल्या प्रवासात हिमाचल प्रदेशची तोंडओळख झाली. इथल्या हिरव्यागार डोंगरांकडे पाहून साडेतीन दिवसांचा प्रवास आणि त्यातून आलेला थकवा पूर्णपणे गायबच झाला.

img_1504ही ट्रिप हा एक कठीण ट्रेक असल्यामुळे, खाण्यापिण्यावर फारसा भर नव्हता. ट्रेकिंगकरता लागणाऱ्या कॅलरीज् आणि पोषण पूर्णपणे मिळते आहे का, त्याचीच काळजी आमच्या खानसाम्यांना असायची, शिवाय डोंगराळ प्रदेशात पायी किंवा फार तर खेचरावरुन सगळं सामान नेण्याची जबाबदारी, त्यामुळे कमीत कमी वजनाचे जास्तीत जास्त पोषकतत्त्वे असलेले पदार्थच खायला मिळायचे. सकाळी उठल्यावर लगेच गोड गोडमिट्ट चहा तुमच्या स्टीलच्या ग्लासात एका किटलीतून वाफेसरशी बाहेर पडत असे. त्या गारेगार हवामानात, हा गरम गरम चहाचा ग्लास जसा हाताला आनंददायी ऊब देत असे, तसाच पोटात जाताच हुरुप आल्यासारखे वाटायचे. खरे तर तेव्हा मला चहा अजिबात आवडत नसे, पण आवडी-निवडी, हवं-नको या गोष्टींना माऊंटेनिअरिंगमध्ये फारशी जागा नसते. तो चहा असो किंवा एक उकडलेले अंडे, पॉरिज असो किंवा पिकलेले केळे किंवा जे काही बनवलेले असेल ते पटापट खायचे आणि सामान बांधून त्या दिवशीच्या ट्रेकसाठी सज्ज व्हायचे. पण कधी कधी रस्त्यात एखाद्या घरात दुपारच्या जेवणासाठी थांबा व्हायचा आणि हिमाचल प्रदेशच्या भाज्यांची चव चाखायला मिळायची. मिश्र भाजी, त्याला सुंदर-साध्या मसाल्याची फोडणी, ओबडधोबड पण गरम गरम रोटया आणि नुसतं कापून ठेवलेले मुळा, काकडी, गाजराचे सॅलेड, हे जेवण मोजकं असले, तरी त्याची चव विलक्षण होती. डोंगराळ भागात ५ ते ६ किलोमीटर चालल्यावर काहीही गोड लागेल, असे तुम्ही म्हणाल आणि ते खरेच आहे पण हिमाचल प्रदेशातील डोंगराच्या कुशीत वाढलेल्या भाज्या, मुंबईच्या लोकल ट्रेनच्या रुळांकाठी वाढत असलेल्या भाज्यांच्या तुलनेत उत्कृष्ट लागणार नाहीत, तर काय!

unnamed-2

त्या पंधरा दिवसांच्या ट्रेकमध्ये हिमाचली जेवण असे चाखायला मिळाले नाही. कारण मक्लोडगंज, मनाली, धरमशाला ही ठिकाणं हिमाचलमध्ये पर्यटन स्थळे आहेत. तिकडे पंजाबी, चायनीज, तिबेटी, इतकंच काय जर्मन, इटालियन, अमेरिकन अशी पाश्चात्य क्विझीन्स्ही सहजरित्या दिसतात. पुढे २-३ वेळा पुन्हा हिमाचलला जाणे झाले, पण ते देखील कुलू, रोहतांग या पर्यटक आणि ट्रेकिंगसाठी असलेल्या पर्यटकस्थळांकडे. सिनेमांतून, पुस्तकांतून  शिमला या रम्य शहराची अनेक वर्णने ऐकली, पाहिली होती आणि वाचली होती. कलोनियल भारताचा जबरदस्त पगडा आणि वारसा असलेले हे शहर किती सुंदर आहे आणि किती रम्य आहे, याबद्दल वाचून इथे जायची तीव्र इच्छा मनात होती. संजय लीला भन्साळी यांच्या ब्लॅक सिनेमात किंवा रस्किन बाँड यांच्या लिखाणात आढळलेला शिमला अनुभवायचा योग गेल्या वर्षी आला. माझी नणंद आणि तिचे पती शिमल्याजवळच्या छराबरा इथे असलेल्या प्रख्यात वाईल्ड फ्लॉवर हॉल ह्या पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यासाठी गेले होते. आमचे भावोजी हे मुळात हॉटेल इंडस्ट्रीमधले आहेत आणि ऑबेरॉयच्या या हॉटेलचे मुख्य व्यवस्थापक आहेत. त्यामुळे त्यांचे पाककला आणि पाक संस्कृतीवरचे प्रेम आणि कुतूहल माझ्या ट्रिपसाठी खूप गंमतीचे ठरले. शिमला शहरापासून जवळ जवळ अर्धा-पाऊण तास गाडीने वर चढून गेल्यावर वाईल्ड फ्लॉवर हॉल येतो. ब्रिटीश आर्मीचे क्मांडर-इन-चीफ लॉर्ड किचनर यांचे पूर्वी निवासस्थान असलेल्या वाईल्ड फ्लॉवर हॉलचा मेनू तसा आंतरराष्ट्रीय असला तरी, त्यात लोकल सामग्री वापरुन डिशेस् तयार केलेल्या असतात. हिमालयीन ट्राऊट, पाइन नटस् रिझोटो यासारख्या डिशेस् जागतिक पातळीवर इथल्या अद्वितीय पदार्थांची ओळख करुन देतात. हे एक फाइव्ह स्टार हॉटेल असले तरी इथे हिमाचली थाळीद्वारे स्थानिक चवींचा अस्सल आस्वाद लोकांना घेता येतो. पण तरीही शिमल्यात आजूबाजूला मिळणा-या वेगवेगळया प्रकारच्या जेवणाचा आस्वाद घ्यायची संधी मी कशी सोडेन! मग रोज भाचे मंडळींच्या शाळेच्या निमित्ताने, शिमल्याच्या मालरोडवर माझा खादयप्रवास सुरु झाला. मग ती इंडियन कॉफी हाऊसमध्ये फेटेवाल्या काकांनी प्रेमाने आणून दिलेली गरम गरम फिल्टर कॉफी आणि डोसा असो किंवा लक्कर बाजारावरुन रीजला जाताना वाटेत असलेल्या सीतारामच्या छोले-भटूरेचा ठेला असो.

लेखिका तिच्या भावजींबरोबर

शिमल्यामध्ये भारतभरचे सगळे पदार्थ गवसतात. हँडमेड आईस्क्रिम, चाट, समोसे, मोमोज अगदी पंजाबी, मोगलाई, बंगाली फुड देखील मिळते. परंतु दिसत नाही ते हिमाचली जेवण, हिमाचली जेवण म्हणजे काय? हा प्रश्न सतत पडत होता. मग बाजूच्या म्हणजे माझ्या नणंदेच्या ड्रायव्हरला हा प्रश्न विचारला असता तो म्हणाला,’ तुम्हाला नाही आवडणार ते” तरीसुद्धा त्यात काय असते, असे विचारले असता वरवर वड्या, कमळाच्या देठाची भाजी, अशी उत्तरे मिळाली. मग हे खायला कुठे मिळेल असे विचारले असता “आप हमारे घर मै ही आइये” असे तो म्हणाला. कुठल्या हॉटेलमध्ये मिळेल असे विचारले असता असले जेवण हॉटेलमध्ये कोण खाणार असे म्हणून तो हसायला लागला. मग भावोजींना विचारले, त्यांनी हिमाचलच्या वेगवेगळया भागांबद्दल मला थोडेसे सांगितले. हिमाचल प्रदेशात बारा जिल्हे आहेत. किन्नोर, कांगडा, शिमला, मंडी, कुलू, सोलन हे त्यातले काही ओळखीचे प्रदेश. या बाराही प्रदेशांमध्ये वेगवेगळया प्रकारची खाद्यसंस्कृती तिथल्या हवामान घटकांवर अवलंबून आहे. पण त्याबद्दल अभ्यास करायचा म्हटलं तर ते इतके सहज शक्य नाही. माझा एक मित्र सध्या मालरोडवर हिमाचली जेवणाचे हॉटेल चालवतो आणि हिमाचली समारंभांच्या पंगतीत मिळत असलेले जेवण जेवून पाहा, असे भावोजींनी सांगताच मी हिमांशु सूदला फोन केला आणि हिमाचली जेवणाबद्दल गप्पा मारायचे आमचे ठरले.

शिमल्याच्या गेएटी थिएटरला लागून एक लाल आगीच्या बंबाची गाडी उभी असते. ब्रिटिशकालीन भारताची  उन्हाळ्यातील राजधानी असलेले हे हिल स्टेशन. त्यामुळे गॉथिक आर्किटेक्चर आणि फायर इंजिन एका बाजूला आणि दुकानांचा गजबजाट एका बाजूला अशी ही मालरोडची सुरुवात. तिकडेच कोप-यावर एका मोठ्या मिठाईच्या दुकानाशेजारी काही पाय-या खाली उतरतात. शिमल्याला जागोजागी अशा पाय-या दिसतातच. ह्या पाय-यांवरुन खाली जाताना बालाजी या मिठाईच्या दुकानातले जिलेब्या वगैरे तळण्याचे काम चालू असते. थोडेसे डावीकडे वळलो की एका छोटयाशा गल्लीत हिमाचली रसोईचा फलक दिसतो. अगदी छोटंसं गोंडस असं हे हॉटेल आहे. बसायला चार टेबल आणि एक छोटी शिडी. या टेबलांवर बसून आधी मेन्यूचा थोडासा अभ्यास करुन घेतला. ह्या हॉटेलमध्ये हिमाचलच्या विविध प्रदेशातल्या धाम म्हणजेच पंगतीची थाळी मिळते. कांगडी, मंडियाली अशा दोन प्रकारच्या या थाळ्या एक दिवसाआड इथे बनवल्या जातात. याशिवाय सिधू (गोड आणि तिखट) नावाचा एक खास प्रकार इथे मिळतो.

आम्ही ज्या दिवशी तिकडे गेलो होतो त्या दिवशी मंडियाली धाम थालीचा बेत होता. जेवायच्या आधी हिमांशुला भेटलो. हिमांशु हा हिमाचलच्या कांगडा प्रदेशातला आहे. मात्र तो जगभर हिंडला आहे. शिमल्यातच त्याच्या कुटुंबाची मूळं असल्यामुळे त्याचे शिमल्याला येणे-जाणे नेहमीच होत असते. मी व्यवसायाने एक प्रोग्रॅमर होतो, पुढचे शिक्षण घ्यायला अमेरिकेत जायचे म्हणून सहा महिन्यांचा ब्रेक घेतला आणि शिमल्याला आलो. इकडच्या वेगवेगळ्या लोकांशी ब-याच विषयांवर चर्चा होत असे. मला लक्षात आले की सुख हे स्वतःचा बॉस असण्यातच मिळते, म्हणून मी स्वत:च काही तरी करण्याचे ठरवले, हिमांशु सांगत होता. हिमांशुला वेगवेगळे ताजे पदार्थ चाखण्याची आणि शिजविण्याची आवड असल्यामुळे स्वतचे हॉटेल काढण्याचा मार्ग अगदी स्पष्ट होता. तेव्हा त्याने ‘कॅफे वेक अँड बेक’ नावाचं एक कॉफी शॉप उघडले.

माझ्या कुटुंबाच्या मालकीची जागा मोकळी होती. त्यामुळे हे सहज शक्य झाले. मी कॉफी शॉप उघडले कारण शिमल्यात या-जेवा-निघून जा अशा प्रकारचीच हॉटेल होती. तासन् तास बसून गप्पा मारता येतील अशी ठिकाणे फार कमी होती. माझ्या कॉफी शॉपमध्ये ताजे खाणे आणि चिल्ड हॅंग आऊट झोन लोकांना मिळू लागला, असं हिमांशुनं सांगितलं. याच कॉफी शॉपमध्ये हिमांशुचा लोकसंपर्क वाढला आणि त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. हिमाचलच्या समृद्ध संस्कृतीबद्दल फारसे सहज प्राप्त होणारे असे साहित्य नाही हे त्याच्या लक्षात येऊ लागले. त्यात शिमल्याला हिमाचली पद्धतीचे जेवण सोडून सगळे काही मिळत होते. हिमाचली खाद्यसंस्कृतीचा अभ्यास करणे आणि त्याचे डॉक्युमेंटेशन होणे हे खूप महत्त्वाचे आहे. असे त्याला वाटू लागले. त्या हेतूने हिमांशुने धाम म्हणजे लग्नाच्या पंगतीत वाढला जाणारा स्वयंपाक, याचा अभ्यास सुरु केला. त्यासाठी तो गावागावात जाऊन लोकसंपर्क वाढवू लागला.

img_20151118_141708

कुठलाही लग्नप्रसंग किंवा मंगलप्रसंग असेल तर तिकडे जेवणाच्या पंगतीत ब्राम्हण आचा-याच्या हातचे धाम भोजन दयायची परंपरा आहे. या ब्राम्हण स्वयंपाक्यांना ‘बोटी’ असे म्हणतात. त्यांचे हे पाककलेचे ज्ञान पिढ्यानपिढ्या शेअर केले जात आहे. हे स्वयंपाकी जरी ब्राम्हण असले तरी ते कोणत्याही समाजातल्या, कोणत्याही आनंदी प्रसंगात भोजन बनवायला हजर होतात. त्यांना समाजात विशेष मान असतो. त्यांचे पदार्थ आणि स्वयंपाकाची पद्धत अत्यंत धर्मनिष्ठतेने पिढ्यानपिढ्या जपण्यात आली आहे. त्यांच्या स्वयंपाकाची कृती आणि विधी आध्यात्मिक स्वरुपाच्या असल्यामुळे त्यांचे जतन करणे शक्य झाले आहे आणि ते अत्यंत दृढ श्रद्धेने स्वयंपाकाचे काम करतात. ते बाहेरच्या कोणालाही त्यांच्या कार्यात लुडबूड करु देत नाहीत आणि ते अत्यंत कटाक्षाने सोवळे-ओवळे ही पाळतात. ते जे भोजन बनवतात, ती प्रक्रिया अत्यंत आध्यात्मिक आणि पवित्र असते. त्याला तुम्ही सोवळंच म्हणून शकता. कारण जो अन्न शिजवण्याकरिता वापरलेला अग्नी असतो, त्याची पूजा केली जाते. इतके साग्रसंगीत आणि समारंभपूर्वक बनविलेले अन्न मात्र कोणत्याही जातीच्या, घरच्या लग्नात किंवा समारंभात वाढले जाते, असं हिमांशुने सांगितलं. हे जेवण म्हणजे नक्की काय असते, हे विचारले असता हिमांशु म्हणाला, विविध प्रकारच्या डाळी आणि कडधान्यापासून बनविलेले पदार्थ या थाळीत असतात. प्रत्येक प्रांताचे वेगवेगळे जिन्नस असतात. मंडियाली थाळीमध्ये भाज्या असल्या तरी कांगडी थाळीमध्ये कडधान्ये आणि डाळीचा वापर जास्त होतो. साधारणत ४-५ आमटया, भात, लोणचे आणि एक किंवा दोन गोडाचे पदार्थ यात असतात. प्रत्येक कुटुंबाच्या ऐपतीप्रमाणे जिन्नस कमी किंवा जास्तही होतात. आम्ही जेवलो त्या मंडियाली थाळीमध्ये दही आणि चवळीची मांडरा नावाची उसळ होती. हिमाचली पद्धतीच्या शेपूच्या वडया होत्या. आपल्या सांडग्यांसारख्याच पण डाळीच्या बनविलेल्या असतात. त्याची पालक घालून केलेली आमटी होती. कद्दू-खट्टा म्हणजे भोपळ्याची आंबट-गोड भाजी होती. ताकाची कढी होती आणि माहकी म्हणजे उडदाची डाळही होती. प्रत्येक आमटीची चव अगदी वेगळी असली तरी या जेवणात एक अद्वितीय साधेपणा होता. थाळीभर भातात कालवून कालवून खाताना एखादा पदार्थ दुसऱ्या पदार्थाबरोबर मिसळला तर आणखीच मजा येत होती.

हिमाचलच्या गडद हिरव्या डोंगरांकडे पाहिल्यावर मला आपलं वाटले की यांच्या शाकाहारी जेवणामध्ये पालेभाज्या, फळभाज्या आणि रानभाज्या भरपूर असतील. मात्र जेवता जेवता लक्षात आले की डाळी आणि कडधान्येच जेवणातले मुख्य हिरो आहेत. मंडी या विभागात भरपूर भाज्या मिळत असल्यामुळे मंडियाली जेवणात भाज्या जास्त असतात. परंतु हिमाचलच्या इतर प्रदेशात जेवणाच्या पंगतीमध्ये, भाज्यांपेक्षा वेगवेगळया प्रकारच्या डाळी आणि कडधान्ये तुम्हाला जास्त आढळतील. हिमाचलच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारची भाताची पिके आणि नाना प्रकारची कडधान्ये व डाळी पिकवल्या जातात. त्यामुळे प्रत्येक प्रदेशात तिथे बनत असलेल्या पदार्थांचे जिन्नस या धामथाळीत वाढले जात असत पण अलिकडे लक्झ्युरी म्हणून भाज्यांचे प्रकार पंगतीत वाढायची पद्धत सुरु झाली आहे.

पण हिमांशुच्या घरी स्वयंपाक कसा होतो याबद्दल मला जरा कुतूहल वाटले. कारण पंगतीत जेवायचे जेवण हे काही रोज होत नसते. माझे आई-बाबा दोघेही उत्तम स्वयंपाक करतात. आमच्या घरी सहसा कांगडी प्रकारचेच जेवण केले जाते, असं हिमांशुनं सांगितलं. कांगडी जेवण हे साधे असले तरीही चवीला उत्कृष्ट आहे. या जेवणात वापरले जाणारे मसाले हे नेहमी सारखे धणे, जिरे, मेथी, हळद, बडीशेप यांचेच मिश्रण आहे. पण बऱ्याशच्या रेसिपीमध्ये डाळ, दही, आणि भात यांचा समावेश दिसतो. आपल्याकडे असणारी अळूवडीदेखील कांगडी जेवणात आढळते आणि त्याला लावले जाणारे मसाल्याचे मिश्रण, वाटलेल्या चण्याची डाळ तसेच तांदळाचे मिश्रण असते. हा शोध मला हिमांशुच्या रेस्टॉरेंटमध्ये ठेवलेल्या एक सुंदर कुकबुक चाळताना लागला. ‘ फ्लेवर्स फ्रॉम् दी कांगडा वॅली’ हे पुस्तक चाळताना लेखिकेचे नाव पाहून लक्षात आले की, लेखिका हिमांशुची कझिन आहे. मुंबईत राहत असलेली दिव्या सुद कुरेशी हिने आपल्या आईच्या रेसिपीजचं हे सुंदर पुस्तक अतिशय अप्रतिम फोटोंसकट एका कॉफी टेबल बुकच्या स्वरूपात प्रकाशित केले आहे. पण या पुस्तकाव्यतिरिक्त हिमाचलमधल्या विविध प्रदेशातल्या, विविध समाजातल्या खाद्यसंस्कृतीचा अभ्यास करायचा झाला तर काय बरे वाचावे, असे विचारले असता हिमांशु म्हणाला, तसं हिमाचली खाद्यसंस्कृतीबद्दल फार काही लिहिण्यात आलेलं नाहीये. एखादी हिमाचली व्यक्ती ओळखीची असेल तरच तुम्हाला या खाद्यसंस्कृतीबद्दल माहिती मिळेल. मला क्षणभर वाटले की आपण हिमाचलमधल्या वेगवेगळ्या भागांची भटकंती करावी पण हिमांशुच्या मते त्यातून काहीच साध्य होणार नाही. गावाकडे या परंपरा हळूहळू लोप पावत चालल्या आहेत. जागतिकीकरण आणि शहरीकरणाचा प्रभाव सगळीकडेच आहे. त्यामुळे खाद्यसंस्कृती आणि इतर सांस्कृतिक अवशेष बरेच विरळ होत चालले आहेत. आता हे जे ‘धाम’ जेवण आहे, ते सगळ्यांना परवडण्यासारखे आहे. परंतु प्रतिष्ठीत लोक जास्तीचे पैसे मोजून बाहेरुन शहरी केटरर या समारंभाना आणतात.” हे सांगताना हिमांशुच्या चेह-यावर एक वेदना होती. ती मी कुठेतरी आधी पाहिली होती. मुंबईच्या लग्नांमध्ये अगदी लहान असताना अनेकवेळा पंगतीचा आस्वाद मी घेतला होता. पण अलीकडे प्रत्येक लग्नात अनेक लाइव्ह काऊंटर असलेले बूफे पाहिले की त्या लहानपणीच्या पंगतांची येणारी आठवण आणि त्यामागे दडलेली एक हलकीशी हृदयातील कळ.

img-20150903-wa0035 धाम जेवताजेवता मी मांसाहारी पदार्थांची चौकशी केली. “हिमाचलचे लोक या भूमीला देवभूमी असे म्हणतात आणि इकडे स्थानिक दैवत आणि त्याच्या मागची श्रद्धा व विचारधारा खूप गूढ आणि गुंतागुंतीची आहे. पारंपारिक हिमाचली जेवणात सगळेच शुद्ध शाकाहारी असते. परंतु डोंगरात उच्च भागात असलेल्या किन्नोरवगैरे सारख्या ठिकाणी नाइलाज म्हणून मांसाहारी जेवण जेवले जाते असा माझा अंदाज आहे कारण इतक्या कडक गोठवणा-या हिवाळ्यात जेवण हे जिवंत राहण्यासाठी केलं जातं. तिकडे धार्मिक बाबींकडे कानाडोळा केला जातो,” हिमांशुने सांगितले. मी रेसिपीजबद्दल विचारले असता तो म्हणाला, “त्यांच्याकडे फारसे मसाले वापरले जात नाहीत. अगदी साधे, बेसिक पदार्थ तिकडे बनतात.” मग चिकन धोलाधारी, छा गोश्त सारखे मांसाहारी हिमाचली पदार्थ हॉटेलमध्ये कसे काय मिळतात असे विचारले असता हिमांशु म्हणाला की, हे मांसाहारी पदार्थ काश्मीरच्या पंडितांच्या रेसिपीजमधून आले आहेत. “तू म्हणते आहेस ते दोन्ही पदार्थ कृतीने देखील काश्मीरी पद्धतीचे असल्यासारखे वाटू शकतात. हिमाचलमध्ये बळी देण्याची प्रथा नसल्यामुळे मांसाहारी जेवणाचा प्रश्नच येत नव्हता.” हिमाचलवर डोगरा परिवाराने राज्य केले तेव्हा काश्मीरची नेमकी खाद्यसंस्कृती आणि मसाले त्यांनी इथे आणल्याचे लक्षात येते. पुढे शिमला हे ब्रिटिश राज्यकर्त्यांनीच उभारलेले शहर असल्यामुळे तिथे काँटिनेंटल प्रकारचे जेवण सर्रास मिळत होते. एकंदरीत हिमांशुचे हॉटेल, काही मोजके धाबे आणि पंचतारांकित हॉटेल सोडले तर हिमाचली असे जेवण कुठेच मिळत नाही. जिथे तिथे मोमो, चाट, चायनीज आणि पंजाबी खाणे तेवढे दिसते. या नैसर्गिक रम्य प्रदेशाची खाद्यसंस्कृती जपली तर गेली पाहिजेच पण त्याचबरोबर पुस्तके, व्हिडिओ आणि इंटरनेटच्या विविध माध्यमांद्वारे या पदार्थांची माहिती आणि रेसिपीज् लोकांपर्यंत पोहचल्याच पाहिजेत. मी आपली परत माझ्या धामच्या थाळीतल्या पदार्थांकडे वळले आणि नवीन काहीतरी शिकल्याचे आणि चाखल्याचे समाधान मानून आनंदी झाले.

काही हिमाचली पदार्थांची यादी :

१) सिधु : गोड किंवा तिखट सारण घालून बनविलेले हे उकडीचे वडे विविध धान्यांच्या पिठाचे असतात. आतले सारण खसखस, गुळ आणि कडक थंडीच्या प्रदेशात अफू घालूनही करतात. साजूक तूपात बुडवून खाण्याचे हे वडे अखंड हिमाचल प्रदेशात घरोघरी बनतात.

२) खट्टी दाल :  ही मसूरच्या डाळीची आंबट आमटी प्रत्येक धाम जेवणात आढळते.

३) पतांदे :  गव्हाच्या पिठाचे हे गोड डोशासारखे पोळे असतात. हे पतांदे बनविणे हे कौशल्याचे काम असते.

४)मठ्ठे: गव्हाच्या पिठाच्या या गोड पुऱ्या चहाबरोबर खायची पद्धत आहे.

शक्ती साळगावकर-येझदानी

1964796_10153977583550015_1774119883_n

लेखिका पत्रकार असून त्यांनी इलेक्ट्रॉनिक तसंच प्रिंट मीडियात काम केलेलं आहे. सध्या त्या कालनिर्णयच्या संचालक म्हणून काम बघतात. शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले पण आईने मराठी वाचण्याचा आणि लिहिण्याचा आग्रह नेहमीच धरला. इंग्रजीत वारंवार खाण्यावर — फूड ट्रेंड्स , रेस्टॉरंट रिव्ह्यू असे लिखाण होत राहिले, पण गेली २-३ वर्ष मराठीत लिहिणे एन्जॉय करतेय.

2 Comments Add yours

  1. Vidya Subnis says:

    लेख आवडला. खरंच तिकडच्या भाज्यांना मस्त चव असते.

    Like

  2. मृण्मयी says:

    वा, मस्तच. मी हिमाचलमध्ये अजिबातच फिरलेले नाहीये अजून. जाण्याची शक्यताही कमीच कारण मला वळणावळणांच्या रस्त्यावरनं प्रवास झेपत नाही. हा लेख वाचून खूपसं तो प्रदेश फिरल्याचंच समाधान मिळालं.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s