कॅनडातल्या आईस वाईन

सतीश रत्नपारखी

वाईन इतक्या प्रकारच्या असतात की त्यातल्या एका वाईनबद्दल काही चांगलं लिहिलं तर दुसऱ्या वाईनला राग येईल की काय असा प्रश्न पडतो! असो. आईस वाईन ही अत्यंत महागडी वाईन असते आणि तेवढीच चवदार सुद्धा .

कॅनडामध्ये ओन्टारियो प्रांतात आइस वाईनची निर्मिती खूप प्रमाणात होते. तशी ती जर्मनी, क्रोएशिया, ऑस्ट्रिया, झेक रिपब्लिक,  फ्रान्स, हंगेरी, इटली, लक्झेम्बर्ग, पोलंड, रुमेनिया, स्पेन आणि स्वित्झर्लंड या युरोपातल्या देशांबरोबरच अमेरिका तसंच जपानमध्येही आईस वाईन बनवली जाते. आईस वाईन ही डीझर्ट वाईन असल्यानं ती जेवण संपल्यावर पितात. मी ज्या वाईनरीत गेलो तिथे सुरूवातीला वाईनरीच्या वाईन टेस्टरनं आम्हाला सविस्तर माहिती दिली.

पहिली आईस वाईन कॅनडामध्ये १९७८ मध्ये बनवली गेली आणि आज कॅनडा आईस वाईनच्या उत्पादनात  प्रथम क्रमांकावर आहे. कॅनडामधल्या नायगारामध्ये जो पठाराचा भाग आहे आणि जिथे खूप स्थिर तापमान आहे अशा भागात ही वाईन बनवतात. आम्ही बघितलेला हा भाग ऑक्टोबरच्या सुमारास पण खूप थंड होता. या ठिकाणी नेहमीच खूप जास्त थंडी असते आणि त्यामुळेच तिथे आईस वाईन बनायला योग्य नैसर्गिक वातावरण मिळतं. कॅनडामध्ये आँटेरियो, क्युबेक, ब्रिटिश कोलंबिया आणि नोव्हा स्कॉशिया या प्रांतात आजकाल ही आईस वाईन बनते.

आईस वाईन बनायला सर्व साधारण – ७ डिग्री सेल्शिअस तापमान लागतं,  पण हे प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी थोड्याबहुत फरकाने वेगवेगळं असते. आईस वाईनमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे, आणि ते मिळवण्यासाठी फर्मेंटेशन हळू होणे फार गरजेचे असते. इतर प्रकारांच्या वाईनचं जर काही आठवड्यात फर्मेंटेशन होत असेल तर आईस वाईनला काही महिने लागतात. फर्मेंटेशनसाठी एक विशिष्ट प्रकारचे यीस्ट वापरले जाते. हे यीस्ट वापरून बनवलेल्या वेगवेगळ्या वाईनची वेगवेगळी चव ही  प्रत्येक वाईनरीची बिझनेस ट्रेड सिक्रेट असते. दोन चवी मिसळून नवी चव बनवण्याची पद्धतसुद्धा खूपच अवघड असते. एका झाडावर दुसरे रोप ग्राफ्ट करून हे नवीन रूप आणायला बरीच कसरत दिसली

तुमच्या डिनरमध्ये जर आईस वाईन असेल, तर तुम्हाला तुमचे डीझर्ट हे कमी गोड बनवणे भाग आहे,  कारण त्या नंतर तुम्हाला आईस वाईन प्यायची आहे. पण काही आईस वाईनच्या व्हरायटीज तर स्टार्टर म्हणून आणि केव्हाही घेऊ शकतात, त्या बरोबर चीज मस्त लागतं. आईस वाईन बर्फानं भरलेल्या बकेटमध्ये दोन तास ठेवून थंड करून प्यायची असते. डीझर्ट वाईन ही कमी प्रमाणात प्यायची असते.

आम्ही नायगारा जवळच्या वाईनरीला भेट दिली. नायगारा फॉलचे रौद्र रूप पाहून डोळे तृप्त झाले आणि लगेचच आम्ही वाईनरीला गेलो. वाईन टेस्टिंग हा एक मस्त प्रकार असतो. आधी ग्लासमध्ये वाईनचा रंग पाहायचा असतो, वाईन किती पारदर्शक आहे त्या वरून ती किती उच्च प्रतीची आहे हे कळतं, मग वाईनचा वास घ्यायचा आणि जर वास हा मंद असेल तर जास्त छान,  मग ग्लास हळूहळू फिरवावा आणि तसा तसा वास वाढायला हवा तर प्रत चांगली,  त्यानंतर, एक घोट वाईन जिभेवर घेऊन तोंडात घोळवावी  लागते आणि नंतर हळूहळू तिचे घोट घ्यावेत. या पूर्ण प्रक्रियेत वाईनची चवही टप्याटप्यानं कळते . सगळ्यात मृदू वाईन ही सुरवातीला टेस्ट करायला देतात आणि जशी जशी तीव्रता वाढते त्याप्रमाणे बाकीच्या वाईन टेस्ट करून सर्वात शेवटी आईस वाईन टेस्ट करायला देतात.

टेस्टिंग झाल्यावर खरेदीची उर्मी अटळच की. आम्ही मग रिझलिंग वाईन घेतली आणि ती जावयाच्या आणि मुलीच्या वाढदिवसाला वापरून सद्कारणी लावली. आजही आईस वाईनची चव आठवते आणि मुख्य म्हणजे वाईन टेस्टिंग हे सौभाग्यवतीसह केल्यामुळे पुढे वाईनच्या खरेदीत थोड्याबहुत प्रमाणात कायमचीच मदत झाली हेही नसे थोडके.

सतीश रत्नपारखी

14925277_470092703177005_7863792099058737244_n

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s