मासे, तांदूळ आणि नारळ – केरळ

तनश्री रेडीज

kerala_mapलग्नाच्या आधी मी आणि माझा होणारा नवरा असे दोघेही हॉस्टेलला राहत असल्याने हॉस्टेल मेसमध्ये मिळणारे जेवण हेच महाराष्ट्रीय जेवण असा जो सर्वसाधारण नॉन महाराष्ट्रीय लोकांचा गैरसमज होतो तसाच माझ्या केरळी नव-याचा सुद्धा झाला होता आणि तेव्हापासून माझी केरळी खाद्यसंस्कृतीशी ओळख झाली. “We Mallus have better food culture than you people. We have variety of breakfast” अशा प्रकारच्या छोट्या छोट्या वाक्यातून आमच्यात खाद्यसांस्कृतिक चकमकी उडायला लागल्या. माझा नवरा केरळी लॅटिन ख्रिश्चन. त्याचं मूळ घर अर्नाकुलम् जवळील चेरथाला येथे आहे. पत्त्यामध्ये उल्लेख करताना चेरेथालाची गणना शहरात होते. पण तिथला परिसर हा असा छान गाव वाटेल असा. आपल्याकडल्या अलिबाग-रेवदंडा वगैरे सारखा. माझ्या लेखात आलेले संदर्भ केरळमधल्या ह्या काही ठराविक भागांपुरते मर्यादित आहेत. लग्नाआधी एकदा, लग्नाच्या वेळेस आणि त्यानंतर साधारण दोनदाच मी सासरी गेल्यामुळे तसा माझा अनुभव तोकडा आहे. पण खाण्याची आणि करण्याची आवड असल्याने मला आलेले मजेशीर अनुभव या लेखाद्वारे तुमच्याशी शेअर करत आहे.

सकाळचा नाश्ता हा केरळमध्ये फार महत्वाचा. खूपच घाई असेल तर तो भाताची पेज पिऊन आटपला जातो. डोसा, इडली, वडा असा आपल्याला माहिती असणारा दाक्षिणात्य प्रकारचा नाश्ता फार क्वचित केरळमध्ये केला जातो. त्यांची खरी पसंती ही पुट्ट, इडिअप्पम्, अप्पम् अशा खास त्यांच्या पदार्थांना दिली जाते. या सर्व पदार्थांचा जीव म्हणजे तांदूळ. पुट्ट हा प्रकार तांदळाचं पीठ आणि खोवलेला नारळ ह्यांच्या मिश्रणापासून बनवतात. हे मिश्रण बांबूच्या नळकांड्यात किंवा नळकांड्यांसारख्या तयार मिळणा-या साच्यात घालून वाफवतात. पूर्वी आणि काही ठिकाणी अजूनही नारळाच्या करवंटीत सुद्धा पुट्ट वाफवले जातात. त्याला चेरटपुट्ट असं म्हणतात. चेरट म्हणजे नारळाची करवंटी. त्यासोबत केळं ही उत्तम जोडी. पण पुट्ट चण्याच्या उसळीसोबत किंवा अंड्याच्या करीसोबतही खातात. तसेच इडियप्पम. मोदकांसाठी जशी उकड काढतात तशी उकड काढून इडलीपात्रात कुरडयांसारख्या शेवया पाडून त्या उकडतात. उकडीत काही वेळेला नारळाचं दूध सुद्धा घालतात. ह्याची जोडी म्हणजे गूळ घातलेलं नारळाचं दूध. पण ह्यासोबतही चण्याची उसळ किंवा अंडाकरी चालते. अप्पम हा केरळमधला सर्वात प्रसिद्ध पदार्थ. मूळ पोर्तुगिजांकडून इथे आला आणि इथला झाला असं म्हणतात. हीसुद्धा तांदळाचे पीठ आणि नारळ यांचीच आवृत्ती. आधीचे दोन पदार्थ हे तसे आयत्या वेळी करता येण्यासारखे. मात्र अप्पमची तयारी आदल्या रात्रीच करावी लागते. थोडंसं यीस्ट घालून तांदूळ आणि खोबरं ह्यांच मिश्रण डोशासारखं आंबवतात. डोशाच्या मानाने अप्पमचं पीठ खूपच पातळ असतं. अगदी धावतं. अप्पमचं एक खोलगट असं विशिष्ट भांडं असतं. सकाळी फुगून आलेलं पीठ सारखं करुन, डावभर पीठ भांड्यात घालून दोन्ही हातांनी हलवल्यासारखं भांडं विशिष्ट पद्धतीने फिरवावं लागतं. मग कडेने कुरकुरीत आणि मध्ये स्पंज सारखा असा जाळीदार अप्पम तयार होतो. ह्याला उलटावं लागत नाही. तो एकाच बाजूनं वाफेवर शिजवायचा असतो. उत्तम जाळी येणे हे अप्पम चांगला झाल्याचं लक्षण. याची जोडी म्हणजे स्ट्यू मग तो कुठलाही प्रकारचा असो. शाकाहारी किंवा मांसाहारी. अप्पम आणि बीफ स्ट्यू हे खास केरळी ख्रिश्चन लोकांच खाणं. पण हल्ली इतरही खातात म्हणा. पहिल्यांदा जेव्हा मी अप्पम बनवायला शिकले तेव्हा ते बनवायचं तंत्र मला फारच आवडलं. त्यावेळचे सगळे अप्पम मी असे मस्त लयीत फटाफट बनवले (खरं हेच विशेषण लागू होईल). त्यानंतर मात्र एकदा जेव्हा मी अप्पम बनवले तेव्हा मात्र त्यांचं काहीतरी तंत्रच बिघडलं. आधीसारखे काही होत नव्हते. अम्मा म्हणजे माझ्या सासूबाई चर्चमध्ये गेलेल्या. बरं माझा अप्पम बनवण्याचा अनुभवही तोकडाच. शेवटी कसेबसे बनवले. नाश्ताच्या टेबलवर अम्मांना कळलं की अप्पमचं गणित बिघडलंय. मग त्या म्हणाल्या, “तुझी चूक नाहीये. माझी आजी सांगायची की अप्पमचं पीठ भिजवताना आजूबाजूला कोणी असू नये. अप्पम चांगले होत नाहीत. काल मी पीठ भिजवताना सगळे होते आजूबाजूला (कारण आदल्या दिवशी घरी एक छोटी पार्टी होती). आवरायला उशीर झाल्याने मी त्यांच्यासमोरच पीठ भिजवलं. त्यामुळे अप्पम बिघडले”. अशाही छोट्या छोट्या समजूतीही तिथे प्रचलित आहेत ही महत्वाची गोष्ट. स्ट्यू ही अप्पमची जोडी असली तरी टिपिकल केरला मीन करी, फिश मोली अशा करीसोबतही ते छान लागतात. करी हा शब्द सर्व प्रकारच्या चटण्या, भाज्या, आमट्या ह्यासाठी वापरला जातो. इथे पुण्यातही एखादी ग्रेवीवाली भाजी छान झाली की नवरा पटकन म्हणून जातो, “this will taste good with appam” त्यामुळे खरं तर माझ्यासाठी अप्पम हे एक परिमाण बनलं आहे. माझ्या मते अप्पम थोड्या सुक्या भाजीसोबतही छान लागतात. लग्नाआधी साधारण तीन वर्षांपूर्वी मी सासरी गेले होते तेव्हा पोळ्यांचा प्रश्न होता. भात खाऊन कंटाळले होते. तेव्हा तिकडे पोळ्यांचं आतासारखं प्रस्थही नव्हतं. आणि तेव्हा पाहुणी म्हणून गेल्याने मला स्वयंपाक घरात प्रवेशही नव्हता. तेव्हा एकदा घरी छोटेखानी पार्टी होती. चिकन रोस्ट नावाची केरळी रेसिपी केली होती. थोडं सुक्या पद्धतीने केलेलं ते चिकन मला खूप आवडलं. करीमीन (पर्ल स्पॉट नावाच्या माशाचा रस्सा) आणि अप्पम अशी जोडी होती. पण मी त्यांच्या सगळ्या जोड्या झुगारुन चिकन आणि अप्पम हादडले होते आणि पोळ्यांची भूक अप्पमवर चांगलीच भागवली होती.

केरळी ख्रिश्चन व्यक्तिच्या रोजच्या जेवणात भात आणि मासे हे मुख्य पदार्थ. मासे हे रस्सा किंवा तळलेल्या स्वरूपात. तसेच रोज एक भाजी सुद्धा रोजच्या जेवणात असते. तिच्याकडे बनवताना आणि खातानाही कोणी फार लक्ष देत नाही असं आपलं माझं निरीक्षण. पण तरीही एखाद्या यांत्रिक पद्धतीने ती एक भाजी रोज केली जाते आणि त्याच यांत्रिकपणे खाल्लीही जाते. ही भाजी अनेकदा दारची असते. त्यामुळे वेगवेगळे कंद, वेलीवरच्या भाज्या अशा प्रकारच्या नावडत्या गटात मोडणा-या भाज्यांचा समावेश रोजच्या आहारात असतो. शाकाहारी पदार्थात एक अतिशय आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे टॅपियोका. ज्या कंदापासून साबुदाणा बनवतात ते कंद. स्वभावाने शाकाहारी असला तरी मांसाहारी पदार्थासोबत उठून दिसतो. हा उकडून त्याचे तुकडे करुन बीफ करीसोबत खातात. घरी तसेच हॉटेलात दोन्ही ठिकाणी हा पदार्थ प्रसिद्ध आहे. तो मिळण्याची काही खास ठिकाणं सुद्धा आहेत.

केरळमध्ये मोठ्ठा साबुदाणा भात खातात. तो शिजायला जवळपास तीन तास लागतात. त्यामुळे केरळमधल्या नोकरदार बायका सकाळी दोन गजर लावतात. पहिला पहाटे साधारण चार वाजताचा. त्या गजराला उठून झोपेतच जावून तांदूळ धुवून चुलीवर चढवायचे आणि येवून परत झोपायचं. दुस-या गजराला किंवा आपल्या सोयीने उठायचं आणि करीची किंवा नाश्त्याची तयारी करायची. करी होईपर्यंत तो भात साधारण तीन एक तासांनी शिजतो. हल्ली मला त्यांच्या भाताची सवय झाली आहे. अगदीच कंटाळा आला तर मग मी आपल्या पद्धतीचा भात करते. त्या भाताला तिथे पच्चरी अस म्हणतात आणि तसं म्हणताना “कसा काय तुम्ही हा पच्चरी खाता?” अशा प्रकारचे भाव आणतात. मात्र पच्चरी खाण्यासाठी चालत नसला तरी पायस किंवा डोसा बनवण्यासाठी किंवा तांदळाच पीठ बनवण्यासाठी मात्र पच्चरीचाच वापर होतो. मला फक्त भात चालत नाही म्हणून मी तिकडे माझ्यापुरत्या पोळ्या करते. कधी कधी नवरा आणि सासू मला जॉईन होतात. एकदा पुण्याहून घरी गेले असताना माझ्यासाठी म्हणून अम्मांनी पोळ्या आणि आपल्या पद्धतीचा भात करुन ठेवला होता. आणि मला हसत हसत सांगितल होत, I cooked chapatti for you मला फारच मजा वाटली होती.

तनाश्री नवरा आणि सासूबरोबर

सध्या आपल्याकडच्या पोळ्यांना तिकडे फार भाव आहे. तिथल्या हॉटेलातसुद्धा चपाती (चिमणीतला च) या मेन्युची भर पडली आहे आणि विशेष म्हणजे ती हॉटलिस्टवर सुद्धा आहे. याचं कारण पर्यटन असावं कदाचित. लग्नाच्या आधी आठ दिवस मी तिथे राहिले होते तेव्हा माझ्या आणि बाबांच्या पोळ्या मी रोजच्या रोज करायचे. माझ्या सासूला पोळ्या फार प्रिय आहेत. त्यांच्या भाषेत चपाती, पण त्या बनवण्याच कसब मात्र अजून त्यांना अवगत झालेलं नाही. पोळ्या मऊ होण्यासाठी त्या विविध प्रयत्न करताना मला आढळलेल्या आहेत. त्या गरम पाण्यात पीठ भिजवतात. मी कणीक मळत असताना लक्ष देवून निरीक्षण करतात. वगैरे वगैरे. माझ्या लग्नानंतर आठ दिवसांनी आमच्या लग्नात ज्यांनी फार मोलाची मदत केली अशा जवळच्यांना एक छोटी घरगुती पार्टी द्यायची अस ठरवल. अम्मांनी विचारल की तू काय करशील? महाराष्ट्रीयन चिकन करी. मी आधी उत्साहात हो म्हटलं पण मेन कोर्समध्ये लुडबुड नको म्हणून मी गाजरचा हलवा करायचा ठरवला. तो केलाही … चूल वगैरे साधने वापरुन. चिकन करी सोबत चपाती करशील का? (हे अस ठराविक पद्धतीच्या करी सोबत चपातीच खायची हे अस केरळी लोकांनी त्यांचं त्यांचंच ठरवलय) अस मला विचारण्यात आलं. हो, त्यात काय! असं म्हणत मी पुढे सरसावले. मग हळू हळू मला कळलं. ही घरगुती माणसांची पार्टी तब्बल चाळीस लोकांची आहे. (माझ्या घरगुती माणसाच्या पार्टीचा आकडा ८ ते १० हाच आहे) पोळ्या हा त्यांचा प्रांत नसल्याने मदतीला पण कोणी नाही. शेवटी सकाळी चाळीस माणसांचा गाजर हलवा आणि संध्याकाळी चाळीस माणसांच्या पोळ्या साडी नेसून घामाने डबडबून लाटल्या. माझ्या ह्या कौशल्याबद्दल पाठ थोपटून घेतली ते वेगळं आणि आत्तापर्यंत घेतेच आहे. पण त्यावेळेला मात्र ब्रह्मांड आठवलं होतं. (ता. क. मला पोळ्या फार कौशल्याने जमत नाहीत ते वेगळंच)

नारळ हा त्यांच्या सर्व पदार्थाचा आत्मा आणि भात हा परमात्मा. मला स्वतःला नारळाचे पदार्थ फार आवडतात. मी नुसतं खोबरेही खाऊ शकते किंवा कुठल्याही पदार्थावर खवलेलं खोबरं घालूनही खाऊ शकते. पण तिकडचा नारळाचा पदार्थातला वापर म्हणजे वाटून तरी वापरायचा नाही तर दूध काढून वापरायचा. आपल्यासारखं नारळ खवून वगैरे घालत नाहीत. प्रत्येकाच्या दारात वर्षाला पुरेल एवढं उत्पादन देणारी नारळाची झाडं नक्कीच. त्यावर असलेल्या नारळाच्या झाडांवर घरची सधनता अवलंबून. एवढच काय तर पंचायतीच्या पॉवर्टी लाईन ठरवायच्या जुन्या निकषांमध्येही दारात असलेल्या नारळाच्या झाडांच्या संख्येचा समावेश होता. तसेच काही काही घरांची नावं सुद्धा “अञ्च तेंग (पाच नारळाची झाडं)” वगैरे अशी आहेत. घरचेच नारळ असल्याने स्वयंपाकात तुटवडा कधीच नाही. नारळ विकत आणण्याचा प्रश्नच नाही. माझ्या लग्नाच्या चार दिवस आधी आमच्या वाडीतले नारळ पाडायला माणसं बोलावली होती. हल्ली त्यांची मागणी वाढलीय. कारण नवीन पिढीतलं कोणी नारळाच्या झाडावर चढत नाही. त्यांनी मस्तपैकी घरचे काही कोवळे नारळसुद्धा पाडले होते. खास माझ्यासाठी. नारळाचं गोड पाणी आणि मऊ मऊ मलई ‘मी होणारी सून’ वगैरे गोष्टी विसरुन खाल्ली होती. आमच्या लग्नाच्या आदल्या दिवशी भरपूर पाऊस पडला होता. भेटायला येणारा प्रत्येक जण एक ठराविक प्रकारचा प्रश्न माझ्या नव-याला विचारत होता आणि त्यावर तो नुसता हसत होता. तेव्हा काही गडबडीत नीट कळलं नाही. लग्नाच्या दुस-या दिवशी मला नव-याने सांगितलं – त्यांच्या इथे असा समज आहे की, जर खोबरं खवता खवता खाल्लं तर लग्नाच्या आदल्या दिवशी पाऊस पडतो आणि आमच्या लग्नाच्या आदल्या दिवशी धुवांधार पाऊस पडला होता. त्यामुळे आलेले सगळे पाहुणे माझ्या नव-याला “काय खूप खोबरं खाल्लंय हा” असं हसून विचारत होते. एकंदरीत आमच्या लग्नाच्या आदल्या दिवशीच्या धुवांधार पावसाचं कारण मी माझे खोबरं प्रेम प्रकट करुन माझ्या डोक्यावर घेतलं.

केरळ आणि मासे हे समीकरण सांगायलाच नको. इथे जेवणात रोज मासे असतात हे आधीच सांगितलं आहे. रोजच्या जेवणात साधे छोटे मासे असतात. ह्यांची खरेदी दारावरच. एक ठरलेली मासेवाली येते मासे विकायला. तिची कूsssक अशी विशिष्ट आरोळी हल्ली माझ्या ओळखीची झालेली आहे. आधी ती आरोळी ऐकू येते आणि मग मीन वेणो (मासे हवे आहेत का?) असा तिचा प्रश्न. हे ऐकू आलं की आपल्याला मासे हवे असतील तर “वेणम्” म्हणजे हवे आहेत अशी एक आरोळी ठोकायची की ती मुख्य गेटशी थांबते. छोट्या माशांसोबत तिच्याकडे कोलंबी आणि कधी कधी करीमीन (पर्लस्पॉट) सुद्धा मिळतात. अम्मांच्या सुनेला कोलंबी आवडते हे माहीत झाल्यापासून ती हटकून कोलंबी घेऊन येते. थोडीशी घासाघीस ही ठरलेली पण गुणवत्ता एकदम सरस. मी एकदा तर तिच्याकडचा मासा जिवंत असल्याचंही पाहिलं होतं. करीमीन हा केरळमध्ये खाल्ला जाणारा प्रसिद्ध मासा. खास गोड्या पाण्यात उपलब्ध होणारा. रोजच्या जेवणासाठी हवा असल्यास दारावर उपलब्ध होतो पण जास्त हवा असल्यास तो मिळण्याची काही खास दुकाने असतात. बाकीची मासे खरेदी मासळी बाजारात जाऊनच. केरळला गेल्यानंतर वेळ काळ न पाहता मी फक्त मासेच खात असते. कोंज नावाची एक मोठ्या प्रकारची कोलंबी तिथे मिळते. तिची छोटे तुकडे करुन करी करतात किंवा फ्राय करतात. माझं कोलंबीवरील प्रेम पाहून लग्नाच्या तिस-याच दिवशी अम्मा मला कोंज खायला एका हॉटेलात घेऊन गेल्या होत्या.  हॉटेल एकदम टपरीवजा. कदाचित एरवी अशा ठिकाणी मी गेलेही नसते. पण तळलेले कोंज एकदम भारी. दोनच खाऊ शकले मी. शिवाय हावरटासारखे दोन पार्सल करुन घेतले. हॉटेल अगदीच छोटं असल्यास पार्सल हा प्रकार बहुतेक त्यांच्या पचनी पडला नसावा. त्यांनी तसेच दोन कोंज विड्याची पानं कागदात गुंडाळून द्यावी तसे दिले. त्यानंतर आम्ही ब-याच ठिकाणी गेलो होतो. मी बॅग नेली नसल्याने तसेच ते कोंज तसेच मिरवत मिरवत फिरले. शेवटी रात्री एकदाचे जावून खाल्ले आणि माझा जीव शांत झाला. बाकी शार्क, खेकडे, शिंपले अशा विविध प्रकारच्या जलचरांचाही तिथल्या आहारात समावेश आहे.

माशांच्या जोडीने इतर अनेक प्रकारचा मांसाहारही तिथे केला जातो. माशांचा समावेश मांसाहारात होत नाही. कारण ईस्टरच्या आधी उपवास म्हणून पाळल्या जाणा-या महिन्यात मांसाहार निषिद्ध असतो पण मासे मात्र चालतात. ह्या इतर मांसाहारात अनेको प्रकारांचा समावेश होतो. अनेक प्रकारचे प्राणी, जलचर प्राणी, पक्षी केरळमध्ये आवडीने खाल्ले जातात. आमचं लग्न झाल्यापासून आमच्या घरातला मांसाहार फारच मर्यादित झाला आहे. पण माझ्या अनुपस्थितीत किंवा उपस्थितीतही विविध प्रकार खाल्ले जातात फक्त माझ्यासमोर बनवले मात्र जात नाहीत. केरळमधले गौड सारस्वत ब्राह्मण शुद्ध शाकाहारी आहेत. त्यांच्या बायका- मुलींना पटति असं म्हणतात. पिवळा, निळा, गुलाबी अशा गडद रंगांचा समावेश त्यांच्या राहणीमानात असतो आणि मलाही हे सर्व रंग वापरायला फार आवडतात. त्यामुळे आणि माझ्या मुळच्या रंगामुळे अनेकांना मी गौड सारस्वत ब्राह्मणच वाटले होते. त्यामुळे तिथे माझ्या नकळत माझा उल्लेख पटति असा केला जातो आणि मी शाकाहारी असल्याचाही अनेकांचा समज होतो. लोकांना भेटायला गेल्यावर लोक माझ्या नव-याकडे फार दयेने बघतात. त्यांच्या चेह-यावरचे मी वाचलेले भाव म्हणजे, “अरेरे आता कसं होणार याचं शाकाहारी मुलीशी लग्न केल्यावर”, पण मग मी काही प्रमाणात (त्यांच्या तुलनेने) मांसाहारी आहे हे कळल्यावर मग लगेच त्यांचे चेहरे उजळतात. तर त्यांच्या ह्या विविध प्रकारच्या मांसाहाराची सोय अनेक जण घरातच करताना आढळतात. अनेकांच्या घरात बदकं, ससे, कोंबड्या, शेळ्या वगैरे पाळलेले आढळतात. एवढंच काय तर पावसाळ्यात घरातल्या तळ्यात आलेलं कासवही इथले लोक सोडत नाहीत.

जशी मांसाहाराची सोय घरातल्या घरात केली जाते तशीच इथे वर्षाला लागणा-या जिन्नसांचीही सोय घरातल्या घरातच केली जाते. प्रत्येकाच्या घराच्या पुढे मागे वर्षभराचं उत्पादन मिळेल अशा प्रकारची विविध झाडं असतात. ह्या सर्वांपासून काही ना काही उत्पादन प्रत्येकाच्या घरी होतेच. सुरुवात नारळापासून करायची तर, दररोज सहज पडणा-या नारळांचा  वापर स्वयंपाकासाठी केला जातो. साधारण तीन महिन्यातून एकदा नारळ पाडले जातात. मग त्यांना दिवसभर सुकवलं जातं आणि रात्री धुरी दिली जाते आणि अशा प्रकारे खोबरं बनवल जातं. त्याला कोप्रा असं म्हणतात. हे काम वर्षभर सुरुच असतं अगदी पावसाळ्यातही. फक्त पावसाळ्यात नारळ घरात वाळवले जातात आणि धुरी देण्याचं प्रमाणही वाढवलं जातं. बाकीही बरीच कामं ही उन्हाळ्यातली. हे सुकं खोबरं केरळमध्ये वापरलं जात नाही. त्याच तेल काढलं जातं. आपलं खोबरं तेलाच्या घाण्यावर नेऊन द्यायचं त्याचं तेल काढून आणायचं. स्वयंपाक, डोक्यावर घालायला आणि इतर अनेक गोष्टींसाठी नारळाचं तेलच वापरलं जातं. तेही फिल्टर न करता. नारळ्याच्या काथ्यापासून प्रक्रिया करुन सुतळीसाठीचा कच्चा माल बनवला जातो. त्याला मल्याळममध्ये कॉयर अस म्हणतात. ह्या कॉयरचा वापर करून सुतळी बनवली जाते.

ह्याशिवाय कोकम आणि चिंच ह्यांचीही झाडं जवळ जवळ प्रत्येकाच्या घरात असतातच. ह्या दोघांनाही पुळी असं आंबट या अर्थाने म्हणतात. कोकमांना कोळंबुळी तर चिंचांना वाळंबुळी असं म्हणतात. कोकमाच बी फोडून नंतर कोकमं वाळवून ती साठवली जातात. केरळमधली कोकमं ही आपल्या इथल्या कोकमांसारखी लाल भडक नसतात. तसंच चिंचसुद्धा गोळा करुन बी काढून साठवून ठेवली जाते. ही पुळीची कामंसुद्धा उन्हाळ्यातलीच. ह्या शिवाय दुसरं महत्वाचं उत्पादन म्हणजे काजू. जास्त प्रमाणात असतील तर त्यांच्या बिया साठवून त्या काजू उत्पादन करणा-यांना विकल्या जातात किंवा घरात स्वयंपाकात वापरल्या जातात. ही सर्व झाडं फार प्रमाणात असतील तर मजूर लावून कामं करुन घेतली जातात अन्यथा घरची सर्व माणसं कंबर कसतात. केरळमध्ये कम्युनिझममुळे मजुरीचे दर जास्त असल्याने पहिला पर्याय अनेकदा टाळला जातो. ह्याशिवाय मिरी, जायफळ अशा मसाल्याच्या पदार्थांचीही वर्षभराची साठवण केली जाते. वेलीवर आलेल्या कारलं वगैरे भाज्या सुकवून तळण्यासाठी वगैरे ठेवल्या जातात. बाकी लहानसहान वाळवणं पावसाळ्याचे दिवस सोडल्यास सुरुच असतात. ह्याशिवाय महत्वाचं म्हणजे त्यांचे जीवलग मासे. तेही पावसाळ्यासाठी सुकवतातच. त्यांना कसं सोडतील ते!

तर असं हे माझं सासर आणि त्याची खाद्यसंस्कृती!

तनश्री रेडीज

img-20161101-wa0013

संस्कृत आणि पुरातत्वशास्त्र हे अभ्यासविषय असून त्यांच्या अनुषंगाने दैनंदिन परंपरा व चालीरीतींचा अभ्यास यात विशेष रस. सध्या डेक्कन काॅलेज, पुणे येथे पीएचडीसाठी संशोधन करत आहे. विविध माध्यमांसाठी संस्कृती व परंपराविषयक लिखाण करते तसेच सध्या मराठी विश्वकोश मंडळाच्या ‘अभिजात भाषा व साहित्य’ या ज्ञानमंडळाची समन्वयक म्हणून कार्यरत आहे.

फोटो – तनाश्री रेडीज    व्हिडिओ – YouTube

9 Comments Add yours

 1. Mugdha Godbole says:

  channn.. ekun ank ch chan.. maja ali..

  Like

 2. साती says:

  mast!
  lekh awadala.
  mase, naral ani bhat amha konkani lokanchahi jeev ki pran!
  mhanun lekh jara jastach chavine wachala.
  mi pan ole khobare premi ahe.

  Like

 3. Charuta says:

  सुंदर लेख!

  Like

 4. Vandana P Chalke says:

  Mast lekh…khup awdla.
  I love Kerala food

  Like

 5. Vandana Hake says:

  Khup mast kerla khadya sanskruti. Fish recipes chan vatlya.

  Like

 6. Ujjwala Prashant Muley says:

  Khupach chan lekh!

  Like

 7. मृण्मयी says:

  मस्त तनाश्री. खूप आवडलं हे तपशीलवार वर्णन.

  Like

 8. Vidya Subnis says:

  विस्तृत माहिती आहे. खूप आवडला लेख

  Like

 9. Pavan Kale says:

  पूर्ण लेख एकदम झकास. केरळची खाद्य भ्रमंती बसल्याजागी झाली. धन्यवाद !

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s