निखिल बेल्लारीकर

बामी सूपः यात नूडल्स, थोडे घासफूस, आणि मोमोज़ असतात. त्यात shrimp आणि पोर्क यांचा एकत्र खिमा असतो. ही एक इंडोनेशियन डिश आहे. भारतावर इंग्रजांचे राज्य असल्याने इंग्लंडमध्ये भारतीय खाद्यपदार्थ लोकप्रिय आहेत तसेच डचांचे इंडोनेशियावर राज्य असल्याने हॉलंडमध्ये इंडोनेशियन खाद्यपदार्थ अतिशय लोकप्रिय आहेत.

बकलावा: बेसिकली स्टफ्ड चिरोटा. सारण म्हणजे पिस्ते, बदाम इत्यादी असते. मी दिलेल्या फोटोमध्ये पिस्त्यांचं सारण आहे. अर्थातच चव अतिशय सुंदर लागते. हा एक तुर्की पदार्थ आहे. हॉलंड आणि जर्मनीत बहुतेक मोठ्या शहरांत गल्लोगल्ली तुर्की हॉटेले असतात. १९८० नंतर तुर्की लोक जर्मनीत कामगार म्हणून येऊ लागले, त्यांच्याबरोबरच त्यांचे खाद्यपदार्थही आले.

लाह्माजुन: यालाच टर्किश पिझ्झा असेही म्हणतात. आकाराने मोठी, पातळ अशी पोळी घेऊन त्यावर मटन + बीफ याचा खिमा थापतात. तो जरा वेळ भट्टीतून काढतात आणि त्यानंतर त्यावर कांदा टोमॅटोचे सॅलड, चिकन, बीफ, इ. ठेवून रोल करून सर्व्ह करतात.

इथिओपियन जेवणः इथिओपिया हा आफ्रिकेच्या पूर्व किनार्यावरील देश. तेथील लोक जगभर पसरले, त्याचबरोबर त्यांचे जेवणही. युरोप-अमेरिकेत इथिओपियन जेवण एकदम हिट प्रकार आहे. फोटोतील डिशमध्ये डावीकडे दिसतेय ती अंड्याचा खिमा करून बनवलेली ग्रेव्ही. उजवीकडे चिकन लेगपीस आणि ग्रेव्ही, प्लस थोडे चीजचे तुकडे. त्याचे नाव आहे ‘दोरो वाट’. शिवाय मध्ये आहे ती बीन्स + बटाटा यांची भाजी आणि बाहेर कोबी इ. चे सलाड. जे चपातीसारखे दिसतेय तो इनफॅक्ट एक प्रकारचा डोसा आहे, त्याचे नाव इंजेरा. चवीला आंबट लागतो. इथिओपियात तेफ (teff) नामक एक धान्य पिकते त्याचे पीठ आंबवून तो बनवतात. सगळ्या भाज्या इ. खाऊन झाले की खालचा इंजेराही खायचा असतो. आणि जेवण झाले की त्याची सांगता इथिओपियन कॉफीने करायचा प्रघात आहे. इथिओपियन जेवणाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा मसाला- त्याला बर्बेरे (berbere) असे म्हणतात. आपल्या गरम मसाल्याप्रमाणेच त्यात अनेक मसाल्यांचे मिश्रण असते. तो मसाला त्यांच्या बहुतेक पदार्थांमध्ये टाकतात. त्यामुळे त्यांचे जेवण चवदार होते. भारतीय चवीशी साधर्म्य असल्यामुळे भारतीयांना इथिओपियन जेवण आवडते. त्यांच्यात मसूरादि डाळींच्या डिशेसही असतात.

जर्मन जेवणः यात ब्रेड, प्रेट्झेल्स विथ मस्टर्ड चटणी, सफरचंदाची वाईन, सॉसेज आणि हांडकेसं मिट मूझिक (handkäse mit musik) हे पदार्थ आहेत. हे जेवण मी जर्मनीच्या पश्चिम भागातील फ्रांकफुर्ट या शहरात घेतले. सॉसेजमध्ये डुकराच्या मांसाचा खिमा करून तो त्याच्या आतड्यात भरतात, वरती पार्स्ली (parsley) चे थोडेसे ड्रेसिंग असते. हांडकेसं मिट मूझिक (handkäse mit musik) हे एक फ्रांकफुर्ट येथील स्पेशल चीज आहे. शब्दशः अर्थ- हँड चीज विथ म्यूझिक. याला असे नाव का आहे ते माहिती नाही. गाईच्या दुधापासून बनवलेले असते. त्यावर कांद्याचे तुकडे आणि बटर टाकलेले आहे. प्रेट्झेल म्हणजे तो वर्तुळाकार पदार्थ आहे. मैद्यापासून बनवतात, तशा आकारात आणि भट्टीतून काढतात.

डच अॅपलटार्टः हॉलंड स्पेशल सफरचंदाचा केक. सफरचंदाच्या फोडी अन पेस्ट्री, द्याट इज़ गव्हाचे पीठ इ. आपल्यासारखा साखरेचा मारा नसतो. अंमळ कमी गोड, सफरचंदाची नैसर्गिक चव कळते. त्यासोबत स्ट्रॉबेरी विथ क्रीम खायचाही प्रघात आहे.

तुर्की चिकन डिशः याचे नाव विसरलो, परंतु यात चिकनसोबतच कांदा, टोमॅटो, मिरची (फार तिखट नव्हती), तिखट चटणी, भात, असे अनेक पदार्थ एकाच डिशमध्ये सर्व केले जातात. तुर्की जेवणाला अन्य पदार्थांच्या तुलनेत पैसेही कमी पडतात असे निरीक्षण आहे. ही डिशदेखील फ्रांकफुर्टमध्येच खाल्ली.

युरोपियन स्टाईल ‘व्हेज करी’: अॅमस्टरडॅम येथे राहणार्या माझ्या डच मित्राने ही करी बनवली. हे इथे लोकप्रिय आहे असे दिसते. वांगी, काकडी, इ. अनेक भाज्या टाकून शिजवायच्या, ‘करी पावडर’ तिथे मिळते ती टाकायची, माफक मीठ आणि तिखट टाकायचे की झाले. सोबत भात. हे क्विक फिक्स मील तिथे खूपजण बनवतात.

मॅकरून (macaron): ही एक फ्रेंच पेस्ट्री आहे. नारळापासून बनवलेल्या macaroon शी याचा काहीही संबंध नाही. ही पेस्ट्री बनवायला सगळ्यात अवघड असते असे पट्टीचे शेफही म्हणतात. अनेक फ्लेवर्समध्ये येते. मॅकरोन्स दिसायला क्रीम बिस्किटासारखे दिसतात. पॅरिसमध्ये थेवेनिन पाटिसेरी नामक बेकरीत खाल्लेले हे मॅकरोन्स. एकाची किंमत दीड युरो. पॅरिसमध्ये सर्वांत प्रसिद्ध मॅकरोन स्टोअरची चेन आहे ती म्हणजे लाडुरी (laduree) ही. पण त्यांची किंमतही खूप जास्त असते. थेवेनिन पॅटिसरीला पॅरिसमध्ये तिस-या क्रमांकाच्या पॅटिसरीचे बक्षीसही मिळाले होते म्हणून मित्राच्या शिफारशीमुळे तिकडे गेलो. हिरवे दिसतात ते पिस्त्याचे, पिवळे हेझलनटचे, गुलाबी स्ट्रॉबेरीचे आणि ब्राउन अर्थातच चॉकलेटचे. यात एवढे स्पेशल ते काय? तर बाहेरून थोडा क्रंची पण आत थोडे गुई, थोडे च्युईंगगमसारखे (थोडेसेच) टेक्श्चर. शिवाय मूळ फ्लेवरची चव तर आहेच. अतिशय सुंदर चव.

फलाफल, हमस आणि पिटा: पिटा म्हणजे एक प्रकारचा ब्रेड. जाड आणि वर्तुळाकार. त्याच्या मध्ये खाच पाडून त्यात हमस्/हुमुस अर्थात छोले पेस्ट विथ दही, ताहिनी (तिळाचा सॉस), लसूण, इ. चे मिश्रण आणि फलाफल म्हणजे छोले भजी. क्लासिक मिडल ईस्टर्न डिश, तुफान लोकप्रिय, सिंपल, हेल्दी आणि चवदार.
बाकीही काही पदार्थ खाल्ले, पण ते तितके खास वाटले नाहीत. नाही म्हणायला जिंजरेल नामक पेय ट्राय केले. चव सुंदरच. एकुणात माझे मत असे झाले की युरोप-अमेरिकेत सर्व प्रकारचे उत्तम आणि स्वस्त जेवण मिळते. शाकाहारी पर्यायही खूप उपलब्ध आहेत.
निखिल बेल्लारीकर