वर्षा नायर
दुबईत जेव्हा नवीन आले, १६ वर्षांपुर्वी तेव्हा माझ्या घराच्या शेजारीच लेबनीज (लेबनान देशातील) स्वीट्स शॉप होते. मी लग्न करून नुकतीच आले असल्याने लोक घरी जेवायला बोलावत. कधी ईदचे आमंत्रण तर कधी अजून काही. मग जाताना काहीतरी स्वीट घेऊन जावे म्हणून मी त्या शॉपमध्ये जायचे. खूप आकर्षक मांडणी होती, ज्याची कुणालाही भुरळ पडेल. आणि गिफ्ट देण्यासाठी अतिशय सुंदर आकर्षक पॅकेजिंग. म्हणजे आतील पदार्थ तर सुंदरच पण पॅकेजिंग त्याला चार चांद लावायचे.
इथे मिळणारे गोड पदार्थ हे आखाती देश, त्याच प्रमाणे मेडिटरेनिअन (भूमध्यसागरीय प्रदेश ) भागातील आहेत. इजिप्त, टर्की, इराण, लेबनान आणि अरबस्तान. पदार्थ साधारण सारखे असले तरी प्रत्येक देशात तेथील भाषेप्रमाणे त्यांचे अपभ्रंश झाले आहेत. म्हणून या पदार्थांचे एक नाव नाही. मी अनेकांना नावे विचारली पण प्रत्येक जण नावे वेगवेगळी सांगतो. त्यांच्या येथील भाषेप्रमाणे. कारण या मिठाया वरील नमूद केलेल्या सर्व प्रदेशात मिळतात. एवढेच कशाला भारतातील बहुतांश गोड पदार्थ आणि मिठाया यांचे उगम स्थान हे आखाती देश आणि मेडिटरेनिअन देश आहेत.
एक एक पदार्थ खाऊन बघितला आणि लक्षात आले की आपण जे पारंपरिक पदार्थ बनवितो हे पदार्थ त्यांच्याशी अगदी साधर्म्य असणारे आहेत. काहींची तर नावेदेखील सारखी आहेत. उदा. शक्करपारा (हे इराणी म्हणजेच पर्शियन स्वीट आहे, त्याचे अपभ्रंश मराठीत शंकरपाळे असे झाले) , गुलाबजामून (जामून शब्दाचे ओरिजिनदेखील अरेबिक शब्दात आहे), गाजर हलवा (हलवा शब्द अरेबिक आहे), जलेबी (हा शब्द देखील पर्शियन आणि अरेबिक आहे) , करंजी, चिरोटे.
हे बरेचसे पदार्थ मैदा आणि सुकामेवा (ड्राय फ्रुटस) यांचा वापर करून बनवले जातात.
१. उम्म अली — हे इजिप्शिअन स्वीट पेस्ट्री पुडिंग आहे
२. बसबुसा — हा स्वीट केक आहे आणि ह्यात ड्राय फ्रुट्सचे टॉपिंग असते, हे नाव इजिप्शिअन आहे. सीरिया, तुर्कस्तान आणि बाकी देशात वेगळे नाव आहे.
३. कुनाफेह — हा मिडल ईस्टर्न पदार्थ आहे ज्याचे टॉपिंग पिस्त्यांनी करतात. हा पदार्थ चीज केकचे आखाती व्हर्जन आहे.
४. बकलावा – हा टर्किश पदार्थ आहे.
५. मामूल — ह्या कुकीज असतात.
६. कताईफ़ — करंजीसारखा आणि त्याच आकाराचा हा पदार्थ आहे .
दुबईत नॅशनल डेला आमच्या ऑफिसला मोठे मंडप बांधले जातात त्यात विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल्स असतात आणि आपल्यासमोर गरमागरम हे पदार्थ बनवितात. जलेबी, गुलाबजाम, करंज्या , चिरोटे (अर्थात लोकल नावे थोडी वेगळी असतात) हे पदार्थ पण त्यात असतात.
वर्षा नायर
दुबई
तोंडाला पाणी सुटल मिठाया बघून.😋
LikeLike
मस्त. टर्किश डिलाइट माझ्या फार आवडीचं.
LikeLike