चित्रलेखा चौधरी
मेक्सिकोला जायचं ठरलं तेव्हा उत्साहाबरोबरच मनात थोडी धाकधूक होती. आधी जमैकाला जाऊन आल्यामुळे पॅकिंगचा थोडासा अनुभव होताच, पण तरी मेक्सिकोला काय मिळते,काय जेवण असते याबद्दल गुगलवर शोधणं चालू केले. तिकडे चिकन, मटण, मासे खात असतील याचा अंदाज होता पण गुगलवर शोधल्यावर कळलं की मेक्सिकोत चित्रविचित्र किडेदेखील खातात. पण मी चिकन आणि कधीतरी मटण आणि मासे खाते आणि शिवाय सोबत नेलेल्या आपल्या डाळी, मसाले असतीलच हा विचार करून मी निश्चिंत होते.
तब्बल ३० तासांचा प्रवास करून आम्ही मेक्सिकोला पोहोचलो. तिथे माझ्या नव-याचा मित्र आम्हाला घ्यायला आला होता, आधीच घराची सोय करून ठेवली होती त्यामुळे काही अडचण नाही आली. दुसऱ्या दिवशी रविवार होता. आम्हाला मेक्सिकोमध्ये सगळेच नवीन होते त्यामुळे धीरजच्या मित्रासोबतच आम्ही बाहेर गेलो. तिथे मार्केटमध्ये गेल्यावर लक्षात आले, अरेच्या! इथे तर भाजी मंडई, खाण्याचे स्टॉल्स, कपड्यांचे स्टॉल्स, बऱ्यापैकी सगळे आपल्यासारखेच आहे. आम्ही पहिल्यांदा चिकन टाको विथ साल्सा खाल्लं आणि ते मस्त होतं.
फार फार वर्षांपूर्वी मेक्सिकोमध्ये मायन आणि अझ्टेक संस्कृती होती. अझ्टेक लोक त्यांच्या पदार्थांमध्ये साध्या मिरचीचा वापर करत होते. त्यांच्या आहारामध्ये कॉर्न, कडधान्यं, वेगवेगळ्या रंगांच्या सिमला मिरच्या, टोमॅटो, रताळी, स्क्वॅश, हर्ब्ससोबतच टर्की, हरीण, ससा, वेगवेगळे लहान पक्षी यांचा समावेश होता. कॉर्न, हिरवी-पिवळी-लाल-केशरी सिमला मिरची, साधी मिरची, चॉकलेट यांचा जन्म तर मूळ मेक्सिकोमधलाच. १५२१ साली स्पॅनिश लोकांनी मेक्सिकोवर हल्ला केला. त्यानंतर साधारणपणे ३०० वर्ष स्पेनने मेक्सिकोवर राज्य केले तेव्हा कॉर्टेझ नावाच्या स्पॅनिश प्रवाशाकडून मेक्सिकोमधील मूळ लोकांना चिकन, मटण, बीफ, पोर्क, चीज यांची ओळख झाली आणि त्याचबरोबर स्पॅनिश लोकांना मायन आणि अझ्टेक लोकांकडून शेंगदाणे, चॉकलेट, अवोकाडो, कॉर्न, मिरची अशा काही पदार्थांची ओळख झाली. मेक्सिकन लोकांनी स्वातंत्र्य मिळवले त्यादरम्यान मेक्सिकन लोकांवर स्पॅनिश संस्कृतीबरोबरच स्पॅनिश पदार्थांचा देखील जास्त प्रभाव झाला. अशाप्रकारे हळू हळू ओरिजिनल मायन आणि अझ्टेक संस्कृती, स्पॅनिश, फ्रेंच, अमेरिकन खाद्यसंस्कृती मिळून मेक्सिकन खाद्यसंस्कृती तयार झाली.
आपल्या भारतात जसे प्रत्येक राज्याच्या खाण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तशाच मेक्सिकोच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. जसे उत्तरेला मीट (बीफ, पोर्क, टर्की, डक) आणि दक्षिणेला चिकन आणि काही भाज्या हे कॉमन आहे. संपूर्ण जगामध्ये मेक्सिको हे तिथल्या टकीलासाठी प्रसिद्ध आहे. आगावे(एक प्रकारचे निवडुंग)च्या रसापासून टकीला बनवतात जी मेक्सिको आणि मध्य मेक्सिकोच्या हवामानाला अनुकूल आहे. मेक्सिकोमध्ये विकसित शीतपेयाचे उद्योग मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे सोडा हे तेथील लोकप्रिय पेय आहे. पण साध्या सोड्याऐवजी मेक्सिकन लोक फ्रुट-फ्लेवरचे सोडा, फ्रुट-फ्लेवरचे पाणी आणि ताज्या फळांचा रस पिणे जास्त पसंत करतात.
मेक्सिकोमध्ये लोकांचे जेवण हे त्यांच्या उत्पन्नावर आधारित आहे. कामगार वर्गातील लोकांच्या आहारामध्ये तांदूळ, सोयाबीन, टोमॅटो, पेपर, पोर्क, कॉर्न किंवा गव्हापासून बनवलेले तोर्तीया यांचा समावेश असतो तर मध्यम आणि उच्च वर्गामध्ये अमेरिकन, युरोपियन पदार्थांचा समावेश असतो. कॉर्न पासून मेक्सिकन लोक पोझोल (एक प्रकारचे चवीला अतिशय छान असे सूप ), अतोले (गरम कॉर्न पासून बनवलेले चॉकलेट, वॅनिला, कॉफी, आणि वेगवेगळ्या फळांचा स्वाद असलेले पेय, टाको, तोर्तीया असे बरेच पदार्थ बनवतात. तोर्तीयाचा वापर केसदिया बनविण्यासाठी करतात, तर टाकोपासून बरेच पदार्थ बनवता येतात जसे चिकन टाको, बीफ टाको, फिश टाको, चीज टाको. अहाहा ! चीझ टाको अप्रतिम अगदी…छान गरम गरम टाको त्यावर त्यांचे वेगवेगळे प्रकारचे चीज आणि त्यावर ग्रीन आणि रेड साल्सा म्हणजे तर अगदी पर्वणीच…पूर्वीच्या काळी आपल्याकडे जसे चूल वापरायचे तसेच ते देखील चूल त्याचप्रमाणे लोखंडी तवे वापरायचे.आणि साल्सा तयार करण्याकरता किंवा एखादी पेस्ट तयार करण्याकरता पाटा-वरवंटा वापरायचे आणि अजून देखील मार्केटमध्ये गेल्यावर ब-याच स्टॉल्सवर पाटा-वरवंट्याचा सर्रास वापर होताना दिसतो. खेडेगावामध्ये तर अजूनही रोज त्याचा वापर करतात.
बऱ्याचदा सकाळी माझा नवरा ऑफिसला निघाला की मी खास त्याच्याबरोबर ऑफिसपर्यंत जायचे कारण तिकडे सकाळी लागलेले नाश्त्याचे आणि ज्यूसचे स्टॉल्स. तिथे सकाळी ६ वाजल्यापासूनच गल्लोगल्ली स्टॉल्स लागतात त्यामधल्या टाकोचे वेगवेगळे प्रकार, चुरोज, हॉर्चाता, फ्राईड एग, मेक्सिकन पोटॅटो ऑम्लेट असे बरेच पदार्थ असतात आणि ज्यूसचे स्टॉल्स असतात. मी नाश्ता क्वचितच केला पण मी ज्यूससाठी खास जात असे… मॉर्निंग वॉकही व्हायचा आणि त्यानंतर आपल्यासमोर काढलेला ताज्या फळांचा मस्त फ्रेश ज्यूस व्वा… मेक्सिकोमध्ये जेवढ्या लोकांना भेटले त्यापैकी बहुतेक लोक घरी जेवण बनवतच नाहीत. नाश्ता, लंच, डिनर सगळे बाहेरच करतात. हो पण त्यांचा सण असला की ते घरी स्वयंपाक करतात.
प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी मेक्सिको सिटीमध्ये बाजार भरतो आणि विशेष म्हणजे इतर लोकांसोबत उच्च मध्यम वर्गातील लोकसुद्धा तिथे बाजार करायला येतात. त्या बाजारात कपड्यांपासून ते फळे, भाज्या, चिकन, फिशपर्यंत सगळेच मिळते आणि सकाळी गेलो तर अगदी फ्रेश. मेक्सिकोमध्ये फळं खूप छान मिळतात. संत्री तर अशी मिळतात की खाऊन पोट तर भरते पण मन कितीही संत्री खाल्ली तरी भरणार नाही. आणि आंबा तर जणू काही हापूस आंबाच, कदाचित त्यापेक्षाही अतिशय गोड…
मेक्सिकन लोक कशावरही लिंबू आणि लाल मिरची खाऊ शकतात पण त्यांची लाल मिरची अजिबात तिखट नसते त्याला एक वेगळीच छान चव असते. ते आंबा, चिंच, बिअरमध्ये देखील मिरची आणि लिंबू घेतात. आपण जर आपल्या आंब्यावर लिंबू-मिरची घेऊन ट्राय केले तर कदाचित आपल्याला आवडणार नाही पण तिकडे ते छान लागते त्यांच्या मिरचीची चवच वेगळी असते… आइस्क्रीममध्येही लिंबू, (लेमन झेस्ट, लिंबाचा रस, साखर, पाणी, चवीनुसार मीठ घालून लाकडी पॉटमध्ये हाताने फिरवलेले) आणि चिली फ्लेवर असतात, मी तर त्या लिंबाच्या आइस्क्रीमच्या प्रेमातच पडले होते. बिअरमध्येही लिंबू, मिरची, टोमॅटो सॉस, सोया सॉस मिक्स करून पितात.
आपल्याकडे जसे वरूण म्हटलं की इंद्रदेव, सूर्य म्हटलं की अग्निदेव असं मानून त्यांची पूजा केली जाते तसेच मेक्सिकोमध्येसुद्धा आहे. मेक्सिकन लोक धार्मिक आहेत. तिकडे विशिष्ट सणाला विशिष्ट पदार्थ करतात. तिकडे देखील बरेच सण साजरे केले जातात. २ फेब्रुवारीला एक लोकप्रिय धार्मिक सुट्टीचा दिवस-डाया दे ला कॅन्डेलरीआ (Candlemas) असतो त्यादिवशी मेरीचे शुद्धीकरण करतात आणि येशू कडून आशीर्वाद घेऊन घरातील सगळी मित्र-मंडळी तमाले (tamale) वर ताव मारतात. तमाले ही एक पारंपरिक मेसोअमेरिकेन डिश असून कॉर्नपासून बनवलेल्या स्टार्ची डोमध्ये (कणीक) आवडीप्रमाणे चिकन, मटण, बीफ, फळे, भाज्या, चीज एकत्र करून त्याचं सारण केळीच्या पानामध्ये किंवा कॉर्नच्या सालांमध्ये वाफवले जाते आणि खाताना वरचे केळीचे किंवा कॉर्नचे साल काढून टाकून आतले तमाले आवडीप्रमाणे सॉस घालून सीझन केले जाते. २ नोव्हेंबरला डे ऑफ द डेड हा हॅलोवीन सारखा सण साजरा केला जातो, यावेळी अंडी आणि साखर मिक्स करून बनवलेला गोड ब्रेड (पॅन दे मूएर्तो) खातात. ख्रिसमसला रोमेरितोस (रोजमेरीबरोबर सॉस आणि बटाटे), बकलाव, टर्की, सुकलेले कॉडफिश शिजवून टोमॅटो, ऑलिव्ह आणि कांद्याच्या सॉसबरोबर सर्व्ह करतात. सप्टेंबरमध्ये सेंट्रल मेक्सिकोमध्ये जमून चिले एन नोगाडा (पोब्लानो चिले स्टफ विथ व्हाइट वॉलनट सॉस, लाल डाळिंब, आणि पार्स्ले ) खातात. हा पदार्थ मेक्सिकन ध्वजासारखा दिसतो.
मेक्सिकोमध्ये इतक्या छान छान वस्तू मिळतात कि ज्यांना विंडो शॉपिंग आवडत असेल त्यांना तर अख्खा दिवशी कमीच पडेल. हाताने बनवलेले नेकलेस, शाली, कानटोप्या, वॉल म्युरल्स अशा सगळ्या गोष्टी इथे फार सुरेख मिळतात.
अवोकाडोपासून ग्वाकोमोल हा साल्सा बनवतात हा साल्सा कुरकुरीत टाकोबरोबर खातात. मेक्सिकोमध्ये कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यावर हे कुरकुरीत टाको त्याबरोबर ग्वाकोमोली, रेड, ग्रीन साल्सा हे प्रत्येक जेवणाबरोबर दिलं जातं.
आम्ही एकदा रविवारी पार्कमध्ये फिरायला गेलो होतो. मेक्सिकोमध्ये पार्क खूप आहेत आणि पर्यटन स्थळ असल्यामुळे रविवारी नेहमीच तिथे सुवेनिएरचे स्टॉल्स, खाण्याचे स्टॉल्स असतात. त्यादिवशी आम्ही फिरत होतो, सगळे लोक काहीतरी हिरव्या रंगाच्या पापडावर चीज आणि सगळ्या प्रकारचे साल्सा घेऊन खात होते आम्ही तो पदार्थ खाऊन बघू असे ठरवले आणि घ्यायला गेलो तेव्हा कळले की तो हिरवा पापड हिरव्या कॉर्नपासून बनवलेला आहे त्यावर उकळलेला राजमा पसरवून त्यावर वेगवेगळे साल्सा, चीज, कॅक्टस, कोथिंबीर घालून सजवतात आणि मग खातात. छान लागतो चवीला… बरेच जण त्यावर फ्राय केलेले किडे-नाकतोडे घेऊन अगदी आवडीने खात होते. डिस्कवरीवर बघितले होते मेक्सिकन लोक किडे खाताना तेव्हा विचित्र वाटले होते पण मेक्सिकोमध्ये गेल्यावर काहीच वाटले नाही कारण ते त्यांचे एक प्रकारचे खाद्यच आहे, आणि त्यावरही लिंबू,मिरची घेऊन आपण भेळ खातो तसे अगदी आवडीने खातात.
आम्ही Chichen Itza- सन पिरॅमिड आणि मून पिरॅमिड बघायला गेले होतो त्यावेळेस हॉटेलमध्ये धीरजच्या मित्राने मुंग्यांच्या अंड्यांची भाजी ( अंडी, कॅक्टस, कोथिंबीर मिक्स करून तेलावर फ्राय करतात ) मागवली होती, मेक्सिकोमध्ये ही अंडी सिझनमध्येच मिळतात. लुद्विग (धीरजच्या मित्राचे नाव) टाकोवर ती भाजी, ग्रीन-रेड साल्सा,चीज घेऊन खात होता. मला मेक्सिकन खाद्यपदार्थांपैकी केसदिया आणि हॉर्चाता जास्त आवडले, मेक्सिकोत असताना मी ब-याचदा केसदिया करायची आणि तो खूप छान व्हायचा पण इथे बनवला तेव्हा त्याची जी ओरिजिनल टेस्ट आहे ती नाही आली कारण त्यात वापरण्यात येणारे चीज. मेक्सिकोमध्ये केसदियासाठी वेगळे ( oxaca चे ओरिजिनल चीज )चीज वापरतात. हॉर्चाता बनवल्यावर मला मेक्सिकोमधल्या Casa de Tono या हॉटेलमधली चव आठवली, एकदम मस्त हॉटेल होते. तिथे पोझोले आणि हॉर्चाता छान मिळते अगदी.
हॉर्चाता रेसिपी
साहित्य:-
१. १/२ वाटी तांदूळ
२. १ लिटर पाणी
३. १ ते २ कप दूध /कंडेन्सड मिल्क
४. दालचिनीची पावडर
५. थोडा वॅनिला इसेन्स
६. साखर चवीनुसार
कृती:-
१. प्रथम तांदूळ धुवून तांदूळ आणि पाणी, तांदूळ थोडे जाडसर राहतील अशाप्रकारे मिक्सरमधून फिरवून घ्यावे.
२. वरील मिश्रणामध्ये दालचिनीच्या २ काड्या घालून कमीत कमी १२ तास फ्रिजमध्ये ठेवून द्यावे.
३. त्यांनतर त्यामध्ये दूध, साखर, वॅनिला घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आणि अजून थंड हवे असल्यास बर्फ घालून सर्व्ह करावे.
४. कंडेन्स्ड मिल्क वापरणार असाल तर साखर घालायची आवश्यकता नाही. बनवायला सोपे आणि चवीला अतिशय मस्त.
चित्रलेखा चौधरी
नवीन नवीन रेसिपी ट्राय करायला,गाणी ऐकायला,आणि फिरायला आवडते. इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं आहे.
फोटो – चित्रलेखा चौधरी व्हिडिओ – YouTube
अंक वाचून मजा आली. बटाट्याची गंमत व केरळ चा अनुभव आवडले.
LikeLike
आवडली ही माहिती, रंगबिरंगी, वेगवेगळ्या वासांची नि चवींची. हाॅर्चाताच्या रेसिपीत तांदूळ कच्चेच ठेवायचे असतात का?
LikeLike
Thank you…ho tandul kachhec astat
LikeLike