मुळारंभ आहाराचा

मेधा कुळकर्णी

आम्ही चौघीजणी भोजनगृहात आपापली जेवणाची ताटं घेऊन बसलो होतो. एक गरम भाकरी. सोबत खूपशी ओली हिरवी चटणी, मोठी वाटी भरून शेवग्याचं सूप, तेवढ्याच वाटीत मधुर चवीचं ताक, आणखी एक वाटी भरून तोंडल्याची रसदार भाजी, आमच्यातल्या एकीला भाकरीसोबत लोणीही मिळालं होतं. दोन- तीन घासांची चव घेतल्यावर आमचे शेरे सुरू झाले. सगळं तसं बरं आहे…..पण….! एकीला, त्यात किंचित तरी मीठ हवंसं झालं होतं. मला हिरव्या मिरचीची आठवण येत होती. कुणाला फोडणी आणखी चालली असती… वगैरे. चटणी मात्र सगळ्यांनाच पसंत पडली होती. हे २०११ सालच्या मार्च महिन्यात उरूळीकांचनच्या निसर्गोपचार आश्रमात घडलं.

फिटनेसकडे लक्ष देण्याचा काळ

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एकदा तरी येते, तीच वेळ माझ्याही आयुष्यात आली होती. स्वत:च्या फिटनेसकडे लक्ष देण्याची ! स्वेच्छानिवृत्तीनंतरचा काळ हा एकूणच स्वतःकडे लक्ष देण्याचा ठरला. पन्नाशी उलटली होती. आहार-विहारातल्या चुका दुरुस्त करायला हव्यात, असं तीव्रतेने वाटत होतं. ऋजुता दिवेकरची पुस्तकं गाजत होती. मलाही फिटनेसशास्त्र समजून घ्यावंसं वाटू लागलं होतं. एरवी, रोजच्या आहारात शरीराला अपायकारक असं काही नव्हतंच. शाकाहार, त्यात पोळी, भात, भरपूर भाज्या, कोशिंबिरी हेच मुख्य जेवण. तळण जवळपास नाहीच. गोड पदार्थ प्रासंगिक. हॉटेलिंग क्वचितच.

व्यायामाचा मात्र अभाव होता. उदरनिर्वाहासाठी आणि घराच्या व्यवस्थापनासाठी करावी लागणारी ऊठबस सोडल्यास मी शरीराला फार तोशीस दिली नव्हती. मुळात पिंड बैठेपणाकडे झुकणारा. घरात वाचनाचा वारसा होता. व्यायामाचा नव्हता. नोकरी सोडल्याने रोजचं रेल्वेने जाणं-येणं बंद झालेलं. त्या प्रवासाचा ताण एकदम संपला. साहजिकच सकाळी सावकाशीने उठणं, चहापान, वृत्तपत्र वाचन असं सुरू केलं. ‘संपर्क’च्या काही कामांची जबाबदारी, त्यासाठीचे दौरे इत्यादी सुरू होतंच. पण ऑफिसची रोजची धावधाव नव्हती. त्यामुळे शरीर आळसावायला सुरुवात झाली. सकाळी उठल्या-उठल्याच मला कंटाळवाणं, क्वचित विफल वाटू लागायचं. त्याला काही खाजगी, कौटुंबिक कारणंही होती. पण ती माझ्या नियंत्रणापलीकडची होती. दिनक्रम बेशिस्तीचा होऊ लागला. मला त्यावर नियंत्रण आणायचं होतं.

imag0046

पाहू तर खरं जाऊन..

आळसाची, वाढत चाललेल्या वजनाची चर्चा एकदा माझ्या मुलीशी, नेहाशी करत होते; तेव्हा तिने ‘समोरच आणि इतक्या जवळ’ असलेल्या जिममध्ये नाव घालायचं सुचवलं. आणि तिचं म्हणणं मी ताबडतोब मनावर घेतलं. ती फिटनेसच्या बाबतीत तत्पर आणि अभ्यासू आहे. जिम हे मला नव्या काळातलं नवश्रीमंतांचं चंगळवादी फॅड वाटायचं. पण आता “पाहू तर खरं जाऊन…” असं वाटलं. आणि मी हळूहळू तिथे रमूनच गेले. शिस्तशीर व्यायामाने शरीर-मनाला बरं वाटायला सुरुवात तर झालीच. पण तिथे फिटनेसविषयीच्या बर्‍याच चर्चा चालायच्या. त्या मी कान देऊन ऐकू लागले.

व्यायामातली शिस्त डायटमध्येही आणली पाहिजे, असं वाटू लागलं. दरम्यान एक नातलग बाई भेटल्या. त्या नुकत्याच उरूळीकांचन इथल्या निसर्गोपचार आश्रमात राहून परतल्या होत्या. तिथे किती छान वाटलं, पोट कसं डिटॉक्स झालं वगैरे ऎकून तिथे जावंसं वाटायला लागलं. माझ्यासाठी ते ठिकाण अपरिचित मुळीच नव्हतं. माझी धाकटी बहीण सुजाता तिच्या कॉलेजकाळात तिथे चांगली महिनाभर राहून आली होती. त्याही आधी माझी आजी, काका, वडील, चुलत भाऊ वगैरे तिथे अनेकदा जात असत. त्या सगळ्यांना भेटायला मी आश्रमात दोनतीनदा तरी गेले होते. आणि तिथे त्या सगळ्यांच्या शिफारसीवरून भाकरी आणि तिथली सुप्रसिद्ध चटणी खाल्ली होती. चटणीचा स्वाद चांगला लक्षातही राहिला होता. आता माझी तिथे जाण्याची वेळ आली होती.

आश्रमात बुकींग मिळालं

त्यांची https://nisargopcharashram.org/ ही वेबसाईट पाहिली. माहिती वाचताना तिथे जाऊन राहण्याचा अनुभव घ्यायलाच हवा असं वाटू लागलं. वेबसाईटवरून कळलं की तिथे तीनतीन महिने आधी बुकींग करावं लागतं. आम्हांला मार्च महिन्यातल्या पहिल्या आठवड्यातलं बुकींग मिळालं. दरम्यान आमच्या कॉलनीत आम्ही सुरू केलेल्या एका आंदोलनाने निर्णायक वळण घेतलं होतं. कॉलनीतल्याच मैदानात एका राजकीय नेत्याने त्याच्या खाजगी ट्रस्टमार्फत सुरू केलेल्या रहिवाशांसाठी त्रासदायक ठरलेल्या यज्ञाविरोधातलं आंदोलन होतं ते. आंदोलनात माझ्याबरोबरीने पुढाकार घेणारी माझी ज्येष्ठ मैत्रीणदेखील माझ्यासोबत उरूळीला येणार होती. आंदोलन सोडून आम्ही जाऊ नये, असा आग्रह आमच्या गटातल्या काहींनी धरला. मात्र माझ्यापुढे स्वतःचा फिटनेस हेच ध्येय होतं. आणि तेव्हाची संधी हुकली, तर पुन्हा तीन महिने तिथे प्रवेश मिळणार नव्हता.

उरूळीकांचन हे गाव पुण्यापासून ३० किमी अंतरावर, पुणे-सोलापूर रस्त्यावर आहे. शिवाय इथे त्याच मार्गावरचं रेल्वे स्टेशनही आहे. बस आणि रेल्वेने जायला सोपं, हे लक्षात घेऊनच गांधीजींनी हे ठिकाण आश्रमासाठी निवडलं. निसर्गोपचार ही आता काही नवी गोष्ट राहिलेली नाही. उलट आता फिटनेस मार्केटमध्ये ती लोकप्रिय ठरली आहे. पण उरूळीचा निसर्गोपचार आश्रम हा खुद्द गांधींजींनी सुरू केलेला असणं, हे माझ्या जिव्हाळ्याचं होतं.

img_20150325_112015

गांधीजींची प्रयोगशाळा

गांधींना स्वतःला वेळोवेळच्या आजारपणात निसर्गोपचाराचा गुण आलेला, आहारविहारात बदल घडवण्यास प्रवृत्त करत त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना आजारातून बरं केलेलं, आरोग्य आणि पूरक आहार यात गांधीनी केलेलं संशोधन, प्रयोग, आहारात पाण्याचं प्रमाण किती असावं इथपासून त्यांनी केलेला बारीक विचार, महागडा ऍलोपथी उपचार गावातल्या गरिबांना परवडणार नाही म्हणून त्यांच्यासाठी पर्यायी उपचारपद्धती विकसित करण्यासाठी त्यांचा आग्रह, त्यांना शरीरशास्त्र समजावून सांगण्याची त्यांची तळमळ, रोगाच्या कारणांपासूनच दूर राहणं हीच निरोगी राहण्याच्या प्रयत्नांची पहिली पायरी आणि त्यात आहार सर्वात महत्त्वाचा ही त्यांची मांडणी. आश्रम ही गांधीजींची प्रयोगशाळाच होती.

काय खावं आणि काय खाऊ नये, हे गांधींनी सोपेपणे सांगितलं आहे. ज्या वस्तू नासतात, सडतात, खराब होऊ शकतात, त्या वस्तू बहुधा आरोग्यासाठी चांगल्या असतात. ज्या वस्तू नासत – सडत नाही, खराब होत नाही त्या वस्तू आरोग्यासाठी बहुधा चांगल्या नसतात. आज बनविलेली पोळी, भाकरी, भाजी उद्या बुरशी येऊन खराब होते; म्हणून पोळी, भाकरी, भाजी खाणं आरोग्यासाठी चांगलं. याउलट बिस्किटासारख्या पॅकिंगच्या वस्तू महिनोन्‍ महिने टिकतात, म्हणून त्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत.

कालसुसंगत पद्धती

१९४६ साली सुरू झालेल्या या आश्रमात आजही होणारी गर्दी, प्रवेशासाठीची मोठी प्रतिक्षायादी, तिथे दर वर्षी पुन्हा पुन्हा येणार्‍यांची वाढती संख्या हे सारं आजही ही उपचारपद्धती कालसुसंगत असल्याचा निर्वाळा देणारं.

या आश्रमात दरवर्षी जवळपास सहा हजारांहून अधिक रुग्ण दाखल होत असतात. तेवढ्याच रुग्णांना बाह्यरुग्ण म्हणून उपचार दिले जातात. तिथे दाखल होण्यासाठी तुम्ही एखाद्या आजाराने ग्रस्त असण्याची मुळीच गरज नसते. स्वतःचा फिटनेस वाढवण्यासाठीही तिथे जाऊ शकताच. मी तशीच गेले होते.  प्रवेश घेणारे आश्रमासाठी ‘रुग्ण’ ठरतात. आश्रमाची ख्याती जगभर पसरलेली असल्यामुळे परदेशांतून आणि भारतातल्या विविध राज्यांतूनही इथे लोक येथे येत असतात. प्रत्येकाच्या गरजेनुसार किमान एक आठवडा ते एक किंवा दोन महिने राहायला सांगितलं जातं. माफक शुल्क, सेवाभावी स्टाफ, साधी आणि स्वच्छ व्यवस्था ही इथली वैशिष्ट्यं.

२०११ साली पहिल्यांदा आणि नंतर आणखी तीनदा मी तिथे राहण्यासाठी गेले. माझे स्वतःचे, नातलग, मित्रमैत्रिणींचे अनुभव, तिथल्या स्टाफसोबत चर्चा, तिथल्या ग्रंथालयातल्या पुस्तकांचं वाचन, तिथे येणार्‍या नव्या-जुन्या पेशंट्ससोबत गप्पा आणि माझी निरीक्षणं यावरून मी सगळ्यांनाच तिथे जाण्याची शिफारस करू इच्छिते. गांधीजी सांगतात, ते क्षणभर बाजूला ठेवलं, तरी आपली बदललेली जीवनशैली, त्यामुळे उद्भवणार्‍या व्याधी, शुद्ध हवा-पाणी-अन्न यांचा अभाव, जीवनाच्या सुसाट वेगात होणारी दमछाक या सगळ्या व्यापातापात भौतिक सुविधा भरपूर पण सुख-समाधान-स्वास्थ्य नाही, हे वास्तव नाकारून कसं चालेल? याचाच परिणाम म्हणून या आश्रमात येणार्‍या लोकांचं वय पन्नाशी-साठीवरून विशी-पंचविशीवर आलंय.

ह्रदयविकार, अनियमित रक्तदाब, मधुमेह, दमा, श्वसनविकार, पचनविकार, आम्लपित्त, डोकेदुखी, जुना खोकला, आतड्याचे आजार, संधिवात, लठ्ठपणा, प्रमाणापेक्षा कमी वजन, त्वचारोग, हार्मोन्स असंतुलन, मुलींच्या मासिक पाळीच्या समस्या, श्वेतप्रदर, यांसारख्या शारीरिक व्याधी असलेले बरेच लोक इथे  येतात. इथे दाखल झाल्यावर पहिल्या दोन दिवसांतच आजाराला उतार पडायला सुरुवात होते. शरीर हलकं वाटू लागतं. निवांत व्हायला होतं. प्रसन्नता येते. इथे पंचमहाभूतांना प्रमाण मानून उपचार केले जातात. त्यासाठी माती, पाणी, अग्नी, हवा आणि मोकळी जागा यांचा खुबीने वापर केला जातो. वायुस्नान, सूर्यस्नान, मातीलेपन, पचनक्रिया सुधारण्यासाठी पोटावर मातीचा लेप, रुग्णाच्या तब्येतीनुसार थंड किंवा गरम पाण्यात कटीस्नान, बाष्पस्नान, मालिश असतं. जोडीला अ‍ॅक्‍युप्रेशर, चुंबकीय उपचार, न्युरोथेरपी, सुजोक, ऍक्‍युपंक्‍चर इ. औषधांविना वापरल्या जाणाऱ्या उपचारपद्धतीही असतात. व्याधींवर नियंत्रण येण्यात आहाराचं योगदान तर मोठंच आहे.

आहारप्रकार

इथे आहाराचे विविध प्रकार असतात. रसाहार, फलाहार, कच्चा आहार आणि भोजन. जलपानही महत्त्वाचं. आश्रमात दाखल झाल्याबरोबर आपल्या व्याधी, आहारविहार, सवयी यांची माहिती भरून द्यायची असते. त्यानंतर इथले निसर्गोपचार तज्ज्ञ आपल्याला तपासतात आणि आपल्या गरजेप्रमाणे दिनचर्या आणि आहार लिहून देतात. त्यानुसार आपला तिथला दिनक्रम सुरू होतो. पहिल्या दिवशी जवळजवळ प्रत्येकालाच भोजन घ्यायला सांगितलं जातं. त्यानंतर मात्र नेमून दिल्यानुसार आहार घ्यायचा असतो. सकाळची भोजनवेळ ११ ते १२.३० आणि संध्याकाळची ५ ते ६ असते. पहिल्यांदा तिथे गेले तेव्हापासून संध्याकाळी लवकर खाण्याची मला सवय होऊन गेली, ती सुरूच आहे.

भोजन

भोजनात ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी, गव्हाची पोळी, हातसडीच्या तांदळाचा भात, विविध पालेभाज्या, फळभाज्या, सूप, चटण्या आणि ताक असं आलटून पालटून असतं. किंचित तेलातली फोडणी, माफक मीठ, तिखट जवळपास नाहीच, भाज्या रसदार असं हे जेवण. तिखट-मीठ-फोडण्या-मसाले यांच्या विशिष्ट प्रमाणाचा आग्रह धरणार्‍यांना हे जेवण बेचवच लागतं. पण माझा अनुभव असा की इथल्या जेवणात मूळ अन्नपदार्थांची चवच पुढे असते. म्हणजे, शेवग्याच्या सुपात शेवग्याचाच स्वाद जिभेला जाणवतो. इथे विविध भाज्या बनवतात. दोडका, तोंडली, ढेमसं, शिराळी, घोसाळी, लाल भोपळा, दुधी, पडवळ, वांगी, कार्ली, चवळीच्या शेंगा, नवलकोल वगैरे. मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या नेहमीच्या जेवणातून या यादीतल्या अनेक भाज्या गायब झालेल्या असणार. भाज्या रस ठेवून केलेल्या असतात. त्या रसात भाजीची मूळ चव उतरलेली असते.

img_20150321_114816

सर्व भाज्यांत थोडं ओलं खोबरं, कढीपत्ता आणि भरपूर कोथिंबीर असते. कार्ल्याच्या सुक्या भाजीत थोडा कांदा, बारीक चिरलेलं लिंबूही घातलेलं असतं. या लिंबाचा स्वाद छान वाटतो. पहिले दोन-तीन दिवस या भाज्यांच्या मूळ चवीचं कौतुक वाटतं. नंतर मात्र तोचतोपणा वाटू लागतो. मग आपला जिव्हाधार बनतात सूप आणि चटण्या. शेवगा, मूग, कुळीथ, बीट, लाल भोपळा, टोमॅटोसह मिश्र भाज्या अशी विविध सुपं इथे दिली जातात. सुपांतही मूळ पदार्थाचा स्वाद तीव्र असतो. बाकी सगळं माफक.

इथल्या ताटातल्या चटण्या मात्र सगळ्यांनाच आवडण्यासारख्या. आणि अन्य पदार्थांच्या तुलनेत त्या सढळ हाताने वाढल्यादेखील जातात. ओलं खोबरं, भोपळी मिरची, पालक, भरपूर कढीपत्ता आणि खूपशी कोथिंबीर हे सगळं असलेली हिरवी ओली चटणी छान लागते. भिजवून शिजवलेल्या कुळथाची चटणीही चांगली असते. जवस, कारळं, भाजकं डाळं यांच्या सुक्या चटण्याही चवबदल म्हणून दिल्या जातात. अधनंमधनं मिश्र भाज्यांचा पुलाव, मूगडाळ-तांदूळ खिचडीही असते. आणि सणाच्या दिवशी गुळाचा दलिया किंवा चक्क पुरणपोळ्या! मी आजवर तिथे जास्तीत जास्त दहा दिवस सलग राहिलेय. जेवणात जेव्हा काही निराळं मिळतं, तेव्हा चक्क लॉटरीच लागलेली असते!

काढा आणि रस

imag0053इथे चहा-कॉफी मिळणं अपेक्षितच नाही. मात्र सकाळी ७ आणि दुपारी ३ वाजता काढा मिळतो. आणि तोही भरपूर असतो, गरम असतो आणि चवदार असतो. इथे पहाटे ५ ला उठायचं असतं. आपल्याला नेमून दिल्यानुसार योगासनांच्या वर्गात जाऊन आल्यावर कधी एकदा काढा मिळतो, असं होऊन जातं. गवती चहा, तुळस आणि आलं यांच्या काढ्यात दूध आणि गुळाचा पातळसर पाक घालून हा काढा दिला जातो. गुळामुळे काढा स्वादिष्ट बनतो.

इथे न्याहारी हा प्रकार नाही. कारण जेवण लवकर असतं. पण काढ्यानंतर रसाहार असतो. आपल्याला नेमून दिल्यानुसार दुधी, गाजर, ओली हळद, आवळा, अडुळसा, तुळस, पालक, कार्ली, कडुनिंब, मोसंबी, संत्री, अननस यांपैकी एखाद-दोन रस घ्यायचे असतात. हे सर्व रस ताजे, आपल्यापुढे काढलेलेच असतात. नीरा आणि नारळपाणी पिण्याची वेळही नेमून दिलेली असते.

कच्च्या आहारात अंकुरित मेथीदाणे, मूग, कुळीथ, किसलेलं बीट, गाजर, कोबी किंवा नवलकोल, ओलं खोबरं, पालक, कोथिंबीर, काकडीचे काप, टोमॅटो, लिंबू असं सगळं असतं. फलाहारात आपल्याला सांगितलेली फळं नेमून दिलेल्या वेळी खायची असतात.

ना दावे, ना जाहिराती, फक्त अनुभूती

हा आश्रम स्वतःची जाहिरात कधीच करत नाही. इथल्या वास्तव्याने गुण आल्यामुळे लोक पुन्हा पुन्हा येत असले तरी आश्रम कधी कुठला दावा करत नाही, की फुगवून काही सांगत नाही. उलट निसर्गोपचार पद्धतीच्या मर्यादा वेबसाईटवर, माहितीपत्रकात नमूद केलेल्या असतात. आश्रमाच्या आपुलकीपोटी एखादी व्यक्ती स्वयंप्रेरणेनेच अशी फिल्म बनवते.

इथल्या वास्तव्यात माहीत असलेल्या अनेक गोष्टींची नव्याने अनुभूती येते. मुळात आजार होऊच नये अशी जीवनशैली अंगिकारणं हेच निसर्गोपचाराचं मूलतत्त्व आहे. निसर्गोपचारात आहारालाच औषध मानलं आहे. त्यामुळे आहाराकडे काटेकोरपणे लक्ष द्यायलाच हवं. आश्रमात व्याख्यानं, फिल्म्स वगैरेंमधून हेच समजावून सांगितलं जातं. निसर्गनियम साधे-सरळ असतात. आपण ते पाळले नाहीत की शरीर-मनावर विपरीत परिणाम होतो. भूक लागेल तेव्हाच आणि भूक भागेल तेवढंच जेवणं, सावकाश खाणं, ताजं, गरम अन्न खाणं, प्रक्रिया, कमीत कमी केलेलं अन्न खाणं, तेल-मीठ-साखरेचा मर्यादित वापर वगैरे. पण आपण हे कितीसं पाळतो?

मुळापाशी परतणं

असं स्वतःला प्रश्न विचारणं आणि आपल्या आहारपद्धती तपासून बघणं तिथे सुरू होतं. तिथला मुक्काम संपवून परतल्यावर काही दिवस आपण खूप जागरूक असतो. परतल्यावर लगेचच पूर्वपदावर यावंसं वाटत नाही. पण मग काहीतरी निमित्त घडतं आणि जे टाळायचं असतं ते खाल्लं जातं. हळूहळू आपला निर्धार ढळायला सुरुवात होते. हे तर होणारच असतं. आपणच निर्माण केलेल्या चवीढवीच्या, रंगीबेरंगी खाद्यसंस्कृतीच्या साम्राज्याचा त्याग करण्याची काहीच गरज नसते. पण याच संस्कृतीचा एक भाग – निसर्गनियमानुसार आहार, जो पाळण्यात आपल्याच शरीरमनाचं भलं साधलं जाणार आहे.

उरूळीच्या निसर्गोपचार आश्रमात गांधींनी सुरू केलेली उपचार आणि आहारपद्धती सत्तर वर्षं जुनी असूनही ती आजच्या अत्याधुनिक जीवनशैलीसाठी नेमकी लागू पडते आहे. कारण ते आपल्या खाद्यपरंपरेचं मूळ आहे. तिथे संतुलन आहे. त्या मुळापाशी कधी ना कधी परतणं आपल्याला भाग आहे.

(हा लेख लिहिण्यासाठी मधुवंती खरे यांची मदत घेतली.)

मेधा कुळकर्णी

12717895_10154745519394488_7447913811544931444_n

निवृत्तीउत्तर आयुष्य आनंदाने व्यतीत करत आहे. आकाशवाणी आणि संपर्क संस्थेद्वारे केलेल्या कामाच्या अनुभवाने समृद्ध आहे. आसपासच्या तरूणांच्या नवनिर्मितीविषयी कुतूहल आणि नवा काळ समजून घेण्याची आस्था आहे.

सर्व फोटो – मेधा कुळकर्णी

5 Comments Add yours

  1. mrin says:

    वा मेधाताई, आता खरंच वाटायलंय की लवकरात लवकर जायला हवं इथे. लिहिलंयस इतकं खुमासदार की, वाचतानाही मजा आली.

    Like

  2. राहुल दाभाडे says:

    खुप छान लेख वाचून आनंद झाला
    मला पण जायचंय
    मदत होईल का आपली
    Plz rly

    Like

  3. Archana phatak says:

    WA khup chan Medha tai…me pan nakki janar ahe ata..

    Like

  4. bhagawan laxman jadhav says:

    ggg

    Like

  5. bhagawan laxman jadhav says:

    nice

    Like

Leave a comment