ओळख बटाट्याशी!

शिल्पा केळकर

माझ्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण शेवटी बटाटा करेल हे मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण झालं मात्र तसं. स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडल्यावर, कितीतरी जास्त उचित कारणं होती, ज्यानं तसं झालं असतं, तर फार वावगं वाटलं नसतं. पण तशा बर्‍याच प्रसंगांना धीरानं तोंड दिलं आणि शेवटी बटाट्याने मात्र घात केला.

गाडी उजव्या बाजूला चालवण्याऐवजी, चुकीच्या बाजूला चालवूनही कठीण प्रसंग शिताफीने टाळला होता. दिवा बंद आहे की सुरू, हे बटण बघून न समजल्याने, “हिची ट्यूब जरा उशिरा पेटते” असा नजरेने मारलेला शेरा सफाईने चुकवला होता.

‘हाय. आय अ‍ॅम बॉब, नाईस टू मीट यू” , असे म्हणत उत्साहाने शेकहँड करण्यासाठी हात पुढे करणार्‍याचा हात हातातही न घेता, “नाही मी रॉबर्टला भेटायला आले आहे, तुम्हाला नाही” असे म्हणाले होते. आणि मग त्या सज्जनाचा असा नकळत अपमान केल्यावरही, तासभर रॉबर्ट उर्फ बॉबबरोबर निर्लज्जपणे बोलले होते. अलेक्झांड्रा म्हणजेच जिच्याशी मी तासनतास फोनवर बोलले ती सॅण्डी आहे, आणि एचआर मधली ट्रिश आणि पट्रिशिआ या जुळ्या बहिणी नसून एकच आहेत, हे समजायला मला ६-८ महिने तरी जावे लागले. पण मी ते कोणालाही कळू न देण्यात पूर्ण यशस्वी झाले होते.

“लेट अस मीट अ‍ॅट द टॉप ऑफ द आवर” असं कलिगनं सांगितल्यावर म्हणजे नक्की किती वाजता आहे मिटींग, हे न समजल्याने मिटींगरूममधे तो येईपर्यंत मुक्काम ठो़कून कळ काढली होती. अमेरिकेतला फ्रान्सिस उर्फ लिन हे पुरूषाचे नाव असते तर तर कॅनडामधे लिन ही बाई असते! देशाची सीमा ओलांडल्यावर बाईचा पुरूष होतो हे कटू सत्य तर मी अगदी डोळे मिटून एरंडेल प्यायल्यासारखे पचवले होते. प्रत्येक देशात ही/शी बरोबर वापरायला शिकले होते.

हायवे सोडून फ्रीवेवर माझी गाडी जरा सुरळीत झाली न झाली तोवर मी बॉस्टनला गेले. कुठे जाण्यासाठी तिथे टर्नपाईक घ्यायचा म्हणजे काय हेच न समजल्याने मला नाकीनऊ आले होते. नक्की काय करायचे हे न समजून कारपार्कमध्ये गाडीत कितीतरी वेळ घालवला होता. शेवटी हायवे, फ्रीवे आणि टर्नपाईक, हे एकाच कुळातले, पण लहानपणी एशिया, युरोप आणि नॉर्थ अमेरिकेतल्या तीन घरी दत्तक गेलेल्या भावांची नावे आहेत हे समजले होते. हे असे घराच्या बाहेरचे सगळे प्रसंग अगदी सराईतपणे हाताळत होते. इतके सारे होऊनही, माझा आत्मविश्वास अजूनही अबाधित होता.

मात्र काही झाले तरी घरी बटाट्याची भाजीच करता येत नव्हती! बटाटा हे अमेरिकनांचे अगदी आवडीचे खादय, मुबलक उपलब्ध. शिवाय माझीही ती सगळ्यात आवडती भाजी. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा भा़जी आणायला गेले त्यावेळी उत्साहाने जाऊन बटाटे आणले. चिरायला घेतले तर प्रत्येक बटाटा आतून जांभळा-काळा. बापरे, म्हणजे अगदी विकसीत देशातल्या भा़जीवाल्याने फसवले तर! आपण उगाचच भारतातल्या नेहमीच्या बटाटेवाल्याबरोबर भांडायचो याचे वाईटही वाटलेले. मग ते काळे किडके बटाटे टाकून देऊन परत एक फेरी. यावेळचे बटाटे एकदम नेहमीसारखे दिसणारे. बस्स. मस्तपैकी काचर्‍यांची भाजी केली तर एकदम चिकट. मग उकडून करुन बघितली तर सगळ्याचा गच्च गोळा. फोडींचा आकार न राहाता लगदा होऊन एक मोठा फोडणीचा बटाटा बनलेला. बटाट्याचे परोठे करायला जावे तर बटाट्याचे सारण एकजीव न होता सगळे कोरडे झालेले. शेवटी मी बटाट्यासमोर हात टेकले. इतके दिवस मी कष्टाने टिकवलेल्या आत्मविश्वासाचे पाणीपाणी झाले. साधी-सुधी बटाट्याची भाजी जमू नये म्हणजे काय? ६-७ वीत असताना, कधी काही चूक केली की, भंडारे बाई म्हणत ” डोक्यात बटाटे भरले आहेत की काय? “, ते वाक्य बटाट्याची भाजी न करता आल्याने सिद्ध व्हावे या योगायोगाने मला हसावे की रडावे हेच कळेना.

मग मात्र मी ईरेला पडले. सुपरमार्केटमधे इतर सर्व आकर्षक गोष्टींना बळी न पडता, बटाटे जिथे मांडून ठेवलेले असतात त्या स्टॉलभोवती मी चकरा मारू लागले. प्रत्येक प्रकारच्या बटाट्याला हातात घेऊन निरीक्षण करू लागले. एरवी नुसती पाऊंडाची किंमत वाचून इतर पाटीकडे दुर्लक्ष करणारी मी प्रत्येकाचे लिहिलेले नाव आणि तो कशाकरता उपयुक्त आहे हेही वाचू लागले आणि बटाट्याच्या कुटुंबाचा हा एवढा लवाजमा आहे हे समजल्यावर आश्चर्यचकितच झाले.

सर्वात प्रथम माहिती मिळाली की ते किडके समजून टाकून दिलेले बटाटे खरं तर आतून तसेच असतात. “पर्पल पेरूव्हिअन बटाटे”, असे हया जातीचे नाव. आतून कधी पूर्ण जांभळे तर कधी पांढर्‍या जांभळ्याचे मिश्रण. भाजण्या-तळण्यासाठी एकदम उपयुक्त. त्यांना छानशी बटरी चव. हे वाचल्यावर मग मात्र मी टाकून दिलेल्या पाऊंडभर बटाट्यांचे मला फारच वाईट वाटू लागले.

img_7290

जसजसा बटाट्याचा कुलवृत्तांत वाचत गेले तसतसा माझा त्यांच्याबद्दल आदर वाढू लागला. ढिगात विकले जाणारे बाजारातले आणि दुसरे डोक्यात भरलेले, असे दोनच प्रकारचे बटाटे आत्तापर्यंत माहिती होते. पोर्तुगिजांनी भारतात बटाट्याची लागवड केली. ब्रिटिश व्यापार्‍यांनी तो भारतभर पसरवला. त्याचे उपयोग खूप, सर्रास वापरला जाणारा, पण आपल्या खाद्यसंस्कृतीत तसे त्याला मानाचे स्थान नाहीच. ज्याला जास्त पाणी लागत नाही, असे हे खरीप पीक, सर्वसामान्य लोकांच्या पोटभरीचं म्हणूनच राहीलं.

इथे मात्र छपन्न प्रकारचे बटाटे. तीन मुख्य प्रकार स्टार्ची, वॅक्सी, ऑल पर्पज. मग त्यातले तेरा-चौदा उपप्रकार. जांभळ्या-निळ्या रंगाचे पर्पल पेरुव्हिअन, अडीरोन्डॅक ब्लू (Adirondack blue). बटरी-नटी फ्लेवर्सचे इंका गोल्ड, करोला वॅक्सी. अगदी हाताच्या बोटांसारखे दिसणारे फिंगरलिंग बटाटे. प्रत्येकाची उपयुक्ततता त्यामधे असणार्‍या स्टार्चवर अवलंबून. जास्त स्टार्च असलेले आयदाहो,न्यू पोटॅटोज बेकिंगसाठी उत्तम. क्रिमी आणि मऊशार असलेले रेड ब्लिस, फिंगरलिंगस सूपसाठी एकदम झकास. फ्रेंच-फ्राईज आणि ग्रीलिंग करण्यासाठी रसेट आणि कदाहदिन (Katahdin) सारखी दुसरी उत्तम जात नाही. बरेच प्रकार पाहिले आणि माहिती करून घेतली.

अमेरिकन बायकांच्या नेहमी बोलण्यात येणारे, बिनकामाचे काऊच पोटॅटो मात्र मला कुठे दिसेनात. शेवटी मी भाजीच्या सेक्शनमधल्या माणसाला विचारलं. त्यावेळी तो ‘यू आर किडींग राईट”, असे म्हणत मोठ्याने का हसला याचा उलगडा मला नंतर झाला.

मग लक्षात आले माझ्या डोक्यात भरलेले बटाटे हे कारण नाहीये भाजी बिघडण्याचे. तर त्यातली पिष्टमयता हे आहे. हि माहीती करून घेण्याची कधी वेळच आली नाही. भारतातले एकमार्गी-एकगुणी बटाटे परोठे-पावभाजीपासून ते उपासाच्या भाजीपर्यंत सर्व गोष्टींना उपयोगी पडणारे. आणि ग्रिलिंग, बेकिंग, ब्रॉयलिंग अशा प्रकारांना गावरान महाराष्ट्रीय जेवणात काही स्थान नाही. पण इथे मात्र हे प्रकार अगदी नेहमी केले जाणारे. मग मात्र बेक्ड पोटॅटो करायचे तर रसेट आणायचे आणि आपली काचर्‍या भाजी करायची असेल तर युकॉन किंवा रोझ गोल्डच चांगले हे गणित डोक्यात पक्के बसवले.

इथल्या वातावरणात रूजून, इतर गोष्टी अंगवळणी पडल्या. रहिवासी झाल्याचा अगदी ऑफीशिअल स्टॅम्पही मिळाला. पण बटाट्याची भाजी जमायला मात्र त्याहीपेक्षा जास्तच वेळ लागला. म्हणूनच आता ठरवले आहे की, कुठल्याही नवीन देशात राहायला गेल्यावर, त्या देशाच्या चालीरिती, माणसे यांच्याशी ओळख तर होईलच, आणि ते निभावूनही नेता येईल. पण आत्मविश्वास टिकवायचा असेल तर तिथल्या बटाट्यांची ओळख लगेचच करून घ्यायची. आपण खरे स्थानिक झालो का नाही हे पटेल, जेव्हा तिथे बटाट्याची भाजी नीट जमेल!

शिल्पा केळकर

14292325_10210221621675178_2499870959441897635_n

फोटो – शिल्पा केळकर, सायली राजाध्यक्ष, विकीपीडिया    व्हिडिओ – YouTube

2 Comments Add yours

  1. sujablogs says:

    मस्त लेख. स्वतःवर विनोद करत लिहिण्याची शैली आवडली.

    Liked by 1 person

  2. मृण्मयी says:

    मस्त. शैली आणि माहिती, दोन्ही छान

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s